( शार्दूलविक्रीडित )
श्रीमद्भाघव दीक्षित, स्वहृदयीं चिंता करूनी वदे;
‘ रे ! वत्सा ! भरता ! स्वदर्शन मला सौमित्र तो कां न दे ? ।
ज्यांहीं जिंकुनि पाडिला त्वदनुज, क्रत्वश्व नेला असे,
त्याच्या सर्व यशासि घेऊनि, कसा आला न ? बोला, कसे ? ॥१॥
सौमित्रिप्रति संगरीं निरखितां देवादिही धाकती,
तेथें मंदमती किती द्विजशिशू युद्धीं कसे ठाकती ? ।
जन्योद्युक्तमना मनानुज जधीं होईल; तेव्हा तया
सांगा कोण शरण्य या त्रिभुवनीं नाशावया तद्भया ? ॥२॥
( गीतिवृत्त )
कोपें प्रवर्ततां द्विजशिशुमथनीं शौर्यसिंधु मद्भ्राता, ।
सुतनाशाकुलचित्ता प्रार्थी कोणासि तेथ तन्माता ? ॥३॥
धर्मगृहापासुनिहि स्वबळें आणील बंधुरत्नातें ।
चंडपराक्रममंडित न चुकेल प्राज्ञ तो प्रयत्नातें. ॥४॥
मम यज्ञविघ्नकारक दारक कोठूनि पावले आजी ? ।
करुनि अवज्ञा माझी, वाजी धरिला, विनिर्मिता आजी. ॥५॥
अंगद सुगळ, बिभीषण, पवनज, यांतें कसें अनादरिलें ? ।
फणिफणमणी न जाणुनि, मदश्वरत्न द्विजात्मजें हरिलें. ॥६॥
अन्यमदीय सुहृज्जन त्यांचाहि मनांत न धरिला लेखा, ।
धाकहि ज्यास न कांहीं द्विजसुतचेष्टित विचित्र हे देखा. ॥७॥
सौमित्रिप्रति माझ्या संदेशातें सुशीघ्र नेति असे, ।
आणावे चार भले, भरता ! अस्वस्थ चित्त आजि असे. ॥८॥
तत्सेवालाभरतें आणविलें पांच दूत तेव्हां भरतें ।
बोले हृतभूभर, तें ऐका येतें कृपांबुनिधिला भरते. ॥९॥
द्विजबाळ मोहनास्त्रें मोहुनि जीवंत लक्ष्मणा ! धरणें, ।
रिपुसिंधुनिमग्नयशःशरीर, यातें असें समुद्धरणें. ॥१०॥
तूं शूर, वीरसेवितरथ, स्वधृतिमान्, धनुःश्रुतिज्ञ, कृती; ।
अपराधी, परि रक्षीं, विरथ, निराश्रय, शिशू पशुप्रकृती. ॥११॥
जे परबाळावरती करिति दया, त्यांसि कीर्तिमा वरिती; ।
बहुपुत्रपौत्रलालनसुखभाजन संसृतीसि मधु करिती. ॥१२॥
सीतावदनांबुजनिभ पुत्रानन मी विलोकिलें नाहीं, ।
संसृतिनदीप्रवाहीं मज कांहीं सुख न लाभलें पाहीं. ॥१३॥
कां विपिनीं ? कोण पिता, माता ? स्थळ कोण हें विचारावें. ।
आणावें मजपाशीं, त्यांचें भय सर्वही निवारावें. ’ ॥१४॥
एवं सांगत असतां क्षतजोक्षितगात्र वीर बहु आले, ।
वेपथुकंपभयाकुळ रामातें नमुनियां सुखी झाले. ॥१५॥
( शार्दूविक्रीडित )
तेव्हां ते म्हणती, ‘ जगत्त्रयपते ! सौमित्रि गेल्यावरी
शत्रुघ्नासि विलोकितां खवळला, युद्धासि कोपें करी, ।
त्या काळीं मग त्या रणीं द्विजसुतें सेनापती मर्दिला,
देवासह्य परंतु लक्ष्मण कृती तो मोहहस्तीं दिला. ॥१६॥
जेणें राक्षस लक्षकोटि वधिले, शौर्यब्धि, वीराग्रणी,
जेणें इंद्रजिदप्रधृष्य मथिला सर्वास्त्रवेत्ता रणीं, ।
गाती ज्याप्रति मर्त्यदेवरमणी, जो धीरचूडामणी
तो विप्रात्मजबाणभिन्न पडला संमूढ युद्धांगणीं. ॥१७॥
हस्त्यश्वोष्ट्रपदातिरक्ततटिनी क्षोणीतळीं वाहिल्या ।
ज्यांचीं दुर्गम मांसकर्दमतटें; नाहीं अशा पाहिल्या. ।
शक्रच्छिन्नगरुद्गिरिव्रज तसे नागेंन्द्र संचेष्टती. ।
कोणाचे करपाद भिन्न, किति हृच्छल्यें बहू कष्टती. ॥१८॥
नानावीरशिरःसरोजनिकराकीर्णक्षमेच्या तळीं
गृध्रश्येनशिवासकृत्प्रजबकस्तोमींहि वाढे कळीं. ।
एवं संक्षय पावलें बळ रणीं, क्षोणींद्रचूडामणी ।
दीक्षा सोडुनि धांव कीर्तिरमणी नेली, असें तूं गणी ’ ॥१९॥
( पृथ्वी )
असें वचन ऐकतां परम मोह तो पावला,
पडे क्षितिवरी भ्रमें, भरत तत्क्षणीं धांवला, ।
धरी उचलुनी, द्विजव्रज तदाशिषा योजिती,
जळें कितिक शिंपिति, व्यजनमारुतें वीजिती. ॥२०॥
( गीतिवृत्त )
मग उघडुनि नेत्रांतें करुणावचनेंकरूनि राम म्हणे, ।
‘ हा वत्स ! अहह लक्ष्मण ! हा बंधो ! प्रवीरमूर्धमणे ! ’ ॥२१॥
भरत म्हणे, ‘ रघुनाथा ! धर्मच्युत शोच्य, हा तसा नोहे. ।
तच्छोकें न समुचिता विकळ दशा, धैर्यरत्नसानो ! हे. ॥२२॥
( शार्दूलविक्रीडित )
निर्दोषा त्यजिली वनीं जनकजा तेव्हांचि वीराग्रणी
झाला पंकिल लक्ष्मण, स्वतनुला तो भार ऐसें गणी, ।
तो सारा कुशचंडकांडतटिनीमध्यें स्वयें धूतला,
झाला पूतचि; तद्यशें धवळिलें स्वर्गासि, या भूतळा. ॥२३॥
मीही होइन पूत, राम ! वरदा ! आज्ञा मला आज दे. ’
कैकेयीस्तु रामपादनत तो, प्रार्थूनि, एवं वदे; ।
‘ जा वत्सा ! उठ; कोण तो कुश असे ? जाण स्वसेनेसि घे. ’
ऐसें राघववाक्य ऐकुनि तदा तोही प्रहर्षें निघे ॥२४॥
‘ तातादेशकरें वनें बहुतरें ! म्या सेविलीं भीकरें,
त्वांही चीरजटाधरें मम वचः केलें खरें आदरें,
जीवंत द्विजलेंकरें धरुनियां जा आण, वत्सा ! बरें. ’
ऐसा भूमिसुरावरें भरत तो आज्ञापिला उत्तरें. ॥२५॥
( गीतिवृत्त )
ऐकूनियां सत्वरतें भरतें तो प्रार्थिला सुसस्वर, तें. ।
‘ बळमथनकुशळ खळ ते कसे धरावे ? न मानस त्वरतें. ॥२६॥
दोघे बाळ काळकराळ कवण ते ? न तूजला कळती, ।
जाण असेल मारुति कीं अंगद, सचिव नीतिमान् सुमती. ’ ॥२७॥
अंगद म्हणे, ‘ वनीं त्या अपवादें त्यागिली सती सुमती, ।
त्वद्गोत्रोद्भव झाले तीच्या ठायीं शिशू असे गमती. ’ ॥२८॥
मग जांबवदंगदनलनीलपवननंदनादि वीरमणी ।
रमणीयवेषभूषित निघती क्षम सर्व विष्टपाक्रमणीं. ॥२९॥
नरवानरसंकुल बल भूमिव्योमासि वेष्टुनी चाले, ।
भारार्त शेषमस्तक हाले, मग भूमिकंप बहु झाले. ॥३०॥
क्षरती घन हे मानुनि, मुग्धाजन फार कौतुकासि करी. ॥३१॥
गणिकास्पर्शे होतें क्षीण यश; पुण्यपुंजही जळती;
म्हणुनि जणों बहुभुक्ता क्षितिला धर्मज्ञ हरि न आतळती. ॥३२॥
( शार्दूलविक्रीडित )
चापी रुक्मरथी, प्रचंडमुसली, कांडी, कृपाणी, गदी,
हारी, कीतिक कुंडली, सुकवची, चर्मी, किरीटांगदी, ।
देवांच्या परि शोभती भट, चलत्क्षोणिध्र तैसे रदी,
झाल्या त्या कटकें तदा क्षितितळीं नामैकशेषा नदी. ॥३३॥
स्वर्णाचे ध्वज अंबरीं झळकती दानोदकें वर्षती
हस्ती गर्जति, धूळिचे व्रज घन व्योमांतरीं दाटती,
वर्षा मानुनियां शिखी बहुसुखी कांतांसवें नाचती. ॥३४॥
( स्रग्धरा )
ऐसा सेनेसमेत त्वरित भरत तो जाय बंधुद्वयातें
रक्षायातें, प्रतापें कुशल कुशलवालागिं जिंकावयातें. ।
भेरीध्वानें सुरांला बधिर करुनियां युद्धयज्ञक्षमेला
पावे, जेथें सुमित्रासुतभटजनही कोटि, कीं लक्ष, मेला. ॥३५॥
कोठें अंगुलिहस्तपादरदनत्वड्मूर्धजांत्रें, शिरें;
कोठें अर्ध कलेवरें, गलदसृक्पूरें महाभीकरें; ।
कोठें कुंडलनिष्कहारकटकें त्रुठ्यत्किरीटांगदें;
ऐसें तेथ धरातळीं निरखिलें रामानुजें सांगदें. ॥३६॥
त्या स्थानीं लक्ष्मणाला सलवणरिपुला शोधितां क्षिप्र गेला,
बोले वातात्मजातें भरत, निरखुनि क्रूर रक्तापगेला, ।
सीताशुद्ध्यर्थ पूर्वीं क्रमुनि जलधिला, तुष्ट केलें अजाला,
तैसा या सिंधुलाही तर, मज सुखवीं, शोध रामानुजांला. ’ ॥३७॥
‘ सिंधूतें तरलों तधीं अभिमुखी होती ’ म्हणे, ‘ ती सती. ’
ते झालीच पराड्मुखी, लघु नदी हे दुस्तरा दिसती. ।
ईतें लंघुनि पाहतों परि बरें आतां त्वदाज्ञेस्तव. ’
ऐसें बोलुनियां उडें, करि मुखें सीताधवाचा स्तव. ॥३८॥
सीतात्यागजकोपतापविकला धात्री, जणों तीप्रती
होते प्रार्थित ते ‘ क्षमस्व ’ म्हणुनी दोघेहि बंधू कृती. ।
तेथें जाउनि, त्यांसि पाहुनि, म्हणे ‘ चित्रा विधीची कृती, ’
हातीं घेउनि, मरुति मग उडे स्वर्णक्षमाध्राकृती. ॥३९॥
दोघेही भरतासि नेउनि तदा वातात्मजें दाविलें,
ते दूरस्थित वीरवानर, तिहीं निर्जीवसे भाविएल,
लंकेशात्मजशक्तिनें हृदय तें जेव्हां रणीं भेदिलें,
तेव्हां मोह असा नसेचि, मरणापासूनिही भें दिलें. ॥४०॥
( वसंततिलका )
उद्दंडचंडकुशकांडविखंडितोरा
तो रामबंधु धरि आकृति फार घोरा ।
वक्षःक्षतक्षतजसिक्ततनू सशोक
लोकव्रजासि करि पंक्तिरथात्मतोक. ॥४१॥
( स्रग्धरा )
त्याच्या संरक्षणार्थ द्रुत भरत तदा स्थापुनीयां चमूला,
कोपवेशें म्हणे, ‘ हे रघूपतिभजनध्वस्तसंसारमूला ! ।
रक्षोवृंदैककाला ! सततगतिसुता ! बाळकातें विलोकीं;
या काळीं त्या खळाला स्वकृतफळ घडो भानुमत्पुत्रलोकीं. ’ ॥४२॥
( गीतिवृत्त )
ऐसें वदोनि जेव्हां ताडविला दुंदुभि स्वयें भरतें, ।
आज्ञाविधूदयीं त्या आलें सेस्नापयोधिला भरतें. ॥४३॥
( उद्गीतिछंद )
जैमिनिकृतभारतगतहयमेधीं कुशलवाख्यानीं ।
बारावा अध्याय श्रवण करावा रसज्ञमुख्यांनीं ॥४४॥