( गीतिवृत्त )
तो पाहुनियां कुशलव म्हणती ‘ नाहीं रिपू निमाले कीं. ।
निकट विकटकटकभत प्रकट कटकसेच दुष्ट आले कीं ? ॥१॥
( शिखरिणी )
असे ते बोलोनी, त्वरित मग दोघे उसळले;
वनीं वाय्वग्नीसे भरतकटकांतीं मिसळले;
महाकांडव्रातेंकरुनि सुटले मर्दित रणीं,
बुडे अब्धीमध्यें तदिषुशिखिसंतप्त तरणी. ॥२॥
( रथोद्धाता )
सूर्यरश्मिसमुदाय आटला, अंधकार मग फार दाटला. ।
जाहलीं जनविलोचनें वृथा, नासली रणकथा यशःप्रभा. ॥३॥
( गीतिवृत्त )
नेत्रें असूनि उघडीं, तिमिरीं स्वपरासि वीर नोळखती,
आकस्मिकलब्धश्रीमदांध अकुलीन नर जसे कुमती. ॥४॥
( स्वागता )
ताडिलें गजकरीं करवालेंः निर्मिलें रण भयंकर बालें. ।
वाहती बहुतर क्षतजा ते, निर्मिलें लवकरें क्षत ज्यातें. ॥५॥
खङ्गपात करितां गजदंतीं, शब्द संचरति सर्व दिगंतीं, ।
पावक प्रगट होउनि भाजी, धांवतां चिरडती गजवाजी. ॥६॥
काळसर्परसना तलवारी, तीस कोण जन कातर वारी, ।
स्पर्शतांचि बहु सत्वर मारी, काय ते प्रगटली नरमारी ! ॥७॥
‘ तात ! सोदर ! सखे ! सुत ! काका ! ’ यापरी बहुत मारिति हाका.
ऊठती कलितशस्त्र कबंधें, मारिती निजजनांसचि अंधें. ॥८॥
( वसंततिलका )
कित्येक शोणिततटिन्युदरांत मेले,
जे कातरांतर तमांत पळोन गेले.
एवं तदा क्षितीसुतातनयायुधांनीं
एका दिसांत भरिली यमराजधानी. ॥९॥
मांसासि भक्षुनि निषेवुनि शोणितातें,
भूतें ‘ दिलें ’ म्हणति, ‘ भोजन मिष्ट तातें ’ ।
‘ याच्या नसे ’ म्हणति तीं, ‘ तुलना यशातें. ’
तें एकतां, सुख गमे बहु त्या कुशातें. ॥१०॥
( शार्दूलविक्रीडित )
आसूर्योदय यापरी बळ तिहीं संहारितां पाहिलें,
तेव्हां त्या भरतासि कोपशिखिनें उद्दंडसे दाहिलें; ।
संताडी कुशहृत्स्थळासि अनळज्वाळाकुळेषुव्रजें,
साधूच्या प्रतिपालनीं मृदु, असत्संक्रंदनीं तीव्र जे. ॥११॥
( गीतिवृत्त )
त्यांचें करुनि निवारण, वारणशत्रुप्रताप कुश बोले, ।
‘ धरुनि वृथा काम रणीं कां मरणीं सिद्ध मूढ हे झाले ? ॥१२॥
( अनुष्टुप् )
सेनालक्ष्मणशत्रुघ्नपंचतामोहहेतु मी,
पतंगदीपकन्यायें मरतां काय हे तुमी ? ’ ॥१३॥
( पृथ्वी )
म्हणे भरत, ‘ हे शिशो ! त्यज खळा ! ममाश्वोत्तमा.
न मानिसि जरी, मनीं धरुनि गर्व लोकाधमा ! ।
यमालयपथीं न हो पथिक, मी करूनि क्षमा
न मारिन, असो प्रसू तव न तापसी सश्रमा. ॥१४॥
मदीयबळशोणितेंकरुनि तर्पिली त्वां क्षमा,
स्वबंधुहि विमर्दिले जरि, तथापि केली क्षमा. ।
त्यजिं मखहयास या धरुनि अन्यथा मी तुला,
पुरास मग नेइन क्षण न लागतां, रे मुला ! ॥१५॥
( गीतिवृत्त )
सोडुनि माझा घोडा, दोघेही हस्त या क्षणीं जोडा. ।
‘ शरणागत ’ म्हणावा रे ! याचि उपायें समर्थभय वारे. ॥१६॥
‘ वांचविलें भरतानें ’ ऐसें जननीस शीघ्र सांगावें, ।
पुनरपि असें न करणें, निजजीवनदातृकीर्तिला गावें ’ ॥१७॥
( स्रग्धरा )
कैकेयीपुत्र बोले खर मृदुल असें जेधवां आत्मतुंडें,
कोपें नेत्रें कुशाचीं तव दिसति, जशीं खादिरांगारकुंडें. ।
सोडी निश्वास पादाहत उरग तसा, दंतवस्त्रासि खंडी,
कोदंडी चंडकांडी कुशचि परि गमे पत्र ज्याचें शिखंडी. ॥१८॥
ताडी सप्तेषुवृंदें कुश कुशल करें शीघ्र रामानुजाला,
पांचां, सातां शरांहीं इतर भट तयां, सत्तरांहीं नळाला, ।
वाताच्या नंदनाला खरविशिखशतें, अंगदातें सहस्त्रें,
नीळातेंही तदर्धें; स्थविर, तिस शतें छिन्न, वाहे महास्त्रें. ॥१९॥
( अनुष्टुप् )
ज्यांच्या उरीं स्पर्श केला बलाकृष्टशिलीमुखें, ।
त्यांहीं त्याहीं भूगतांहीं वीरांहीं वाशिलीं मुखें. ॥२०॥
( इंद्रव्रजा )
वक्षःस्थलीं बाण तदा कुशानें संप्रेरिले युद्धनिरंकुशानें,
संमूढ होऊनि पडे धडाडां, रक्तप्रवाहासि वमे भडाडां ॥२२॥
( शार्दूलविक्रीडित )
जेव्हां मूर्च्छित देखिला क्षितितळीं भास्वत्कुळाचा टिळा,
क्रोधें पर्वत योजनायत मरुत्पुत्रें समुत्पाटिला, ।
हुंकारध्वनिकंपितत्रिभुवनें दोघांवरी सोडिला,
त्यांहीं तो त्रसरेणुसंचय वियद्गंगांतरीं पाडिला. ॥२३॥
वातोद्धूतमहीध्ररेणुगण तो जेव्हां शिरे खांगणीं,
युद्धालोकनकौतुकागतनभःस्थस्वर्वधू तत्क्षणीं ।
वस्त्रें झांकिति, नेत्र चोळिति, किती त्या फुंकिती, थुंकिती,
कीती खोकति, ओकती, किती धुतस्वालंकृती शिंकती. ॥२४॥
ऐसें कौतुक निर्मिलें लवयुतें त्या सद्यशःसंचकें,
वामीं मारुति ताडिला मग कुशें बाणांचिया पंचकें. ।
वज्रछिन्ननगेंद्रसा धडधड क्षोणीतळीं आपटे,
कांपें सांद्र [ विनासरा ] थरथरा भू, पृष्ट जीचें फुटे. ॥२५॥
( इंद्रवज्रा )
ऐसें कुशें कौतुक तेथ केलें, सर्वां भटांचें मग धैर्य गेलें, ।
धाकें पळाली अवशिष्ट सेना, भ्याडांसि कांहींच पुढें दिसेना. ॥२६॥
( उपेंद्रवज्रा )
करूनियां ते जन वंदनातें, निवेदिति श्रीरघुनंदनातें. ।
सबाष्पदीनानन खेद मानी, धरी धृतीतें परमाभिमानी. ॥२७॥
( शार्दूलविक्रीडित )
‘ हा ! वत्सा ! भरता ! मदुक्तिनिरता ! हा सद्गुणा ! लक्ष्मणा !
हा ! वत्सा ! घननादनाशकुशला ! हा भिन्नरक्षोगणा ! ।
हा ! शत्रुघ्न ! सखे ! मरुत्सुत ! मम प्राणप्रदा ! नील ! हा !,
हा ! हा ! अंगद ! जांबवन्नल ! कसे निर्वीर्य झालां महा ! ’ ॥२८॥
एवं फार तदा विलाप करुनि, श्रीराम तो घे सवें
सुग्रीवासि, बिभीषणाप्रति; रथीं आरूढ झाला जवें. ।
सेनामध्यविराजमान उडुराट् शोभे जसा खांगणीं,
पावे जाउनि युद्धभूमिजवळि क्षोणींद्रचूडामणी. ॥२९॥
( अश्वधाटीवृत्त )
‘ रामा ! मनोज्ञगुणधामा ! पलाशजनतामारणैकनिरता !
कामारिचित्तसदना ! मारुतिप्रियसुनामा ! नशत्रुविजिता ! ।
धामाधिपान्वयवरा ! मानशौर्यसुभगा ! मानिषेव्यचरणा !
वामाकृते ! इतरवामापराड्मुखमना ! मानवैकशरणा ! ’ ॥३०॥
( शार्दूलविक्रीडित )
एवं शल्यनिपीडितात्मजनतावक्त्रोत्थनामध्वनी,
येतां युद्धधरेसमीप, शिरति श्रीरामकर्णाध्वनीं, ।
त्यांला देखुनियां दयाकुलमना झाला कृपापांपती,
‘ गेले काय ’ म्हणे, ‘ किशोर ? ’ तंव ते आले अकस्मात् कृती. ॥३१॥
( स्वागता )
काकपक्षधर, कार्मुकपाणी, मेघवर्ण, सुकुमार, कृपाणी, ।
तुल्यलक्षण, समान वयाचे देवसे गणिति मानव यांचे. ॥३२॥
जानकीवदनपद्मसमानें तन्मुखें निरखिलीं बहु मानें, ।
स्वाकृतीधरशिशूंप्रति पाहे, तों सुखासि रघुनंदन लाहे. ॥३३॥
तद्वृत्तश्रवणोत्सुकश्रुति, कृती, श्रीराम त्यातें पुसे,
‘ कोणापासुनि सांगचापनिगमीं अभ्यास केला असे ? ।
उद्दंडध्वजिनीविनाश करितां कांहींच नाहीं श्रम ?
क्षोणीभूषणराजिरत्न तुमचा कोणा स्थळीं आश्रम ? ॥३४॥
कोणीं केला उपनय ? वदा मातृताताभिधानें.
शब्दब्रह्माभ्यसन घडलें कीं महत्सन्निधानें ? ।
निष्प्रत्यूहें सकळ घडती नित्य कीं सद्विधानें ? ’
रामें वाक्येंकरुनि पुशिलें त्यांसि एवंविधानें. ॥३५॥
( पृथ्वी )
म्हणे कुश, नृपा ! असो कशितरीहि आस्मत्कथा,
पुसूनि तुज काय गा ? फळ ? विलंब होतो वृथा. ।
त्यजूनि निज पौरुषाप्रति, अशा न वार्ता रणीं.
करीं, स्वविशिखाशि घे, त्वरित तूं नियोजीं गुणीं. ’ ॥३६॥
‘ स्ववृत्त न निवेदितां प्रथम, वीरचूडामणे !
न युद्ध तुजशी घडे ’ रघुपती असें जों म्हणे, ।
तदा स्मितलसन्मुखद्विजसमूहशुभ्रद्युति -
च्छटाधवलितांबरक्षिति कथी कुश स्वस्थिति. ॥३७॥
( शार्दूलविक्रीडित )
‘ सीता केवळ काननी प्रसवलीं; जीं जातककर्मादिकें
कर्में सोपनयें स्वयेंचि मुनिनें केलीं महत्कौतुकें; ।
समग् वेद सशास्त्रही पढविले, गानादि नानाकळा;
श्रीमद्रामचरित्र चित्र कथिलें, झाली मती सोज्ज्वळा. ॥३८॥
बुद्धिस्वास्थ घडे, मनोमळ झडे, स्वर्ग स्वयें सांपडे,
देहीं मोक्ष जडे, करीं जय चढे, काळारि धाकें दडे, ।
रामाच्या चरितामृताप्रति पितां सेनाजयाची कथा.
तेथें काय ? कितीक कौतुक मनीं लोकांसि भासे वृथा ! ॥३९॥
( आर्यावृत्त )
रामा ! तूझी ममता जायातनयालयादिकीं नाहीं, !
तस्मान् मृतसेनेची तुजला गणना नसो कांहीं. ॥४०॥
( गीतिवृत्त )
शक्ति नसे तुज संप्रति, ते त्वां कां त्यागिली वनीं ? रामा ! ।
शक्तिविवर्जित नर जो, तो होइल काय योग्य संग्रामा ? ’ ॥४१॥
( वसंततिलका )
‘ सीता ’ असा परिसतां कुशशब्दकानें,
ते पुत्रसे वळखिले रघुनायकानें. ।
‘ धिग् युद्ध हें ’ म्हणुनियां, मग कश्मळाला
पावोनियां, विकळ केवळ तो गळाला. ॥४२॥
( इंद्रवज्रा )
झाला मुहूर्तें मग सावधान सीतापती, शौर्ययशोनिधान ।
तेव्हां जगत्कंटकरावणारी वक्त्रें सुकंठासि असे विचारी. ॥४३॥
( गीतिवृत्त )
‘ कोणाचे सुत दोघे हे, या शोधासि वाळिबंधो ! घे, ।
मजशीं करिती दावे जाणत असशील तरि निवेदावे. ’ ॥४४॥
सुग्रीव वदे तेव्हा रामातें नमुनि पूर्णकामातें, ।
‘ तूझेचि वनामध्यें दोघे प्रतिबिंब वाटती मातें. ॥४५॥
( वसंततिलका )
आज्ञा मला त्वरित दे, रघुनायका ! मी
आहे दशास्यमृतिपासुनि युद्धकामी. ।
हे भक्तकामसुरपादपराज ! आजी
या बाळकांसह घडो मजलागिं आजी. ॥४६॥
( स्रग्धरा )
आज्ञा होतां सुकंठें तरु उपडुनियां क्षेपिला जों प्रचंडें,
त्यांहीं केलीं द्रुमाचीं स्वविशिखनिकरें तों नभीं कोटि खंडें; ।
तद्वक्षोरक्त जैसें शरततिसि दिलें, देहही त्या क्षितीतें,
आली मूर्च्छाहि याञ्चा धरुनि म्हणुनियां अर्पिले प्राण तीतें. ॥४७॥
( शार्दूलविक्रीडित )
होतां वानरराज मूर्च्छित असा, तो नीळही तत्क्षणीं,
क्रोधाला धरुनी मनांत, तरुला हस्तीं, उडे खांगणीं, ।
ताडी त्यासि धरारुहें प्रबळ तोबाहूसि पाणिद्वयें,
हाही सानुज खंडितद्रु कुश तद्वक्षासि बाणें स्वयें ॥४८॥
( स्रग्धरा )
तेव्हां तद्रक्तबिंदु क्षितिवरि पडले, मूळनीळाप्रमाणें
त्यांचेही नीळ झाले प्रगट, मग कुशें ताडिले तेहि बाणें; ।
तद्रक्ताच्याहि धारा प्रबळतर महाकायनीळात्ममाता,
झाला ऐसाचि नीळव्रज सगिरितरु क्ष्मानभोंतीं न माता. ॥४९॥
चित्तीं सम्यग् विचारी कुशल कुश, जलौकात्र जें त्यासि योजी
त्यांच्या देहीं जलौका प्रबळचि जडति कोण हो ! त्यांसि मोजी ?
होता नीरक्त पूर्वासहित शरचित क्ष्मातळीं बोळवीले,
कुष्टाचे चाळविले कर, यमसदना सर्वही बोळवीले. ॥५०॥
( पृथ्वी )
गुणग्रहणदक्ष ते म्हणति, ‘ साधु साधु; क्षमा,
क्षमादुहितृनंदना ! धरु तुझा तदा पक्ष मा ।
क्षमाबळपराक्रमद्युतियशोनिधी सर्वदा
वदान्यपति हो, सुखी चिर वसें सुहृत्सर्वदा ! ’ ॥५१॥
( अनुष्टुप् )
तदा कुशलवत्रस्त तें शिरे सैन्य काननीं, ।
यशस्तोम जनीं, त्यांचा गुण स्वर्नायिकाननीं ॥५२॥
( शार्दूलविक्रीडित )
एकाकीच तदा रघुद्वह रणीं क्रोधें उभा राहिला;
तद्भीत्याकुल भूमि कांपवि धृतस्वीयात्मभाराहिला; ।
नेला कीं चिरसंचितोत्तमयशस्तोम स्वयें पाहतां,
‘ युद्धीं मृत्यु बरा ’ म्हणे ‘ मुख नसे दुष्कीर्तिला वाहतां. ’ ॥५३॥
( वसंततिलका )
कालानलप्रभशरांसि गुणासि जोडी,
आकर्ण चापलतिकेप्रति राम ओढी, ।
बालद्वयावर कृपेसह शीघ्र सोडी,
तों त्यांस सानुज कुश स्मितवक्त्र तोडी. ॥५४॥
( आर्यागीति )
शिशुतें सत्वरतातें समर्पिला जों क्षुरप्र सत्वर तातें, ।
तों तो होय चतुर्धा; बाणांशीं वाढली अशी ते स्पर्धा ॥५५॥
( शार्दूलविक्रीडित )
प्रावृण्मेघ जसा नगावरि जळें वर्षें तसा रामही
बाणांच्या निकरें, तदा थरथरां कांपे असारा मही. ।
तों ते सस्मितवक्त्र कांडततिचे निर्मूनियां तूकडे,
भूमीतें किति अर्पुनी, उडविती, व्योमस्थ देवाकडे. ॥५६॥
( गीतिवृत्त )
निर्धनलोकमनोरथकृपणालयशारदांबुदासारे ।
त्याचि रणीम निष्फळ शर रामाचे जाहले तदा सारे. ॥५७॥
रण जनविस्मयकारक दारकयुग्मासवें असें रामें ।
केलें खरतरशरवरधरकरपद्में गुणाचयारामें ॥५८॥
( द्रुतविलंबित )
स्वबळतुल्य तदीय बळाप्रति स्वहृदयीं समजे धरणीपती. ।
शर तयांसि शिवे नचि आपुला, तदिषुगोचर तो बहु तापला. ॥५९॥
( स्रग्धरा )
त्या दोघांच्या मुखातें जंव निजनयनें, युद्ध होतांहि, पहए,
तों तों कांतास्म्रुतीतें घडिघडि हृदयीं जानकीजानि लाहे. ।
त्या रंध्रीं त्या सतीचा स्मर, अणिक तिचे पुत्रही चापपाणी,
एकामेंचि प्रतापें रघुपतिस उरीं ताडिती क्रूरबाणीं ॥६०॥
( पंचचामर )
उरःक्षतक्षरत्प्रभूतरक्तसिक्तविग्रह,
प्रमीलिताक्ष तो, जगत्क्षयीं जसा रवि ग्रह. ।
सुराश्रुबिंधुसंततीसह क्षणें रथीं पडे,
सखेद लेख देखतां, पमोद त्यांसही घडे. ॥६१॥
प्रचंड पंक्तितुंडदंडदक्षबाहुदंड हा
किशोरकांडखंडितस्वपिंड जाहला अहा ! ।
सतोक देवलोकही सशोक तो करी क्षमा -
तळीं निजाश्रुवृष्टिला, तृणोद्भवास जे क्षमा - ॥६२॥
( मंदाक्रांता )
ऐसा जेव्हां रघुतिलक तो गुंतला मोहपाशीं,
आले हर्षें कुशलव तदा जानकीजानिपाशीं. ।
घेती त्यांतें उतरुनि करें मेदिनीमंडलातें,
केयूरातें कटकपदकस्रड्मणीकुंडलातें. ॥६३॥
( स्रग्धरा )
कैकेयीसूनुमेघध्वनिरिपुलवणद्वेषणाद्यंगभूषा,
त्यांतें घेती करांहीं अभय, हरि जया दीपकांतीसि, पूषा. ।
मूर्च्छाग्रस्त प्रतापी भट, इतरहि जे सैनिक च्छिन्न काय,
दोघे तद्भूषणांचें हरण करिति, तद्भारनाशार्थ काय ! ॥६४॥
( शार्दूलविक्रीडित )
आहे हा रथ हेमरत्नखचित ब्रध्रप्रभापुंजसा,
जावें यावरतें बसोनि लव हें बोले स्वतोषें जसा, ।
तेव्हां सानुज तो चढे कुश सुखें श्रीराघवस्यंदनीं,
त्यांची दृष्टि जनांसि त्या निरखितां गेली मरुन्नंदनीं. ॥६५॥
श्रीमन्मारुति जांबवान् प्लवग हे दोघेचि तेथें कृती
होते कृत्रिममूर्च्छित क्षितितळीं अत्यंत रम्याकृती. ।
त्यांतें पाहुनियां म्हणे लव ‘ कुशा ! या वानरांतें घरा
या नेऊं, अवलोकितांचि जननी होईल हृष्टांतरा. ’ ॥६६॥
( स्रग्धरा )
ऐसें ऐकोनि कानें पवनसुत म्हणे ‘ जांबवन् ! मृत्यु आला,
तूतें, मातें धरूनि प्रबळबळ लवें नेइल स्वालयाला. ।
मूर्च्छाप्रस्तात्म रामप्रभृति मृततसे पाडिले बाळकांहीं,
झांकावें लोचनांतें दृढ जयद नसे आपणा काळ कांहीं. ॥६७॥
( शार्दूलविक्रीडित )
युद्धातें करितां महाबळ शिशू संहारितील क्षणें,
मच्चित्तीं त्रिजगज्जयार्हचि असे हे भासती लक्षणें. ।
जातील स्वगृहासि घेउनि, तरी संदिग्ध वाटे जिणें;
आजि क्ष्मातनयासमीप घडतें पंचत्व शस्त्राविणें ’ ॥६८॥
( स्रग्धरा )
ऐसें बोले उपांशु श्वसनसुत मग क्षिप्र तो स्तब्ध जाला,
दोघांतें न्यावयाला लव लवकरि तो त्या स्थळालागिं आला; ।
स्थापूनि स्यंदनांतीं प्रबळ शिशु सुखें पर्णशाळेशि गेले,
सीतपादांबुजातें नमन करुनियां प्रांजळी नम्र ठेले. ॥६९॥
( गीतिवृत्त )
पुत्रांतेंहि न हृदयीं आनंदातेंहि ते धरी सुमती,
करुणामृतासि केवळ न, वर्षली अश्रुवारिलाहि सती. ॥७०॥
चिर आलिंगुनि पुत्रद्वयास सोडी श्रमासही सीता, ।
सुततनुगतरिपुशस्त्रव्रणावलोकप्रहर्षिताभीता. ॥७१॥
( स्रग्धरा )
सांगे सीतेसि तेव्हां लव, ‘ जननि ! कुशें फारसें युद्ध केलें,
याच्या त्रासें रिपूचें बहु बळ यमुनाबंधुगेहासि गेलें. ।
या वीरें राम तोही प्रबळ परि रणीं जिंकिला बाणजाळें,
हीं त्यांचीं भूषणें, हा रथवरहि पहा, थोर आश्चर्य झालें ! ॥७२॥
( उपजाति )
त्वत्कौतुकार्थ प्लवगद्वयातें मी आणिलें, तूं अवलोक यांते. ।
तुझ्या कृपेनेंचि खळ क्षयाला नेऊनि, आलों कुशळ क्षयाला ॥७३॥
( अनुष्टुप् )
एवं ऐकोनि पाहे, तों वोळखे मारुतीस ती. ।
दुसरा जांबवान् वृद्ध हें जाणें सुमती सती. ॥७४॥
( गीतिवृत्त )
सीता म्हणे लवाला, ‘ रणीं प्लवंगांस सोड जा बाला ! ।
मज पाहुनि हे मानी होतील प्राणहीन, हें मानीं. ’ ॥७५॥
( उपजाति )
ऐकोनि ऐसें, मग त्या लवानें रणीं हरींतें त्यजिलें लवानें. ।
झाली सुखी ते बहु भूमीकन्या धन्या, वदान्या, जगदेकमान्या ॥७६॥
( शिखरिणी )
अशा काळीं आला वरुणसदनापासुन मुनी,
तयातें हे दोघे कथिति निजवृत्तासि नमुनी. ।
तदा आलिंगूनि क्षिति दुहितृपुत्रांप्रति, करें
शिरीं स्पर्शे हर्षें सुरविटपिगर्वक्षयकरें. ॥७७॥
( शार्दूलविक्रीडित )
गंगातीरपवित्रनामशमनप्रेमाश्रुनीरव्रजें
वर्षें त्यांवर तो दयाब्धि भगवान् वाल्मीकि नेत्रांबुजें. ।
ज्यातें जे कथिली धनुःश्रुति, तिचें साफल्य जालें खरें,
त्या विप्रें सुतनिर्विशेषचि वनीं तीं पाळिलीं लेंकरें ॥७८॥
( वसंततिलका )
श्रीरामसैन्यहि बळें मथिलें करांहीं,
संपादिला जय सुदुर्लभ लेंकरांहीं.
आश्चर्ययुक्त मुनि, पावुनियां सुखातें,
पाहे अतृप्त हृदयें क्षण तन्मुखांतें. ॥७९॥
( स्रग्धरा )
ऐसा शिष्यचरित्रतुष्ट भगवान् वाल्मीकि बोले मुखें,
‘ या युष्मच्चरितेंकरूनि हृदयीं मी पूर्ण झालों सुखें. ।
केला मत्प्रिय राम मूर्च्छित तुम्हीं, हें दुःख झालें मला,
दावा तें स्थळ, जेथ सैन्य वधिलें; आतांचि पाहूं, चला. ॥८०॥
राजा राम गुणाभिराम, तुमचा तो तात की; त्याप्रति
दावा नेउनियां मला, उचित हें केलें नसे संप्रति. ’ ।
विप्रव्रातसमेत तो मग उठे, बोलोनि ऐसें, मुनी
सीतानंदन दाविती मग तया स्थानासि त्या नेउनी ॥८१॥
( शार्दूलविक्रीडित )
जेव्हां सानुज मूर्च्छित क्षितितळीं श्रीराम तो देखिला,
त्रैलोक्याभर बाळविक्रम वनीं वाल्मीकिनें लेखिला, ।
तेव्हां तो मुनि मंत्रपूत सलिलें सार्वासि शिंपीं करें
सर्वक्लेशहरें, जनेप्सितकरें, पुण्यामृत्तैकाकरें. ॥८२॥
( इंद्रव्रशा )
सुप्तोत्थिताचेपरि सर्व ऊठले, वंदूनि वाल्मीकिपदासि भेटले. ।
कृपाकटाक्षें यमपाश तोडिले म्हणोनि रामें निजहस्त जोडिले. ॥८३॥
( स्रग्धरा )
तेव्हा वाल्मीकिनामा मुनि धरि हृदयीं सानुजाला अजाला,
आनंदाश्रुप्रवाहें भिजवि, बहु तदा तोष झाला द्विजाला. ।
बोले तो लेखकांताप्रति धिषण जसा, कीं पिता स्वत्मजाला,
ऐसाची तूं त्रिलोकीं, गुरु कवि, भगवान्, वंदिति सर्व ज्याला. ॥८४॥
रामा ! लोकापवादें निजयुवति वनीं त्यागिली त्वां ससत्वा,
ते म्यां यूपार्थ रानीं विचरत असतां देखिली शुद्धसत्वा, ।
तूझी कांता प्रशांता, अजतनुजवधू मैथिलाची सुता, हे
जाणूनि, त्राण केलें तनुवचनमनें आजपर्यंत, पाहे ॥८५॥
तीचे हे पुत्र दोघे कुशलव, तुजसी निर्मिलें युद्ध यांहीं,
पुत्रच्छात्रादिकांहीं जित बुध धरिती दुःख चित्तीं न कांहीं. ।
आतां त्वद्विप्रयोगप्रखरशिखिशिखातप्तदेहा अदोषा
न्यावी हर्षें गृहातें, धरुनि मम वचें, हे सपुत्रा स्वयोषा ’ ॥८६॥
( अमृतध्वनि )
ऐसें वदोनि, मग शिष्यासि पाठवुनि सीतेसि आणवि मुनी,
स्वीकारिली सतनया राघवें त्वरित, वाल्मीकिलागि नमुनी. ।
हर्षे तदा कुसुमवर्षें अमर्त्य जन वर्षे रघूत्तमशिरीं,
प्रेमाश्रुशीकर सुरांचेंहि भूमिवरि, नीहारतेंवि शिशिरीं. ॥८७॥
गाती नभीं मुदित गंधर्व, नाचति तदा अपसरोगण सुखें,
ब्रम्हेंद्ररुद्रमुख देख प्रहृष्ट रघुनाथासि वर्णिति मुखें. ।
भेर्रीप्रभृत्यखिलवाद्यस्वनेंकरुनि भैरीची होय जगती;
वाहे सुशीत, मृदु, गंधाढ्य वात; बहु लाहे प्रमोद मग ती. ॥८८॥
( स्रग्धरा )
एवं झाला प्रमोद प्रचुरतर तदा विष्टपीं; अंगनेला
अंगीकारोनि , रामें मग निज नगरा सर्षि वाल्मीकि नेला. ।
भेरीवीणामृदंगप्रभृति बहुविधें वाजलीं मंजु वाद्यें,
जेव्हां केलें प्रयाण प्रमुदितहृदयें त्या जगत्संभवाद्यें ॥८९॥
साकेतालागिं रामें गमन करुनियां यज्ञ संपूर्ण केला.
झालें स्वांतीं प्रमोदप्रचुर अवभृथस्नान भूकन्यकेला. ।
दासीदासाश्वरत्नक्षितिकनकरथेंभेंद्रधेन्वंशुकांहीं.
झाले तृप्त द्विजाति, स्वमनि न गणिती द्रव्यनाथासि कांहीं. ॥९०॥
उपसंहार
( शार्दूलविक्रीडित )
एवं रावणपीडितत्रिभुवनक्लेशक्षयाकारणें
ब्रह्मप्रार्थितपादपद्मयुगुलें, देवें जगत्कारणें, ।
मायामानुषविग्रहें, कृतमहारक्षःसमिन्निग्रहें,
सर्वांतें सदनुग्रहें सुखविलें निर्दोषलीलागृहें ॥९१॥
ऐशीं नित्य सुखाकरें, सुचरितें, एनस्तमोहस्करें,
जीं केलीं करुणाकरें, रघुवरें, भक्तापदातस्करें ।
त्यांमध्यें लव वर्णिला प्रमुदितस्वांतें मयूरेश्वरें
लोकीं नाहिंच आर्य कार्य दुसरें या विग्रहें नश्वरें. ॥९२॥
( उद्गीतिछंद )
जैमिनिकृतभारतगतहयमेधीं कुशलवाख्यानीं, ।
तेरावा अध्याय श्रवण करावा रसज्ञमुख्यांनीं ॥९३॥