देवर्षिपितृभूतानि लोकपालाः सहानुगाः । पूजितास्तमनुज्ञाप्य स्वधामानि ययुर्नृप ॥२६॥

नारदप्रमुख देवर्षिगण । मरीचिप्रमुख महर्षि जाण । वसिष्ठादि ब्रह्मिष्ठ मान्य । अपर तपोधन भूसुर जे ॥३२॥
कव्यवाट्प्रभृति पितर । भूजलप्रभृति भूतनिकर । अष्टकाष्ठांचे दिगीश्वर । सहानुचर जे आले ॥३३॥
यज्ञप्रसंगें युधिष्ठिरें । सर्व पूजिले यथोपचारें । परम संतुष्ट प्रेमादरें । आज्ञा घेती धर्माची ॥३४॥
आज्ञा दिधलिया यजमानें । करिती स्वधामा प्रयाणें । गगनमार्गें व्योमयानें । देदीप्यमानें जन पाहती ॥२३५॥
ज्या ज्या भुवना जे जे जाती । ते ते प्रशंसा तेथ करिती । ते तूं अवधारीं भूपती । म्हणे सुमती शुक वक्ता ॥३६॥

हरिदासस्य राजर्षे राजसूयमहोदयम् । नैवातृप्यन्प्रशंसंतः पिबन्मर्त्योऽमृतं यथा ॥२७॥

क्षत्रियांमाजी ब्रह्मनिष्ठ । राजसूयमखयाजी कर्मठ । राजर्षि हें नाम स्पष्ट । म्हणती श्रेष्ठ युधिष्ठिरा ॥३७॥
आणि कृष्णाचें दास्य करी । कृष्ण वोळगे ज्याचे घरीं । प्रेमें भजती परस्परीं । यास्तव म्हणती हरिदास ॥३८॥
धर्म राजर्षि हरिदास । तयाच्या यज्ञाचा विशेष । प्रशंसिती सावकाश । स्वमुखें यश वर्णूनी ॥३९॥
राजसूयाचा महोदय । धर्मा ऐसा अपर राय । करूं न शके लोकत्रय । जरी वशवर्ती जालिया ॥२४०॥
धर्म हरिदास सप्रेममळ । धार्मिक राजर्षि केवळ । म्हणोनि श्रीकृष्ण अळुमाळ । कोठें विकळ हो नेदी ॥४१॥
चरणक्षालनाचें काम । स्वयें आंगवी मेघश्याम । नीचपरिचर्ये निःसीम । उच्छिष्ट पात्रें विसर्जी ॥४२॥
पीताम्बराची घालूनि कांस । सांवरूनियां कौस्तुभास । निजदासांचा होऊनि दास । नीच कृत्यांस न लाजे ॥४३॥
सोळा सहस्र अंतःपुरा । अष्टोतरशत पट्टदारा । देखतां रावे नीच किङ्करा । सम कामारा होऊनियां ॥४४॥
निर्जरविभवांचिया श्रेणी । जिचिया अपाङ्गमात्रें करूनी । ते श्री लंपट ज्याचे चरणीं । तो  मखसदनीं दास्य करीं ॥२४५॥
ऐसा धर्माचा महोदय । म्हणोनि साङ्ग राजसूय । संपादला यदर्थीं काय । महदाश्चर्य मानावें ॥४६॥
नहुष ययाति सगर शिबी । श्वेतकिप्रमुख वरिष्ठ विभवीं । तथापि धर्माध्वरगौरवीं । न तुळती दिवि भव विधिही ॥४७॥
ऐसे स्वधामा जे जे जाती । मख शंसितां ते न धाती । अमृत प्राशितां मर्त्यांप्रती । नोहे तृप्ति जयापरी ॥४८॥
कीं स्तनपा स्तनपान । कीं कामुकां कामिनीध्यान । नातरी दरिद्रियां धनागम । होतां मन अतृप्त ॥४९॥
तेवि आपुल्या स्वधामा जातां । न धाती धर्ममखा शंसितां । असो ऐसी मखसाङ्गता । भामाकान्तास्तव जाली ॥२५०॥
आज्ञा मागूनि धर्माप्रती । सर्व आपुल्या स्थळा जाती । तैं युधिष्ठिर सप्रेमभक्ति । सुहृदांप्रति राहवीतसे ॥५१॥

ततो युधिष्ठिरो राजा सुहृत्संबंधिबांधवान् । प्रेम्णा निवासयामास कृष्णं च त्यागकातरः ॥२८॥

भूतळ जिङ्कूनि निष्कंटक । राजसूया सारिखा मख । निर्विघ्न संपला सम्यक । उत्कट हरिख धर्मातें ॥५२॥
पादपीठा प्रणतमौळी । राजे झाले संग्रामशाळी । इंद्रप्रस्थीं सुकृतबहळीं । धर्मराजा विराजला ॥५३॥
सुरमंडळीं अमरपति । तेंवि भूतळीं धर्मनृपति । साम्राजविभवें चक्रवर्ती । उज्ज्वल कीर्ति त्रिजगांत ॥५४॥
ऐसी धर्ममखसाङ्गता । सिद्धि आंगीं बाणली असतां । मुनि सुर नृपति आज्ञा घेतां । राहवी तत्त्वता सुहृदांतें ॥२५५॥
आग्रह करूनि बहुतां परी । दूपद विराट सह परिवारीं । शल्य कुन्तिभोजयदुभारीं । श्रीकृष्णातें राहवीतसे ॥५६॥
एकल्या कृष्णासी राहवितां । आग्रह करी मन्मथजनिता । म्हणोनि समस्तां सुहृदां आप्तां । राहवी तत्वता युधिष्ठिर ॥५७॥
श्रीकृष्णाचा वियोग सहसा । क्षणही न साहवे मानसा । यालागीं सोयरियां अशेषां । राहवी परेशास्तव भावें ॥५८॥
वना जातां धेनु ताने । वत्स जैसे युगान्त मानी । धर्मा मानसीं तैसीच ग्लानी । रुक्मिणीजानी जाणतसे ॥५९॥
जाणोनि धर्माचें अंतर । तैसाचि विव्हळ कमळावर । इंद्रप्रस्थीं झाला स्थिर । द्वारके परिवार प्रेरूनी ॥२६०॥

भगवानपि तत्रांग न्यवात्सीत्तत्प्रियंकरः । प्रस्थाप्य यदुवीरांश्च सांबादींश्च कुशस्थलीम् ॥२९॥

जैसा भजे जो मजकारणें । मीही तैसाचि त्या कारणें । ऐसें बिरुद साच करणें । श्रीभगवानें भक्तप्रियें ॥६१॥
अंग या कोमळ आमंत्रणें । परीक्षितीतें श्रीशुक म्हणे । युधिष्ठिराच्या प्रेमबंधनें । निबद्ध झाला गोविन्द ॥६२॥
धर्मराजाचा अत्यादर । देखोनि गुंतला रुक्मिणीवर । साम्बादियदुवीरांचा भार । केला स्वार द्वारकै ॥६३॥
स्वधामा गेले मुनि निर्जर । स्वदेशा गेले नृप भूसुर । द्वारके गेले यादवभार । राहिला श्रीधर धर्मापें ॥६४॥
ऐसा जो जो मनोरथ । धर्में केला अत्यद्भुत । तो तो पुरवी कृष्णनाथ । प्रेमासक्त होत्साता ॥२६५॥

इत्थं राजा धर्मसुतो मनोरथमहार्णवम् । सुदुस्तरं समुत्तीर्य कृष्णेनासीद्गतज्वरः ॥३०॥

यमधर्माचा अवतार । तो हा राजा युधिष्ठिर । म्हणोन धर्मसुतनामोच्चार । व्यासकुमर प्रशंसी ॥६६॥
तो धर्मसुत धर्मराव । मनोरथाचा महार्णव । परम दुस्तर जो अथाव । श्रीकृष्णनावबळें तरला ॥६७॥
निष्कंटक धरातळ । जाले वशवर्ती भूपाळ । ब्रह्मांडमंडित यश उज्ज्वळ । लाधला केवळ श्रीकृष्णकृपा ॥६८॥
ऐसा कृष्णाचे कृपेकरून । राजसूयमुख संपादून । झाला विजयसुखसंपन्न । नित्य निमग्न स्वानंदीं ॥६९॥
दुस्तर मनोरथसागर । उतरूनि गेला पैल पार । कृष्णयोगें सुखनिर्भर । विगतज्वर यास्तव तो ॥२७०॥
ऐसा साम्राज्यभद्रपीठीं । समस्तनृपांचिये मुकुटीं । धर्म विराजला जगजेठी । जेंवि परमेष्ठी सुरचक्रीं ॥७१॥
यावरी बादरायणि पुसे । निरोपिलें तव प्रश्नासरसें । तें निरूपण तव मानसें । कथिलें तैसें अवगमिलें ॥७२॥
धर्मलक्ष्मी प्रकाशमान । देखूनि त्रिजगा आनंद पूर्ण । तें न साहे दुर्योधन । काय म्हणोन हे शंका ॥७३॥
ये शंकेच्या निरसना । पुढती कथिलें अवभृथस्नाना । यज्ञारंभीं कोणकोणां । कार्ययोजना निरूपिली ॥७४॥
धनाध्यक्ष दुर्योधन । भावी कार्यार्थ जाणून । कृष्णें केला सम्मानून । तेंही निरूपण तुज केलें ॥२७५॥
यावरी कथेचा उपसंहार । ऐकोनि शंकेचा परिहार । करावया रहस्यसार । चमत्कार निरूपितों ॥७६॥

N/A

References : N/A
Last Updated : June 01, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP