सस्नुस्तत्र ततः सर्वे वर्णाश्रमयुता नराः । महापातक्यपि यतः सद्यो मुच्येत किल्बिषात् ॥२१॥

ऐसा साधारण समस्त । वर्णाश्रमीं आचारवंत । अनुलोमविलोमकक्षागत । झाले सुस्नात धर्मातळीं ॥७७॥
त्यांहीहूनि कनिष्ठलोकीं । आर्दीं शुष्कीं सांसर्गिकीं । कायिकीं वाचिकीं मानसिकीं । महापातकीं खिळिले जे ॥७८॥
व्रात्य पतित बहिष्कृत । घोरकर्मी अतिदुष्कृत । तेही ते काळीं सुस्नात । पापनिर्मुक्त जाहले कीं ॥७९॥
धर्मराजाचे अवभृथस्नानीं । जान्हवीप्रवाहजीवनीं । सर्वांतळीं निमज्जूनी । जाले तेथूनी निष्पाप ॥१८०॥
सद्यः कल्मशापासूनि सुटले । दोषसंस्कार आंगींचें फिटले । स्वधर्मकर्मांतें विनटले । दुर्गुण तुटले नैसर्गी ॥८१॥
अवभृथस्नानीं सुकृतलाभ । झाला ऐसा समस्तां सुलभ । जिये ठायीं पंकजनाभ । वाढवी वालभ भक्तीचें ॥८२॥
ऐसें सारूनि अवभृथस्नान । वस्त्राभरणादि यजमान । धरिता झाला तें व्याख्यान । कीजे श्रवण सुभगांहीं ॥८३॥

अथ राजाहते क्षौमे परिधाय स्वलंकृतः । ऋत्विक्सदस्यब्रह्मादीनानचभ्रणाम्बरैः ॥२२॥

या उपरी युधिष्ठिरराजा । द्रौपदीप्रमुख समस्त भाजा । स्नानवस्त्रें फेडूनि ओजा । केलीं नूतन परिधानें ॥८४॥
महामोलागळीं क्षौमें । कांठीं पदरीं सूत्रें हैमें । निर्जरभोग्यें अमरोत्तमें । जियें परिधानें करिजती ॥१८५॥
तियें धर्में परिधान केलीं । दिव्य भूषणें वरी बाणलीं । तिलक माळा सुमनें धरिलीं । मग पूजिली सुरपंक्ति ॥८६॥
निर्जरतटिनीतटीं अवभृथ । सारूनि यजमान सालंकृत । वाद्यघोषें आनंदभरित । आला त्वरित मखशाळे ॥८७॥
मखमंडपीं दिव्यास्तरणें । झाडूनि आस्तरिलीं विस्तीर्णें । यथाधिकारें भूभुजरत्नें । उपविष्ट झालीं ते ठायीं ॥८८॥
त्यानंतरें ऋत्विक्पूजा । करिता झाला धर्मराजा । चरण प्रक्षाळूनियां ओजा । पदसरोजा अभिवंदी ॥८९॥
हस्तमात्रा कर्णमात्रा । परिधानर्थ कनकाम्बरा । आच्छादना दिव्य वस्त्रां । परम पवित्रां समर्पी ॥१९०॥
गंधाक्षता टिळे माळा । वरी उधळिला परिमळरोळा । साज्यत्रिवर्ति देदीप्य अनळा । कनकपात्रीं धूप दीप ॥९१॥
दशाङ्गशलाका सुपरिमळ । अर्पिती अग्रीं योजूनि अनळ । एकारती तेज बहळ । उजळी केवळ करकमळें ॥९२॥
नैवेद्य अमृतोपम उपहार । फल ताम्बूल कार्तस्वर । गो भू अनर्ध्य रत्नभार । दक्षिणा अपार समर्पिली ॥९३॥
मंगळ दीप पुष्पाञ्जली । अर्पूनि ऋत्विजां चरणकमळीं । प्रदक्षिणा करूनि भौळीं । पादाब्ज वंदी सप्रेमें ॥९४॥
ब्रह्मादिसदस्यान्त ऋत्विज । यथानुक्रमें जैसे पूज्य । तैसे पूजूनि धर्मराज । अर्ची भूभुज तें ऐका ॥१९५॥

बंधुज्ञातिनृपान्मित्रसुहृदोऽन्यांश्च सर्वशः । अभीक्ष्णं पूजयामास नारायणपरो नृपः ॥२३॥

महाराज युधिष्ठिर । यज्ञ नारायण साचार । जाणोनि तेथ प्रेमादर । वर्ते अतितर सद्भावें ॥९६॥
ऋत्विज वेदपरायण । वेद मूर्तिमंत ब्राह्मण । जाणोनि वेदोनारायण । करी अर्चन हरिप्रेमें ॥९७॥
ना विष्णुः पृथ्वीपतिः । ऐसें बोलती मन्वादि स्मृति । विष्णुप्रतिमा मानूनि चित्तीं । अभेदभक्ती नृप पूजी ॥९८॥
कुळ शीळ वीर्य शौर्य । स्नेहार्जव प्रेम ऐश्वर्य । धूर्त धार्मिकता चातुर्य । ते नृपवर्य क्रमें अर्चीं ॥९९॥
मुकुटकुंडलें कंठमाळा । अंगदें कटकें मुद्रिकाङ्गुळां । पदकें अवतंस कटिमेखळा । सहित अबळां वामाङ्गीं ॥२००॥
वेणिका मस्तक श्रवण घ्राण । बाहु मणिबंध अंगुळी पूर्ण । मुक्तमाळा कंठाभरण । वनिताभूषणभूपाङ्गें ॥१॥
कतितट गुल्फ पादाङ्गुळें । इत्यादि भूषणें भूषित स्थळें । रत्नखचितें भूषणें अमळें । अर्पूनि केलीं सालंकृतें ॥२॥
अंतर्वासावरी परिधान । कंचुकी आच्छादन वैरण । आपादगोपक रम्यावरण । इत्यादिवसनसमुच्चय ॥३॥
कनकताटीं पृथगाकारें । समर्पिजती माद्रीकुमरें । धर्में पूजिलीं नृपओहरें । आनंदगजरें मखशाळे ॥४॥
गंधाक्षता कुसुममाळा । नैश चूर्णें कुंकुमें अबळा । सिन्दूररेखा मध्यमौळा । नयनीं कज्जळ द्रौपदी दे ॥२०५॥
दिव्य धूसर उधळूनि वरी । मोकळीं पुष्पें वाहिली शिरीं । धूप दीप दिव्योपहारीं । गंडूषपात्रीं करशुद्धि ॥६॥
फलताम्बूल उपायनें । राजोपचार भूभुजचिह्नें । समर्पूनियां अतिसम्मानें । भूपाळरत्नें गौरविलीं ॥७॥
याच प्रकारें बंधुवर्ग । भीष्मप्रमुख पूजिले साङ्ग । स्वयाति मान्य पूजना योग्य । सुभट चांग अर्चियले ॥८॥
आपुले ज्ञातीहूनि इतर । परंतु केवळ प्राणमित्र । यथाधिकारें ते समग्र । पूजिले सादर सद्भावें ॥९॥
व्याही जामात भागिनेय । श्वशुर माउसे मातुळतनय । साडू श्यालक सुहृदनिचय । अर्ची कुरुवर्य सद्भावें ॥२१०॥
याही वेगळ्या समस्त जाति । वर्ण उपवर्ण राजप्रकृति । पूजिता झाला धर्म नृपति । भगवत्प्रीति लक्षूनी ॥११॥
याञ्चे रहित याचक केले । कीर्ति वर्णित दिगंतीं गेले । उज्ज्वळ यशें ब्रह्माण्ड भरिलें । कौरवपाळें यज्ञान्तीं ॥१२॥
नृपांनिकटीं नृपांगना । पूजितां कथिलें वसनाभरणा । सिंहावलोकें कवींचा राणा । करी व्याख्याना तें ऐका ॥१३॥

सर्वे जनाः सुररुचो मणिकुंडलस्रगुष्णीषकंचुकदुकूलमहार्घ्यहाराः ।
नार्यश्च कुंडलयुगालकवृंदजुष्टवक्त्रश्रियः कनकमेखलया विरेजुः ॥२४॥

धर्मराजें सुपूजित । सर्व भूभुज अंगनांसहित । बंधु ज्ञाति मित्र आप्त । सुहृद समस्त जनपदही ॥१४॥
ऐसे स्वर्चित सर्वजन । रुचिराभरणीं शोभायमान । शोभते जाले अमरांहून । मर्त्यभुवनीं सम्मानें ॥२१५॥
जडित मुकुट नृपांच्या मौळीं । इतरां उष्णीषें मौलागळीं । मणिमय कुंडलें श्रवणयुगळीं । मुक्तमाळा रत्नहार ॥१६॥
कौशेय पीताम्बर परिधानें । कंचुकोपकंचुक अंगत्राणें । चरणकंचुक सुरंग वसनें । दिव्य प्रावरणें अमूल्य ॥१७॥
कंठीं आपाद सुमनमाळा । कुसुमावतंत्स खोंविले मौळा । गंधाक्षता परिमळउधळा । यज्ञशाळा मघमघित ॥१८॥
अनर्ध्यरत्नमणींचे हार । केयूरांगदें कटकें रुचिर । मुद्रिकामंडित चंचळ कर । स्वर्चित ते नर सुर गमती ॥१९॥
तैशाच नारी दिव्याभरणीं । सुभगा अलवण्यललामश्रेणी । दिव्य कुंडलें जडित रत्नीं । श्रवणभूषणीं विराजती ॥२२०॥
अलकग्रथित वेणिका पृष्ठीं । ग्रथिल्या दिव्याभरणाभीष्टीं । मस्तकीं मौळभूषणांची थाटी । मुक्ताजाळिया उज्ज्वळिता ॥२१॥
वेणिका मौळें ग्रथिल्या सुमनीं । अमूल्य मुक्ताफळें घ्राणीं । मंगळसन्निभ गोमेदमणी । समुक्त नथनी लेइलिया ॥२२॥
दंतीं वज्रमणींच्या पंक्ति । ताम्बूलरंगें सुरंग दीप्ति । माणिक्यप्रभा वोप देती । मंदस्मितीं प्रकाशतां ॥२३॥
गळसरिया कृतकृष्णमणि । तदनुक्रमें मुक्तश्रेणि । एकावळी कंठाभरणीं । अनर्ध्य पदकें विराजती ॥२४॥
बाहुभूषणें रत्नजडित । चुडे मनगटीं पुरटघटित । मुद्रिका कराग्रीं झळकत । ते प्रभा फांकत नभोगर्भीं ॥२२५॥
परिधान पीताम्बर पट्टकुलें । रत्नें जडिलीं स्वर्णमेखळे । झण्त्कारिती वांकी वाळे । अंदु नूपर रुणझुणिती ॥२६॥
अणवट जोडवीं पोल्हारे । विरोद्या झिणिया वृश्चिकाकारें । इत्यादि मंडित अळंकारें । वनिताशरीरें विराजती ॥२७॥
एवं धर्मराजें अध्वरीं । सर्वही पूजिले यथाधिकारीं । शोभती सालंकृत नरनारी । अमराप्सरीपडिपाडें ॥२८॥

अथर्विजो महाशीलाः सदस्या ब्रह्मवादिनः । ब्रह्मक्षत्रियविट्शूद्रा राजानो ये समागताः ॥२५॥

या नंतरें ऋत्विजगण । सदस्य ब्रह्मवादी ब्राह्मण । शालाधिकारी भिन्न भिन्न । पृथक्प्रयोजननियमित जे ॥२९॥
ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र । वर्णोपवर्ण जन अपार । देशोदेशींचे नृप समग्र । पाहों अध्वर जे आले ॥२३०॥
देवता कोटि या वेगळ्या । धर्माध्वरा पाहों आल्या । धर्मराजें ज्या पूजिल्या । त्याही कथिल्या जाताती ॥३१॥

N/A

References : N/A
Last Updated : June 01, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP