अध्याय ५६ वा - आरंभ
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
श्रीगणेशाय नमः ।
विमलमंगलप्रकाशका । निखिलकलिमलविध्वंसका । समूलमायाभ्रमनाशका । सच्चित्सुखा गोविन्दा ॥१॥
उदार आज्ञा स्वीकरूनी । विवरिली पंचम एकादशिनी । आतां षष्ठीच्या व्याख्यानें । शंका मनीं झळंबतसे ॥२॥
अष्टमहिषीस्वयंवरें । षोडशहस्रशतोत्तरें । तत्संतति कुमरीकुमरें । पृथगाकारें उद्वाह ॥३॥
रुक्मिणीचा प्रीतिकलह । उषाहरण रोचनोद्वाह । नृगमोक्षण भौमक्षय । निर्जरजय द्रुमहरण ॥४॥
इत्यादि अगाधप्रमेयसिन्धु । अल्प मृकुट कें मतिमंदु । लघुचंचूनें एकैक बिंदु । केंवि उमाणूं प्रवर्तें ॥५॥
हा ऐकोनि अभिप्राय । श्रीगुरु केवळ सत्समुदाय । म्हणती किंकरामस्तकीं राय । असतां निर्भय तूं तैसा ॥६॥
राव असतां किंकरशिरीं । तो प्रजांतें शासन करी । सूक्तासूक्त नृपवैखरी । तो अधिकारी आज्ञेचा ॥७॥
जैसें आज्ञापी भूपति । तैसें शासन प्रजापति । करी ते त्याचे आंगींची शक्ति । किंवा नृपतिऐश्वर्यें ॥८॥
सेवकें इतुकेंचि करावें । स्वामिकार्यार्थीं अवंचकभावें । सादर होऊनि ओळगावें । येर आघवें नृप जाणे ॥९॥
तेंवि तूम आज्ञा वंदूनि माथा । आरब्धग्रंथ वाखाणितां । शंका झळंबों बेदीं चित्ता । निर्वाह करिता गुरुवर्य ॥१०॥
तो हृदयस्थ तव हृतकमळीं । स्वसत्ता प्रकाश प्रज्ञा उजळी । त्या उजिवडें टीका मोकळी । निरूपी सगळी हरिवरें ॥११॥
पढविलें तें पक्षी पुढे । वावडी चढविली गगना चढे । सायखेड्याचें बाउलें xxxx । तें काय निवाडें बळ त्याचें ॥१२॥
तेंवि तुज व्याख्यानीं स्वसत्ता । देशिकेंद्रें अधिष्ठितां । तूं का शंका वाहसी वृथा । निर्वाहकर्ता सर्वज्ञ ॥१३॥
हें ऐकोनि आश्वासन । शंकारहित स्वस्थ मन । करूनि आदरिलें व्याख्यान । तें सज्जन परिसोत ॥१४॥
आतां एकादशिनी षष्ठ । तदनुक्रमणी ऐका स्पष्ट । छप्पन्नाव्या अध्यायीं कष्ट । मिथ्याभिशाप हरि निरसी ॥१५॥
तत्प्रसंगें जाम्बवती । सत्यभामा सात्रजिती । वरिलियामाजि अध्यात्मरीति । अर्थानर्थता निरूपिली ॥१६॥
सत्तावन्नाद्यायीं कथा । मणिनिमित्त गोत्रजहत्या । त्या दुर्यशाच्या परिहारार्था । अक्रूरापासूनि मणिग्रहण ॥१७॥
दावूनि समस्तां यादवांसी । स्वमाथांचें दुर्यश निरसी । पुढती ठेवी अक्रूरापाशीं । बलभद्रासी बुझावुनियां ॥१८॥
अठ्ठावन्नावे अध्यायीं कृष्णें । केलीं पंच पाणिग्रहणें । कालिंदीच्या तपआचरनें । प्राप्त झाला हरि भर्ता ॥१९॥
एकोणषष्टितमे अध्यायीं । भौमा वधूनि शेषशायी । विजयी झाला अमरालयीं । पार्यातार्थ सुरसमरीं ॥२०॥
भौमासुरातें वधूनि हेळा । वधू शताधिक सहस्र सोळा । आणिल्या तिहीं श्रीगोपाळा । वरिलें सोहळा तो कथिला ॥२१॥
षष्टितमाध्यायीं कथा । रुक्मिणी आणि कृष्णनाथा । प्रेमकलहचातुर्यता । त्या वृत्तान्ता निरूपिलें ॥२२॥
एकषष्टितमाध्यायीं । संतति सर्व वधूंच्या ठायीं । अनिरुद्धाचिये विवाहीं । रुक्मिमरण हलिहस्तें ॥२३॥
अष्टमहिषी रुक्मिणीप्रमुखा । सशत षोडश सहस्र आणिका । तत्संततिविवाह देखा । संक्षेपार्थें निरूपिले ॥२४॥
यावरी द्विषष्टितमामाजि । अनिरुद्धउषाविवाहकाजीं । बाणासुराची भुजवनराजि । शंकर जिणोनि छेदिली ॥२५॥
त्रिषष्टितमे अध्यायीं । बाणयादवसमरमही । ज्वर शंकरें स्तविला पाहीं । बाणबाहु हरि हरितां ॥२६॥
चतुःषष्टितमे अध्यायांत । नृग उद्धरिला सरटदेही । ब्रह्मस्वा हारी दोष पाहीं । राजे सर्वही शिक्षियले ॥२७॥
पांसष्टाव्या अध्यायांत । नंदगोकुळवक्षणार्थ । राम जाऊनि गोपीसुरत । करितां कर्षित यमुनेतें ॥२८॥
षट्षष्टितमीं कृष्ण । पौण्ड्रकें दूत पाठवून । आक्षेपिला तो त्याचें हनन । करी स्वचिह्नपरिहरणा ॥२९॥
इत्यादिनिरूपणीं वरिष्ठ । एकादशिनी षष्ठी स्पष्ट । वाखाणिजेल तें श्रवणनिष्ठ । होऊनि श्रेष्ठ परिसोत ॥३०॥
प्रद्युम्नजनन शंबरहनन । स्नुषा संप्राप्त ललनारत्न । हें पूर्वाध्यायीं केलें कथन । पुढें व्याख्यान अवधारा ॥३१॥
व्यासऔरस योगाग्रणी । वक्ता सर्वज्ञ निरूपणीं । तो नृपातें बादरायणी । सांगे करणी कृष्णाची ॥३२॥
कुरुधरित्रीमंगलसूत्रा । श्रवणसद्भक्तिसुबीजक्षेत्रा । वैष्णवोत्तमा परमपवित्रा । हरिगुणपात्रा परीक्षिति ॥३३॥
प्राकृत जनांचिये परी । पुत्रलाभाची आनंदलहरी । अनुभवूनि तच्छोकगिरि । स्वयें श्रीहरि वळघले ॥३४॥
नष्टपुत्राचा प्राप्तिलाभ । पुधती अनुभवूनि पद्मनाभ । म्हणे हा चंचल भवसुखकोंभ । नोहे स्वयंभ चित्सुख हें ॥३५॥
इतुकें संपलें पूर्वाध्यायीं । अर्थानर्थरूपें पाहीं । स्यमंतकाख्यानाच्या ठायीं । प्रसंगें तेंही अवधारा ॥३६॥
रुक्मिणी पट्टमहिषी प्रथमा । मग जाम्बवती सत्यभामा । वरित्या झाल्या पुरुषोत्तमा । त्या संभ्रमा वदावया ॥३७॥
स्यमंतकमणीचें आख्यान । आरंभूनियां मुनि सर्वज्ञ । तत्प्रसंगें पाणिग्रहण । उभय पत्न्यांचें निरूपी ॥३८॥
N/A
References : N/A
Last Updated : May 09, 2017
TOP