अध्याय ५६ वा - श्लोक ३६ ते ४०
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
तेषां तु देव्युपस्थानात्प्रत्यादिष्टाऽऽशिषा स च । प्रादुर्बभूव सिद्धार्थः सदारो हर्षयन्हरिः ॥३६॥
दशांशहवनोत्तरतर्पणें । मार्जनें आणि संतर्पणें । अंबा तुष्टली प्रसन्न वदनें । दिल्हीं वरदानें हरिप्राप्ती ॥३७०॥
अंबेचिया आशीर्वचनीं । कृष्णागमन तेचि दिनीं । धन्य म्हणती श्रीभवानी । आम्हां निर्वाणीं पावली ॥७१॥
जाम्बवतीतें देखोनी । म्हणती प्रत्यक्ष श्रीभवानी । आली कृष्णातें घेऊनी । आमुच्या स्तवनीं प्रकटली ॥७२॥
जिहीं प्रसन्न केली अंबा । तया समस्त जनकदंबा । आश्चर्य झालें पद्मनाभा । सहित वल्लभा देखोनी ॥७३॥
सलिलाब्धिभवललामललना । अपर इंदिरा इंदुवंदना । जाम्बवती ते दिव्याङ्गना । मधुसूदनासमवेत ॥७४॥
प्रकट झाली अकस्मात । देखोनि द्वारकाजन समस्त । प्रसन्नवदनें उदो म्हणत । सिद्धी मनोरथ पावले ॥३७५॥
दुर्गा तुष्टली आम्हावरी । दुर्गमी रक्षूनि आणिला हरि । प्रसादा वोपिली दिव्य नारी । ते हे सुंदरी हरिरमणी ॥७६॥
सकळ स्वजनां प्रोत्साहित । निजागमनें आनंदवित । सिद्धी पाववोनी त्यांचे अर्थ । सदार भगवंत प्रकटला ॥७७॥
पद्ममुकुळें जेंवि समस्तें । सूर्योदयीं प्रफुल्लितें । तेंवि द्वारकाजनांचीं चित्तें । झालीं विकासितें हरिउदयीं ॥७८॥
उपलभ्य हृषीकेशं मृतं पुनरिवाऽगतम् । सह पत्न्या मणिग्रीवं सर्वे जातमहोत्सवाः ॥३७॥
मेलें परते स्वर्गींहून । तैसे कृष्णागमनें जन । परमानंदें झाले पूर्ण । दंपती देखोनि निवाले ॥७९॥
कंठदेशीं स्यमंतकमणि । जाम्बवती लावण्यखाणी । एवं देखोनि चक्रपाणि । द्वारकाभुवनीं उत्साह ॥३८०॥
एक वांटिती शर्करा । एक हाकारिती द्विजवरां । कृष्णाप्राप्तीउत्साहगजरा । माजी देकारा करिताती ॥८१॥
नवशिल्या वांटिती शेरणिया । उपोषणी ते पारणिया । एक जाऊनि हरिहराया । महासपर्या करिताती ॥८२॥
कृष्णागमनोत्साहघोषें । द्वारकावासी जन संतोषे । वसुदेवदेवकीप्रमुख हर्षें । अभ्युदयिकें संपादिती ॥८३॥
गोभूतिलघृतहिरण्यदानें । लवण धान्यें वसनाभरणें । देतीं ब्राह्मणांकारणें । गृहशान्त्यर्थें गृहोचितें ॥८४॥
जाम्बवतीचा गृहप्रवेश । करूनि लक्ष्मीपूजनास । रेवती रुक्मिणी भाणवस । परमोह्लासें निरोविती ॥३८५॥
द्वारकाभुवनीं नारीनर । वोहरें पाहती अतिसादर । समारंभेंसीं अहेर । वाद्यगजरें समर्पिती ॥८६॥
सुहृदीं आप्तीं स्नेहाळ स्वजनीं । ओहरें नेवोनि आत्मसदनीं । मंगलस्नानदिव्यभोजनीं । वसनाभरणीं गौरविती ॥८७॥
ऐसा आनंद घरोघरीं । कृष्णागमनें द्वारकापुरीं । पौलोमी पर्णोनि पर्वतारि । जेंवि शोभे सुरवरीं त्रिविष्टपीं ॥८८॥
यानंतरें एके दिवसीं । उग्रसेनभूपतीपासीं । यादवें सहित हृषीकेशी । सुधर्मासदसीं उपविष्ट ॥८९॥
वृत्तान्त राजया करूनि विद्त । मिथ्याभिशापक्षालनार्थ । पाचारिजे सत्राजित । म्हणतां दूत पाठविले ॥३९०॥
सत्राजितं समाहूय सभायां राजसन्निधौ । प्राप्तिं चाख्याय भगवान्मणिं तसमि न्यवेदयत् ॥३८॥
नृपासन्निध सभास्थानीं । सत्राजितातें पाचारूनी । यादवांसहित चक्रपाणि । अभ्युत्थानीं सम्मानी ॥९१॥
सभे बैसला सत्राजित । प्रसंगें मणीची काढिली मात । जनपदवदनें पूर्वींच विदित । विवरापर्यंत गवेषणा ॥९२॥
विवरीं पवेशल्यानंतरें । वर्तले कथेचीं उत्तरें । स्वमुखें कथिलीं रुक्मिणीवरें । संपूर्ण नगरें परिसावया ॥९३॥
स्यमंतकमणीचें दर्शन । जाम्बवतासीं बाहुकदन । जाम्बवतीचें पाणिग्रहण । पुनरागमन मणिसहित ॥९४॥
आम्हीं प्रसेन वधिला नसतां । मिथ्यापवाद माझिया माथां । सर्वां विदित वर्तली कथा । निर्दोष आतां कीं नाहो ॥३९५॥
सत्राजिताकारणें मणि । देता झाला चक्रपाणि । कलंक निरसला येथोनी । झाला मूर्ध्नि उजळता ॥९६॥
सत्राजितें तियें वचनें । सभेमाजी ऐकतां श्रवणें । लज्जा पावला अंतःकरणें । तीं सर्वज्ञें परिसावीं ॥९७॥
स चातिव्रीडितो रत्नं गृहीत्वाऽवाड्मुखस्ततः । अनुतप्यमानो भवनमगमत्स्वेन पाप्मना ॥३९॥
आपुलें कृतापराधपाप । तेणें पावला अनुताप । महत्त्वाचा झाला लोप । सलज्ज सकंप सभास्थानीं ॥९८॥
सत्राजित जैं लाधला मणि । तैं तेजस्वी सूर्याहूनी । तोहीं लज्जित रत्नग्रहणीं । अधोवदनीं गृहा गेला ॥९९॥
मणि घेऊनि सत्राजित । अधोवदनें लज्जान्वित । कृतापराधें परमतप्त । उठिला त्वरित न बोलतां ॥४००॥
तेणें जाऊनि आपुले घरीं । काय विवरिलें अभ्यंतरीं । तें तूं कुरुवर्या अवधारीं । शुकवैखरी वाखाणी ॥१॥
सोऽनुध्यायंस्तदेवाघं बलवद्विग्रहाकुलः । कथं मृजाम्यात्मरजः प्रसीदेद्वाऽच्युतः कथम् ॥४०॥
तेणें जाऊनि निजमंदिरीं । एकान्तसदनीं विचार करी । प्रसेनवियोगदुःखलहरी । हृदयसागरीं हेलावे ॥२॥
म्हणे प्रसेनाऐसा बन्धु । परमस्नेहाळ विवेकसिंधु । गेला आणि मज हा बाधु । लोकापवादु स्पर्शला ॥३॥
आतां कवणेंसीं विचार करूं । केंवि हा दोषाब्धि निस्तरूं । लोकापवाद झाला थोरू । पदलें वैर बळिष्ठेंसीं ॥४॥
कोणा उपायें याचें शमन । पुन्हा साधुत्वें वदती जन । निर्वैर होवोनि जनार्दन । निजकारुण्यें संगोपी ॥४०५॥
ऐसें अपराधजनित पाप । स्मरोनि विवरी बहु संकल्प । तत्परिहरणार्थ अनुतप । विचार अल्प उमजेला ॥६॥
क्षणक्षणा विकळ पडे । प्रसेन स्मरोनि दीर्घ रडे । एकान्तसदनाचीं कवाडें । लावूनि ओरडे एकाकी ॥७॥
तिये समयीं पतिव्रता । सुभगा साध्वी सुशील वनिता । अनन्यभवें अनुकूल कान्ता । ते एकांता पवर्तली ॥८॥
सत्राजितातें सावधान । करूनि म्हणे काय हें रुदन । प्रसेन पावला निर्वाण । तो परतोन केंवि भेटे ॥९॥
आतां स्वस्थ मानस कीजे । हृद्गत मजसीं अनुवादिजे । मजयोग्य असो नसो तें वदिजे । शंका न धरिजे यदर्थीं ॥४१०॥
हें ऐकोनि सत्राजित । पतिव्रतेसी बोले मात । श्रोतां होवोनि दत्तचित्त । तो वृत्तान्त परिसावा ॥११॥
N/A
References : N/A
Last Updated : May 09, 2017
TOP