प्रासंगिक कविता - प्रसंग ५
समर्थ रामदासांनी हिन्दी भाषेत रसाळ पदे लिहीली आहेत.
( शके १५७० सर्वधारी नाम संवत्सरीं चाफळास श्रीरामनवमीच्या उत्सवास श्रीसमर्थानीं आरंभ केला. तत्पूर्वीं हा उत्सव मसूर मुक्कामीं होत होता. पुढील डफगाण्यांत चाफळ क्षेत्राचें सृष्टिसौंदर्य, श्रीसमर्थांनीं स्वहस्तें बांधलेलें श्रीरघुपतीचें देवालय आणि श्रीरामनवमीचा उत्सव समारंभ यांचें मोठ्या बहारीचें वर्णन श्रीसमर्थांच्याच जोरदार भाषेंत वाचकांस पाहावयास मिळेल. )
भोंवता डोंगराचा फेरा । मध्यें देवाचें शिखर ।
पुढें मंडप सुंदर । नवखणांचा ॥१॥
चहूंखांबाची रचना । वरत्या चोवीस कमाना ।
काम कटाउ नयना । समाधान ॥२॥
नाना तरुआंबेबनें । दोहींकडे वृंदावनें ।
वृंदावनीं जगजीवनें । वस्ती केली ॥३॥
पुढें उभा कपिवीर । पूर्वेकडे लंबोदर ।
खालें दाटला दर्बार । नाना परी ॥४॥
दमामे चौघडे वाजती । धडके भांड्यांचे गाजती ।
फौजा भक्तांच्या साजती । ठाईं ठाईं ॥५॥
माही मोर्तबें निशाणें । मेघडंब्रें सूर्यपानें ।
दिंड्याछत्र्या सुखासनें । विंजणे कुंचे ॥६॥
काहाळा कर्णे बुरुंग बाके । नाना ध्वनीं गगन झांके ।
बहुत वाद्यांचे धबके । परोपरीं ॥७॥
टाळमृदांगें उपांग । ब्रह्मविणें चुटक्या चंग ।
तानमानें माजे रंग । हरिकथेसी ॥८॥
घांटा घंटा शंख भेरी । डफडीं पावे वाजंतरी ।
भाट वर्जती नातरी । परोपरीं ॥९॥
उदंड यात्रेकरू आले । रंगीं हरिदास मिळाले ।
श्रोतेवक्ते कथा चाले । भगवंताची ॥१०॥
नाना पुष्पमाळा तुरे । पाहों जातां भडस पुरे ।
रंग स्वर्गींचा उतरे । तये ठायीं ॥११॥
गंध सुगंध केशर । उदंड उधळती धूशर ।
जगदांतरें हरिहरें । वस्ति केली ॥१२॥
दिवट्या हिलाल चंद्रज्योती । नळे आर्डत उठती ।
बाण हवाया झर्कती । गगनामध्यें ॥१३॥
उदंड मनुष्यांचीं थाटें । दिसतातीं लखलखाटें ।
येकमेकांसी बोभाटें । बोलावितीं ॥१४॥
उदंड उजळील्या दीपिका । नामघोषें करताळिका ।
कितीयेक ते आइका । ऐका शब्द होती ॥१५॥
क्षीरापतीची वाटणी । तेथें जाहाली दाटणी ।
पैस नाहीं राजांगणीं । दाटी जाली ॥१६॥
रंगमाळा नीरांजनें । तेथें वस्ति केली मनें ।
दिवस उगवतां सुमनें । कोमाईलीं ॥१७॥
रथ देवाचा वोढिला । यात्रेकरां निरोप जाला ।
पुढें जायाचा गल्बला । ठाईं ठाईं ॥१८॥
भक्तजन म्हणती देवा । आतां लोभ असों द्यावा ।
धन्य सुकृताचा ठेवा । भक्ति तुझी ॥१९॥
दास डोंगरीं राहातो । यात्रा देवाची पाहातो ।
देव भक्तांसवें जातो । ध्यानरूपें ॥२०॥
N/A
References : N/A
Last Updated : December 09, 2016
TOP