( शार्दूलविक्रीडित )
त्या सेनेसि विलोकितां कुश म्हणे, आतां करावें कसें ?
आहे फारचि दुष्प्रधर्ष बळ हें, देवाधिपाचें जसें.’ ।
तेव्हां त्यासि कथी लव, ‘ क्षितितळीं या सैनिकांचीं शिरें
कोहाळ्यापरी फोडिजे फटफटां क्रूरें शरें, कीं करें. ॥१॥
नाहीं योग्य तुझ्या बळासि बळ हें कुंभोद्भवाला जसा
अंभोराशि, तसा तृणासम गमे सेन्यौघ मन्मानसा. ।
मातें चाप नसे, रणांत रिपुनें केलें शरें तूकडे. ’
पाहे, बोलुनियां असें, लव तदा तो लोकबंधूकडे. ॥२॥
( गीतिवृत्त )
त्रिभुवनरक्षादक्षा ! नमितों तुजला, स्वभक्तसुरवृक्षा ! ।
तिमिरद्विपहर्यक्षा ! तेजःपक्षा ! क्षातामरविपक्षा ! ॥३॥
स्वजनभवांबुधितरणे ! त्रिजगद्भूषणमहामणे ! तरणे ! ।
दे मज चापास रणीं, दाविन दुष्टासि काळगृहसरणी ’ ॥४॥
( शार्दूलविक्रीडित )
एवं संस्तवितां, दिनेश भगवान् श्रीमान् दयासागर
स्नेहें दे शिशुला धनुव्रततिला देखावया संगर ।
हातीं घेउनियां, म्हणे लव कुशा, ‘ स्वोत्कर्ष मातें गमे.
श्रीविघ्नेश्वर ! ते नमः, कुरु कृपां, निर्विघ्नमस्त्वद्य मे ! ’ ॥५॥
जैसे वायुविभावसू कुश लव क्रोधें तसे धावले.
विस्फारूनि धनुर्लतासि, सहसा सैन्यांतरीं पावले ।
केलें मर्दन, मांसकर्दमपटें रक्तस्रवंती किती
तेथें वाहति; पाहती भट, मनीं कल्पांतसे तर्किती. ॥६॥
( स्रग्धरा )
सेनानी लक्ष्मणाचा प्रकटबळयशा काळजिन्नाम, त्याला
संगें घेऊनि, रामानुज घनरवहा तो पुढें शीघ्र झाला. ।
दोघेही बाणजाळेंकरुनि मग रणीं रोधिती त्या कुशाला,
तेव्हां एका लवानें द्रुततर वरिली सर्वसेना विशाला. ॥७॥
( शिखरिणी )
फिरे सेनेमध्यें अभय, विपिनांतों अनळासा,
जयाची दोर्वल्ली सतत शरदानीं अनळसा. !
रथेभांच्या पंक्ती तुरगवरपादासहिता,
लवातें वेष्टूनी, बहुत वसती वीरविहिता. ॥८॥
( पृथ्वी )
कितेक रथ मोडिले, ध्वज कितेकही तोडिले,
कितेक शर सोडिले, गज कितेकही झोडिले, ।
असंख्य भट तोडिले, यमपुराकडे धाडिले,
शिरःप्रकर पाडिले, बहुत यापरी नाडिले. ॥९॥
( शार्दूलविक्रीडित )
तेव्हां शूलगदापरश्वसिलताशक्त्यृष्टिचक्रायुधें
कुंतप्रासभुशुंडिमुद्गरमहापाशादि नानाविधें ।
सर्वांहीं त्यजिलीं लवावर; तदा तो त्यांस खंडी शरें,
मूर्खांच्या वचनासि पंडित जसा निःशंक युक्त्युत्तरें ॥१०॥
( स्रग्धरा )
तेव्हां मागें फिरोनि, क्षततनु लव तो अग्रजालागिं पाहे,
तों, तो कोठें दिसेना, मग निज हृदयीं फार चिंतेसि वाहे, ।
प्रावण्मेघापरी ते सुभट भटशिरीं वर्षती आयुधांहीं,
जैसा भूमिध्र, तैसा तिळभरि न चळे; वर्णिला तैं बुधांहीं. ॥११॥
( शार्दूलविक्रीडित )
शत्रुन्घें लवणासुर प्रमथिला पूर्वींच, तन्मातुळ
आला जो रुधिराक्षनाम शरण श्रीरामभीत्याकुळ, ।
त्या दुष्टें हरिलें शरासन, तदा वेगें रिघे तो नभीं,
तेव्हां तो लव, चक्र घेउनि, उडे व्योमीं तयाला न भी. ॥१२॥
( गीतिवृत्त )
जैसा आमिषलुब्ध श्येन व्योमीं शिरे, तसा शोभे. ।
चक्रें शक्रानुजसा, देवस्त्रीवृंद पाहतां लोभे. ॥१३॥
( शार्दूलविक्रीडित )
भूमीसंस्थित सर्व वीरवर, ‘ हा माथा पडेल स्वयें,
किंवा काय करील तेंचि न कळे ’ हे बोलती तद्भयें. ।
कोणी भ्याड रथाबुडींच दडती, कोणी मृतेभांतरीं,
कोणी ऊर्ध्व शरांसि योजिति, किती चर्मासि घेती शिरीं. ॥१४॥
मंत्र्याचेहि जितश्रमादि सुत जे दिक्स्यांदनाच्या दहा,
त्यांहीं चक्र विखंडितां रुडनळें जाला लवाचा दहा. ।
सारेही पडती सुतीक्ष्ण परिघें संताडितां ते तसे,
अंतीं नास्तिक वेदबाह्य नरकीं दुःशास्त्रवेत्ते जसे. ॥१५॥
तेव्हां तो रुधिराक्ष राक्षस गदा हाणी लवाच्या शिरीं.
मूर्च्छा पावुनियां उठे पुनरपि क्रोधें मुहूर्तांतरीं.
केशीं त्यासि धरूनि, मस्तक तदा कुंतायुधानें हरी.
भास्वद्दत्त धनू करीं धरुनियां, गर्जे हरीच्या परी. ॥१६॥
( आर्यागीति )
पुनरपि तो लव तेव्हां क्षणमात्रें वेष्टिला महासेनांहीं. ।
गर्भापासुनि बाहिर पडल्यावर जेंवि जंतु अज्ञानांहीं. ॥१७॥
( उपजाति )
तृणेंधनाच्छादित आश्रयाश जसा तयाचाचि करी विनाश, ।
सेनागणीं वेष्टित तो शरांही मर्दी तयालाचि भयंकरांहीं ॥१८॥
( उद्गीतिछंद )
जैमिनिकृतभारतगतहयमेधीं कुशलवाख्यानीं, ।
अध्याय दहावा हा श्रवण करावा रसज्ञमुख्यांनीं ॥१९॥