मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ६ वा| श्लोक ३६ ते ४० अध्याय ६ वा आरंभ श्लोक १ ते ६ श्लोक ७ ते १० श्लोक ११ ते १७ श्लोक १८ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४४ अध्याय ६ वा - श्लोक ३६ ते ४० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ३६ ते ४० Translation - भाषांतर किं पुनः श्रद्धया भक्त्या कृष्णाय परमात्मने । यच्छन् प्रियतमं किं नु रक्तास्तन्मातरो यथा ॥३६॥विषमयस्तन पाजूनि हरी । मोक्ष पावली खेचरी । माझिया अनुरक्ता माउलीपरी । त्यांची थोरी काय वर्णूं ॥४४॥आस्तिक्यें परब्रह्मभावनें । श्रद्धावंत अंतःकरणें । कां पुत्रभावें सप्रेमभजनें ।ज्या निमज्जनें अनुसरल्या ॥२४५॥पुत्रभावना एके माते । म्हणसी बहुवचन बोलसी एथें । वत्साहरणीं हें उमजेल तंतूं । संशय चित्तें न धरावा ॥४६॥आणि मानसीं झुरे देवकी माय । यशोदा पुत्रत्वें भजे काय । कीं रोहिणी सःपत्नभावें जाय । ऐसें काय घडेल ॥४७॥श्रीकृष्ण प्रत्यक्ष परमात्मा । तेथ अनुरक्त ज्यांचा प्रेमा । पुत्रस्नेहें सर्वोत्तमा । ज्या निःसीमा अनुसरल्या ॥४८॥उत्तप्रोत्तमें अन्नें वसनें । उत्तमोत्तमें सर्वाभरणें । जें आवडतें जीवें प्राणें । तें अर्पणें सप्रेमें ॥४९॥ऐशा अनुरक्ता मातेपरी । कृष्णीं भजती सर्वोपचारीं । त्यांचे प्राप्तीची केवढी थोरी । वर्णूं वैखरी शकेना ॥२५०॥सुखसमुद्रीं भिजे केश । तेणें निघे जो सुखजललेश । तितुका लाभ पूतनेस । सिंधु अशेष याजोगा ॥५१॥म्हणाल सायुज्यापरतें कांहीं । अधिक सहसा उरलें नाहीं । पूतना समरसली ते ठायीं । विषम काई त्यापुढें ॥५२॥सायुज्यापरौतें प्रेमसुख । केवीं जाणती प्राकृत मूर्ख । विषयसंगें भोगिलें दुःख । ते मुमुक्षु विरक्त ॥५३॥जिहीं मोक्ष हाणोनि लाता । पाय ठेवूनि सायुज्यामाथां । सगुणत्व लेववूनि भगवंता । उपासकता स्वीकरिली ॥५४॥तया प्रेमसुखाचे गोडी । वरूनि मोक्षाची कुरवंडी । करूनि सनकादिक आवडीं । ये ब्रह्मांडीं विचरती ॥२५५॥प्रत्यक्ष सोळा सहस्र नारी । आणि अष्ट नायिका तयांवरी । परंतु रुक्मिणीची सरी । कोणी सुंदरी न पवे कां ॥५६॥ प्रेमें ऐक्य द्विभागिलें । आगळें भक्तित्वें निर्मिलें । भगवंतत्वें न्यून झालें । म्हणोनि केलें सन्मानीं ॥५७॥दोन्ही मिळोनि एक अंग । म्हणोनि न साहती वियोग । परस्परें प्रेमभोग । जे अभंग भोगिती ॥५८॥देवीं भक्त कीं भक्तीं देव । कोणि करूनि दावितां उगव । त्यांसि म्हणतों ज्ञानिराव । धरितों पाव तयाचे ॥५९॥हे अनिर्वचनीय असे गोठी । येर प्राकृत चावटी । ऐशियांसी पडे गांठी । जैं सुकृतकोटी सफळितां ॥२६०॥जैसा सूर्य किरणरहित । गोडीवेगळें अमृत । तेंवि भिन्न देवभक्त । हें अघटित सर्वथा ॥६१॥अभिन्न देवभक्त पाहीं । दोन्ही विभाग एके देहीं । तेथ ब्रह्मसुखाची मात कांहीं । उणी नाहीं निर्धारें ॥६२॥ऐसें अचुंबित ब्रह्मसुख । जें नेणती शक्रप्रमुख । तें सेविती उपासक । विषयी मूर्ख नेणती ॥६३॥असो बोलिलों क्षमा करणें । पूतने सायुज्य दिधलें कृष्णें । माउलियांसि काय देणें । हें शुष्क म्हणे कल्पेना ॥६४॥राजा पुसे शुकेंद्रासी । एवढी प्राप्ति कपटें कैशी । प्राप्त झाली पूतनेसी । ते मजपाशीं सांगावी ॥२६५॥शुक म्हणे गा नृपोत्तमा । एवढा वस्तुसामर्थ्यमहिमा । श्रीहरीच्या पादपद्मा । या लागीं रमा न विसंवे ॥६६॥पद्भ्यां भक्तहृदिस्थाभ्यां वंद्याभ्यां लोकवंदितैः । अंगं यस्याः समाक्रम्य भगवानपिबत्स्तनम् ॥३७॥भगवच्चरण्स्पर्शमात्रें । पावन झालीं पूतनागात्रें । निबद्ध होतीं कर्मसूत्रें । तीं सर्वत्रें जळालीं ॥६७॥श्रीहरीचें चरणयुगळ । भक्तहृदय ज्याचें स्थळ । ब्रह्मादि ज्या त्रैलोक्यपाळ । करिती मौळ कुरवंडी ॥६८॥जया पदींचें प्रक्षाळणावणी । मुकुटीं वाहे शूळपाणि । विश्वसंहार करितां कोणी । पापवाणी न बोले ॥६९॥अहल्येचा गौतम भर्ता । जाणे चरणमहिमा तत्त्वता । म्हणोनि श्रीरामचरणें कांता । निष्पापता उच्छापी ॥२७०॥केवळ दैत्यकुळींच बळि । पादस्पर्शें झाला बळी । तेणें अद्यापि वनमाळी । केला देहलीरक्षक ॥७१॥ऐसा चरणमहिमा समग्र । वर्णूं न शके सहस्रवक्त्र । त्या संस्पर्शा झाली पात्र । दैवें विचित्र पूतना ॥७२॥जये चरणींचा एक रेणु । जोडतां विरंचीसहित स्थाणु । पदवी गौण भासे अणु । तो भगवान जे पाजी ॥७३॥दोन्हीं करी स्तनपीडन । रोषें शोखी विष उल्बण । बाळभावें झाडि चरण । झालें स्पर्शन सर्वांगीं ॥७४॥पूतनेची सर्व तनु । चरणस्पर्शें अतिपावन । झाली तेणें सायुज्यसदन । अक्षय्य स्थान पावली ॥२७५॥श्रीकृष्णचरणमहिमा ऐसा । तूंही जाणसी कुरुनरेशा । गर्भीं रक्षितां लाहोनि स्पर्शा । निजात्मतोषा भोगिसी ॥७६॥श्रीकृष्णपादकमलमहिमा । जाणे गौतमवामा रमा । वैरोचनि जान्हवी ब्रह्मा । कीं पूतनामा पूतना ॥७७॥यातुधान्यपि सा स्वर्गमवाप जननीगतिम् । कृष्णभुक्तस्तनक्षीरां किमु गावोऽनुमातरः ॥३८॥पूतना प्रत्यक्ष राक्षसी । स्तन पाऊनि झाली मावशी । कृतागसा ही कृष्णस्पर्शीं । जननी ऐशी उद्धरिली ॥७८॥बोलती प्राकृत कहाणी । पूतना हे कंसबहिणी । परी हें नाहीं कोणें पुराणीं । बादरायणी वैखरी ॥७९॥उग्रसेनाची आकृति । द्रुमल्यदैत्यें धरूनि निगुति । कंसमातेसी दिधली रति । हे नारदोक्ति हरिवंशीं ॥२८०॥तेणें संभविला कंस । द्रुमल्यदैत्याचा वीर्यांश । म्हणोनि उग्रसेनाचा द्वेष । करी राक्षसप्रियमैत्री ॥८१॥पूतना पाजी हरिसी स्तन । म्हणूनि मावशी म्हणती जन । वाचूनि संबंध बोलणें गौण । शुक भगवान वाखाणी ॥८२॥यातुधानी ही पावली स्वर्ग । करूनि कृष्णासि स्तन्यप्रसंग । जननीतुल्य लाधली भाग । जो अपवर्ग दुर्लभ ॥८३॥राक्षसी आणि मारकबुद्धि । विष पाजूनिया मोक्ष साधी । तेह माउलीपरी स्नेहविधि । ज्या त्रिशुधि अनुरक्ता ॥८४॥तया धेनु आणि माता । स्नेहें पाजूनि स्तन्यामृता । ज्या ज्या सप्रेम अनुरक्ता । त्यांची प्राप्ति तत्त्वतां कोण वर्णीं ॥२८५॥कृष्णें ज्यांचे प्राशिले स्तन । त्या गाई अथवा माता धन्य । त्यांचे उत्तम गतीचें कथन । विधीचें वदन करूं न शके ॥८६॥पयांसि यासामपिबत्पुत्रस्नेहस्नुतान्यलम् । भगवान्देवकीपुत्रः कैवल्याद्यखिलप्रदः ॥३९॥ज्यांच्या स्तनींचें स्तन्यामृत । पुत्रभावनास्नेहस्नुत । उत्संगीं रिघोनि श्रीभगवंत । प्रेमयुक्त स्वीकरी ॥८७॥षड्गुणैश्वर्यसंपन्न । श्रीकृष्ण देवकीनंदन । अपवर्गादि सप्रेमभजन । विभवदान जो कर्ता ॥८८॥अपवर्गादि अभीष्टकाम । अर्पी वरद पुरुषोत्तम । स्वर्गसान्निध्यें मेघश्याम । निरसी भवभ्रम निजसत्ता ॥८९॥तासामविरतं कृष्णे कुर्वतीनां सुतेक्षणम् । न पुनः कल्पते राजन् संसारोऽज्ञानसंभवः ॥४०॥राया आश्चर्य झालें कैसें । सांगतां मनचि दाटे हर्षें । कृष्णप्राप्तीच्या संतोषें । मोक्षविशेषें न वर्णवे ॥२९०॥संसार मिथ्या प्रपंचभान । चिन्मात्रवस्तूचें अज्ञान । तया पोटीं विपरीत ज्ञान । जीवचैतन्य अवलंबी ॥९१॥स्वरूपीं ठाकोनि पाठीमोरें । विपरीतबोधें इंद्रियद्वारें । बाहेर भासोनि दृश्याकारें । प्रेमादरें तेथ रते ॥९२॥तंव तें भ्रमाक्त मिथ्या दृश्य । कवळूनि मानूं पाहे तोष । सुखसंभ्रम होय फोस । माथां दोष लटिका घे ॥९३॥तये दोषनिवृत्तिसाठीं । भरे कर्माच्चे कचाटीं । तेथ कामना रिघोन खोटी । बारा वाटीं धांवडवी ॥९४॥मग नाथिलीं देहांतरें । धरी कर्माच्या संस्कारें । पुढती उमजे पुढती मरे । खाय फेरे भवस्वर्गीं ॥२९५॥तेथ अनेक नरकयातना । कीं स्वर्गभोग दिव्यांगना । कीं नरदेहींच्या भोगरचना । मानाभिमाना ओळंगे ॥९६॥पुत्रलाभें तोष मानी । पुत्रशोकें थोर हानि । तैसाचि स्वार्थें गुंते धनीं । नाना प्रयत्नीं जोडावया ॥९७॥एथें जें जें वाढे तितुकें मोडे । सांचे त्याचा वेंच घडे । उपजे तितुकें काळदाढे । पडे अवघडें अवचितें ॥९८॥प्रियवस्तूचा होय वियोग । अप्रियाचा घडे योग । ऐसे दुःखाचे प्रसंग । अंगीं अनेक आदळती ॥९९॥लोभभंगें होय क्षोभ । स्वार्थमूळें वाढे दंभ । निंदास्तुतीचा तेणें लाभ । हें वालभ संसारीं ॥३००॥ऐसा संसार दुःखावह । तोचि झाला सुखावह । कृष्णमूर्तीचा विग्रह । पुत्रमोह ज्या लावी ॥१॥एर्हवीं संसारनिवृत्तीसाठीं । कित्येक रिघाले गिरिकपाटीं । कित्येक विरक्त झाले पोटीं । साधनकोटी साधिती ॥२॥ब्रह्मया समान आयुष्य जोडे । तोंवरी साधनीं सुकृत घडे । तरी संसारनिवृत्ति न घडे । ऐशीं अवघडें श्रुतिवाक्यें ॥३॥शुको मुक्तो वामदेवो वा । एथवरी संशयाचा गोंवा । तेथ प्राकृतां इतरां जीवां । कायसा हेवा मोक्षाचा ॥४॥ब्रह्मणा सह मुच्यंते । तोंवरी अवघड विरक्तां तें । प्राकृतां रीघ कैंचा तेथें । साधनपंथ प्रवेशा ॥३०५॥एथ आश्चर्य हेंचि राया । विषभक्षणें अमर काया । तेंवि पुत्रत्वें मोहमाया । कैवल्यनिलया पाववी ॥६॥पुत्रभावें मेघश्यामा । ज्यांचा अखंड जडला प्रेमा । कृष्णबुद्धि कामधामा । भवसंभ्रमा ज्या करिती ॥७॥कृष्णभोजनालागीं जाण । करिती दळण कांडण पाखडण । त्यांमाजीं गाती श्रीकृष्णगुण । मनें निर्विण्ण होऊनि ॥८॥कृष्णालागीं गृह झाडणें । कृष्णालागीं संमार्जनें । सेक उपलेप प्रांगणें । संशोधनें तदर्थ ॥९॥कृष्णालागीं गोदोहनें । कृष्णालागीं दुग्ध पाजणें । कृष्णालागीं स्तन्य देणें । खेळवणें श्रीकृष्णा ॥३१०॥कृष्ण खेळावया स्थळ । कीजे अत्यंत निर्मळ । कृष्ण ( आहे ? ) क्रीडाशीळ । अतिकोमल सुकुमार ॥११॥कृष्ण नयनीं अवलोकिती । कृष्ण हृदयीं आलिंगिती । कृष्णक्रीडा सदा गाती । कृष्ण ध्याती अंतरीं ॥१२॥कृष्णालागीं नहाणूं नहाणीं । कृष्णालागीं सांगूं कहाणी । श्रीकृष्णाचे संरक्षणीं । मायराणी उपासूं ॥१३॥कृष्णालागीं पाक करूं । कृष्णवदनीं ग्रास भरूं । कृष्णालागीं अळंकारूं । अतिसुंदर लेववूं ॥१४॥कृष्णालागीं अंगी टोपी । कृष्णप्रेमा झाली सोपी । ऐशा कृष्णवेधें गोपी । कृष्णरूपीं रंगल्या ॥३१५॥ऐशा कृष्णीं पुत्रमोहें । ज्या रंगल्या पूर्वस्नेहें । कैवल्य त्यांचें देहगेहें । जेथ ब्रह्म पाहे खेळणें ॥१६॥शुक म्हणे गा अर्जुनपौत्रा । सफळ त्यांचीच देहयात्रा । जिहीं खेंळविलें चिन्मात्रा । प्राकृत पुत्रासारिखें ॥१७॥अज्ञानसंभव जो संसार । तया कैम्चा तेथ थार । जन्ममरणाचें दुस्तर । कर्म अघोर ज्यामाजीं ॥१८॥ऐशी अवघड हे संसृति । परी हे बाणल्या श्रीकृष्णभक्ति । पायां लागे सायुज्यमुक्ति । हे एथ युक्ति सूचिली ॥१९॥भजनावांचूनि ब्रह्मज्ञानें । साधितां शमदमसाधनें । मोक्ष अवघड बहुत गुणें । श्रुतिप्राणें बोलती ॥३२०॥जेथ भक्ति तेथ ज्ञान । तेथेंचि वैराग्यही पूर्ण । यांचें तत्प्रसंगें कथन । तुजलागूनि करूं पुढें ॥२१॥एवं गोपिकांचिये परी । कृष्णीं अनुराग जो धरी । तोचि कृष्णमय शरीरीं । गोष्टी दुसरी असेना ॥२२॥कृष्णीं निरत जे नारी नर । ब्रह्म चिन्मात्र तें शरीर । त्यांचा संसार कैवल्यसार । जो दुस्तर इतरांसी ॥२३॥असो ऐसें शुकाचार्य । कृष्णप्रेमाचें आश्चर्य । वर्णी तेथींचें चातुर्य । जाणे कुरुवर्य सुश्रोता ॥२४॥ N/A References : N/A Last Updated : April 27, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP