अध्याय ४६ वा - श्लोक ११ ते १५
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
गायंतीभिश्च कर्माणि शुभनि बलकृष्णयोः । स्वलंकृताबहिर्मोपीभिर्गोपैश्च सुविराजितम् ॥११॥
जन्मापासूनि रामकृष्णीं । जे जे क्रीडा व्रजभुवनीं । केली ते ते गाती वदनीं । मनीं स्मरोनि तद्वेधें ॥२६॥
रामकृष्णांचीं कल्याणकर्में । हृदयीं स्मरोनियां सप्रेमें । विवशवृत्ति मनोधर्में । गाती नामें गुणगरिमा ॥२७॥
राकारमणवदना गोपी । प्रथमवयसा नवकंदर्पी । दिव्याभ्रणीं रविभा लोपी । ज्यंचे रूपीं हरि वेधें ॥२८॥
आणि सांडूनि त्रिविष्टप । त्रिदश जेथें जाले पशुप । तो हा नंदव्रज अमूप । शोभामंडप मिरवीतसे ॥२९॥
गोपगोपी लावण्यराशि । सालंकृता शुभवाससी । स्वसौंदर्यें व्रजभुवनासी । शोभाविशेषीं शोभविती ॥१३०॥
आणखी गोपाळांची वसती । सकळ स्वधर्में गुणसंपत्ति । तेणें गोकुळ शोभविती । तें तूं भूपती अवधारीं ॥३१॥
अग्न्यर्कातिथिगोविप्रपितृदेवर्चनान्वितैः । धूपदीपैश्च माल्यैश्च गोपावासैर्मनोरमम् ॥१२॥
अग्न्यवरदान सायंहोमीं । प्रभाते होमिती सूर्यनामीं । अतिथिपूजिचिया नियमीं । पुरुषोत्तमीं समरसती ॥३२॥
गोगोपांचें कुळदैवत । अनन्यभावें विप्रभक्त । सर्वदा पितृभजनीं निरत । अतंद्रित सुरार्चनीं ॥३३॥
मलापकर्षण शुद्धशानें । दिव्यवसनें दिव्याभरणें । धूपदीपदिव्यसुमनें । सुगंधचुर्णें चर्चिती ॥३४॥
अमृततुल्य षड्रस अन्नें । सुगंध शीतळ पवित्र जीवनें । फलतांबूलहेमरत्नें । जे दक्षिणे समर्पिती ॥१३५॥
नीराजनें मंत्रकुसुमें । प्रदक्षिणा करिती नियमें । निगमप्रणीत । सूक्तोत्तमें । स्तविती प्रेमें पूजान्तीं ॥३६॥
प्रार्थनापूर्वक क्षमापन । अच्युतस्मरणें न्यून तें पूर्ण । करिती ऐसे बल्लवगण । तिहीं करून व्रज शोभे ॥३७॥
ऐसे आभीर सन्मार्गनिरत । अग्निसूर्यअतिथिभक्त । गोसुरभूसुरभजनीं निरत । अतंद्रित पैतृकीं ॥३८॥
आर्यमुखें अध्यात्मश्रवण । स्वमुखें करिती हरियशःकथन । नित्य नियमें हरिकीर्तन । पादसेवन पूज्यांचे ॥३९॥
ऐसियांचियें वसतीकरून । नंदगोकुळ विराजमान । देखोनि उद्धवाचे न्यन । सुप्रसन्न निवाले ॥१४०॥
असो ऐसे व्रजनिवसी । स्ववासें शोभविती व्रजासी । भवतीं वनें विपिनें कैसीं । वृंदावनासी शोभविती ॥४१॥
सर्वतः पुष्पितवनं द्विजालिकुलनादितम् । हंसकारंडवाकीर्णैः पद्मखंडैश्च मंडितम् ॥१३॥
वनें वाटिका उद्यानें । सुपुष्पितें शृंगारवनें । कदळीखंडें च्यूतविपिनें । विविधकाननें विराजती ॥४२॥
भंवाते अनेक विटपाराम । रामकृष्णीं धरूनि प्रेम । मुनिवर झाले कल्पद्रूम । सुकृतधाम व्रजविपिनीं ॥४३॥
फळप्रसूनीं नवपल्लवीं । शीतळ छाया श्रमितां निववी । ऐसिया तरुवरीं शोभा नवी । व्रजा शोभवी स्वतेजें ॥४४॥
वनोपवनीं द्विजांच्या पंक्ति । फळें भक्षूनि विराव करिती । हंसकारंडवादिजाति । पिका कूजती शुकादिक ॥१४५॥
तडागसरोवरें उदंडें । त्यांमाजी विचित्रें पद्मखंडें । गुंजारवती भ्रमर कोडें । तुच्छ त्यापुढें अमरपुरी ॥४६॥
इत्यादिगुणीं वृंदावान । उद्धवें देखिलें शोभायमान । परमाह्लादें निवालें मन । नंदसदन पातला ॥४७॥
तमागतं समागम्य कृष्णस्यानुचरं प्रियम् । नंदः प्रीतः परिष्वज्य वासुदेवधियार्चयत् ॥१४॥
श्रीकृष्णाचा अनुचर प्रिय । येतां देखोनि नंदराय । मेळवूनियां हृदय हृदय । प्रम सदय भेटला ॥४८॥
यान विश्रामविलें वाटीं । उद्धव धरूनियां मनगटीं । गृहामजीं रत्नपीठीं । सुखसंतुष्टी बैसविला ॥४९॥
प्रत्यक्ष मानूनियां रामकृष्ण । किंवा वैकुंठ श्रीभगवान । ऐसिया बुद्धीं उद्धवर्चन । करी आपण व्रजपति ॥१५०॥
चरण क्षाळूनि शुद्धोदकें । सदन प्रोक्षी पादोदकें । भाळ शोभवी केशरतिलकें । मलयजपंकें तनु चर्ची ॥५१॥
अक्षता माणिक्यरंगाकार । कंठीं घातले सुमनहार । परिमळद्रव्याचा धूसर । पवन श्रमहर जाणविती ॥५२॥
दशांग धूप एकारती । उजळूनियां कर्पूरज्योति । महानिवेद्य यशोदसती । कनकताटीं विस्तारी ॥५३॥
भोजितं परमान्नेन संविष्टं कशिपौ सुखम् । गतश्रमं पर्यपृच्छत्पादसंवाहनादिभिः ॥१५॥
परमान्न पर्पट पयाज्य सिता । नंदें नैवेद्य समर्पितां । हरिस्मरणें उद्धव भोक्ता । झाला तत्त्वता ते काळीं ॥५४॥
भाव देखोनि निवाला मनीं । तृप्त झाला प्रियभोजनीं । गंडूषपात्रीं उष्ण पाणी । आंच्वनार्थ अर्पिलें ॥१५५॥
प्रक्षाळूनियां करपदवदन । पुसिलें विशुद्धवसनें करून । मंचकीं कशिपु उपवर्हण । मृदुलासनीं बैसविला ॥५६॥
मार्गश्रमा विसर्जूनी । सुखें बैसतां मंचकासनीं । नंदें चरणसंवाहनीं । सन्निधानीं बैसविला ॥५७॥
स्वागत स्वर्चित सुभोजित । मंचकीं बैसला श्रमातीत । ऐसियातें यशोदाकांत । पुसे वृत्तांत तो ऐका ॥५८॥
N/A
References : N/A
Last Updated : May 08, 2017
TOP