भक्तीपर श्लोक

संकीर्ण वाड्मय साहित्य.


॥१॥
ध्यानी घ्या निजरूप विठ्ठल सदा वाचें हरी नाम गा ॥
ऐका कीर्तन आदरें श्रवणी या सत्यत्व जें ऊमगा ॥
वंदा सज्जन - संत - सद्गुरुपदा होऊनिया नम्रतां ॥
तुकाविप्र गुरु प्रबोध आवडी सेवा बरें अमृता ॥१॥
॥२॥
पूजा सद्गुरु - संत - ब्राह्मण प्रिती सेवेबले तोषवा ॥
मैत्री लक्षण द्वेष टाकुनि मनीं ऐक्यत्व पाहो जिवा ॥
सशा(च्छा)स्त्र - श्रवणें करोनि सहजी आत्मार्पणासी घडे ॥
तुकाविप्र गुरु कृपे रुपे नवविधा भक्ती अशी आतुडे ॥२॥
॥३॥
झाला मुक्त परीक्षिती त्वरितची संसार - बंधाहूनी ॥
एकाग्र श्रवणार्थ साक्ष पहा ऐकावया होवोनी (?) ॥
जे जे वाक्य शुकाचिया निघती तें सेवोनी विश्वासला ॥
तुकाविप्र गुरु निजात्म मुकला भूतीं असे संचला ॥३॥
॥४॥
सप्रेमें करिताती किर्तन सदा विश्वोपकारास्तव ॥
स्वामी नारद आणि श्रीशुक - मुनी वेदांत हे वैभव ॥
गाती नाचति हर्षयुक्त त्रिजगीं वर्णोनि श्रीकेशवा ॥
तुकाविप्र गुरु हरी - गुण - कथा सध्याची मुक्ती जिवा ॥४॥
॥५॥
वाचे नाम उमापती स्मरतसे श्रीराम - नामावळी ॥
दैत्याचा सुत नाम श्रीनरहरी प्रल्हाद गर्जे बळी ॥
ऐसी भक्ति निवाड नाम - स्मरण संस्थापिले दोघेंही (?) ॥
तुकावीप्र गुरु मुखें अनुभव तारावयाशी मही ॥५॥
॥६॥
सेवा भक्ति रमा करी अनुदिनी श्रीशेषशाहीपदा ॥
तेणें पावली सत्वरेचि करुनी त्रैलोक्यची संपदा ॥
सांडोनी आपुली अहंमती महा सेवी पती श्रीपती ॥
तुकावीप्र गुरु निजांग पदवी श्री शोभली हें प्रिती ॥६॥
॥७॥
भक्ति ही प्रथुराज अर्चन - विधी श्रीविष्णु सर्वोत्तम ॥
केली शोडस भाव तो उपविधी सौख्यत्व कीं संभ्रम ॥
पृथ्वी विष्णुमय करोनि दिधली पूजोनियां सर्वदा ॥
तुकाविप्र गुरु समस्त सुख दे वारोनिया आपदा ॥७॥
॥८॥
सर्वात्मा हरि जाणुनि नमन हें भक्ती करी आक्रूरें ॥
पाहे जे स्थिर - जंगमादिक जगीं वंदावया सादरें ॥
विष्णूरूप जगत्रि ठेवुन मनीं भक्ती करी यापरी ॥
तुकाविप्र गुरु पदासी नमितां प्रत्यक्ष मुक्ती वरी ॥८॥
॥९॥
श्रीरामा प्रिति प्रेमदाश्य करुनी संतोषवीला बरा ॥
तो हा मारुती ब्रह्मचारी आगळा सामर्थ्य योगें तुरा ॥
भक्तीदाश्य अशी जयासी घडली कालादि ज्या धाकती ॥
तुकाविप्र गुरु अखंड स्मरतो श्रीराम शीतापती ॥९॥
॥१०॥
सख्यत्व करोनि अखंड भजन हें अर्जुना श्रीहरी ॥
झाला सारथी सर्वकाळ जवळी सांभाळी सर्वापरी ॥
पृथ्वीचा बहु भार हा उतरिला पार्थाचिया हस्तकें ॥
तुकाविप्र गुरु सखा यदुपती भक्ती घडे कौतुकें ॥१०॥
॥११॥
दानीं आणि रणीं वली विजय जो दैत्या कुळी जन्मला ॥
पाहूनी बहु पुण्य इंद्र मनिं तो एकंदरे धाकला ॥
प्रार्थोनी जलज्यापति प्रगटला रूपे लघू वामन ॥
तुकाविप्र गुरु त्रिपाद करितां संतोष आत्मार्पण ॥११॥

N/A

References : N/A
Last Updated : March 26, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP