देवादिकांचे कौल
प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.
अशा तर्हेची वचने आणखी देता येतील, परंतु ती तशी देण्याची जरूर नाही. तात्पर्य सांगण्याचे मिळून इतकेच की, शकुनांचा पगडा लोकांच्या मनावर बसल्यामुळे अगोदर जुळून आलेले लग्नसंबंधही असल्या क्षुल्लक सबबींनी मोडल्याची उदाहरणे केव्हा केव्हा घडतात. काही प्रसंगी तर यावरही ताण होऊन देवादिकांना नुसता कौल लावून पडत्या फ़ळाची आज्ञा या न्यायाने विवाहादी कार्ये जुळून येतात, व ज्योतिष, सामुद्रिक व शकुन ही तिन्ही शास्त्रे बिचारी हार खाऊन बाजूस सरून बसण्याची पाळी येते. ज्योतिषादी शास्त्रे जात्या खरीखोटी कशीही असली, तरी त्यांचा बाणा मिरविणार्यांचे अंगी विद्येचा थोडाबहुत गंध तरी असतो; परंतु आता सांगितल्याप्रमाणे नुसत्या कौलावरच भागण्याची जेथे पाळी येते, तेथे विद्येची भानगड यत्किंचितही न पडता निव्वळ ठोंब्ये आडाणी असे पुजारी, गुरव, भोप्ये, अंगात देव आणणार्या बाया, इत्यादी दर्जाचे लोकही साक्षात परमेश्वराच्या वतीने सनदी वकील बनून देवाच्या मेहनतीच्या उत्पन्नाचे व यशाचे आपण स्वत:च धनी बनतात.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP