अध्याय ५६ वा - श्लोक १६ ते २०

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


प्रायः कृष्णेन निहतो मणिग्रीवो वनं गतः । भ्राता ममेति तच्छ्रुत्वा कर्णे कर्णेऽजपञ्जनाः ॥१६॥

बहुतेक मणि याचिला कृष्णें । म्या भंगिलें त्याचिया तृष्णे । मानसीं गुल्म धरूनि तेणें । प्रसेनप्राण घेतला ॥२७॥
परम प्रियतम माझा भ्राता । ग्रीवामंडित स्यमंतक असतां । मृगयार्थ वना गेला होता । कृष्णें तत्त्वता तो वधिला ॥२८॥
ऐसी शोकोर्मीमाझारीं । वदली सत्राजिताची वैखरी । हें वाक्य पडतां जनांच्या श्रोत्रीं । परस्परीं तें श्रुत करिती ॥२९॥
कर्णोपकर्णीं हें वाक्य कथन । उपांशु जपवत् वदती जन । द्वारकेमाजी थोर लहान । वदतां श्रवण सर्वत्रां ॥१३०॥
मुखाबाहेर गेलिया शब्द । सांवरूं न शके जरी प्रबुद्ध । यालागीं विवरूनि एकान्तवाद । करिती कोविद नयनिपुण ॥३१॥
प्रमाद म्हणिजे असावधता । शोकवैकल्यें वदों जातां । विघ्नें कवळिलें सत्राजिता । तें कुरुनाथा अवधारीं ॥३२॥

भगवांस्तदुपश्रुत्य दुर्यशो लिप्तमात्मनि । मार्ष्टु प्रसेनपदवीमन्वपद्यत नागरैः ॥१७॥

सर्वज्ञ श्रीकृष्ण अंतरवेत्ता । तथापि ऐकोन कुटीची वार्ता । मिथ्या अभिशाप आला माथां । तत्क्षालनार्थ प्रवर्तला ॥३३॥
उग्रसेनादि सभास्थानीं । बैसल्या समस्त यादवश्रेणी । तेथ स्वमुखें चक्रपाणि । दुर्यशोग्लानि प्रकट वदे ॥३४॥
भोज अंधक माधव कुकुर । वृष्णि सात्वत दाशार्हप्रवर । समस्त यादव बैसलां गोत्र । तरी ऐका विचित्र दैवबळ ॥१३५॥
सर्वाम देखतां सभास्थानीं । प्रसंगोचित मी बोलिलों वाणी । नृपायोग्य हा स्यमंतकमणि । हें ऐकिलें श्रवणीं सत्राजितें ॥३६॥
इतुकियावरूनि माजिया माथां । दुर्यशारोप केला वृथा । तुम्हीं गोत्रजीं ममहितार्था । क्षालनार्था प्रवर्तिजे ॥३७॥
हें ऐकोनि म्हणती गोत्रज । कर्णोपकर्णीं हे गुजगुज । ऐकत होतों तेचि सहज । गरुडध्वजें प्रकटिली ॥३८॥
एक म्हणती शोकार्तवाणी । सहसा न धरिजे अंतःकरणीं । एक म्हणती स्यमंतकाहूनी । मणींच्या श्रेणी हरिसदनीं ॥३९॥
ब्रह्मादि देव आज्ञाधर । तेथ मणीचा कोण विचार । संकल्पमात्रें द्वारकापुर । करवी श्रीधर स्वसत्ता ॥१४०॥
एक म्हणती सुधर्मा सभा । कृष्णें आणिली ऐश्वर्यलाभा । तेथ मणीची कायसी शोभा । किमर्थ क्षोभा वश होणें ॥४१॥
एक म्हणती ऐसें नोहे । ऐश्वर्यक्षोभें जाऊं नये । सत्य मिथ्या मराळप्राय । निवडिजे न्यायें पय पाणी ॥४२॥
हें ऐकोनि कमलापति । पहावया प्रसेनपद्धति । तुम्हीं चालावें म्हणे समस्तीं । दुर्यशोनिवृत्ति करावया ॥४३॥
उग्रसेन वसुदेवप्रमुख । द्वारके ठेवूनि वृद्ध अशेख । सवें घेऊनि यादवकटक । यदुनायक निघाला ॥४४॥
द्वारकानगरींचे नागरजन । अवधियांसहित श्रीभगवान । प्रसेनपदवी अनुलक्षून । चालिला सर्वज्ञ मनुजवत् ॥१४५॥

हतं प्रसेनमश्वं च वीक्ष्य केसरिणा वने। तं चाद्रिपृष्ठे निहतमृक्षेण ददृशुर्जनाः ॥१८॥

पुढें काढिती कुरंगमार्ग । मागें प्रसेनहयशफलाग । चालिले शोधीत दुर्गम दांत । बहु भूभाग आक्रमिला ॥४६॥
हुडकित भरले वनीं दुर्घटा । तंव देखिला प्रसेनअश्वसाटा । अवयव पडिले बारा वाटा । वसना मुकुटा ओळखती ॥४७॥
चाप तुणीर खटक खङ्ग । माळा मुद्रिका भूषणें चांग । सेवकीं घेवोनि पुढें लाग । सिंहपदवीचा हरि गिंवसी ॥४८॥
सिंहपदविन्यासा मान । करूनि चालिएल शोधित रान । सामान्य पर्वत उल्लंघोन । केलें आरोहण गिरिपृष्टीं ॥४९॥
तेथ देखिलें परमाश्चर्य । आस्वलाचे उमटले पाय । सिंहप्रेत पडिलें आहे । मणीची सोय न लभेचि ॥१५०॥
पुधें काढिला आस्वलमाग । कैत चालिले कणीचा लाग । अवघड पर्वत दुर्गम मार्ग । भयंकर दांग प्रवेशले ॥५१॥
वृक्ष लागले महाविशाळ । करंज कदंब नीप सरळ । खदिर धामोडे अर्जुन बहळ । व्याहळे बाहळे आरग्वध ॥५२॥
रिठे ब्याहडे हिरडे कुडे । साय सातवनें दोसाडे । दिव्य वृक्शांचे मांदोडे । आम्रचंदनपनसादि ॥५३॥
राताञ्जन राजादन । ताल तमाल शाल गहन । मंदार पार्यातक संतान । मृत्युलोकींचे गिरिभव जे ॥५४॥
जंबु कपित्थ तिंतिणिका । वैकंकत कर्वंदिका । शाल शाल्मली श्लेष्मातका । भल्लातका सहकोळी ॥१५५॥
प्लक्ष पालाश पिंपळ वट । उंबर अंजिर तिंदुक तरट । निंब निंबारे सरळ नीट । जाळी अफाट वंशांच्या ॥५६॥
ऐसे अपार वृक्ष वनीं । उंच विशाळ लागले गगनीं । वल्लीलतालिंगिता पर्णीं । सुमनीं वितानीं सफलिता ॥५७॥
भुभुकार देती वानरभार । फूत्कारकरिती महाविखार । कोकिळांचे पंचम स्वर । मत्त मयूर नाचती ॥५८॥
ढोलीं घुघाती दिवाभीत । वटवाघुळा कळकळित । स्वेच्छा पिंगळे किलबिलित । किलकिलत कळविंक ॥५९॥
राक्षस गर्जती भयंकर । सिंहनाद करिती घोर । भूत प्रेत यक्षिणी क्रूर । पिंग झोटिंग वेताळ ॥१६०॥
भूतें नाचती नग्नोन्मत्त । विशाळ विकराळ महाप्रेत । शाकिनी डाकिनी खांकात । भीम गर्जत वनचंडी ॥६१॥
सिंह ऋक्षव्याघ्र वृक । वाराह गज गवाक्ष भल्लूक । तरस चमरी खङ्ग जंबुक । महाभयानक श्वापदें ॥६२॥
ऐसिये दुर्गम वनोदरीं । ऋक्षपदवी लक्षित हरि । रिघाला जाम्बवताचे विवरीं । तेंहि चतुरीं परिसावें ॥६३॥

ऋक्षराजबिलंभीममंधेन तमसाऽवृतम् । एको विवेश भगवानस्थाप्य बहिः प्रजाः ॥१९॥

बिळामाजी आस्वलमार्ग । देखोनि थोकला नागरवर्ग । म्हणती मणीचा प्रसंग । येथोनि लाग राहिला ॥६४॥
हें ऐकोनि पंकजपाणि । नागरजनासि बोले वाणी । जंववरी प्राप्त नोहे मणि । द्वारकाभुवनीं तंव न वचें ॥१६५॥
तें परिसूनि समस्त जन । म्हणती काय हा आग्रह कोण । विवरीं रिघोनि द्यावा प्राण । येवढें निर्वाण किमर्थ ॥६६॥
एक म्हणति सत्राजिता । सांगोनि प्रसेन मरणवार्ता । शस्त्रें वस्त्रें भूषणें देतां । दुर्यश माथां मग कैंचें ॥६७॥
ऐकोनि म्हणे पद्मनाभ । जंववरी मणीचा नोहे लाभ । तंव दुर्यशकाळिमाराहुबिंब । जडलें स्वयंभ वदनाब्जा ॥६८॥
यालागीं प्रवेशेन मी विवरीं । समस्तीं रहावें बाहेरीं । ऐसें म्हणोनियां श्रीहरी । बिळामाझारीं प्रवेशला ॥६९॥
ऋक्षराजाचें भयंकर बिळ । अंधकारें दाटलें बहळ । माजी प्रवेशला घननीळ । साक्षी केवळ प्राज्ञात्वें ॥१७०॥
असतां मणीचा पकाश बिळीं । तरी अंधकार कां तिये स्थळीं । म्हणाल तरी ते गर्ता सरळी । द्वारपर्यंत नसे कें ॥७१॥
विवरीं प्रवेशोनि घननीळ । स्वप्रकाशें धवळी बिळ । ठाकिलें ऋक्षराजाचें स्थळ । पुढें प्राञ्जळ अवधारा ॥७२॥

तत्र दृष्ट्वा मणिं श्रेष्ठं बालक्रीडनकं कृतम् । हर्तुं कृतमतिस्तस्मिन्नवतस्थेऽर्भकांतिके ॥२०॥

वक्र कुटिळ अतिलंबाळ । मार्ग क्रमूनि ठाकिलें बिळ । तेथ मणिप्रभाबंबाळ । देखे केवळ बिळगर्भ ॥७३॥
सुषुपतिगर्भीं जैसें स्वप्न । तैसें ठाकिलें ऋक्षसदन । तेथ स्यमंतक देदीप्यमान । देखिला दुरून मणिश्रेष्ठ ॥७४॥
तपश्चर्येअंतीं फळ । तेंवि श्रमतां श्रीघननीळ । मणि देखोनि सुतेजाळ । तोषे केवळ हृदयकमळीं ॥१७५॥
बालकाचिया पाळण्यावरी । मणि बांधिला खेळण्यापरी । निकट उभी असे धात्री । तेथ श्रीहरि पातला ॥७६॥
तेथ मणिहाणाची धरूनि मति । उभा अर्भकानिकटवर्ती । धात्री देखोनियां श्रीपति । पडली आवर्ती भयार्णवीं ॥७७॥
धात्री म्हणिजे ते उपमाता । तिणें देखोनि श्रीकृष्णनाथा । महाभयाई ऊर्मी चित्ता । करित आकान्ता तें ऐका ॥७८॥

N/A

References : N/A
Last Updated : May 09, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP