प्रासंगिक कविता - प्रसंग ३

समर्थ रामदासांनी हिन्दी भाषेत रसाळ पदे लिहीली आहेत.


( शके १५५६ -५७ चे सुमारास सातार्‍याजवळ माहुली क्षेत्रीं श्रीसमर्थांचा मुक्काम असतां, तुकाराम महाराज त्यांचे भेटीस आले होते. त्या प्रसंगीं आपापलीं चरित्रें परस्परांनीं परस्परांस सांगितलीं. त्यांत पुढील अभंगामध्यें समर्थांनीं आपलें त्रोटक चरित्र वर्णन केलें आहे. )
नमो अधिष्ठाता विष्णु मुख साधु । तेथूनियां बोधु विधीलागीं ॥१॥
विधीपासुनियां ज्ञान विधीसुता । तेंचि ज्ञान प्राप्त वसिष्ठासी ॥२॥
वसिष्ठें उपदेश केला रामचंद्रा । तोचि महारुद्रा हनुमंता ॥३॥
हनुमंत कलीमाजीं चिरंजीव । जाले देव सर्व बौद्धरूप ॥४॥
बौद्ध नारायण होऊनी बैसला । उपाव बोलिला व्यासमुनि ॥५॥
व्यासमुनि बोले भविष्यपुराण । जग उद्धरणें कलीमाजीं ॥६॥
कलीमाजीं गोदातीरीं पुण्यक्षेत्र । तेथें वातपुत्र अवतरे ॥७॥
अवतरे अभिधानी रामदास । कृष्णातीरीं वास जगदुद्धारा ॥८॥
जगदुद्धारासाठीं श्रीरामा सांकडें । केलें वाडेंकोडें भक्तिपंथें ॥९॥
भक्तिपंथें मोठा केला श्रीरामानें । जंबू अभिधानें ग्राम तेथें ॥१०॥
तेथें ब्रह्मनिष्ठ अधिष्ठाता पूर्ण । सूर्यनामा जाण द्विजवर्य ॥११॥
द्विजवर्य सूर्य जैसा तपोधन । अद्भुत विंदान जालें तेथें ॥१२॥
जाली रामनवमी मध्य अष्टमीसी । अर्धरात्रीं त्यासी दूत आले ॥१३॥
दूत आले पुढें घालोनि चालिले । महाद्वारा आले भीम जेथें ॥१४॥
भीमदेवालयीं नेऊनी तयासी । तेथें उभयतांसी देखियेलें ॥१५॥
देखियेलें राजपुत्र सूर्यवंशी । झांपड नेत्रासी पडे तेव्हां ॥१६॥
पडें तेव्हां जैसा दंडवत भूमी । मग अंतर्धामीं बोलाविलें ॥१७॥
बोलावूनि माथां ठेवी सव्य पाणि । मंत्र सांगे कर्णीं रामनाम ॥१८॥
नाम सांगुनियां ताम्रमूर्ति रम्य । पट्टाभिश्रीराम दिधला तया ॥१९॥
तया दिला वर तु पुत्र होतील । ध्वज उभारतील रामदास्यें ॥२०॥
रामदास्य जालें धन्य वंशोद्धार । बोलोनि सत्वर गैब जाले ॥२१॥
जाला रामनवमी महोत्सव थोर । मध्यान्हीं सत्वर जन्मा जाला ॥२२॥
जन्म जाला भला देव वंशा आले । उपासना चाले राघवाची ॥२३॥
राघवाची भक्ति सुखाची विश्रांति । पितयाची शांति जाली पुढें ॥२४॥
पुढें ज्येष्ठ बंधु न सांगेचि कांहीं । सुखें देवालयीं निद्रा केली ॥२५॥
निद्रा केली तेथें श्रीरामें उठवूनी । तोचि मंत्र कानीं सांगितला ॥२६॥
सांगितला बोध रामीरामदासा । गुरुच्याही वंशा निरोपिलें ॥२७॥

N/A

References : N/A
Last Updated : December 09, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP