अध्याय ७५ वा - श्लोक १६ ते २०
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
गुप्ता नृभिर्निरगमन्नुपलब्धुमेतद्देव्यो यथा दिवि विमानवरैर्नृदेव्यः ।
ता मातुलेयसखिभिः परिषिच्यमानाः । सव्रीडहासविकसद्वदना विरेजुः ॥१६॥
जिया नृपांच्या वाराङ्गना । कनकरत्नमय स्यंदना । वळंघूनि आल्या अवभृथस्नाना । रक्षकगणासमवेत ॥१३०॥
रथ चालती घडघडाट । वेष्टित नृपभटांचे थाट । पुलोमारक्षक सुर सुभट । तैसे निकट प्रगोप्ते ॥३१॥
जैशा देवाङ्गना विमानीं । उत्साहभरिता विचरती गगनीं । तैशाचि राजाङ्गना अवनी । स्यंदनयानीं विराजती ॥३२॥
सर्वत्र रक्षिता राजभटीं । रथाश्वनरांची रक्षकघरटी । जळक्रीडा पहावयासाठीं । जाहूनवीतटीं पातलिया ॥३३॥
मग त्या उतरोनि रथातळीं । प्रवेशोनियां जाहूनवीजळीं । मेहुणियांसीं करिती रळी । मातुलेयां समवेत ॥३४॥
आपुले सुहृद जिवलग सखे । मेहुणे मातुलेय देवर निके । तिहीं वेष्टिल्या शिम्पिती उदकें । परम कौतुकें उत्साहें ॥१३५॥
पूर्वोक्त सुगंधद्रव्यें रस । परस्परें शिम्पिती बहुबस । वदनारविन्दीं सव्रीड हास । परमोल्लास हृत्कमळीं ॥३६॥
सलज्जवदनीं मंदस्मितें । तेणें वदनाब्जें विकसितें । ऐशा करितां जलक्रीडेतें । ललनारत्नें विराजती ॥३७॥
वनितायूनांची जळकेली । धर्मराजाचे अवभृथकाळीं । प्रवर्तली ते कुरुकुळमौळी । सचिवमंडळीसह परिसें ॥३८॥
ता देवरानुत सखीन्सिषिचुर्दृतीभिः क्लिन्नांबरा विवृतगात्रकुचोरुमध्याः ।
औत्सुक्यमुक्तकबराच्च्यवमानमाल्याः क्षोभं दधुर्मलधियां रुचिरैर्विहारैः ॥१७॥
तया नृपांचिया नृदेवी । धर्मराजाच्या अवभृथोत्सवीं । निःशंक क्रीडत्या झाल्या सर्वी । जेंवि सुपर्वीं सुरसदनीं ॥३९॥
कनिष्ठ बंधु निजकान्ताचे । देवर तयांसि म्हणिजेत साचे । मातुळादिपितृष्वसांचे । तनय मेहुणे सुहृद सखे ॥१४०॥
चुलते आता चुलतमामे । ऐसे संबंधी गोत्रनियमें । तत्पुत्र मेहुणे सुहृत्प्रेमें । सखे या नामें बोलिजती ॥४१॥
ऐसिया सखिवर्गा देवरां । माजी निःशंक नृपवरदारा । गंगेमाजी शिम्पिती नीरा । आर्द्राम्बरा प्रकटांगा ॥४२॥
भृभुजभोग्यें सूक्ष्मवसनें । जळविहारीं भिजलीं क्लिन्नें । त्वचेसमान तनु संलग्नें । अवयव तेणें स्फुट दिसती ॥४३॥
सखयां सुहृदां देवरांवरी । करचापल्यें शिम्पितां वारी । अंबरें न थरतीच शरीरीं । उघडा गात्रीं क्रीडती त्या ॥४४॥
पादांगुष्ठादि शिरोरुह । पर्यंत निगूढ वनितादेह । क्रीडाप्रसंगें निःसंदेह । देखती समूह यूनांचे ॥१४५॥
अवयवांमाजि गोपना योग्य । क्रीडासमयीं भर्तृभोग्य । तेही अवयव दिसती सांग । जळक्रीडेच्या प्रसंगें ॥४६॥
मध्य म्हणिजे कटिपदसंधी । मांडिया जाणिजे ऊरु या शब्दीं । वक्षोज कुचनामें प्रसिद्धी । कथितां प्रकट जाणिजती ॥४७॥
ऐसे स्त्रियांचे गुप्तावयव । जळविहारीं उघडेचि सर्व । अपरशरीरांमाजी ठाव । उघडे झांकले न पुसावे ॥४८॥
जयांचें अंगुष्ठ न दिसती दृष्टी । न्या नृपाङ्गनांच्या सर्वाङ्गयष्टी । अवभृथजळचर्याराहटी । करितां सृष्टी स्फुट दिसती ॥४९॥
उत्कट क्रीडेचा विशेष । तेणें मुक्त वेणिकाकेश । च्यवती ग्रथित पुष्पघोष । वनिताविलासऔत्सुक्यें ॥१५०॥
चामीकराभ गौरा तरुणी । नव्हती दरिद्रा निराभरणी । सालंकृता सर्वभूषणीं । नृपकामिनी कमनीया ॥५१॥
देखोनि त्यांच्या अंगयष्टी । कामविकारें सकळ पोटीं । तया नरांच्या जडल्या दृष्टी । लाळ घोंटिती संकल्पें ॥५२॥
ब्रह्मचारी स्नातक यती । वेदपारंगत सांगों किती । अपक्क साधनीं स्मरमळ चित्तीं । नेत्र न लविती तें पाहतां ॥५३॥
देवर मेहुणे सखी समाजीं । नृपाङ्गना ज्या क्रीडाभाजी । क्रीडती त्यांचें कौशल्य सहजीं । जनपदराजी अवलोकी ॥५४॥
जलविक्षेपयंत्रें नाना । चर्मनिर्मितें वैणवें जाणा । हैमें राजतें शौल्बें कोण्हां । केवळ कराञ्जळी ॥१५५॥
गोरसैक्षवप्रमुख रस । सुगंध सस्निग्ध द्रव्यें विशेष । यंत्रीं भरूनि वनिता तोष । मानूनि यूनां शिम्पिती त्या ॥५६॥
चिपोळ्या चमत्कारें चिरकांडीं । लक्षूनि यूनां नाकीं तोंडीं । सोडितां वोडविती ते गांडी । तोंडें वांकुडीं करूनियां ॥५७॥
ऐसे रुचिर मनोहर । नृपांगनांची जलविहार । अवभृथ नाहतां युधिष्ठिर । समस्त नागर अनुभविती ॥५८॥
निगूढा नृपांगनाची क्रीडा । उद्दाम कथिली विगतव्रीडा । सामान्य जनाच्या विलासकोडा । उमजें सुघडा न सांगतां ॥५९॥
धर्मराजा तये काळीं । ऐसी वेष्टित नॄपमंदळी । पातला भागीरथीचे कूळीं । तेंही समूळीं परिसावें ॥१६०॥
स सम्राड्रथमारूढः सदश्वं रुक्ममालिनम् । व्यरोचत स्वपत्नीभिः क्रियाभिः क्रतुराडिव ॥१८॥
राजसूयक्रतु सम्यक । यजिल्यानंतर कुरुनायक । सम्राट्पदवी पावला देख । ऐश्वर्यपूर्वक भूचक्रीं ॥६१॥
रत्नखचितकनकरथ । उत्तम जुंपिले अश्व तेथ । दिव्याभरणीं विराजित । जेंवि भास्कर प्रकाशला ॥६२॥
मग तो सम्राट तिये रथीं । द्रौपदीप्रमुख वनिता सतीं - । सह बैसला क्रतुसुकृतीं । जेंवि सुरपती शचीसहित ॥६३॥
कीं तो क्रियांसीं मखेन्द्र जैसा । स्वपत्न्यांशीं युधिष्ठिर तैसा । शोभता झाला पूर्णयशसा । भगणामाजी हिमकरवत ॥६४॥
ऐसा दिव्य रथीम कुरुराय । स्वपत्न्यांसीं शोभला होय । क्रियांसहित राजसूय । मूर्तिमंत जियापरी ॥१६५॥
एवं जान्हवीजीवनानिकटीं । रथौनि उतरला भूतटीं । तेथील जैसी विधिराहटी । तेही गोठी अवधारीं ॥६६॥
पत्नीसंयाजावभृथ्यैश्चरित्वा ते तमृत्विजः । आचांतं स्नापयांचक्रुर्गंगायां सह कृष्णया ॥१९॥
पत्नीसंयाजनामक याग । जो कां केवळ अवभृथाङ्ग । तिहींसीं अवभृथ सांङ्गोपाङ्ग । ऋत्विजीं अव्यंग संपविलें ॥६७॥
कृष्णा म्हणिजे द्रौपदीदेवी । तयेसहित श्रीजान्हवी । माजी यजमान ऋत्विजीं सर्वीं । केला अवभृथीं सुस्नात ॥६८॥
विध्युक्त आचमनपूर्वक । अवभृथीं सुस्नात कुरुनायक । वरुणसूक्तादिमंत्रघोक । करिती ऋत्विज ते काळीं ॥६९॥
धर्मराजातें ऋत्विजगणीं । पत्नीसंयाज विधिविधानीं । द्रौपदीसहित अवभृथस्नानीं । अवगाहन करविलें ॥१७०॥
नृपाङ्गनांची जळकेली कथिली । धर्मद्रौपदी जेथ नाहलीं । सुकृती नाहती तया तळीं । प्रवाहजळीं जाह्नवीच्या ॥७१॥
द्रौपदीचीं मौळसुमनें । गळितें प्रवाहें उह्यमानें । सुकृताभिलाषी अतिसम्मानें । लब्धें धरिती निजमौळीं ॥७२॥
ऐसिया अवभृथस्नानोत्सवीं । विमानीं दुन्दुभि त्राहाटिल्या देवीं । भूतळीं गजदुन्दुभि मानवीं । सर्वत्र सर्वीं वाजिन्नल्या ॥७३॥
देवदुंदुभयो नेदुर्नरदुंदुभिभिः समम् । मुमुचुः पुष्पवर्षाणि देवर्षिपितृमानवाः ॥२०॥
विमानीं सुरवरांच्या श्रेणी । तिहीं दुन्दुभि वाजविल्या गगनीं । नरदुन्दुभि मृत्युभुवनीं । धर्मावगाहनीं लागल्या ॥७४॥
समस्त वाजंत्रांचे गजर । नृत्य करिती नृत्यकार । सुमनें वर्षती देवर्षिपितर । गंधर्वकिन्नरमनुजादि ॥१७५॥
ऐसा उत्कट समारंभ । सुज्ञीं साधिला सुकृतलाभ । महिमा जाणोनि तो दुर्लभ । सदंभ - निर्दंभ - दुष्कृतिहीं ॥७६॥
N/A
References : N/A
Last Updated : June 01, 2017
TOP