नाथगोपाळाचे सुलतान

संकीर्ण वाड्मय साहित्य.


( श्री. पां. मा. चांदोरकर )
१ माझ्या जवळील एका हस्तलिखित बाडांत खालील कविता आहे. कवितेच्या शेवटीं “ नाथ गोपाळ निर्गुण बाही : केला सुलतान आक्षईं ” आसा उल्लेख आहे.
२ कविता अशी
श्री
चतुर्दळीच्या चवघी जणी : साहा सखया स्वाधिष्ठानीं : दहा मणिपुरीच्या कामिनी : अनुहातीच्या द्वादश गडनी : नेणो म्हणती तो वीतरागी : १ : वीशु (?) दलीच्या नारी सोळा : अग्नी चक्रीच्या दोनी बाळा : त्रिपुटीसी देखिले डोळा : ब्रह्म देवो ब्राह्मण मेळा : तेथें गेले मी लगबग ही : २ : श्रीहाटीचा सारंगधर : गोल्हाटीचा गौरीहर : आउट पीठीचा विस्वंभर : भ्रमरगुंफेचा विचार : सदा सीव उन्मनी भोगी : ३ : ब्रह्मरंध्रीची सत्रावी : चढले सहस्रदळ गावी : पुढें देखिला गोसावी : माजी सरली ठेवाठेवी : माया सरली न सिवे आंगीं : ४ : जेथें शब्द वाचा नाहीं : तेथें अद्भुत कांहीं न बाई : नाथ गोपाळ निर्गुण बाही । केला सुलतान आक्षईं : सद्गुरु रुपे सायोज्य भोगी : ५ : कोणी शुधी सांगा मजलागी : बाई कोठें तो निजयोगीं : धृ० :
३ गोपाळनाथ चार झाले. (१) रंगनाथ शिष्य गोपाळनाथ (१६८८). (२) देवनाथ शिष्य गोपाळनाथ (१६७६-१७४३). (३) देवनाथांचे परमगुरु गोपाळनाथ (१६००). (४) आत्माराम शिष्य गोपाळनाथ. तेव्हां वरील चार गोपाळनाथांपैकीं सुलतानाचे गुरु कोणते गोपाळनाथ ? नक्की समजत नाहीं. सुलतान ( नाथ ) यांनीं नाथपंथाचा आवडता विषय जो पातंजल योग तोच वरील कवितेंत गायिला आहे, हें साहजिकच आहे.
४ कसेंहि असो, आज सुलतान हे संत - कवि आपल्याला नवीन उपलब्ध होत आहेत. वर जे गोपाळनाथांचे काल दिले आहेत त्यावरून व सुलतानांच्या भाषेवरून सुलतान ( नाथ ) हे सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात व अठराव्याच्या पूर्वार्धांत केव्हांतरी झाले असें अनुमान काढण्यास कांहीं हरकत असूं नये.

N/A

References : N/A
Last Updated : March 26, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP