श्रीशुक उवाच । नंदः पथि वचः शौरेर्न मृषेति विचिन्तयन् । हरिं जगाम शरणमुत्पातागमशंकितः ॥१॥

ऐकोनि वसुदेवाचें वचन । गोकुळीं उत्पातभय दारुण । शंका पावून अंतःकरण । गोकुळा गमन नंद करी ॥२३॥
नंद मार्गीं आठवी मनीं । मिथ्या न म्हणिजे वसुदेववाणी । हृदयीं चिंती चक्रपाणि । शंका मानूनि विघ्नांची ॥२४॥
जयजयाजी जगदात्मया । जगदखिलकल्याणनिलया । जगत्सृजनावनाप्यया । कारणकार्या आश्रय ॥२५॥
भक्तकामकल्पद्रुम । पुराणपुरुष मेघश्याम । स्मरणें विघ्नांचा उपशम । कैवल्यदान सुखदानी ॥२६॥
परम पुरुष पुरुषोत्तम । अपराजितपराक्रम । अक्षयी अलक्ष्य अगम्यधाम । पूज्य परम परमात्मा ॥२७॥
नामें विघ्नाचें उपशमन । नामें रोगा विध्वंसन । नामें विपत्तिभंजन । नाम पावन जग करी ॥२८॥
नामें ग्रहपीडा न बाधी । नामें नासती आधिव्याधि । नाम महापापपर्वत छेदी । नामें न बाधी भवभय ॥२९॥
व्याघ्र सर्प हिंस्र घोर । राजविग्रह अग्नि चोर । नामस्मरणें सौम्यतर । सहसा क्रूर न होती ॥३०॥
ऐसें ज्याचें नामस्मरण । तो चिंतूनि नारायण । नंद जाहला अनन्यशरण । विघ्नशमन अभीष्टा ॥३१॥

कंसेन प्रहिता घोरा पूतना बालघातिनी । शिशूंश्चचार निघ्नन्ती पुरग्रामव्रजादिषु ॥२॥

पूतनाभयें साशंकित । श्रीकृष्णविषयीं नृपाचें चित्त । म्हणोनि शंकापरिहारार्थ । शुक समर्थ निरूपी ॥३२॥
जयाचा जो विषय नोहे । तेथें प्रवर्तलीया मोहें । विफळ यत्नें होऊनि राहे । मृत्यु लाहे तत्काळ ॥३३॥
मार्जारा वधूं म्हणती मूषक । व्याघ्रा भक्षूं पाहती शशक । अग्निप्राशनीं जेंवि मशक । हाव विशेष वाढवी ॥३४॥
गरुडा गिळूं म्हणती सर्प । शंकरा जिंकूं म्हणे कंदर्प । तिमिर तरणी रहितदर्प । निजप्रतापें करूं पाहे ॥३५॥
परी हें विपरीत होऊनि पडे । तैसेंचि पूतनेलागीं घडे । तें हें परीक्षिते निज निवाडें । ऐकें निवाडें प्रांजळ ॥३६॥
चतुर्थाध्यायींची ही सूचना । करावया बालहनना । कंसें प्रेरिली पूतना । राष्ट्रें नाना भ्रमतसे ॥३७॥
पुरें पट्टणें नाना नगरें । खेट खर्वट अग्रहारें । पल्लिका ग्राम देवागारें । दुष्टाचारें अवलोकी ॥३८॥
स्तन्य देऊनि मारी बाळें । पिळी एकांचीं कंठनाळें । एका झोंबूनि जीवनकळे । प्राणावेगळें त्यां करी ॥३९॥
श्वास रोधूनि एक मारी । पाय ठेवूनिया हृदयावरी । ऐशीं बाळकें नानापरी । बळें संहारी पूतना ॥४०॥
अघोररूपिणी शिशुहंत्री । सवें विघ्नसेनापति । पृथ्वी फिरतां ते अवचितीं । गोकुळप्रांतीं पावली ॥४१॥
ऐशी क्रूर जरी पूतना । प्रयत्नीं फिरे देश नाना । तियेचिया प्रवेशस्थाना । ऐकें सुजाणा परीक्षितें ॥४२॥

न यत्र श्रवणादीनि रक्षोघ्नानि स्वकर्मसु । कुर्वन्ति सात्वतां मर्तुयातुधान्यश्च तत्र हि ॥३॥

सात्वत म्हणजे भगवद्भक्त । त्यांचा भर्ता रमाकांत । त्याचें गुणावतारचरित । श्रवण जेथ न करिती ॥४३॥
कीर्तनाचा ऐकोनि घोष । उभेच जळती महादोष । नलगे प्रायश्चित्त विशेष । विघ्ननाश सहजेंची ॥४४॥
अग्निस्पर्शें तृणें जळती । तैशीं विग्नें नामें पळती । दुष्टदानवदर्प गळती । केंवि आतळती पिशाच ॥४५॥
नामें दैत्यराक्षसां कंप । नामें जळे पाप ताप । नामें विषमा होय लोप । नामप्रताप अगाध ॥४६॥
जेथें नाहीं हरिगुणश्रवण । जेथ नाहीं हरिकीर्तन । जेथें नाहीं नामस्मरण । यातुधान ते स्थानें ॥४७॥
जेथें नाहीं सद्गुरुभजन । नाहीं अतिथीचें पूजन । नाहीं विप्रपादार्चन । तेथें विघ्न प्रवेशे ॥४८॥
जेथें नाहीं पितृभक्ति । सासुश्वशुरां सुनां गांजिती । जेष्ठां कनिष्ठ अवमानिती । तेथ वसति विग्नांची ॥४९॥  
नाहीं ब्राह्मणां सन्मान । नमन आसन पादार्चन । विनयें अन्नाच्छादन । पिशाचगण ते ठायीं ॥५०॥
जेथ स्त्रिया प्ररद्वारीं । भर्तार मानिती जैसा वैरी । अवज्ञा हेलन अनाचारीं । विघ्न आसुरी तेथ रिघे ॥५१॥
द्यूत मद्य मृगयाव्यसनी । जार चोर दुर्भाषणी । निंदाद्वेष वेश्यागमनी । यातुधानीं त्यां छळिती ॥५२॥
वैष्णवांची पादसेवा । सांडूनि भजती भववैभवा । जे भूलले देहभावा । तेथ यावा विघ्नांचा ॥५३॥
जेथ नाहीं वेदाध्ययन । नाहीं पुण्यसूक्तें स्तोत्रपठण । वैदिक तांत्रिक विष्णुपूजन । तेथ विघ्न प्रवर्ते ॥५४॥
विष्णु शंकर वक्रतुंड । हिरण्यरेता श्रीमार्तंड । यावीण वाढविती पाखंड । त्यावरी दंड विघ्नांचा ॥५५॥
वृंदावनावीण अंगण । गायीवीण गृह गोठण । एकादशीवीण व्रतधारण । विघ्न दारुण ते ठायीं ॥५६॥
जेथ नित्यनैमित्तिकां लोप । जेथ सत्पुरुषीं विक्षेप । कायावाचामनें पाप । तेथ प्रताप विघ्नांचा ॥५७॥
रक्षोघ्नादि सूक्तपठणें । न करितीं शांत्यादि शुभ विधातें । नेणती पुण्यश्रवणकीर्तनें । राक्षसी विघ्नें ते ठायीं ॥५८॥
जो कां विष्णु स्वभक्तपति । त्याची पुण्यश्रवणकीर्ति । विघ्नेंबारा वाटा पळती । काळ कांपती ऐकोनि ॥५९॥
ज्याचें नाम पडतां श्रवणीं । होय विघ्नांची भंगाणी । तोचि स्वयें चक्रपाणि । व्रजभुवनीं अवतरला ॥६०॥
तेथ पूतनेची कोण शंका । हृदयीं धरिसी कुरुनायका । कैसा प्रवेशाचा आवांका । त्या विवेका अवधारीं ॥६१॥

सा खेचर्येकदोपेत्य पूतना नंदगोकुलम् । योषित्वा माययाऽत्मानं प्राविशत्कामचारिणी ॥४॥

जैसा बस्त कवळिला मरणें । करी न्याघ्रेंशीं आंगवणें । कीं दीप ग्रासावया धांवणें । जेंवि करणें पतंगें ॥६२॥
तैशी पूतना दुष्ट कपटी । नंदव्रजीं झाली पैठी । कां अनंतसुकृतकोटि । होत्या गांठीं त्या फळल्या ॥६३॥
म्हणोनि पातली गोकुळा । आपणा केलें रम्य अबळा । लावण्य तुळितां अप्सरा सकळां । तिच्या तुळा न तुळती ॥६४॥
म्हणाल ऐशी वरांगना । निःशंक रिघतां पारिख्या सदना । लज्जा कैशी न वाटे मना । हे कल्पना न धरावी ॥६५॥
कामचारिणी राक्षसी स्पष्ट । मायालाघवें लावण्यनट । नटोनि होतां सदनीं प्रविष्ट । काय दुर्घट तयेसी ॥६६॥
कामिल्या ठायांप्रति जाती । कामनेसारिखीं रूपें धरिती । यथाकाम क्रिया करिती । ते बोलिजती कामचारी ॥६७॥
मायामय पूतनावेख । श्लोकद्वयें वर्णी शुक । तेथींचा लावण्यविवेक शौनकप्रमुख परिसती ॥६८॥

तां केशबन्धव्य्तिषक्तमल्लिकां बृहनितम्बस्तनकृच्छ्रमध्यामाम् ।
सुवाससं कम्पितकर्णभूषणत्विषोल्लसत्कुन्तलभूषिताननाम् ॥५॥
वल्गुस्मितापांगविसर्गवीक्षितैर्मनो हरन्ती वनितां व्रजौकसाम् ।
अमंसतांभोजकरेण रूपिणीं गोप्यः श्रियं द्रष्टुमिवागतां पतिम् ॥६॥

यशोदा रोहिणी व्रजींच्या गोपी । आपुल्या रूपें अवघ्या लोपी । प्रत्यक्ष लक्ष्मी हे लावण्यारूपी । ऐसें कल्पी मन त्यांचें ॥६९॥
देखोनि तये वनितेप्रति । जैशी पहावया आपुला पति । त्रैलोक्यलावण्याची व्यक्ति । आली क्षिति कमला हे ॥७०॥
ऐसें भावूनि तियेसी । तटस्थ ठेल्या निजमानसीं । श्रीसाम्यता अवयवासी । लावण्यासी शुक सांगे ॥७१॥
जैशीं तारांगणें आकाशीं । तैशीं सुमनें केशपाशीं । माणिक्यमुक्तें तेजोराशि । जडितजळीशीं लेइलीं ॥७२॥
स्थूल नितंब कुच पृथुल । सूक्ष्म मध्य सडपातळ । कुचनितंबांमाजीं केवळ । अमांसल तनुमध्य ॥७३॥
परिधानप्रावरण दिव्यांबरें । बालतरणीहूनि भासुरें । तेज फांकतां लावण्यभरें । बाह्य आधारें हारपे ॥७४॥
कर्णभूषणीं विलोल दीप्ति । तेणें कुंतल प्रकाशती । तया तेजें वदनकांति । तारापति लोपवी ॥७५॥
लावण्यरसाचें कोमल पीक । मंदस्मितेंशीं स्निग्धावलोक । अपांगविसर्गें कटाक्ष देख । दैसे सायक स्मराचे ॥७६॥
रूपलावण्यकटाक्षबाणें । व्रजौकसांचीं अंतःकरणें । हिरोनि घेतलीं एका क्षणें । मायामोहनें भुलवूनि ॥७७॥
गौळी ठेले तटस्थ सकळ । पक्षी न होती चंचळ । सारमेयादि शांतशीळ । झाले निश्चळ ते काळीं ॥७८॥
एथें आशंका कीजेल श्रोतीं । पुरुषांसि मोहक वनिताव्यक्ति । कैसेनि भुलल्या म्हणाल युवती । ते व्युत्पत्ति अवधारा ॥७९॥
गोपी मानिती अंतरीं । पद्मोद्भवा परमेश्वरी । साक्षात् प्रकटली व्रजपुरीं । दैवें नेत्रीं देखिली ॥८०॥
खेचरी माया हे अपूर्व । गोकुळामाजीं प्राणी सर्व । तटस्थ ठेले देहभाव । जैसे अवयव चित्रांचे ॥८१॥
एवं न निवारितां कोणी । पूतना प्रवेशे व्रजभुवनीं । बालकें मारावयालागूनि । नाना सदनीं हुडकी ते ॥८२॥

N/A

References : N/A
Last Updated : April 27, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP