अनुभवामृत - प्रकरण ५ वें
वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.
तेविंचि सत्ता प्रकाश सुख । या तिहि उणे लेख । विषपणे विष । विषा नाहि ॥१॥
कांति काठिन्य कनक । तिन्हि मिळुन एक । द्राव गोडि पियुष । पुयुष जेविं ॥२॥
उजाळ दृति मार्दव । या तिहि तिहि उणीव । देखिजे सावेव । कापुरि एकि ॥३॥
अंगे कीर उजाळ । उजाळ तोचि मवाळ । कां दोन्हि ना परिमळ । मात्र जो ॥४॥
ऐसि इये कापुरपणि । तिन्हि इये तिन्हि उणि । इया परि आटणि । सत्तादिका ॥५॥
यर्हवि सच्चिदानंदभेदे । चालिलि तिन्हि पदे । परि तिन्हि उणि आनंदे । केलि येणे ॥६॥
जे सत्ताचि प्रकाशु । प्रकाशचि सत्ता उल्हासु । हे न निवडे मिठांशु । अमृति जेवि ॥७॥
शुक्ल पक्षिच्या सोळा । दिवसा वाढति कळा । परि चंद्र मात्र सगळा । चंद्रि जेवि ॥८॥
थेंबि पडता उदक । थेंबा धरो ये लेख । परि पडला ठांई उदक । वांचुनि आहे ॥९॥
तैसे असदाचिये व्यावृत्ति । सद म्हणो आले श्रुति । जडाचिये समाप्ति । चिदपण ऐसे ॥१०॥
दु:खाचिये सर्वनासे । उरले ते सुख ऐसे । निगदिले निश्वासे । प्रभुचेनि ॥११॥
ऐसि सत्प्रतियोगिये । असदादि तिन्हि इये । लोटता जालि त्राय । सत्तादिका ॥१२॥
एवं सच्चिदानंद । आत्मा हा ऐसा शब्द । अन्य व्यावृत्ति सिद्ध । वाचक नव्हे ॥१३॥
सूर्याचे प्रकाशे । जे कांहि आभासे । तेणे तो दिसे । सूर्य काई ॥१४॥
तेविं जेणे तेजे । वाचेसि वाच्य सुजे । ते वाचा प्रकाशिजे । हे के आहे ॥१५॥
विषय नोव्हे कोण्हाहि । जया प्रमेयत्वचि नाहि । तया स्वप्रकाशा काई । प्रमाणे होति ॥१६॥
प्रमेय परिच्छेदे । प्रमाणत्व नांदे । ते काय स्वत:सिद्धे । वस्तुचे ठांई ॥१७॥
म्हणोनि सच्चित्सुख । हे बोल वस्तुवाचक । नव्हति हे शेष । विचाराचे ॥१८॥
ऐसेनि इये प्रसिद्धे । चालिलि तिन्हि पदे । मग द्रष्ट्या स्वसंवादे । भेटति जेव्हा ॥१९॥
ते वेळि वरिसोनि मेघ । समुद्र होवोनि वोघ । सरे दावोनि माग । हारवे जैसा ॥२०॥
फळ विउनि फुल सुके । फळपाके रस पोखे । तोहि रस उफरवे । तृप्तिदानि ॥२१॥
अहुति आग्नि अंतु । घालुनि वोसरे हातु । सुख चेवउनि गीतु । उगा राहे ॥२२॥
नाना मुखा मुख दाउनि । अरिसा जाय निघोनि । कां निदेले चेवउनि । चेवविते जैसे ॥२३॥
तैसे सच्चिदानंद चोखटा । दाउनि द्रष्ट्या द्रष्टा । तिन्हि पदे लागति वाटा । मौनाचिया ॥२४॥
जे जे बोलिजे ते ते नव्हे । होय ते तंव न बोलवे । साउलिवरि न मववे । मविते जैसे ॥२५॥
मग आपलियेकडे । मवितियासि पडे । तै लाजलाजु अखडे । मविति जैसि ॥२६॥
तैसे सदचि स्वभावे । असद तंव नव्हे । मा सदत्व संभवे । सदासि काई ॥२७॥
अचिदाचेनि नाशे । अचिदाचेनि नाशे । जे चिन्मात्र आले दशे । आता चिन्मात्रचि मा कैसे । चिन्मात्रि इये ॥२८॥
नीद प्रबोधाचेठाई । नसे तैसे जागणेहि । तेवि चिन्मात्र मा काई चिन्मात्रि इये ॥२९॥
ऐसे यया सुखपणे । नाहि दु:ख कीर होणे । आता सुखचि मा होणे । सुखासि काई ॥३०॥
म्हणोनि सद सदत्वे गेले । चिद चिदत्वे मावळले । सुखा सुख जाले । कां हि ना किं ॥३१॥
आता द्वंद्वाचि लवचक । सांडुनि दुनिचे कंचुक । सुखमात्रचि एक । स्वये अथि ॥३२॥
वरि एकपणे गणिजे । तै गणितेनसि होय दुजे । ह्मणोनि कांहि न गणिजे । ऐसे एक ॥३३॥
सुखा अतोनि निघणे । तै सुखिया सुखि तेणे । हे सुखमात्रचि मा कोणे । अनुभवावे ॥३४॥
जै प्रकृति डंकु अनुकरे । तै प्रकृति डंके अवतरे । मा डंकुचि डंका भरे । ऐसे आहे ॥३५॥
तैसे आपलेनि सुखपणे । जया नाहि सुखावणे । आणि नाहि हेहि जेणे । नेणिजे सुखे ॥३६॥
अरिसा न पाहाता मुख । स्वये सन्मुख ना विन्मुख । तैसे नसोनि सुखासुख । सुखचि जे ॥३७॥
आता न लाविता उसु । तै जैसेनि असे रसु । तेथिचा जो मिठांशु । तोचि जाणे ॥३८॥
कां न सज्जिता विणा । तो नाद जेवि अबोलना । तयाते तेणेचि जाणा । व्हावे जैसे ॥३९॥
नाना पुष्पाचिया उदरा । न येता पुष्पसारा । आणपचि भवरा । व्हांवे पडे ॥४०॥
न रांधिता रससोय । ते गोडि कैसि आहे । हे पाहाणे ते नव्हे । आणिका जोगे ॥४१॥
तैसे सुखपणा येवो । लाजे आपले सुख पावो । ते आणिका चाखोसुवो । येइल काई ॥४२॥
देहाचिये दुपारि । चंद्रमा जैसा अंबरि । ते आसणें चांदावरि । जाणावे कि ॥४३॥
रूप नाहि तै लावण्य । अंग नुठि तै तारुण्य । क्रिया नसे तै पुण्य । कैसे असे ॥४४॥
जै मनाचा अंकुर नुदैजे । तैचेनि मकरध्वजे । आसणे हे न साजे । तरि तेचि घडे ॥४५॥
कां वाद्य - विशेषाचिये सृष्टि । जै जन्म नये दृष्टि । तै नाद ऐसि गोठि । नादाचि जोगि ॥४६॥
नाना काष्टाचिया विटाळा । वोसरलिया अनळा । लागणें ते केवळा । अंगासिचि ॥४७॥
दर्पणाचिये नियमे । विण मुखि मुख प्रेमे । आणिजेते क्रमे । वर्में येणे ॥४८॥
न पेरिता पीक जोडे । ते मुढाचि आहे रोकडे । ऐसिया सोई उघडे । बोलणे हे ॥४९॥
एवं विशेस्ष सन्मान्य । दोन्हिते नातळे चैतन्य । जे भोगिजे अनन्य । तेणेसि सदा ॥५०॥
आता यावरि जे बोलणे । ते येणेचि बोले साहने । जे मौनाचेहि पठने । पीउनि गेले ॥५१॥
एवं प्रमाणे प्रमाण । येणे केले अप्रमाण । दृष्टांते वाइलि आण । दिसावयाचि ॥५२॥
जेथे अंगाचिच अनुपमाण । ह्मणोनि आटल्या उपपत्ति । तेथे उठलि पाति । लक्षणाचिया ॥५३॥
उपाय मागिल पाय । घेउनि जाले वाय । प्रतिति सांडिलि सोय । प्रत्ययाचि ॥५४॥
येथे निर्धारेसि विच्यार । निमोनि गेला साचार । स्वामिचे संकटि शूर । सुभट जैसा ॥५५॥
नाश साधोनि आपला । बोध बोधेसि लाजिला । नुसधेपणे थोटावला । अनुभव येथे ॥५६॥
भिंगाचिया चडळा । पदराचा पुंजा वेगळा । करिता जैसा निफाळा । अंगाचा होय ॥५७॥
कां गजबजिला उबा । पांघुरणे केळिचा गाभा । सांडिते वेळि उभा । कैचा कीजे ॥५८॥
तैसे अनुभाव्य अनुभावक । इंहि दोहि अनुभूतिबिक । ते गेलिया कैचे एक । एकासिचि ॥५९॥
अनुभव हा ठाववरि । आपुलिच अनवसरि । तेथे अक्षराचि हारि । वाईल काई ॥६०॥
जेथे परेसि पडे मिठि । तेथे नादा सळ उठि । मा वावरिजैल होटि । हे के आहे ॥६१॥
चेइलिया पाठि । चेवणायाच्या गोठि । किं धाला बैसे पाठि । रंधनाचिया ॥६२॥
उदेलिया दिवसपति । ते कि दिवे सेजे येति । पीकला सेति सुजति । नांगर काई ॥६३॥
म्हणोनि बंधमोक्षाचे व्याज । निमालिया जाले काज । आतां निरुपण भोज । वळघेल कांई ॥६४॥
इतिश्री अनुभवामृते सच्चिदानंदविवरणं नाम पंचम प्रकरणम् ॥
N/A
References : N/A
Last Updated : November 25, 2016
TOP