कामात्मजं तं भुवनैकसुंदरं श्यामं पिशंगांबरमंबुजेक्षणम् ।
बृहद्भुजं xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx ॥३१॥

काम केवळ जो अनंग । कृष्णवीर्यें तो झाला साङ्ग । तो कामात्मज लावण्यलिङ्ग । अपर अव्यंग निवडला ॥१९॥
ब्रह्माण्डभुवनसुंदर एक । अपर तुलना न पवे पुरुष । श्याम मनोहर राजीवाक्ष ॥३२०॥
विशाळ बाहु सुपीन सरळ । कुण्डलमंडित गंडयुगल । तद्भारंजित सुतेजाळ । श्रवणीं कुन्तळ झळकती ॥२१॥
किरीट माथां रत्नखचित । कंठाभरणें पदकान्वित । अंगदें कटकें मुद्रिकायुक्त । मेखळांमंडित भूषाढ्य ॥२२॥
कनकाम्बर कशिलें कासे । वदन चंद्रासमान भासे । सस्मित कटाक्षें लक्ष्मी विलसे । अपाङ्गमोक्षें प्रस्फुरित ॥२३॥
नवयौवन ठाणठकार । ऐसियातें वाणासुर । देखता झाला क्रीडापर । तें सविस्तर अवधारा ॥२४॥

दीव्यंतमक्षैः प्रिययाभिनृम्णाया तदंगसंगस्तनकुंकुमस्रजम् ।
बाह्वोर्दधानं मधुमल्लिकाश्रितां तस्याग्र आसीनमवेक्ष्य विस्मितः ॥३२॥

सर्व माङ्गल्यें मंगलभरिता । ऐसी उषा जे प्रियतम कान्ता । तिच्या स्तनकुंकुमें रंजिता । सुमनमाळा ज्या कंठीं ॥३२५॥
सुरतरंगालिङ्गनकाळीं । माळा रुळतां कुचमंदळीं । कुचकुंकुमें सुरंग झाली । ते वक्षस्थळीं जो मिरवी ॥२६॥
मधुमासोद्भव मल्लिकासुमनें । तत्कृतमाळा कुचसंलग्न । कुङ्कुमलग्नें शोणायमानें । लांछितचिह्नें प्रकाशती ॥२७॥
तिये प्रियतमेसी निकट । अग्रभागीं बैसूनि नीट । खेळत असतां सारीपाट । बाण प्रकट त्यां देखे ॥२८॥
त्यातें देखोनि विस्मित बाण । म्हणे हा उद्धट धीट कोण । मम कन्येसीं अंगसंलग्न । न धरी मरणभय पोटीं ॥२९॥
ऐसा अनिरुद्ध बाणासुरें । देखूनि विस्मित निजान्तरें । बाणासुरातें देखिलें येरें । तेंही श्रोते अवधारा ॥३३०॥

स त्म प्रविष्टं वृतमाततायिभिर्भटैरनेकैरवलोक्य माधवः ।
उद्यम्य मौर्वं परिघ व्यवस्थितो यथांतको दंडधरो जिघांसया ॥३३॥

परमप्रतापी महाशूर । बाणभोजनीं पंक्तिकार । वसनाभरणें अलंकार । ज्यां दे असुर निजसाम्यें ॥३१॥
ऐसे भरंवशाचे जे वीर । परम निर्दय महाक्रूर । तिहेंसी वेष्टित बाणासुर । कन्यागार प्रवेशला ॥३२॥
तो अनिरुद्ध देखूनि त्यातें । उदायुध आततायीही भोंवतें । सन्नद्ध बद्ध शतानुशतें । काय करिती तें अवधारा ॥३३॥
अकस्मात वेष्टित भटीं । उषेनें बाण देखिला दृष्टी । धाकें धडकी भरली पोटीं । पाहे गोरटी वरवक्त्रीं ॥३४॥
तंव तो प्रतापी माधव वीर । सुभटवेष्टित बाणासुर । देखूनि क्षोभला प्रळयरुद्र । परिघ सत्वर घेऊनी ॥३३५॥
वैकुंठकंठीरवाचे पोटीं । वीर प्रद्युम्न प्रतापजेठी । विधि हर साहूं न शकती काठी । तेथें कैं गोठी इतरांची ॥३६॥
तया प्रद्युम्नाचा बाळ । अनिरुद्ध प्रतापी प्रळयानळ । देखूनि बाणासुराचें दळ । परिघ विशाळ पडताळी ॥३७॥
लोहामाजी वज्रतुल्य । विद्युत्पातावशिष्ट शल्य । मुरनामक लोहगोळ । परिघ विशाळ तत्कृत जो ॥३८॥
तो मौर्व परिघ पडताळूने । जैसा अंतक दण्डपाणि । करावया प्राणहानि । सज्ज होऊनि राहिला ॥३९॥
करावया भूतसृष्टीचा अंत । दंड धरी जेंवि कृतान्त । तेंव अनिरुद्ध परिघेंसहित । समरा व्यवस्थित राहिला ॥३४०॥
तिये समयीं निकट वीर । प्रेरिता झाला बाणासुर । म्हणे धरा मारा बांधा चोर । कन्यागारप्रवेशक ॥४१॥
ऐकोनि बाणासुराची गोठी । आततायी सुभट हठी । अनिरुद्धावरी लोटले कपटी । शस्त्रें मुष्टी कवळूनी ॥४२॥
वीर प्रवर्तले मारामारी । देखूनि अनिरुद्ध काय करी । तें तूं कुरुवर्या अवधारीं । स्वस्थ अंतरीं होवोनी ॥४३॥

जिघृक्षया तान्परितः प्रसर्पतः शुनो यथा सूकरयूथपोऽहनत् ।
ते हन्यमाना भवनाद्विनिर्गता निर्भिन्नमूर्धोरुभुजाः प्रदुद्रुवुः ॥३४॥

धरावयाचे इच्छेकरून । भोंवता लोटला दैत्यगण । सूकरयूथपा जैसे श्वान । चहूंकडुन मेळविती ॥४४॥
तया श्वानातें सूकरपति । प्रचंडदंष्ट्राप्रहारक्षतीं । भंगी तेंवि ते दुर्मति । अनिरुद्धवीरें भंगिले ॥३४५॥
धरावया आपणातें । दुर्मद दैत्य धांवती भोंवतें । अनिरुद्धें त्यां परिघघातें । श्वान मानूनि झोडपिलें ॥४६॥
कित्येक खङ्गखेटकधारी । मौर्व परिघ बैसतां शिरीं । सुस्नात होवोनियां रुधिरीं । मूर्छित समरीं पहुडती ॥४७॥
अपर कुंतपट्टीशपाणि । यावज्जन्म अजिंक रणीं । ते परिघाचे झोडपणीं । पाठी देऊनि पळाले ॥४८॥
तोमर मुद्गर शूळ शक्ति । वीर प्रतापें हाणों जाती । ते झोडिले परिघघातीं । प्रवाह वमिती रुधिराचे ॥४९॥
परिघघातें भंगलीं शिरें । ते ते सुस्नात झाले रुधिरें । कर पद मोडले परिघमारें । पळों माघारे न लाहती ॥३५०॥
करतळ मनगटें कोपर बाहू । मोडूनि पडिले वीर बहु । एक दुरूनि हाहाहूहू । करूनि शस्त्रें परजिती ॥५१॥
सुभट झोडिले परिघघातीं । एकाआड एक लपती । कित्येक तृष्णें धरिती दांतीं । गाई म्हणती आम्ही तुझ्या ॥५२॥
पळतां दाटले देहळीं । साळी जैश्या मूसळातळीं । तेंवि परिघें झोडी बळी । प्रळयकाळीं कृतान्तवत् ॥५३॥
दैवें सांपदली ज्यां वाट । पावला म्हणती ते श्रीकंठ । भीक मागूनि भरूं पोट । यावरी सुभट म्हणवूं ना ॥५४॥
परिघघातें झोडितां बळी । भंगली बाणभटांची फळी । एक पळती रानोमाळीं । उडिया तळीं घालूनी ॥३५५॥
तें देखोनि बाणासुर । म्हणे हा प्रतापी महावीर । समरीं कोणी न धरी धीर । भासे अपर प्रळयाग्नि ॥५६॥
दुर्धर दैत्यभटांच्या चळथा । परिघघात ओपितां माथां । अवलंबिती मृत्युपंथा । पावली व्यथा मम सेना ॥५७॥
वीर नव्हे हा सामान्य । कोण माउली प्रसवला धन्य । अमोघ याची आंगवण । यत्नेंकरून धरूं यातें ॥५८॥
युद्धीं भिडतां अहळबाहळीं । हा झोडील परिघातळीं । म्हणोनि रथीं बैसला बळी । बाण ते काळीं साटोपें ॥५९॥
परिघें मारितां सुभटथाटी । अनिरुद्ध पावला बाणानिकटीं । येरें कार्मुकीं सज्जूनि काठी । वीर जगजेठी विंधिला ॥३६०॥
परिघें निवारूनि तो शर । अश्व सारथि केले चूर । बाण सोडूनियां रहंवर । अतिसत्वर पळाला ॥६१॥
आज्ञा करूनि किंकरगणा । पाचारिली प्रचंड सेना । मध्यें वेष्टूनि वीरराणा । बाण सणसणा विंधिती ॥६२॥
येरें ठोकूनि परिघघातें । प्रचंड वीर पाडिले भोंवते । लत्ताप्रहारें काढिलीं आंतें । शरमारातें वारूनी ॥६३॥
यावरी कपटी बाणासुर । हृदयीं चिंतूनियां शङ्कर । करितां झाला जो विचार । तो समग्र अवधारा ॥६४॥

तं नागपाशैर्बलिनंदनो बली घ्नंतं स्वसैन्यं कुपितो बबंधह ।
उषा भृशं शोकविषादविव्हला बद्धं निशम्याश्रुकलाक्ष्यरोदिषीत् ॥३५॥

दैत्यसेना कोट्यनुकोटि । अनिरुद्ध वेष्टूनि उठाउठीं । करिती शस्त्रास्त्रांची वृष्टि । विलोकी दृष्टी बळितनया ॥३६५॥
तंव तो प्रतापी उषारमण । दावी बाणातें आंगवण । परिघघातें झोडिलें सैन्य । पळती भणाण महादैत्य ॥६६॥
परिघें ठोकितां कुञ्जरदळें । घायें फुटती कुंभस्थळें । उसळोनि पडती मुक्ताफळें । जलदोपलांसम समरीं ॥६७॥
रथी मारिले परिघघातीं । अधोमुखें रुधिरें वमती । कित्येक मूर्छित पडिले क्षिती । एक दिगंतीं पळाले ॥६८॥
पायींचे लपती सांदीकोंदीं । वातवेगें अश्वसादी । बाणासुर विवरी बुद्धि । म्हणे हा युद्धीं नाटोपे ॥६९॥
मग स्मरूनि आसुरी माया । वारुणीविद्या जपूनियां । नागपाशीं प्रद्युम्नतनया । बांधूनियां पाडिलें ॥३७०॥
जैसा प्रचंड महावात । अंगीं झगटे अनावरत । नागपाशीं अकस्मात । तेंवि मूर्छित पाडिला ॥७१॥
कंठ कर पद बांधिले पाशीं । स्मृति हारपली मानसीं । मूर्छित पडला रणभूमीसी । बाण तयासी वधूं पाहे ॥७२॥
तंव तो पातला कुंभाण्ड मंत्री । अनिरुद्धातें लक्षूनि नेत्रीं । म्हणे हा प्रतापी वीर क्षत्री । मूर्छित निःशस्त्रे या न वधीं ॥७३॥
बलिष्ठ ठेवूनियां राखण । याचें करीं संरक्षण । कुल शील जाती कोण । शोधूं आपण साकल्यें ॥७४॥
येणें भोगिली तव नंदिनी । आन तयेच्या पाणिग्रहणीं । सहसा प्रवर्तों न शके कोणी । रहस्य जाणोनि या रक्षीं ॥३७५॥
जरी तूं मारिसील यालागून । दुःखें उषा देईल प्राण । उषेची जननी आक्रन्दून । पावेल मरण तत्काळ ॥७६॥
तुझी ऐकूनि हे राहटी । क्षोभेल गौरीसह धूर्जटि । यालागीं विवेक विवरूनि पोटीं । वीर जगजेठी रक्षावा ॥७७॥
ऐसें ऐकूनि प्रधानवचन । विवेकारूढ झाला बाण । ठेवूनि प्रतापी वीर रक्षण । गेला आपण निजसदना ॥७८॥
तंव उषा हृत्कमळीं घाबरी । करितां कान्ताची अवसरी । वार्ता घेऊनियां किंकरी । आल्या सहचरी ते काळीं ॥७९॥
म्हणती अवो बाणात्मजे । तुझ्या कान्तें प्रतापें तेजें । प्रचंड दैत्य मारिले पैजे । कोणी न झुंजे येणेंसी ॥३८०॥
धुरा पाडिल्या समराङ्गणीं । केली गजदळा भंगाणी । रथी झोडिले परिघेंकरूनी । गेले पळोनि महावीर ॥८१॥
हा एकला ते बहुत । मारिती निष्ठुर शस्त्रघात । अनिरुद्धवीर प्रतापवंत । प्रलयकृतान्त तुलनेचा ॥८२॥
प्रचंड मारिली दैत्यसेना । परम संकट पडिलें बाणा । तेणें वारूनि कृतसाधना । आणिला रणा अनिरुद्ध ॥८३॥
बाणें नागपाशें बांधूनी । अनिरुद्ध पाडिला समराङ्गणीं । भोंवतीं रक्षणें ठेवूनी । आपण सदनीं प्रवेशला ॥८४॥
ऐसी अनिरुद्धाची वार्ता । किंकरीवदनें उषा ऐकतां । शोकविषादें विह्वळचित्ता । मूर्छित पदली धरणिये ॥३८५॥
किंकरी धांवूनि सांवरिती । म्हणती सखिये न करीं खंती । चिरंजीव तुझा पति । स्मरें वरदोक्ति गौरीची ॥८६॥
नागपाशीं बांधिला असे । तेणें जाकळे परमक्लेशें । एर्‍हवीं प्राणांचें भय नसे । दृढविश्वासें जाण पां ॥८७॥
ऐकूनि उषा करी रुदन । म्हणे नागपाशांचें बंधन । न सोसतां त्यजील प्राण । परम निर्वाण ओढवलें ॥८८॥
शोकें जाकळे कलेवर । विषादें जाकळे अंतर । म्हणे जनकें साधिलें वैर । व्याघ्रमार्जारपडिपाडें ॥८९॥
म्हणे माझीच बुद्धि कुडी । कान्त आणिला येथ अवघडीं । सप्रेमसुखाचिये आवडी । मरणा वरपडी पैं केला ॥३९०॥
आतां कोणा जाऊं शरण । कैसे वांचती वराचे प्राण । कां पां न पवे गौरीरमण । बद्धमोक्षण करावया ॥९१॥
जाऊनि प्रार्थूं जरी पितयासी । तरी तो केवळ अविवेकराशि । सांगों जातां मातेपासीं । संकट तयेसी न निवारे ॥९२॥
अनिरुद्ध सुकुमार सुन्दर । अनिरुद्ध झुंजार एकाङ्गवीर । पद्मिनीलोभें गुंते मधुकर । तेंवि दुस्तर वरपडला ॥९३॥
गुंतला माझिये पीतीसाठीं । म्हणोनि पडिला पाशसंकटीं । कोणापासीं सांगों गोष्टी । म्हणोनि पिटी ललाटीं ॥९४॥
तंव पातली चित्रलेखा । तिणें आश्वासिली उषा । कान्तविषयीं न धरीं धोका । स्मरें अंबिकावरदान ॥३९५॥
जिणें तुजला दिधला वर । ते रक्षील तव भर्तार । ऐसा देऊनि नाभीकार । गेली सत्वर तेथोनी ॥९६॥
मग जपूनि गरुडविद्या । विभूति चर्चिली अनिरुद्धा । कळों नेदितां रक्षकवृंदा । गेली प्रमदा गुप्तत्वें ॥९७॥
सामर्थ्य मंत्राचें विशेष । शिथिल झाले नागपाश । चालों लागले श्वासोच्छ्वास । क्लेश अशेष हारपले ॥९८॥
जैसा निद्रित पहुदे शयनीं । तेंवि अनिरुद्ध पाशबंधनीं । चित्रलेखेनें इतुकी करणी । करूनि सदनीं प्रवेशली ॥९९॥
इतुकी कथा शोणितपुरीं । वर्तली ते कथिली पुरी । यावरी द्वारकेमाझारीं । करिती अवसरी ते ऐका ॥४००॥
श्रीमद्भागवतामाझारीं । दशमस्कंधीं शुकवैखरी । कुरुवर्याचे श्रवणपात्रीं । सविस्तरीं निरूपिली ॥१॥
पुढिले अध्यायीं बळ कृष्ण । अनिरुद्धाची सोडवण । करिती जिंकूनि गौरीमरण । बाहु खंडून बाणाचे ॥२॥
परम रसाळ आहे ते कथा । एकाग्रचित्तें परिसिजे श्रोतां । कलिमल खंडूनि कमलाकान्ता । प्रियतम होणें तद्योगें ॥३॥
प्रतिष्ठानीं एकनाथ । कैवल्यदानी परम समर्थ । चिदानंदें सकळां तृप्त । स्वानंदभरित करीतसे ॥४॥
तेथ गोविंद गोकुळपति । लाहूनि स्वानंदसुखावाप्ति । निजचरणोदकभागीरथी । भरली निगुती दयार्णवीं ॥४०५॥
तेणें दयार्णव अगाध झाला । मुक्तरत्नांच्या संग्रहें भरला । साधूं  जाणे त्या साधकाला । लाभ नेमिला तो अवघा ॥६॥
येरा क्रूर जलग्राह । वैराग्यदशनीं दाविती भय । तयांचा टांकी समुदाय । सेवूनि विषय वर्ततसे ॥७॥
जे वैराग्य न मनिती कठीन । होती दयार्णवीं निमग्न । मुक्तरत्नें संग्रहून । लाहती संपूर्ण मोक्षश्री ॥४०८॥
इति श्रीमद्भागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां पारमहंस्यां संहितायां दशमस्कंधें श्रीशुकपरीक्षित्संवादे हरिवरदाटीकायां दयार्नवानुचरविरचितायामुषाहरणानिरुद्धबंधनं नाम द्विषष्टितमोऽध्यायः ॥६२॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्लोक ॥३५॥ ओवी संख्या ॥४०८॥ एवं संख्या ॥४४३॥ ( बासष्टावा अध्याय मिळून ओवी संख्या २९६५५ )

अध्याय बासष्टावा समाप्त.

N/A

References : N/A
Last Updated : May 10, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP