श्रीमत्कृष्णदयार्णवाय नमः ।
गोविंदसद्गुरु जगन्मया । जगत्प्रचुर हे तुझी काया । कायातीता तुज अकाया । नमावया नुरणूक ॥१॥
इंद्रियद्वारा प्रकाशून । आंतून बाहेर भासे भान । जग ऐसें त्या अभिधान । जें अभिन्न सत्यत्वें ॥२॥
आपणा नेणोनि जाणे जगा । याचि वैपरीत्यें दगा । सूर्यप्रतिमंडळाचिया संगा । इच्छूनि योगा अभ्यासी ॥३॥
कस्तूरीसाठीं भ्रमे हरिण । सूर्य अळंगूं पाहे किरण । तेंवि इंद्रियद्वारा जीवचैतन्य । दृश्या शरण होतसे ॥४॥
इंद्रियें प्रकाशिती स्वर्गा । सप्तपाताळें पन्नगभोगा । सप्तद्वीपें दिग्विभागा । वाढे वाउगा अभिलाष ॥५॥
आपुल्या प्रकाशें प्रकटलें । त्याचें सत्यत्व वाटलें । त्याच्या अभिलाषें दाटलें । मग लोटलें प्रयत्नीं ॥६॥
कर्ता करण आणि कार्य । त्रिपुटी याचेंचि नाम होय । ज्ञाता ज्ञान आणि ज्ञेय । एवं विषय जदद्दृश्य ॥७॥
खापर घोटूनि सोज्वळ केलें । तेथें चराचर बिंबलें । घर्षणें तें हरपलें । नोहे आंतुले वास्तव ॥८॥
वास्तवान्वयें अवघें वस्तु । विपरीत बोधें पावे अस्तु । उपरतौनि होतां स्वस्थु । रहित मी तूं उरणें तें ॥९॥
एवं सकाय अकाय । अवघा एक सद्गुरुराय । अभिन्नभावें नमितां पाय । सर्व अपाय पारुषती ॥१०॥
तंव सद्गुरु म्हणती पुरें । अभिन्नभजनप्रेमादरें । सात्त्विका बुद्धीसि भरतें भरें । तें नावरे प्रज्ञेतें ॥११॥
विवेकामृताचिया पाउसाळां । विश्वचित्सुखाच्या सुकाळा - । माजीं मोहाचा उन्हाळा । कोण दुबळा वांछील ॥१२॥
तथापि श्रीमद्भागवत । जें श्रुतीचें निर्मथित । येणें सप्रेमें आनंदभरित । पुढें त्वरित निरूपीं ॥१३॥
दशमस्कंधींचा अध्याय षष्ठ । भाषाव्याख्यान महाराष्ट्र । विवरूनि श्रोत्यांचे श्रवणीं स्पष्ट । अर्थ प्रविष्ट करावा ॥१४॥
सदयाज्ञा हे श्रीमुखींहून । प्रकटे जेवीं जान्हवीजीवन । तया ओघाची सांठवण । दयार्णव भरून उचंबळला ॥१५॥
माजीं शेषशायी सद्गुरु । पादसेवनीं अत्यादरु । मागितला तोचि वरु । देते झाले कृपेनें ॥१६॥
एवं वरें आनंदोन । देशभाषेचें व्याख्यान । आरंभिलें तें सज्जन । सावधान कृपेनें ॥१७॥
ऐकोनि मंत्र्यांच्या वचना । पूतना प्रेरिली बालहनना । इतर प्रेरूनि साधुच्छळणा । कंस सदना प्रवेशे ॥१८॥
तेचि पूतना गोकुलभुवनीं । प्रवेशेल हें जाणोनि । वसुदेव सांगें नंदा कर्णीं । गूढवचनीं भविष्य ॥१९॥
रायासि दिधलें वार्षिक द्रव्य । आतां न करावें स्थातव्य । गोकुळामाजीं एथूनि भाव्य । विघ्नोद्भव दिसतसे ॥२०॥
तेंचि षष्ठीं वसुदेववचन । ऐकोनि नंद विस्मयापन्न । हृदयीं चिंतूनि श्रीभगवान । पूतनामरण तो देखे ॥२१॥
षष्ठाध्यायीं इतुकी कथा । श्रीशुक सांगे जगतीनाथा । जिचेनि श्रवणें निरसे व्यथा । ते हे श्रोतां परिसावी ॥२२॥

N/A

References : N/A
Last Updated : April 27, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP