अध्याय ६२ वा - श्लोक ६ ते १०
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
स एकदाऽऽह गिरिशं पार्श्वस्थं वीर्यदुर्मदः । किरीटेनार्कवर्नेन संस्पृशंस्तत्पदांबुजम् ॥६॥
तो मग कोणे एके काळीं । बाण पातला शंभूजवळी । शिवपदाम्बुज वंदूनि मौळीं । बद्धाञ्जळि प्रार्थितसे ॥४४॥
गिरिमस्तकीं ज्याचें शयन । गिरिशनामा तो ईशान । तया पार्श्वस्थातें नमून । करी प्रार्थन औद्धत्यें ॥४५॥
प्रतापवीर्यें जो दुर्मद । अदीर्घदर्शी बुद्धिमंद । अर्कभासुरकिरीटें पद । वंदूनि वरद जें मागे ॥४६॥
ते बाण याचीच वैखरी । शुक रायातें कथन करी । तें व्याख्यान सावध श्रोत्रीं । सुकृतपात्रीं सेवावें ॥४७॥
नमस्ये त्वां महादेव लोकानां गुरुमीश्वरम् । पुंसामपूर्णकामानां कामपूरामरांघ्रिपम् ॥७॥
अगा हे महादेवा तूतें । विश्वनियंत्या जगद्गुरूतें । मी नमीतसें परम आर्ते । अमरद्रुमातें जाणोनी ॥४८॥
आम्हांऐशांचे अपूर्ण काम । पूर्णकर्ता तूं अमरद्रुम । हें जाणोनि श्रीपदपद्म । नमितों सप्रेम सद्भावें ॥४९॥
विनीत ऐकूनि बाणवाणी । शंभु पुसे दावूनि पाणि । काय अभीष्ट तुझिये मनीं । मागें म्हणूनि आज्ञापी ॥५०॥
शिवाची प्रसन्नता देखोनि । मागता झाला सहस्रपाणि । तें निरूपी बादरायणि । ऐकें श्रवणीं कुरुवर्या ॥५१॥
दोः सहस्रं त्वया दत्तं परं भाराय मेऽभवत् । त्रिलोक्यां प्रतियोद्धारं न लभे त्वदृते समम् ॥८॥
शङ्करातें म्हणे बाणा । सहस्र बाहूंची आंगवण । त्वां हे दिधली मजला पूर्ण । तो भार संपूर्ण मज वाटे ॥५२॥
पाहतां त्रैलोक्याच्या ठायीं । मजसीं प्रतियोद्धा अपर नाहीं । तुजवांचूनि दुसरा पाहीं । समरमहीं जोडेना ॥५३॥
तूंचि एक माझेनि पाडें । यालागीं सत्वर मजसी भिडें । बाहुस्फुरण दाटलें गाढें । योद्धा न जोडे बळसिंधु ॥५४॥
कंडूत्या निभृतैर्दोर्भिर्युयुत्सुर्दिग्गजानहम् । आद्याऽयां चूर्णयन्नद्रीन्भीतास्तेऽपि प्रदुद्रुवुः ॥९॥
मम दोर्दंडीं वीरश्रीकंडू । दाटला असे महाप्रचंडू । दिग्गजेंसी इच्छीं भिडूं । परी ते पाडू न करिती ॥५५॥
अगा हे आद्या प्रणवरूपा । वीर श्रीमदें चढूनि कोपा । धांवता तिहीं सांडूनि दर्पा । पळते झाले दिगंतीं ॥५६॥
पर्वत लोटलिया मजवरी । चूर्ण करीन मुष्टिप्रहारीं । यालागीं तूतें प्रार्थीं समरीं । पुरवीं त्रिपुरारि मम इच्छा ॥५७॥
तच्छ्रुत्वा भगवान्क्रुद्धः केतुस्ते भज्यते यदा । त्वद्दर्पघ्नं भवेन्मूढ संयुगं मत्समेन ते ॥१०॥
हें ऐकून शंभु म्हणे । अभाग्या कायसें हें भागणें । क्रोधें प्रज्वळलेनि नयनें । बोधी वरदानें प्रतियोद्धा ॥५८॥
गोपुरशिखरींचा मयूरकेतु । तुझा भंगेल जैं अकस्मातु । त्वद्दर्पहंता वीरश्रीनाथ । होईल प्राप्त तैं समरीं ॥५९॥
माझेनि पाडें अपर रुद्र । समरंगीं तुज जोडेल वीर । हें ऐकूनि बाणासुर । आह्लाद थोर पावला ॥६०॥
N/A
References : N/A
Last Updated : May 10, 2017
TOP