कुशलवोपाख्यान - अध्याय पहिला

‘आर्या’ वृतातील प्रचंड काव्यरचनेबद्दल प्रसिद्ध असलेले मराठी कवी मोरोपंत हे पुराण मोठे छान सांगत.


( गीतिछंद )
गणपति, गुरु, गुह, गौरी, गिरीश, गंगा, गुणाढ्य गीर्देवी ॥
यांसि नमुनि, रामात्मज कुशलवचरितामृतासि संसेवी. ॥१॥

( शार्दूलविक्रीडित )
श्रीमद्राघव तो त्यजी वसुमतीकन्येसि निंदाभयें;
वाल्मीकिद्विजनायकाश्रमपदीं राहे महीजा स्वयें ।
तेजस्वी यम जन्मले सुत, तिहीं यज्ञाश्व नेला, तथा
युद्धीं तातहि जिंकिला; अशि वरा गावी मनोज्ञा कथा ॥२॥

( मंदाक्रांता )
तातादेशेंकरुनि विपिनीं राघवें वास केला,
तेथें चौर्यें दशमुख हरी मेदिनीकन्यकेला ।
सुग्रीवाख्य प्लवगपतिशीं सख्य साधूनि, वाळी
त्याचा भ्राता वधुनि विशिखें, दाविली त्या दिवाळी ॥३॥

( शार्दूलविक्रीडित )
पश्चाद्राम दशाननासि ससुतामात्यासि युद्धीं वधी,
दे लंकेसि बिभीषणाप्रति धरा सिंधर्कसोमावधी ।
स्वाहेशास्यविशुद्धमैथिलसुतासंयुक्त रम्याकृती,
साकेतासि सुपुष्पकीं मग सुखें बैसोनि आला कृती ॥४॥
जे सुग्रीवबिभीषणांगदमरुत्पुत्रादि आले, सुखें
सेनासंयुत जानकीपतिगुणस्तोमासि गाती मुखें ।
श्रीरामगमनप्रहृष्ट सकळायोध्या पुढें धांवली,
पानीयासि जशी तृषार्त सुरभी तैशी क्षणें पावली ॥५॥
गेल्यापासुनियां चतुर्दश समां कष्टीचि जाला वनीं,
सीतालक्षणयुक्त राघव, असें भावूनियां तो मनीं ।
सक्ष्मादेव, कृपापयोधर, तदा त्याचा पुरोधा मुनी,
आशीर्वादमिषें सुधेसि भगवान् वर्षे पुढें जाउनी ॥६॥
कैकेयीसुत, वल्कलाजिनजटाधारी, प्रधानासवें
सामोरा रघुनायकाप्रति पुढें गेला प्रभूतोत्सवें ।
जाला सन्नत राघवेंद्रचरणीं, रामें समालिंगिला;
तठोमाश्रुकणें भिजे, रघुवरें जेव्हां शिरीं हुंगिला ॥७॥
जाला तो नगरीं प्रविष्ट सकळक्ष्मानाथचूडामणी,
लोकांच्या हृदयांबुजीं बहु दिसां आनंदही त्या क्षणीं; ।
कौशल्या घननादशत्रुजननी, कांतारवासप्रदा
कैकेयीहि, रघूत्तमें नमुनियां केली प्रमोदास्पदा ॥८॥
कौशल्या मालिना, कृशा, स्तवनयाश्लेषें तदा हर्षली,
आनंदाश्रुकरूनि, राघवशिरीं हुंगूनियां, वर्षली ।
पूर्वीच्या परि विघ्न होईल, असें मानूनियां क्षिप्र ती,
कोणातेंहि न पूसतां करि जणों राज्याभिषेकाप्रती. ॥९॥
‘ हा अच्छेद्य, अभेद्य नंदन तुझा अक्लेद्य, वत्से ! ’ असें
मातें संकथिती वसिष्ठमुख हे भूदेव, मिथ्या कसे ? ।
जालासि प्रखरेषुभिन्नतनु तूं, बोलोनि ऐसें, करें
स्पर्शे, लक्ष्मण राम हीं स्वहृदयीं आलिंगुनी लेंकरें, ॥१०॥
श्वश्रूतें क्षितिजा नमी, तंव तिहीं आलिंगिली आदरें,
कौशल्या मग ते वदे, सुचुबुकीं स्पर्शोनि तीतें करें, ।
‘ रामाशीं चिरकाळ सर्वसुखसंपूर्णा स्वपल्या रहा,
पातिव्रत्यबळें तुझ्याचि तरला दुःखाब्धिला वत्स हा. ॥११॥
वत्से ! तूं रघुवंशभूषणमणी, स्तुत्या सतींच्या गणीं,
चारित्र्यासि तुझ्या सुरेंद्ररमणी गाती सुखें स्वांगणीं, ।
त्वत्कोपेंचि दशास्य दुर्मति कथाशेष त्रिलोकांत या
झाला, कोण असा असे त्रिभुवनीं मारावयाला तया ’ ? ॥१२॥

( स्रग्धरा )
कौशल्या यापरी ते प्रमुदित - हृदया बोलिली मैथिलीला,
वर्णी हर्षेकरूनी स्फुरदधरमुखें रामसौमित्रिलीला. ।
केला राज्याभिषेक क्षितिसुरतिलकें श्रीवसिष्ठें स्वतोषें,
विप्रांचे संघ तेव्हां परम शुभदिनीं गर्जती मंत्रघोषें. ॥१३॥

( शार्दूलविक्रीडित )
राज्यातें अज तो करीत असतां, जाले दरिद्री धनी,
रोगी रोगविहीन, बालिश रत ज्ञानाचिया साधनीं, ।
गाई त्या घटदोहनी, बहुरसा सस्यावृता मेदिनी,
यूपस्तंभसमन्विताहि सरयू लोकत्रयाल्हादिनी. ॥१४॥
दिव्यास्वादुफळाढ्य भूरूह, लता संशोभती पुष्पिता;
आत्मापत्यमृतिप्रति क्षितिपळीं पाहे न मातापिता; ।
वंध्या लब्धबहुप्रजा सकलही वर्ण स्वधर्मीं रत,
श्रीरामाख्यसुधेसि कर्णचषकें पीती सुखें संतत. ॥१५॥
पापातें न वसावया स्थळ दिसे, कोण श्रमाला पुसे ?
नाहीं आश्रय यास्तव क्षितितळीं चिंता सचिंता बसे, ।
विघ्नातें बहु विघ्न होति, रुसली भीति त्रिलोकीं बरी;
साकेतीं रघुनाथ सानुजसुहृद राज्यासि जेव्हां करी. ॥१६॥

( उद्गीतिछंद )
जैमिनिकृतभारतगतहयमेधीं कुशलवाख्यानीं, ।
हा पहिला अध्याय श्रवण करावा रसज्ञमुख्यांनीं. ॥१७॥

N/A

References : N/A
Last Updated : November 17, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP