प्रासंगिक कविता - प्रसंग ९
समर्थ रामदासांनी हिन्दी भाषेत रसाळ पदे लिहीली आहेत.
( भिमाजीबाबा उर्फ भीमस्वामी यांस श्रीसमर्थांचा अनुग्रह शके १५६७ मध्यें झाला होता, आणि त्यांनीं १५९७ मध्यें शिवाजीमहाराजांबरोबर कर्नाटकांत समर्थांच्या आज्ञेवरून जाऊन तंजावरास मठस्थापना केली होती. तंजावरास गेल्यानंतर भीमस्वामींना सद्गुरुचरणांचा वियो दुस्सह झाला म्हणून त्यांनी “ अखंडीत हे वासना भेटि व्हावी । प्रभूपाइंची धूळि माथां पडावी । मनींचे मनीं जाणसी स्वामिराया । किती वाढऊं हा सविस्तार वायां ॥ ” अशा आशयाचें एक शोकबद्ध पत्र श्रीसमर्थांकडे पाठविलें. त्यास उत्तर म्हणून पुढील दोन अभंग व ओंव्या समर्थांनीं लिहिल्या. )
आम्हां तुम्हां मुळीं जाली नाहीं तुटी । तुटीविण भेटि इच्छीतसां ॥१॥
इच्छितसां योग नसतां वियोग । तुम्हां आम्हां योग सर्वकाळ ॥२॥
सर्वकाळ तुम्ही आम्ही एके स्थळीं । वायां मृगजळीं बुडों नये ॥३॥
बुडों नये आतां सावध असावें । रूप ओळखावें जवळींच ॥४॥
जवळींच आहे नका धरूं दुरी । बाह्य अभ्य़ंतरीं असोनीयां ॥५॥
असोनी सन्निध वियोगाचा खेद । नसोनीयां भेद लावूं नये ॥६॥
लावूं नये भेद मायिकसंबंधीं । रामदासीं बोधीं भेटि जाली ॥७॥
==
स्वरूपाची भेटि तेथें नाहीं तुटी । वायांचि हिंपुटी होत असां ॥१॥
होतसां हिंपुटी नसतां वियोग । असतां संयोग सर्वकाळ ॥२॥
सर्वकाळ ऐक्यरूप आलिंगन । तेथें मीतूंपण हारपलें ॥३॥
हारपलें दुःख द्वैताचें पाहातां । सस्वरूप आतां समाधान ॥४॥
समाधान चळे ऐसें न करावें । विवेकें भरावें सस्वरूपीं ॥५॥
सस्वरूपीं नाहीं संयोग वियोग । सर्वकाळ योग सज्जनाचा ॥६॥
सज्जनाचा योग सज्जनासी आहे । विचारूनि पाहें अनुभवें ॥७॥
अनुभवीं जाली आम्हां तुम्हां भेटि । आतां नव्हे तुटी दास म्हणे ॥८॥
ओंव्या -
चित्रकला नाना नाटक । म्हणोनि नामें कर्नाटक ।
तेथें जे रामउपासक । पत्र त्यांसी ॥१॥
तुम्हीं पत्र पाठविलें । वाचुनि आश्चिर्य वाटलें ।
परम समाधान जालें । देव जाणे ॥२॥
प्रवृत्तीसी पाहिजे राजकारण । निवृत्तीसी पाहिजे विवरण ।
जेथें अखंड श्रवण मनन । धन्य तो काळ ॥३॥
आयुष्यासी माप लागलें । ऐसें प्रचीतीसी आलें ।
तरी सार्थक पाहिजे केलें । सारासार विचारें ॥४॥
हें बहुत सुकृतें घडे । परलोक विवेकें जोडे ।
समजतां मूळ खंडें । जन्ममृत्याचें ॥५॥
नवविधाभक्तीचे अंतीं । होत आहे भक्तवत्प्राप्ति ।
सत्य स्वरूपीं सद्गति । तात्काळ होते ॥६॥
हें उमजल्यावीण काय कळे । समजल्यावीण तें न कळे ।
श्रवणमननें निवळें । सकळ कांहीं ॥७॥
सकळ कांहीं जाणोनि केलें । म्हणिजे सार्थकचि जालें ।
नेणतां अनुमानें गेलें । तें निरर्थक ॥८॥
धन्य आत्मज्ञानी नर । सार्थक केला संसार ।
त्यासी आम्हांसी अंतर । कांहींच नाहीं ॥९॥
तत्वनिर्शना उपरी । रायारंका एकचि सरी ।
पुरता विचार चतुरीं । पाहिला पाहिजे ॥१०॥
शब्दद्वारां अर्थ घेणें । विवेकें अर्थरूप होणें ।
सार्थकाचीं हें लक्षणें । जाणती ज्ञानी ॥११॥
विवेकाचें एक सूत्र । सकळांसी मिळोनि एकचि पत्र ।
देहभावना विचित्र । स्मरण होत ॥१२॥
स्मरणाउपरी अवस्था । ते लिहितां नव्हे व्यवस्था ।
बहुत निकट असतां । वियोग जाला ॥१३॥
हें ऋणानुबंधानें केलें । तें ऋणानुबंधावरी गेलें ।
आतां घडेल तें भलें । ऋणानुबंध ॥१४॥
एकी अवस्था दोहींकडे । अनृत लिहिणें न घडे ।
निमिष्यनिमिष्याचे निडें । स्मरण होतें ॥१५॥
तुम्हांसी प्रपंच आहे कांहीं । आम्हांसी तुम्हांवेगळें नाहीं ।
पत्र दरुशण सर्वहि । स्मरणें होतें ॥१६॥
ते सारिखे परस्परें । अंतरा होडती ( ओढती ? ) अंतरें ।
रघुनाथ भक्ताचेनि उपकारें । उपकारीं आहे ॥१७॥
आतां बहुत काय लिहावें । अंतरा अंतर जाणावें ।
तालीक करून पाठवावें । समस्तांसी ॥१८॥
N/A
References : N/A
Last Updated : December 09, 2016
TOP