अध्याय ६४ वा - श्लोक १ ते ५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


श्रीशुक उवाच - एकदोपवनं राजञ्जग्मुर्यदुकुमारकाः । विहर्तुं सांबप्रद्युम्नचारुदेष्णगदादयः ॥१॥

कोणे एके अपूर्व समयीं । यदुकुमार स्वसमुदायीं । क्रीडार्थ उपवनाच्या ठायीं । गेले सर्वही मिळोनिया ॥१२॥
साम्ब प्रद्युम्न चारुदेष्ण । गद मरुवल्क सारण । भानु स्वर्भानु बृहद्भानु । भामानंदन इत्यादि ॥१३॥
एवं सर्वही कृष्णतनय । अन्यत्र यदुकुळ संततिमय । उपवनीं क्रीडति रमणीय । वीटा कंदुक बहुक्रीडा ॥१४॥
धनुर्विद्या लक्षसाधनें । छत्तीस दण्डायुधें परजणें । अश्व गज रथ विविध यानें । लघु लाघवें शिक्षिती पैं ॥१५॥
कृत्रिमखङ्गखेटकधर । परस्परें शिक्षापर । परीक्षा दाविती यदुकुमार । विविधा शरीर मोडूनी ॥१६॥
शूळ पट्टिश चक्रें लहुडी । एक बळिष्ठ उचलिती धोंडी । एक आंगें मोडिती प्रौढी । कडोविकडि गुरुशिक्षा ॥१७॥
ऐसे अनेकक्रीडापर । करितां उपवनीं विहार । नेणती दिवस चढला फार । झोंबती भास्करकर तप्त ॥१८॥
प्रभाते उपहार करोनि सदनीं । स्वेच्छा विहरतां वनोपवनीं । छाया सुशीतल लक्षूनी । एकत्र होवोनि बैसले ॥१९॥
कदलें द्राक्षें दाडिमीफळें । साकोट बदाम रायांवळे । चूत खर्जूर नारिकेळें । बदरें जांबळें पनसादि ॥२०॥
इक्षुदण्ड श्वेत कृष्ण । कंदमूळादि पदार्थ आन । स्वेच्छा तृप्त झाले भक्षून । तृषार्त जीवन हुडकिती ॥२१॥

क्रीडित्वा सुचिरं तत्र विचिन्वंतः पिपासिताः । जलं निरुदके कूपे ददृशुः सत्वमद्भुतम् ॥२॥

चिरकाळ करूनि विहारक्रीडा । तृषार्त हुडाकिती जीवनचाडा । तंव निर्जरकूपीं प्रचंड सरडा । देखोनि झाले विस्मित पैं ॥२२॥
पहा हो म्हणती कूपान्तरीं । अद्भुत प्राणी स्थूळशरीरी । निर्जल आणि निराहारी । कोणे परी हा येथ वसे ॥२३॥
लहान थोर यदुकुमार । कूपीं पाहती सर्व सादर । पाहोनि केला जो निर्धार । तो सविस्तर अवधारा ॥२४॥

कृकलासं गिरिनिभं वीक्ष्य विस्मितमानसाः । तस्य चोद्धरणे यत्नं चक्रुस्ते कृपयान्विताः ॥३॥

पुच्छ शरीर चरण मौळ । गिरिसन्निभ महाविशाळ । देखूनि यदुकुमर सकळ । म्हणती विकराळ सरठतनू ॥२५॥
गिरिसन्निभ कृकलासातें । देखूनि अवघे विस्मितचित्तें । कृपेनें कळवळिले होत्साते । करिती यत्नातें तदुद्धरणीं ॥२६॥
म्हणती पहा हो केवढा प्राणी । सरठदेही निर्जलस्थानीं । क्षुधे तृषेची सोसी ग्लानि । यासी येथूनि काढावें ॥२७॥
ऐसे सर्वही कृपापर । करिती उद्धरणार्थ विचार । नानाप्रकारीं यत्नपर । तोही प्रकार अवधारा ॥२८॥

चर्मजैस्तांतवैः पाशैर्बद्ध्वा पतितमर्भकाः । नाशक्नुवन्समुद्धर्तुं कृष्णायाचख्युरुत्सुकाः ॥४॥

मातंगनिर्मित चर्मतंति । तन्मय पाश निर्मूनि निगुती । तेणें बांधोनि सरडाप्रति । बळें वोढिती अवघेही ॥२९॥
अपर कौशेयतंतुमय । पाशें बांधूनि सरठदेह । कूपीं पडिला पर्वतप्राय । करिती उपाय तदुद्धरणीं ॥३०॥
एक कार्पासतंतु अविशेष । पाशीं बांधूनि त्या प्राण्यास । उद्धरणीं धरूनि आवेश । ओढित अशेष आंगबळें ॥३१॥
परंतु शापें पतित कूपीं । राजा नृग कृकलासरूपी । सर्वीं ओढितां निजप्रतापीं । अणुमात्र न ढळे बहु श्रमतां ॥३२॥
यदुकुमार समस्त जाण । करूं न शकती नृगोद्धरण । कृष्णाकारणें करिती कथन । परम उत्सुक होत्साते ॥३३॥
नमूनि भगवत्पदारविन्दा । म्हणती स्वामी श्रीमुकुन्दा । उपवनीं क्रीडतां कुमारवृंदा । परमाश्चर्य देखियेलें ॥३४॥
अंधकूपीं सरठदेही । पर्वतप्राय प्राणी पाहीं । क्षुधे तृषेनें पीडतां कांहीं । विश्रान्ति नाहीं अणुमात्र ॥३५॥
तया देखोनि यदुकुमार । उद्धरणार्थ श्रमले फार । करूं न शकोंच तदुद्धार । मग सत्वर कथूं आलों ॥३६॥
हें ऐकूनि जनार्दन । द्रवला स्वभक्तकरुणेंकरून । ज्ञानदृष्टी नृगाचरण । पाहे विवरून विश्वदृक् ॥३७॥
त्रिकालीनज्ञानद्रष्टा । जाणोनि नृगाच्या कर्मानिष्टा । छेदावया शापकष्टा । उपवनीं पैठा स्वयें आला ॥३८॥

तत्राऽऽगत्यारविंदाक्षो भगवान्विश्वभावनः । वीक्ष्योज्जहार वामेन तं करेण स लीलया ॥५॥

तेथे जाऊनि कूपापासीं । पंकजाक्ष ज्ञानैकराशि । षड्गुणैश्वर्यसंपन्नतेसीं । विश्वभावन विश्वात्मा ॥३९॥
विलोकूनियां कृपान्तरीं । कृपापाङ्गें सदय हरि । लीलेकरूनि वामकरीं । रज्जु धरूनि आकर्षी ॥४०॥
दयापाङ्गें अवलोकिलें । तेणेंचि ऊर्ध्व आकर्षिलें । करस्पर्शाचें निमित्त केलें । मानुषीं लौकिकपरिहारा ॥४१॥
लोहचुंबक लोह आकर्षी । रज्जुहस्तादि नाहीं त्यासी । कृष्ण केवळ चैतन्यराशि । तेथ कायसी ग्रहणक्रिया ॥४२॥
चुंबक लोहाचें जेंवि ग्रहण । तेंवि नृगाचें उद्धरण । स्पर्श लोहा करी सुवर्ण । तें लक्षण शुक वर्णी ॥४३॥

N/A

References : N/A
Last Updated : May 10, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP