अध्याय ६ वा - श्लोक ७ ते १०
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
बालग्रहस्तत्र विचिन्वती शिशून्यदृच्छयानन्दगृहेऽसदन्तकम् ।
बालं प्रतिच्छन्ननिजोरुतेजसं ददर्श तल्पेऽग्निमिवाहितं भसि ॥७॥
पूतना क्रूर बालग्रह । धरूनि लागण्यस्त्रीविग्रह । बाळें वधोनियां गृहेंगृह । पापसंग्रह संपादी ॥८३॥
ऐशी फिरतां घरोघरीं । अकस्मात ते खेचरी । रिघे नंदाचिये मंदिरीं । जेथें वैरी विघ्नांचा ॥८४॥
म्हणाल कालमृत्यूचा धाक । मानूनि कांपती सर्व लोक । तेथें जाणोनि निजांतक । कैशी निःशंक प्रवेशली ॥८५॥
तरी पिशाचमाया भुलवी नरां । दैवी माहा ते खेचरां । वैष्णवी ते चराचरां । सुरांअसुरां मोहक ॥८६॥
तो हा प्रत्यक्ष वैकुंठ । मायालाघवें बालनाट्य । नटोनि नंदालयीं प्रविष्ट । नेणे प्रकट पूतना ॥८७॥
जो अनंत मायालाघवी । हरिहरब्रह्मादिकां भुलवी । गुणत्रयांचा गोसांवी । ज्याची पदवी अलक्ष्य ॥८८॥
खद्योत तेजें झाके दीपें । सूर्यतेजें दीप हरपे । तो सूर्य ज्याच्या प्रकाशें लोपे । त्या झांकिजे कोपें खद्योतें ॥८९॥
तैशी विष्णुमाया विश्व भुलवी । ते पूतनेसी उमजे केवीं । बालनाट्यें स्वतेज लपवी । मायालाघवी श्रीकृष्ण ॥९०॥
म्हणोनि पूतनेसि भासला बाळ । नाहीं ओळखिला हा काळ । माळा म्हणोनि कवळिजे व्याळ । तैसा घननीळ शिशु मानी ॥९१॥
निःशंक प्रवेशोनि मंदिरीं । बाळ देखिला मंचकावरी । जैसा खङ्ग कोशाभीतरीं । न वाटे बाहेरी तीक्ष्ण ॥९२॥
कीं श्रौताग्नि कुंडीं गुप्त । भस्मासारिखा भासे शांत । तैसा बालनाट्यें अनंत । नेणोनि निश्चिंत पूतना ॥९३॥
विबुध्य तां बालकमारिकाग्रहं चराचरात्माऽऽस निमीलितेक्षणः ।
अनन्तमारोपयदंकमन्तकं यथोरगं सुप्तमबुद्धिरज्जुधीः ॥८॥
म्हणाल बाळपण लेइला हरी । तयासि पूतना खेचरी । जाणवली कैशापरी । हे अंतरीं आशंका ॥९४॥
तरी ज्यासि चराचरात्मकपणें । विदित सर्वही होणें जाणें । तयासि पूतनेचें विषम करणें । कोण्या गुणें तर्केना ॥९५॥
कपट जाणोनि अंतरीं । बालविग्रहें मंचकावरी । जैसा खङ्ग कोशाभीतरीं । तेंवि श्रीहरि पहुडला ॥९६॥
झांकूनियां दोन्ही नेत्र । पाहे पूतनाचरित्र । बालग्रह महा क्रूर । जैशी अपार महामारी ॥९७॥
मी तंव चराचरात्मा अनंत । मज हेंचि तूं पाहें अंत । मानूनि विस्मय अत्यंत । पाहे निवांत निदसुरा ॥९८॥
तंव ते रिघोनि माजघरीं । स्नेहाळ माउलीचियेपरी । उभयहस्तें लोण उतरी । हृदयीं धरी उचलोनि ॥९९॥
न जाणोनि निजांतक । अंकीं घेतला बालक । दोर मानूनि सुप्तपन्नग । जेंवि मूर्ख करीं घे ॥१००॥
तैसा दुष्टांतक श्रीहरि । नेणोनि पूतना खेचरी । स्नेहचेष्टा मातेपरी । अंकावरी घेऊनि दावी ॥१॥
निःशंक निर्लज्ज धीट वनिता । देखोनि मंदिरीं संचरतां । तथापि उचलोनि बाळका घेतां । केंवि माता न निषेधिती ॥२॥
तथापि यशोदा रोहिणी । पुत्रवत्सला मोहखाणीं । नव्हती लौकिका प्राकृता जननी । कां त्या मौनी राहिल्या ॥३॥
दरिद्र भोगिलें बहुत दिवस । त्यासि दैवें सांपडे परीस । तो जेंवि न विसंवे कोणास । प्रांआपरीस संरक्षी ॥४॥
तैसें वार्द्धक्यीं यशोदेसी । पुत्रसंतान दुर्लभ तिसी । कंसत्रासें रोहिणीसी । संततीसी दुर्लभता ॥५॥
जैशी अलभ्यलाभाची प्राप्ति । तैशी ज्यासी पुत्रसंतति । तटस्थ ठेलय कवणे रीतीं । बालकाप्रति उचलितां ॥६॥
ऐशी न धरिजे आशंका । राक्षसी मायेच्या कौतुका । भुलल्या तेणें अन्यविवेका । विसरूनि शंका न करिती ॥७॥
तां तीक्ष्णचित्तामतिवामचेष्टितां वीक्ष्यान्तराकोशपरिच्छदासिवत् ।
वरस्त्रियं तत्प्रभया च धर्षिते निरीक्षमाणे जननी ह्यतिष्ठताम् ॥९॥
अकस्मात निजमंदिरीं । मंचकासन्निध माजघरीं । जैशी प्रकटे परमेश्वरी । तैशी नारी देखिली ॥८॥
दिव्यवसनीं दिव्याभरणीं । दिव्यरूपिणी विचित्र तरुणी । परमस्नेहाळ इंगितेक्षणी । देखोनि जननी तैं भुलल्या ॥९॥
मुखवीक्षणें परिलालनें । स्मितचुंबनें कुरवाळणें । हनुकपोलसंस्पर्शनें । आलिंगनें सप्रेमें ॥११०॥
ऐशी माउलीहूनि स्नेहाळ । ललना लाघवी लालनशीळ । देखोनि भुलल्या वरदळ । माजील कुटिल नेणती ॥११॥
जैसें दळवाडें चित्रविचित्र । माजीं झांकलें तीक्ष्ण शस्र्त्र । तैसें लावण्यललनागात्र । स्त्रीचरित्र लाघवी ॥१२॥
देखोनि यशोदा रोहिणी । तटस्थ ठेल्या अंतःकरणीं । हेचि याची साचार जननी । भ्रमें भुलोनि मानिती ॥१३॥
राक्षसी माया हे विचित्र । भगवत्सत्ता कर्मसूत्र । प्रकट दिसतां उघडे नेत्र । कांहीं मंत्र स्फुरेना ॥१४॥
आम्ही लटक्याच म्हणवूं माता । परी हेचि याची जननी तत्त्वता । कीं दैवें प्रकटली कुलदेवता । म्हणोनि विस्मिता पाहती ॥११५॥
तस्मिन्स्तनं दुर्जरवीर्यमुल्बणं घोरांकमादाय शिशोर्ददावथ ।
गाढं कराभ्यां भगवान्प्रपीड्य तत्प्राणैः समं रोषसमन्वितोऽपिबत् ॥१०॥
तंव ते पूतना तये स्थानीं । अंकीं बाळासि कवळूनि । लालनचुंबनीं न करी वाणी । घालून इवदनीं स्तनातें ॥१६॥
समुद्रमथनींचें हळाहळ । त्याहूनि सहस्रधा कराळ । प्रलयतक्षकाचें गरळ । तैसें केवळ दुर्जर ॥१७॥
ऐसें उल्वण मारक विष । जये स्तनीं तें सावकाश । अंकीं घेऊनि बाळकास । देती झाली साक्षेपें ॥१८॥
क्रूर गरळ तें दारुण । ज्याचें होतांचि अवघ्राण । देहावेगळे होती प्राण । बाळाकारणें तें पाजी ॥१९॥
ऐसें राक्षसीअंतर । वरी स्नेहाळ पोटीं क्रूर । यावरी तो जगदीश्वर । करी प्रकार तो ऐका ॥१२०॥
जाणोनि पूतनेची कपटभाव । उल्वणविषाचा प्रादुर्भाव । प्राणेंद्रियांसहित जीव । शोषी माधव सक्रोधें ॥२१॥
पूतना हे देहबुद्धि । विषयविषें बाळका बाधी । तिची करावया शुद्धि । शोशी त्रिशुद्धि सप्राण ॥२२॥
दोहीं करीं दोन्ही स्तन । करूनि गाढ निष्पीडन । शोणितां झाले विकळ प्राण । आक्रंदन करितसे ॥२३॥
N/A
References : N/A
Last Updated : April 27, 2017
TOP