अध्याय ५६ वा - श्लोक ११ ते १५
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
दिने दिने स्वर्णभारानष्टौ स सृजति प्रभो । दुर्भिक्षमार्यरिष्टानि सर्पाधिव्याधयोऽशुभाः ॥११॥
स्वर्चित स्यमंतक जिये स्थानीं । तिये राष्ट्रीं कल्याणश्रेणी । नाहें विघ्नांची काचणी । प्रसवे अनुदिनीं अष्टभार ॥८२॥
अष्टौ भार गाङ्गेय शुद्ध । जें कां बोलिजे जाम्बूनद । स्वर्चित स्यमंतकमणि विशद । प्रसवे प्रसिद्ध दिनीं दिनीं ॥८३॥
ऐकें पभो परीक्षिति । भारसंख्येची व्युत्पत्ति । बोलिली असे निबंधीं गणितीं । ते तुजप्रति निरूपितों ॥८४॥
श्लोक निबंधींचे - चतुर्भिर्व्रीहिभिर्गुजं गुंजान्पंच पणं पणान् ॥
अष्टौधरणमष्टौ च कर्षतांश्चतुरं पलम् ।
तुलां पलशतं प्राहुर्भारः स्याद्विंशतिस्तुलाः ॥
चौ व्रीहींची एक गुंज । पंच गुंजांचा पण हें बुझ । आठां पणांचा धरण सहज । कर्ष तूं उमज धरणाष्टकें ॥८५॥
चारी कर्ष एक्या पळा । शतपळाम्ची बोलिजे तुळा । विंशति तुळांचा मोकळा । भार बोलिला शास्त्रज्ञीं ॥८६॥
ऐसे सुवर्नभार अष्ट । अहरह प्रसवे स्यमंतक श्रेष्ठ । तेणें लाभें अतिसंतुष्ट । जो रविनिष्ठ सत्राजित ॥८७॥
आणिक स्यमंतकमणीचे गुण । राष्ट्रीं दुर्भिक्षें न पीडे जन । कदापि न पडे अवर्षण । वर्षें पर्जन्य जनइच्छा ॥८८॥
जरी मरी शारें वारें । भूतें प्रेतें भयंकरें । नाना अरिष्टें विघ्नें क्रूरें । महाविखारें न बाधती ॥८९॥
चौर्यांशीं लक्ष दुर्घट रोग । तियें राष्ट्रीं न करिती लाग । सर्प वृश्चिक तक्षक नाग । तद्भयप्रसंग तेथ नसे ॥९०॥
काम क्रोध लोभ मोह । चिंता हृद्रोग शोक भय । मद मत्सर दंभ व्यय । हानि क्षय मनोग्लानि ॥९१॥
ऐसिया अनेक आधि व्याधि । अशुभें दुश्चिह्नें दुष्कृतावधि । व्याघ्रादि हिंस्रश्वापदमांदी । कोणा न बाधी ते राष्ट्रीं ॥९२॥
न संति मायिनस्तत्र यत्राऽऽस्तेऽभ्यर्चितो मणिः । स याचितो मणिं क्वापि यदुराजाय शौरिणा ॥१२॥
टाणे टाणे साबरी कुटिळ । भुररीं चेटकी मायिक खळ । कपटी कुजान्तरी दुःशीळ । तें तें स्थळ उपेक्षिती ॥९३॥
जारण मारण उच्चाटन । स्तंभन मोहन विद्वेषण । विस्फोटादि वशीकरण । कर्ते दुर्जन ते नसती ॥९४॥
इत्यादि मणीच्या सन्निधानें । जन नेणती अकल्याणें । अनेक दुःखदें कारणें । राष्ट्रींच्या जनें नेणिजती ॥९५॥
ऐसे ज्याचे अपार गुण । तो देवतासदनीं प्रतिष्ठून । सत्राजित सभास्थान । सहज आपण प्रवेशला ॥९६॥
तेथ मणीची चर्चा करितां । सहज श्रीकृष्ण झाला वदता । उग्रसेना हा मणि अर्पितां । शुभ सर्वथा सर्वांसी ॥९७॥
ऐसी ऐकूनियां मात । नायकिल्यापरि त्वरित । उठोनि गेला साशंकित । परम सचिन्त होवोनी ॥९८॥
क्क अपि या द्वय अव्ययीं । अर्थ सूचिला असे काई । तो परिसिजे सर्वज्ञाहीं । कथिजेल कांहीं स्वल्पसा ॥९९॥
न देतां समर्थालागूनी । स्वर्चित असो कां कोणे स्थानीं । मणि सद्गुणी तोचि दुर्गुणी । होय म्हणोनि सुचविलें ॥१००॥
ज्याचेनि सर्व अरिष्टें हरती । तो नार्पितां ईश्वराप्रति । प्रसवे अनिष्टांची संतति । वदला श्रीपति गूढत्वें ॥१॥
नार्पितां भगवन्ताच्या ठायीं । आपणचि आधीं भक्षी गृहीं । तें अमृतरूपचि अन्न पाहीं । नरकदायी कृमितुल्य ॥२॥
ऐसा कृष्णाचा गूढार्थ । नेणोनियां सत्राजित । गेला परंतु फळही प्राप्त । झालें त्वरित तें ऐका ॥३॥
नैवार्थकामुकः प्रादाद्याञ्चाभ्म्गमतर्कयन् । तमेकदा मणिं कंठे प्रतिमुच्य महाप्रभंम् ।
प्रसेनो हयमारुह्य मृगया व्यचरद्वने ॥१३॥
अर्थकामुक सत्राजित । त्यासी याचितां उग्रसेनार्थ । मनि नेदूनि निघाला त्वरित । अवज्ञा तर्कित होत्साता ॥४॥
म्यां भंगिली भगवद्याञ्चा । लोभ धरिला स्यमंतकाचा । भिडे घालिती तैं सर्वांचा । मी विरोधी होईन ॥१०५॥
विरोध पडतां समर्थांसीं । मग वसावें कवणे देशीं । यालागीं मणि हा प्रसेनासी । देऊनि निमित्त वारिलें ॥६॥
स्वर्चित मणि जिये स्थानीं । तेथ सर्वही कल्याणखाणी । विपरीत फळाची जे करणी । तेही श्रवणीं अवधारा ॥७॥
कोणे एके दुर्दैवदिवसीं । कंठीं बांधोनि स्यमंतकासी । प्रसेन निघाला पारधीसी । अनुगवर्गेंसीं विराजित ॥८॥
दिव्यवस्त्राभरणीं युक्त । मुकुटकुंडलमणिमंडित । शस्त्रास्त्रसामग्रीसमवेत । उत्साहभरित हयवहनीं ॥९॥
भंवते चालती असिवार । पुढें खोलती पायभार । करूनि दुंदुभिवाद्यगजर । वनगह्वर प्रवेशला ॥११०॥
श्वानें सोडिलीं मृगापाठीं । वृक्षीं पक्षियां निर्यासयष्टि । व्याघ्रसूकरां देखोनि दृष्टी । सुभट हठी उठावले ॥११॥
अघटित दैवरेखेची घटी । प्रसेनें कुरंग देकिला निकटीं । अश्व लोटिला तयापाठीं । दाटोदाटीं गिरिकुक्षीं ॥१२॥
पळे प्राणभयें कुरंग । पवनवेगें दिव्य तुरंग । धांवतां लंघिता बहु भूभाग । अनुगवर्ग अंतरला ॥१३॥
अटव्यें वनें गहनें घोर । लंघितां अंतर पडलें फार । जाम्बवताचें वन दुस्तर । महाभयंकर प्रवेशला ॥१४॥
प्रसेनकंठीं भास्वर मणि । कंठीरवें लक्षूनि गहनीं । अकस्मात कव घालूनी । झडपी गवसूनि तें परिसा ॥११५॥
प्रसेनं सहयं हत्वा मणिमाच्छिद्य केसरी । गिरिं विशञ्जाम्बवता निहतो मणिमिच्छता ॥१४॥
अश्वें सहित प्रसेन वनीं । मृगेंद्रें मारिला पैं झडपोनी । प्रेतें सांडिलीं विदारोनी । आकर्षूनि मणि हरिला ॥१६॥
भास्करभासुर मणि घेऊनी । केसरी भरतां गिरिकाननीं । जाम्बवतें लक्षूनि नयनीं । कव घालूनि घोळसिला ॥१७॥
जाम्बवान प्रतापजेठी । मणीची इच्छा धरूनि पोटीं । सिंह मारूनि उठाउठीं । स्वबिळापोटीं प्रवेशला ॥१८॥
सोऽपि चक्रे कुमारस्य मणिं क्रीडनकं बिले । अपश्यन्भ्रातरं भ्राता सत्राजित्पर्यतप्यत ॥१५॥
बिळीं प्रवेशोनि आह्लादें । स्वपुत्राचिये पाळणामोदें । खेळणें करूनि मणि तो बांधे । परमानंदें उज्ज्वलित ॥१९॥
स्यमंतकमणीचिया प्रकाशें । विवरामाजील ध्वान्त नासे । समृद्धिमंत स्वर्गा ऐसें । विवर विलसे देदीप्य ॥१२०॥
असो जाम्बवताची कथा । प्रसेन न दिसे मागुता येतां । वनोपवनीं न लभे वार्ता । अनुगीं हुडकितां सर्वत्र ॥२१॥
एक वेंघोनि गिरिशिखरें । हांका मारिती दीर्घ स्वरें । मार्गस्थ देखोनि किंकर त्वरें । धांवोनि घाबरे त्यां पुसती ॥२२॥
एकीं सत्राजिताच्या सदनीं । हांक नेली द्वारकाभुवनीं । सवेंच अनुयायी मागूनी । आले धांवूनि आक्रंदत ॥२३॥
शोक करिती स्त्रिया बाळें । म्हणती प्रसेन ग्रासिला काळें । सिंहें सर्पें कीं शार्दूळें । किंवा भक्षिला निशाचरीं ॥२४॥
अश्वेंसहित पर्वतपतन । कीं लवणार्नवीं गेले प्राण । किंवा तृषातें जलेंवीण । पावला मरण रवितापें ॥१२५॥
रविदत्त कंठीं असतां मणि । क्षुधेतृषेची न बाधी ग्लानि । तंव सत्राजितें आक्रंदोनी । तर्किलें मनीं तें ऐका ॥२६॥
N/A
References : N/A
Last Updated : May 09, 2017
TOP