अध्याय ६२ वा - श्लोक १६ ते २१
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
उषोवाच - दृष्टः कश्चिन्नरः स्वप्ने श्यामः कमललोचनः । पीतवासा बृहद्वाहुर्योषितां हृदयंगमः ॥१६॥
स्वप्नामाजी पुरुषरत्न । कोणी एक म्यां देखिलें जाण । श्यामसुन्दर पद्यलोचन । पीत परिधान कौशेय ॥४१॥
बाहु विशाळ सरळ सलंब । गमे अपर मन्मथबिंब । ज्याच्या दर्शनें विरहक्षोभ । कामिनीकदंब पावतसे ॥४२॥
वनितानिचया हृदयंगम । तरुण सुन्दर मेघश्याम । अरुणापाङ्गें हृदयपद्म । हरूनि विराम मज केला ॥४३॥
तमहं मृगये कांतं पाययित्वाधरं मधु । क्वापि यातः स्पृहयतीं क्षिप्त्वा मां वृजिनार्णवे ॥१७॥
तयातें हुडकितें मी सदनीं । कान्त लावण्यरसाची खाणी । मातें अधरामृत पाजूनी । गेला निगोनि केउता ॥४४॥
जयाची स्पृहा माझे हृदयीं । मातें दुःखार्णवाच्या ठायीं । टाकूनि गेला तो लवलाहीं । दिशा दाही हुडकीतसें ॥१४५॥
मी जयाची स्पृहा करीं । तो मज टाकूनि दुःखसागरीं । निर्दय गेला कोठवरी । कवणे परी पुन्हा लाभे ॥४६॥
स्वप्नीं तुजसीं रमेल नर । तो निर्धारें नेमिला वर । पार्वतीचें हें वरोत्तर । केंवि साचार हों पाहे ॥४७॥
पूर्वीं देखिला ऐकिला नाहीं । तो गिंवसावा कवणे ठायीं । यालागीं पडिलें दुःखडोहीं । चिंताप्रवाहीं तळमळितें ॥४८॥
ऐसें ऐकोनि उषेचें व्यसन । चित्रलेखेचें द्रवलें मन । काय बोलती झाली वचन । श्रोतीं श्रवण तें कीजे ॥४९॥
चित्रलेखोवाच - व्यसनं तेऽपकर्षामि त्रैलोक्यां यदि भाव्यते । तमानेष्ये नरं यस्ते मनोहर्ता तमादिश ॥१८॥
चित्रलेखा म्हणे वो उषे । बाणतनये मृगडोळसे । अवघड व्यसन हें निरसे । उपाय तैसे करीन मी ॥१५०॥
जरी त्रैलोक्यामाजिवडा । दुर्गम स्थळीं असेल गूढा । तोही आणीन घालूनि होडा । प्रताप रोकडा दावीन ॥५१॥
स्वप्नीं रमला तुजसी भर्ता । तुझिया मानसाचा जो हर्ता । त्यातें आणीन हो तत्वतां । व्यसनावर्ता चुकवीन ॥५२॥
परंतु तूं वो इतुकें करीं । त्याची ओळखी हृदयीं धरीं । अवयवकान्ति सालंकारीं । मज निर्धारीं आज्ञापीं ॥५३॥
ध्यानीं चिंदूनि नररूपडें । प्रत्यक्ष दिसे नयनांपुढें । ऐसें सांगें मज निवाडें । त्या तुजपुढें आणीन ॥५४॥
ऐकूनि चित्रलेखेचें वचन । बाष्पें भरले उषेचे नयन । उकासाबुकसी करी स्फुंदन । सावधान म्हणे येरी ॥१५५॥
मजसारिखी असतां सखी । नरवर धुंडीन तिहीं लोकीं । सांगें तयाची ओळखी निकी । वृथा दुःखी कां होसी ॥५६॥
उषा म्हणे वो मायबहिणी । जन्मापासूनि कन्याभवनीं । विरुद्ध असतां मजलागोनि । कोण कोठोनी कळों येती ॥५७॥
पूर्वीं देखिला ऐकिला असे । तो नर स्वप्नामाजी जरी दिसे । जागृति झालिया कोणी पुसे । तरी अनायासें दावूं ये ॥५८॥
पूर्वीं देखिला न ऐकिला । त्रैलोक्यमोहनरूपाथिला । तेणें स्वप्नीं सुरत केला । तो दादुला केंवि दावूं ॥५९॥
पुढती दिसता जरी नयनांसी । तरी मी ओळखुन देतें त्यासी । अगोचराची ओळखी कैसी । म्यां तुजपासीं सांगावी ॥१६०॥
यालागीं माझा मनोरथ । केंवि साधिसी तूं अघटित । यावरी चित्रलेखा म्हणत । पुरवीन आर्त खेद त्यजीं ॥६१॥
इत्युक्त्वा देवगंधर्वसिद्धचारणपन्नगान् । दैत्यविद्याश्वरान्यक्षान्मनुजांश्च यथालिखित् ॥१९॥
ऐसें बोलूनि चित्रलेखा । हातीं घेऊनि रंगशलाका । पटीं लिहिती झाली देखा । समस्त लोकां निज हस्तें ॥६२॥
प्रथम लिही अमरपुरी । शक्रें सहित सुरांच्या हारी । त्यांतें पाहोनि म्हणे य्री । नसे निर्धारीं तो येथें ॥६३॥
मग लिहिला गंधर्वलोक । हाहाहूहूतुम्बुरुप्रमुख । नारदपर्वतादि अनेक । उषा नावेक त्यां पाहे ॥६४॥
त्यामाजी न दिसे नरवैदूर्य । मग लिहिला सिद्धनिचय । तोही सादर निरखूनि पाहे । न दिसे सोय त्यांमाजी ॥१६५॥
त्यावरी लिहिले दिव्य चारण । माजी न दिसे पुरुषरत्न । त्यानंतरें पाताळभुवन । लिहिले संपूर्ण फणिवर्ग ॥६६॥
त्यांतें निरखोनि पाहे उषा । तेथ न दिसे पुरुष तैसा । तेणें झाली खिन्नमानसा । येरी धिंवसा पुन्हां धरी ॥६७॥
त्यावरी लिहिले विद्याधर । त्यांमाजी न दिसे नरसुन्दर । तदुपरि लिहिले दैत्यभार । गोत्र समग्र असुरांचें ॥६८॥
तें सर्वही पाहोनि दृष्टी । चित्रलेखेसी वदे गोष्टी । म्हणे कासया होसी कष्टी । नसे अदृष्टीं वरलाभ ॥६९॥
येरी म्हणे न टाकीं धीर । यथार्थ गौरीचें उत्तर । जाणोनि मानस करीं स्थिर । आणीन सत्वर तव भर्ता ॥१७०॥
कुबेरप्रमुख यक्षपति । समस्त लोकपाळांच्या व्यक्ति । उषा लक्षूनि तयांप्रति । म्हणे मम पति येथ नसे ॥७१॥
मग लिहिला मनुष्यलोक । ब्राह्मण क्षत्रिय वैश्य सेवक । अन्वय सूर्यसोमप्रमुख । भूप अनेक विद्यमान ॥७२॥
उषा पाहोनि त्यांमाझारी । म्हणे कासया पडसी घोरीं । स्वप्नींचें जोडे लेखनावारीं । हें अघटित गौरी कैं घडवी ॥७३॥
येरी म्हणे न टाकीं धीर । आतां लिहितें द्वारकापुर । तें तूं अवलोकीं समग्र । वरनिर्धार करीं तेथ ॥७४॥
मनुजेषु च सा वृष्णीञ्शूरमानकदुंदुभिम् । व्यलिखद्रामकृष्णौ च प्रद्युम्नं वीक्ष्य लज्जिता ॥२०॥
अनिरुद्धं विलिखितं वीक्ष्योष्याऽवाड्मुखी ह्रिया । सोऽसावसाविति प्राह स्मयमाना महीपते ॥२१॥
चित्रलेखा परम कुशल । जेथ अवतरला गोपाळ । आधीं तेंचि वृष्णिकुळ । दावी तत्काळ लिहूनिं ॥१७५॥
मनुष्यांमाजी वृष्णीराव । लिहिला शूरसेन पार्थिव । आनकदुंदुभि तत्संभव । ज्या वसुदेव अभिधान ॥७६॥
त्यातें लक्षूनि म्हणे उषा । कांहीं साम्यता गमे या वंशा । ऐकूनि चित्र लेखा मानसा । माजी भरंवसा अवलंबी ॥७७॥
मग लिहिले रामकृष्ण । अवयव ठाणठकार पूर्ण । आयुधेंसहित वस्त्राभरण । उषा लक्षून हरिखेली ॥७८॥
चित्रलेखेनें पाहूनि नयनीं । बाणतनया प्रसन्नवदनी । येथ झाली काय म्हणोनी । ऐसें निजमनीं तर्कीतसे ॥७९॥
तंव ते उषा म्हणे सखिये । मेघश्याम हा कवण होय । अपर याचा प्रत्याम्नाय । पुरुष पाहें सुजाणे ॥१८०॥
येरी म्हणे हा द्वारकाधीशा । त्रैलोक्यनायक परमपुरुष । अपर याचा वीर्यविशेष । पाहें औरस प्रद्युम्न ॥८१॥
म्हणोनि लिहिली मन्मथमूर्ति । उषा देखोनि संदिग्ध चित्तीं । होय न होय ऐसी भ्रान्ति । सलज्जवृत्ति जाणविते ॥८२॥
लज्जित पल्लव सरसा करी । खुणा बोधी मंदोत्तरीं । यासारिखी प्रतिमा दुसरी । पाहें अंतरीं विवरूनी ॥८३॥
उषावचन ऐकूनि ऐसें । चित्रलेखेच्या मानसें । अनिरुद्धें ही भोगिली असें । दृढ विश्वासें अवगमिलें ॥८४॥
मग तो लिहिला रोचनाकान्त । सादरचित्तें सुरंगभरित । वसनाभरणीं सालंकृत । ठकारमंडित कंजाक्ष ॥१८५॥
त्यातें लक्षूनि बाणकुसरी । लाजूनि झाली पाठीमोरी । चित्रलेखेतें नमस्कारी । विवरीं पुढारीं सूचना ॥८६॥
हाचि हाचि तो होय ऐसें । चित्रलेखेतें सांगे हर्षें । संशय न धरीं वो मानसें । म्हणे विश्वासें कुरुवर्या ॥८७॥
महीपति हें संबोधन । कीं तूं पृथ्वी पाळिसी पूर्ण । ऐसें कौतुक कोठें आन । तुजलागून दृश्य असे ॥८८॥
येरू म्हणे जी योगाग्रणी । यावत्काळ आम्हीं कर्णीं । ऐकिलें नाहीं तेथ नयनीं । देखों कोठोनी स्वामिया ॥८९॥
यानंतरें वर्तलें काय । तो निरूपा अभिप्राय । ऐसें प्रार्थितां शुकाचार्य । वदता होय तें ऐका ॥१९०॥
N/A
References : N/A
Last Updated : May 10, 2017
TOP