राजोवाच - बाणस्य तनयामूषामुपयेमे यदूत्तमः । यत्र युद्धमभूद्धोरं हरिशङ्करयोर्महत् ।
एतत्सर्व महायोगिन्समाख्यातुं त्वमर्हसि ॥१॥

म्हणे सर्वज्ञा बादरायणि । प्रश्नापेक्षा अंतःकरणीं । वर्ते ते मज विवळ करूनी । घालिजे श्रवणीं स्वामिया ॥१२॥
हिरण्यकशिपूचा जो कुमर । प्रह्लादनामा वैष्णवप्रवर । त्याचा पुत्र विरोचनवीर । वीर्याङुक्र बळि त्याचा ॥१३॥
बाणासुर बळीचा सुत । शोणितपुरीचा जो नृपनाथ । शङ्कराचा परम भक्त । वोळगे संतत शिवसेवे ॥१४॥
उषानामका बाणतनया । पर्णूनि अनिरुद्धें केली जाया । तेथें शंकरा रुक्मिणीप्रिया । दारुण उभया रण झालें ॥१५॥
एकमेकांचे हृदयवासी । घोर युद्ध कैं घडलें त्यांसी । हें सर्वही कथावयासी । योग्य आहेसी योगीशा ॥१६॥
ऐसा नृपाचा ऐकूनि प्रश्न । बादरायणि मुनि सर्वज्ञ । करिता झाला निरूपण । तें सज्जन परिसत तूं ॥१७॥

श्रीशुक उवाच - बाणः पुत्रशतज्येष्ठो बलेरासीन्महात्मनः । येन वामनरूपाय हरयेऽदायि मेदिनी ॥२॥

शुक म्हणे गा भुवनपाळा । परीक्षिति हरिगुणश्रवणशीळा । हरिभक्तांची अन्वयमाळा । जे कळिमळा सुरसरिता ॥१८॥
प्रह्राद भजला गरुडध्वजा । अद्यापि ज्याची कीर्तिध्वजा । तत्सुत विरोचन सायुज्या । पातला ओजा रविभजनें ॥१९॥
विरोचनवीर्यें जन्मला बळि । इंद्र मेळविला जेणें धुळी । समस्त त्रिदशांचिये मौळीं । अमरावतीस मिरवला ॥२०॥
जया बळीची प्रतापगरिमा । त्रिजगीं कोणी न पवे सीमा । क्षीराब्धि मथूनि दिव्य ललामा । अद्भुत महिमा प्रकाशिला ॥२१॥
जयाचे शतमखयजनकाळीं । वामनरूपें श्रीवनमाळी । त्रिपादभूदानाच्या छळीं । छळितां न डंडळी सत्वस्थ ॥२२॥
ब्रह्माङ्गण भरलें द्विपादमात्र । तृतीयपदीं अर्पी गात्र । एवं वमन दानपात्र । अर्चूनि वेत्रधर केला ॥२३॥
तया बळीस शत एक पुत्र । त्यांमाजी ज्येष्ठ बाणासुर । तेणें आराधिला शंकर । भजनीं तत्पर होऊनी ॥२४॥
वीर धीर प्रतापी बळी । अमरां अजिंक समरशाळी । तेणें तोषवूनि वनमाळी । केला देहलीपरिगोप्ता ॥२५॥
ऐसा महात्मा बळि प्रसिद्ध । ब्राह्मणभजनें जिंकूनि बिबुध । कीर्ति विस्तारिली अगाध । प्रतापी प्रह्राद मानविला ॥२६॥
पुढें तयाचें संतान । नोहे प्राकृतापरी गौण । तुवां केला जयाचा प्रश्न । तें व्याख्यान अवधारीं ॥२७॥

तस्यौरसः सुतो बाणः शिवभक्तिरतः सदा । मान्यो वदान्यो धीमांश्च सत्यसंधो धृतवतः ॥३॥

तया बळीचा औरस कुमर । प्रतपामेरु बाणासुर । शिवसेवनीं निरंतर । चंद्रीं चकोर ज्यापरी ॥२८॥
प्रमथगणीं वरिष्ठ मान्य । बुद्धिमंत आणि वदान्य । सत्य सन्मार्गीं व्रतस्थ पूर्ण । त्रिजगीं धन्य दैत्यकुळीं ॥२९॥
तयाचें उद्दाम ऐश्वर्य । कथितों न्यग्रोधबीजप्राय । क्षणैक सावध परिसता होय । कुरुनरवर्यवैदूर्या ॥३०॥

शोणिताख्ये पुरे रम्ये स राज्यमकरोत्पुरा । तस्य शंभोः प्रसादेन किंकरा इव तेऽमराः ।
सहस्रबाहुर्वाद्येन तांडवे तोषयन्मृडम् ॥४॥

शतशृंगीचें दुर्गम शृंग । त्यावरी शोणितपुर निलाग । सुरासुरां न करवे लाग । तेथ बाण अभंग राज्य करी ॥३१॥
शोणितपुरीचा राजा बाण । ऐश्वर्यवंत पूर्वींहून । त्यासी शंभूच्या प्रसादें करून । निर्जरगण दासवत् ॥३२॥
दास्य करिती ऋद्धिसिद्धि । निर्वैरभावें सेविजे विबुधीं । शिवसेवेची प्रसादलब्धि । तेणें समृद्धि सर्व घरीं ॥३३॥
ऐसा संपन्न बाणासुर । जेंवि सहस्रकर भास्कर । शिवताण्डवीं वाद्यकार । होवोनि विचित्र रस भरिला ॥३४॥
डमरुढाङ्कारीं युग्म द्विकरीं । अपर करयुग्मीं ताल धरी । रुद्रवीणा मुरज झल्लरीं । नागस्वरीं स्वरबद्ध ॥३५॥
एवं वाद्यें पंच शत । संगीतसंमत मूर्छनायुक्त । शंकर करितां ताण्डवनृत्य । संतोष करित तद्गजरें ॥३६॥
आनंदभरित नर्तनकाळीं । बाण लक्षूनि वादित्रशाळी । संतुष्ट होवोनि चंद्रमौळी । म्हणे ये वेळीं वर मागें ॥३७॥
मृडानीरमण जो कां मृड । तो तोषविला चंद्रचूड । प्रसन्न वदनें वचन गोड । बोलिला उघड तें ऐका ॥३८॥

भगवान्सर्वभूतेशः शरण्यो भक्तवत्सलः । वरेणच्छंदयामास स तं वव्रे पुराधिपम् ॥५॥

सकलैश्वर्याचे मुकुटीं । सर्वभूतेश्वर जो धूर्जटि । शरण्य शरणागतांच्या कोटी । कृपादृष्टी उद्धर्ता ॥३९॥
भक्तवत्सल तो पंचवदन । वरेंकरून प्रलोभी बाण । तेणें शङ्कारातें वरदान । स्वपुररक्षण याचिलें ॥४०॥
तुम्ही वरदायी माझिये शिरीं । कृपेनें रक्षावी शोणितपुरी । याञ्चा ऐकूनियां त्रिपुरारि । म्हणे वैखरी तथास्तु ॥४१॥
वर लाहूनि संतुष्ट बाण । स्थाणु स्वपुरा करी रक्षण । स्वप्रतापासमान आन । पाहे त्रिभुवन शोधूनी ॥४२॥
मजसमान समराङ्गणीं । योद्धा न दिसे त्रिभुवनीं । म्हणे प्रार्थूनि शूळपाणि । मानसशिराणी पुरवावी ॥४३॥

N/A

References : N/A
Last Updated : May 10, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP