कुशलवोपाख्यान - अध्याय आठवा

‘आर्या’ वृतातील प्रचंड काव्यरचनेबद्दल प्रसिद्ध असलेले मराठी कवी मोरोपंत हे पुराण मोठे छान सांगत.


( स्रग्धरा )
एवं जैसें निघालें कटक, धरुनियां मूर्च्छितातें लवातें,
तेव्हां त्याचे सखे ते त्यजिति उपवनीं लोचनांभोलवांतें. ।
हस्तापासोन पुस्ते गळति सटसटां, धीर गेला लयाला,
जाती सांगावयाला मग बहुत जवें भूमिकन्यालयाला. ॥१॥

( लीलाकर दंडक )
म्हणति पृथुक, जानकि ! स्वाश्रमीं मेध्य दूर्वांकुरासक्त
कश्चिन् नृपाचा हरी पाहिला त्वत्सुतें दिव्यलीलाकरें ।
‘ नरवरहय हा, सख्या ! यासि बांधों नको, ’ यापरी वारिला
फार आम्ही, परी [ तन् ] निषेधासि सोडूनियां बद्ध केला करें. ।
प्रबळ कटक तेथ आलें, तदा युद्ध आरंभिलें,
बाणनिर्भिन्नपत्यश्वमातंगवीरांगरक्तोदकें निर्मिल्या वाहिनी.
तदुपरि भट एक झाला पुढें; तच्छरें मूर्च्छिताते लवातें
निजस्यंदनीं स्थापुनी, स्वात्मदेशाकडे जातसे वाहिनी. ’ ॥२॥

( वसंततिलका )
हें वर्तमान परिसोनि म्हणे क्षमाजा,
‘ गेला असेल जरि धर्म वृथा न माजा, ।
यावत् कुशागमन होय, लव स्वहातें,
तावत् करू नतिस न स्वपितामहातें. ॥३॥

( पुष्पिताग्रा )
अकरुणभटबाणभिन्नवत्सा ! तुजविण मी तशि, गौ जशी विवत्सा. ।
करुनि खळजनासवें कलीला, अहह ! मला त्यजिलेंसि एकलीला ॥४॥

( वसंततिलका )
वांछा धरुनि अन्यमहीपवाहीं,
कां त्यागिली स्वतनु दुःखनदीप्रवाहीं ? ।
वाहूं किती तरि असे बहु दुःखराशी ?
कां दैवसृष्ट मजला न वधी खरासी ? ॥५॥

( शार्दूलविक्रीडित )
झालीं जीं उटजांगणीं उमटलीं आतांचि जातां पदें,
तीं माझ्या हृदयास हय ! गमतीं अत्यंत संतापदें,
नानावृक्षलतालवालरचनाकौशल्य हें भाजितें
मचित्ताप्रति, जें करें विरचिलें त्वां पद्मशोभाजितें ॥६॥

( आर्यागीतिवृत्त )
उडुपनिभ त्वद्वदन, स्मृतिगत होऊनियां मुला ! तापवितें. ।
होइल केव्हां शोकक्षितिध्रभेदार्ह जेंवि धरिता पवितें ? ॥७॥

( गीतिवृत्त )
वाल्मीकि जवळ नाहीं, कुशही गेला असे अरण्यातें, ।
सैनिकचोरापासुनि सोडवितें कोण लवहिरण्यातें ? ॥८॥

( उपजाति )
धरूनियां यापरि शोकदीक्षा, सीता करी पुत्रपथप्रतीक्षा. ।
वत्सें वियुक्ता जसि होय गृष्टी, तीहूनि ते कोटिगुणेंहि कष्टी. ॥९॥
अशांत घेऊन समित्फळांला, आला वनाहूनि कुश क्षयाला.
समीप येऊन, मनांत तर्क आला करी मातृदृगब्जअर्क ॥१०॥

( उपेंद्रवज्रा )
‘ सकाळ येतां मजशीं दवाला, निवारिलें म्या स्वमुखें लवाला, ।
पुढें नये क्रुद्ध म्हणोनि काय ? कधीं न कीं आजि असें निकाय. ’ ॥११॥

( अनुष्टुप् )
वनीं, देहीं दुर्निमित्यें पाहिलीं, त्यांसि आठवी, ।
चिंतानदी विवेकार्ककिरणौघेंचि आतवी. ॥१२॥

( उपेंद्रवज्रा )
निजोटजांतीं द्विडिभांकुशानें विलोकिली भूमिसुता कुशानें ।
स्वपुत्रतापोन्मथितांगवल्ली, जशी अरण्याग्निविमृष्ट मल्ली. ॥१३॥

( वियोगिनी )
‘ वद रोदनमोहहेतुला, उचिता अंब ! दशा न हे तुला. ।
तव दुःख न नाशिलें जरि, तरि लोकीं व्यासुताचि साजिरी. ॥१५॥
अहह ! श्रम जाहला तुला, न दिसे यासि जगत्त्रयीं तुला. ।
तव वक्त्रनिशीन कोमला, मग तें जीवितही नको मला. ॥१६॥

( उपजाति )
वाल्मीकिपादांबुजयुग्मलीन, त्वदंघ्रिसेवाकमलिन्यलीन, ।
कोठें असे तो लव ? सांग, मी न विलोकिला वेदपयोधिमीन ’ ॥१७॥

( हरिणी )
तदुपरि म्हणे सीता, स्पर्शोनि हृत्करपल्लवें,
‘ तुरग धरिला कोणा एका धरापतिचा लवें, ।
समरसमयीं त्यांहीं वक्षःस्थलीं दृढ भेदिला,
धरुनि नगरा नेला, दुःखक्षमाध्र मला दिला. ॥१८॥
सदय, भगवान्, श्रीमान्, वाल्मीकिही जवळि नसे.
तुजविण कुशा ! आतां त्राता जनीं न दुजा दिसे. ।
मम भुज नको छेदुं दैवा ! त्यजीं बहुकोप हा;
अहह ! करुणापांगें मातें सकृत् तरि तूं पहा. ’ ॥१९॥

( अनुष्टुप् )
प्रलापबीज सीतेच्या मुखें आकर्णितां असें, ।
म्हणे कुश, ‘ स्वस्थ चित्तें, मातः ! स्वसदनीं असें. ॥२०॥

( स्रग्धरा )
त्यातें होऊत शक्रप्रभृतिसुर रणीं साह्य माते ! तथापि
दुष्टातें आहवीं त्या मम निशित शर व्यापितील प्रतापी. ।
सिंहासीं काय कोल्हे करितिल समर ? व्यर्थ चिंता तुला हे.
जिंकूनि त्वत्सुतातें कवण जयधन ब्रह्मगोळांत लाहे ? ॥२१॥

( पुष्पिताग्रा )
जननि ! मज निषंग, चाप, वर्म, त्वरित समर्प किरीट खङ्ग, चर्म. ।
लव लवकरिच स्वआश्रमातें तव सुत आणिल; तूं त्यज श्रमातें. ’ ॥२२॥

( पंचचामर )
असे स्वसूनुचे सुशब्द ऐकतां महासती
त्यजूनि शोक, लोचनें पुसुनि, होय हांसती. ।
किरीट, सन्निषंग, चर्म, वर्म, खङ्ग, चाप ती
कुशासि दे, दशाननासि मर्दिता जिचा पति. ॥२३॥

( मंदाक्रांता )
‘ हा जातों मी ’ म्हणुनि, नमुनी क्ष्मासुतेच्या पदातें
जाता झाला रिपुदळ वधूं, ओष्ट चावीत दातें, ।
जैसा सिंहीतनय विदळूं जाय मातंगजातें;
बाहू ताडी भयरहित तो, क्रूरही भीति ज्यातें. ॥२४॥

( मयूरीवृत्त )
तो जाऊनि श्रीरामाची सेना, पाहे, चित्तीं भी त्याला भासेना. ।
बोले त्यासी वीरश्रीचा कांत, क्ष्मापुत्रीचा संहर्ता आकांत. ॥२५॥
‘ उभे, उभे, ’ हो भट ! युद्धकामी आलों असें हो ! कुशनाम हा मी. ।
मला पराभूत जरी कराल, ममानुजातासि तरी हराल. ॥२६॥

( उपगीति )
पृथ्वीवरि चापातें, स्वशिरातें तर्‍हि [ तुम्ही ] लववा, ।
तुम्हीं द्रुत सोडावा निज जीवितकाम, तो लव वा. ॥२८॥

( स्रग्धरा )
एवं प्रोद्दाम शब्द ग्रहण करुनियां, त्यांस तो काळ वाटे.
उद्यद्वायूत्थधूलिव्रज तिमिरसम व्योमगर्भात दाटे. ।
वातोद्धूत प्रभूत ध्वज खणखणती, शीर्ण झाल्या पताका.
झालें शांत क्षणें तें रज, मग शमनीं र्‍हेषितें आणि हाका. ॥२९॥
तेव्हां शत्रुघ्न सेनापतिस मग म्हणे, ‘ तूं निवारीं कुशातें,
सेनाव्यूहास मीही दृढतर रचितों, आज रक्षू यशातें. ’ ।
तें ऐकूनी वदे तो बळरमण, ‘शिशो ! तिष्ट तिष्टे’ति गर्वें,
अर्पी दिग्बाण, ज्यांचीं खरतर वदनें आततें सर्व पर्वें. ॥३०॥
तेव्हां त्याच्या शरांचें कुशळ कुश शरें भूतळीं चूर्ण पाडी,
पार्ष्णिग्राहाश्वसूतांप्रति भटपति तो मृत्युलोकासी धाडी. ।
चापांगत्राणतूणासिरथरवर्किरीटादिकांतें स्वबाणें
छेदूनि, क्रोधरक्तेक्षण मग घडवी त्यासि नाकासि जाणें. ॥३१॥

( शार्दूलविक्रीडित )
‘ हा ! हा ! ’ शब्द तदा बळीं प्रगटला तद्बंधु नागाभिध,
क्रोधोग्रेक्षण हस्तिमस्तकग तो आला द्विषत्सन्निध. ।
क्षेपी सक्तिस, तत्क्षणीं कुश करी तीचें शरें वारण,
क्रूरेषुप्रकरें करें करुनियां छिन्नांघ्रि तद्वारण. ॥३२॥
नानापासुनि नाग भूमि उतरे, हस्तीं गदेला धरी;
तीतें तत्करपंकजासहित तो पाडी शरें भूवरी. ।
त्याचा वामहि चक्रयुक् शय शरें तोडी तदा, तो पदें.
येतां धावत, पादयुग्महि हरि बाणद्वयें तापदें. ॥३३॥
धूलीधूसरशोणितार्द्रतनु तो चित्तांत कोपें कढे,
धांवे, राहु जसा रविप्रति, तसा क्ष्मायोनिपुत्राकडे. ।
तद्वीर्यें बहु तोषला कुश करी स्वांतीं तयाचा स्तव,
छेदी तीव्र शरें शिरासि, मखहा घे मुंड मालेस्तव. ॥३४॥
एवं मारुनियां तयासि, मग तो शत्रुघ्नसेनेप्रती
छेदी तीक्ष्ण शरें, तदा म्हणति ते, ‘ कल्पांत कीं संप्रति ! ’
पादाताश्वतुरंगपर्वतनिभेभ क्ष्मातळीं लोळती,
सद्यःशोणितपानतत्परशिवागृध्राननें पोळती. ॥३५॥
जे होते मदमत्तवारणशिरीं जे अश्वपृष्टावरी,
जे कार्तस्वररत्नभूषितरथीं जैसे विमानांतरीं, ।
तद्बाणाहत ते अधःपतनभाक् झाले महासंगरीं
जो कन्याद्रविणें स्वजीवन करी तत्पूर्वजांचे परी. ॥३६॥

( शालिनी )
एवं त्यांचें सैन्य तेव्हां कुशानें, केलें तीक्ष्ण द्विण्महेभांकुशानें, ।
लोकामध्यें वेदशास्त्रोक्तधर्में होती क्षीण क्षिप्र तैसीं कुकर्में. ॥३७॥

( उद्गीतिछंद )
जैमिनिकृतभारतगतहयमेधीं कुशलवाख्यानीं, ।
अध्याय आठवा हा श्रवण करावा कवींद्रमुख्यांनीं ॥३८॥

N/A

References : N/A
Last Updated : November 17, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP