अध्याय ६४ वा - श्लोक ६ ते १०

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


स उत्तमश्लोककराभिमृष्टो विहाय सद्यः कृकलासरूपम् ।
संतप्त्चामीकरचारुवर्णः स्वर्ग्यद्भुतालंकरणांबरस्रक् ॥६॥

सरठदेही जो तो नृग । कृपापाङ्गें कमलारंग । कडे काढूनि तद्देह शंतमहस्तें कुरवाळी ॥४४॥
देव वर्णिती उत्तम कीर्ति । यालागीं उत्तमश्लोक म्हणती । पद्मकरें तो नृगाप्रति । स्पर्शे चित्तीं द्रवोनियां ॥४५॥
अमृतहस्तें सरठतनु । स्पर्शतांचि जनार्दनु । स्पर्श लोहा करी सुवर्ण । तेंवि काञ्चनमय झाला ॥४६॥
लोह काळिमा आणि जडता । सांडी तेंवि कृकलासता । टाकूनि दिव्यतनूतें धरिता । झाला तत्वता नृगरावो ॥४७॥
सम्यक्तप्त जेंवि सुवर्ण । तैसा सुंदर तनूचा वर्ण । स्वर्गवासियांमाजि मान्य । वसनाभरणीं देदीप्य ॥४८॥
मनुष्यांमाजी उत्तमयोनी । श्रीमंत यशःश्रीसुकृतखाणी । अंत्यादि पामर नीचयोनी । मानव म्हणोनि सम न कीजे ॥४९॥
तैसे पिशाच गुह्यक भूत । त्याही देवयोनिच निश्चित । तथापि शक्र ज्यां सम्मानित । ते अद्भुत स्वर्गवासी ॥५०॥
तयां श्रेष्ठांमाजी गणना । मिरवी अद्भुतां वसनाभरणां । तुरंबूनियां मंदारसुमना । माळा अवतंस शोभवी ॥५१॥
एवं ऐसा दिव्यदेही । सरठतनू त्यागूनि पाहीं । हस्त स्पर्शतांचि नवाई । कृष्णें लवलाहीं प्रकटिली ॥५२॥
मुकुट कुंडलें कटिमेखळा । अंगदें कटकें कंठमाळा । त्रिदशपाळा अंगींची कळा । नृग लाधला हरिहस्तें ॥५३॥
सर्ववेत्ता श्रीभगवान । तथापि मानवाचिसमान । पुसता झाला त्यालागून । तेंही लक्षण अवधारा ॥५४॥

पप्रच्छ विद्वानपि तन्निदानं जनेषु विख्यापयितुं मुकुन्दः ।
कस्त्वं महाभाग वरेण्यरूपो देवोत्तमं त्वां गणयामि नूनम् ॥७॥

कळोनि किमर्थ म्हणाल पुसिलें । तरी नृगाचरण जें कां पहिलें । लोकां प्रकटावया वहिलें । निमित्त केलें प्रश्नाचें ॥५५॥
अनवधानतेमाजी केवळ । अल्पही दुष्कर्माचें फळ । दुःखयातना भोगवी बहळ । ऐसें गोपाळ प्रकटितसे ॥५६॥
श्रीकृष्णाच्या कृपापाङ्गें । शंतम करें स्पर्शतां वेगें । सरठदेह टाकूनि नृगें । दिव्यनिजाङ्गें निवडला ॥५७॥
तया दिव्य पुरुषाप्रति । परमाश्चर्यें पुसे श्रीपति । महाभाग तूं कोण ये क्षिती । वरेण्यमूर्ति वरार्ह ॥५८॥
वर द्यावया योग्य होसी । यालागीं उत्तम त्रिविष्टपवासी । त्यांमाजी उत्तमोत्तम मानसीं । निश्चयेंसीं मी गणितों ॥५९॥
ऐशिया दिव्य पुरुषाप्रति । किमर्थ सरठदेहावाप्ति । अंधकूपीं अधोगति । मम प्रश्नोक्ति हे सांग ॥६०॥

दशाभिमांग वा कतमे कर्मणा संप्रापितोऽस्यतदर्हः सुभद्र ।
आत्मानमाख्याहि विवित्सतां नो यन्मन्यसे नः क्षममत्र वक्तुम् ॥८॥

कोण्या कर्मे तुज हे दशा । पावविली गा पुण्यपुरुषा । तूं सुकृती ऐसिया क्लेशा । योग्य न होसी भोगावया ॥६१॥
सुभद्रा म्हणिजे कल्याणपात्रा । तव दर्शनें तृप्ति नेत्रां । भाषणश्रवणीं क्षुधा श्रोत्रा । ते सन्मित्रा पूर्ण करीं ॥६२॥
आपुल्या पूर्वकर्माची दशा । श्रोतृकामां आम्हां पुरुषां । कथनीं योग्यता मानसा । असतां सहसा गूज न राखें ॥६३॥
अख्याहि म्हणजे प्रकट करीं । इतुकें कृष्ण बोलिल्यावरी । नृग बोलिला मधुरोत्तरीं । शुकवैखरी ते ऐका ॥६४॥

श्रीशुक उवाच - इति स्म राजा संपृष्टः कृष्णेनानंतमूर्तिना । माधवं प्रणिपत्याहं किरीटेनार्कवर्चसा ॥९॥

जो कां अनंतगुणपरिपूर्ण । अनंतमूर्ति जो श्रीकृष्ण । तेणें इत्यादिप्रकारें प्रश्न । नृगासी केला होत्साता ॥६५॥
भास्करभास्वरकोटीरकोटी । श्रीकृष्णाच्या चरणानिकटीं । प्रणम करूनियां वृत्तान्तगोठी । वदता झाला मारमणा ॥६६॥

नृग उवाच - नृगो नाम नरेंद्रोऽहमिक्ष्वाकुतनयः प्रभो । दानिष्वाख्यायमानेषु यदि ते कर्णमस्पृशम् ॥१०॥

राजा इक्ष्वाकु सूर्यवंशीं । मी जन्मलों तयाचे कुशीं । विख्यात नृगनामा त्रिजगासी । जरी तूं जाणसी समर्था ॥६७॥
दानशीलांमाजी गणना । प्रकट कीर्ति श्रुतिपुराणां । विभो समर्था तुझिया जायसी कर्णा । स्पर्शली असेल जरी कांहीं ॥६८॥
कोणी एक विधिनिर्णय । वेदप्रमाणें निःसंशय । तैसाचि हाही अभिप्राय । कर्णगोचर जरी तुजला ॥६९॥
दानशील जे वाखाणिती । त्यांमाजी नृगनामाची ख्याति । स्पर्शली असेल श्रवणपथीं । नरेंद्रमूर्ति तो हा मी ॥७०॥
हेंही बोलणें बालिशपणें । विभो समर्था तुझेंनि वयुनें । त्रैलोक्य जागे ज्ञातेपणें । तेंही श्रवणें अवधारीं ॥७१॥

N/A

References : N/A
Last Updated : May 10, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP