संस्कृतात या विषयांचा उल्लेख अनेक ग्रंथात अनेक ठिकाणी झाला आहे, व यासाठी एका अर्थी त्या लेखांचा संग्रह या ठिकाणी करणे अगत्याचे म्हणता येईल, परंतु या लेखात सर्वत्र पारिभाषिक संज्ञांचाच बहुधा उपयोग जास्ती करण्यात आला आहे, यामुळे ज्योतिष विषयाची सामान्य प्रक्रिया माहीत असल्याशिवाय त्या पारिभाषेक संज्ञा घेऊन केलेल्या भाषान्तराचा उपयोग त्या विषयाच्या ज्ञात्या मनुष्याशिवाय इतर कोणास व्हावा तसा होणे अशक्य आहे, यासाठी मूळ ग्रंथातील वचने व त्यांचे अर्थ न लिहिता, व प्रत्येक प्रसंगी परिस्थिती ओळखून शास्त्रातील वचनांची संगती व्यवहारत: करून दाखविण्याची जबाबदारी ज्योतिषवेत्त्या लोकांवरच राहिली पाहिजे हे नमूद करून, कन्या पाहण्याच्या वेळी जेवढ्या गोष्टींच्या संबंधाने खात्री करून घेणे अवश्य मानिले जाते, तेवढ्या गोष्टी मात्र येथे नमूद करणे अधिक सोईचे होईल.
( अ ) पत्रिकेचा खरेखोटेपणा : विवाह्य कन्येची पत्रिका मागवून ती पत्रिका खरी असल्याची खातरी करून घेणे, लग्नाच्या कामात जुळवाजुळवी करून लालचीने अगर विशेष घराण्याशी संबंध जुळवून आणण्याच्या हेतूने, खर्या पत्रिकांच्या ऐवजी बनावट पत्रिकाही पुढे करितात असे अनेक प्रसंगी घडते. यासाठी सूचनेदाखल ही गोष्ट येथे लिहिणे अगत्याचे आहे.
( आ ) निर्विघ्नता योग : विवाह जुळून आला असता अगर त्याच्या विधीस आरंभ होऊन विवाहकृत्ये चालू असताच मध्यंतरी एखादे वेळी लग्न मोडते, यासाठी पत्रिकेवरून अगर प्रश्नलग्नावरून, अशा प्रकारचा काही योग आहे अगर कसे हे पाहणे.
( इ ) वैधव्ययोग : विवाह होऊन वधू आपल्या पतीच्या कुलात आल्यावर तिच्या पतीस अल्प काळातच मृत्यू येतो, व ती बालविधवा होऊ शकते; यासाठी अशा प्रकारचे योग आहेत अगर नाहीत याची खात्री करून घेणे.
( ई ) सासरच्या इतर मनुष्यांस नडण्याजोगा पायगुण : विवाहित वधू पतीस नडली नाही, तथापि तिचा पायगुण सासू, सासरा, दीर इत्यादिकांस नडतो, म्हणजे त्यांच्या प्राणांस अपाय घडतो, अगर इतर प्रकारच्या आपत्तींत पडण्याची त्यांजवर पाळी येते, व ती या वधूच्या दोषामुळे आली अशी लोकांची समजूत होते, यासाठी अशाविषयीची योग्य चौकशी करणे. वधूचे जन्म मूळ, ज्येष्ठा व आश्लेषा या नक्षत्रांच्या विशेष पादावर झाले असता आता लिहिलेले प्रकार होऊ शकतात असा ज्योतिषशास्त्राचा सिद्धान्त आहे.
( उ ) वर्णकूट : वरापेक्षा वधू जन्मकाळाच्या राशींवरून उच्च वर्णाची असल्यास त्यापासून पतीस मृत्यू येतो. यासाठी ती समान वर्णाची अगर कनिष्ठ वर्णाची असावी. या ठिकाणी ‘ वर्ण ’ शब्दाचा अर्थ ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, व शूद्र असा असून प्रत्येक वर्णाच्या राशी पुढीलप्रमाणे सांगितल्या आहेत :-
( क ) ब्राह्मण : मीन, वृश्चिक, व कर्क.
( ख ) क्षत्रिय : मेष, सिंह, व धनू.
( ग ) वैश्य : वृषभ, कन्या, व मकर.
( घ ) शूद्र : मिथून, तूळ, व कुंभ.
वर्णांची स्थिती योग्य असल्याची खात्री करून घेणे यास ‘ वर्णकूट पाहणे ’ असे म्हणतात.
( ऊ ) वश्यकूट : स्त्री पुरुषास वश्य असावी, अगर स्त्रीचे वर्चस्व पुरुषावर न चालेल अशी ती असावी. याची परीक्षा जन्मराशीवरून करावयाची असते. बारा राशींपैकी मिथून, कन्या व तूळ या राशी पुरुष असल्याचे शास्त्राने मानिले आहे, व त्या राशींस सिंह राशीशिवाय इतर राशी वश्य असतात. तसेच सिंह राशीला एक वृश्चिक राशी मात्र वश्य असत नाही, व इतर सर्व राशी वश्य असतात. दैवज्ञमनोहर ग्रंथात ही वचने आली आहेत, त्यात ( १ ) सख्य, ( २ ) वैर, आणि
सख्यं वैरं च भक्ष्यं च वश्यमाहुस्त्रिधा बुधा: ॥
वैरे भक्षगुणाभावो द्वयो: सख्ये गुणद्वयं ॥
वश्यवैरे गुणस्त्वेको वश्यभक्ष्ये गुणोधिक: ॥
( ३ ) भक्ष्य असे वश्याचे तीन प्रकार सांगितले असून, वैराच्या अंगी भक्ष्याचा गुण नाही, परंतु या दोहोत सख्याची भर पडली असता तिची योग्यता दुप्पट समजावी; तसेच वैराया योग्यतेच्या मानाने भक्ष्याची योग्यता अधिक आहे असेही सांगितले आहे. वधू आणि वर यांच्या जन्मराशीवरून वराच्या राशीपेक्षा वधूची जन्मराशी प्रबळ असल्यास ती पतीच्या अकल्याणास अगर मृत्यूसही कारण होऊ शकते. वश्याच्या या प्रकारच्या मेळास ‘ वश्यकूट ’ ही संज्ञा आहे.
( ऋ ) ताराकूट अथवा दिनकूट : वर्णकूट आणि वश्यकूट या दोहोंचा संबंध वधू वराच्या जन्मकाळाच्या राशींशी आहेअ. ताराकूट नावाच्या कूटात तो उभयतांच्या जन्मनक्षत्रांवरून जाणावयाचा असतो. अश्विनी, भरणी, इत्यादी नक्षत्रे व्यवहारात २७ मानितात, परंतु त्यांत ‘ अभिजित् ’ नावाच्या एका निराळ्या नक्षत्राची भर घातली असता नक्षत्राची संख्या २८ होते. या नक्षत्राच्या पोटी वधू आणि वर यांच्या एकमेकांच्या नक्षत्रापासून दुसर्याच्या नक्षत्रापावेतो असलेली संख्यांची अंतम्रे मोजून मोठ्या अंतरास ९ या संख्येने भागावे, बाकी राहील तिजवरून विवाहाची भावी फ़ळे शुभ अगर अशुभ आहेत हे जाणावे, असा ज्योति:शास्त्रकारांचा आशय आहे. ३, ५, ७ ही बाकी अशुभ, व २, ४, ६, ८ व ९ ही बाकी शुभ, मानिली आहे. या गणनेसंबंधाने निरनिराळ्या ज्योति:शास्त्रग्रंथांत आणखी विशेष गोष्टी पुष्कळ लिहिल्या आहेत. त्यांत विशेष महत्त्वाची गोष्ट आहे ती ही की, एकमेकांच्या नक्षत्रापासून एकमेकांची नक्षत्रे मोजिली असता येणारे नक्षत्र वरास अशुभ नसले पाहिजे. नक्षत्रास ‘ तारा ’ असेही म्हणतात, व ही नक्षत्रे दररोजच्या चंद्राच्या संबंधाने घेतली असतात, यासाठी त्यांच्या मेळास ‘ ताराकूट ’ अथवा ‘ दिनकूट ’ अशा संज्ञा शास्त्रकारांनी दिल्या आहेत.
( ॠ ) योनिकूट : शास्त्रग्रंथात आणखी एक निराळे कूट सांगितले आहे त्यास ‘ योनिकूट ’ असे म्हणतात. या कूटाचा संबंधही जन्मनक्षत्राशीच असतो. ‘ योनी ’ म्हणजे प्राण्यांची जाती, या अर्थाने २८ नक्षत्रांपैकी निरनिराळ्या नक्षत्रांच्या घोडा, रेडा, सिंह, हत्ती, बोकड, वानर, मुंगुस, साप, कुत्रा, मांजर व बैल या जाती आहेत, व कित्येक नक्षत्रास जाती मुळीच सांगितलेल्या नाहीत. जाती सांगितलेल्या नाहीत. त्यात कित्येक जातीचे परस्परांशी वैर असते, कित्येक एकत्र सख्याने राहू शकतात, व कित्येकांचे सख्य नसते त्याप्रमाणे वैरही नसते.
स्त्री काय किंवा पुरुष काय, प्रत्येकाची उत्पत्ती ज्या जन्मनक्षत्रावर झाली असेल, त्या नक्षत्राच्या जातीवरून उभयतांच्याही शास्त्रानुसार निरनिराळ्या योनी मानाव्या लागतात, व नक्षत्रास योनी नसेल तर उभयता स्त्री अगर पुरुष यांची गणना योनिरहित वर्गात करावी लागते. विवाहचर्चा करिताना उभयतांच्याही योनिकूटाची चौकशी करणे अगत्याचे असते. याचे फ़ळी अत्रिऋषीने पुढीलप्रमाणे सांगितली आहेत. ( १ ) उभयतांची योनी एकच असल्यास उत्तम, ( २ ) शुभभाव नसलेल्या योनी भिन्न भिन्न असल्यास त्यांचे फ़ळ मध्य, ( ३ ) शत्रुभाव असलेल्या योनी अर्थातच वाईट, व ( ४ ) योनी नसेल तर त्यापासून वियोगरूपी फ़ळ प्राप्त होणारे असते यासाठी तेही वाईटच समजावे.
( लृ ) ग्रहमैत्री : स्त्रीपुरुषांच्या जन्मकाळच्या ग्रहांवरून त्यांच्या ग्रहमैत्रीविषयी पाहावे लागते. प्रत्येक ग्रहासंबंधाने विचार करिताना त्याशी मित्रभावाने, शत्रुभावाने, अगर उदासीनपणाने म्हणजे मित्रही नव्हेत अगर शत्रुही नव्हेत अशा रीतीने, वागणारे ग्रह आहेत. उभयता वधूवरांचे ग्रह मित्रभावाने वागणारे असल्यास उत्तमच; तसे नसून उदासीन असले तर त्यांचे फ़ळ मध्यम; व शत्रू असल्यास मात्र मरण हे फ़ळ प्राप्त होणारे असते. दांपत्याच्या शत्रुमित्रतेचे किंवा एकमेकांशी समशत्रुत्वाचे फ़ळ अनुक्रमे कलह व विरह हे समजावे, असेही शास्त्रकारांनी सांगितले आहे. प्रत्येक ग्रहाचे मित्र व उदासीन कोण समजावयाचे हे पुढील कोष्टकात दाखविले आहे :
ग्रह मित्रग्रह शत्रुग्रह उदासीनग्रह
र. सो.मं.गु शु.श. बु.
सो. बु,र. ------ मं,गु,शु,श.
मं. र,सो,गु. बु. शु.श.
बु. र.शु. सो. मं.गु.श.
गु. र.सो.मं. बु.शु. ध.
शु. बु.श. र.सो. मं.गु.
श. बु.शु. र.सो.मं. गु.
र--रवी, सो--सोम, मं--मंगळ, बु--बुध,
गु--गुरू, शु--शुक्र, श--शनी
( ए ) गणकूट : जन्मनक्षत्रे अगर त्यांचे चरण यांवरून स्त्रीपुरुषांचे मनुष्यगण, देवगण व राक्षसगण शास्त्रकर्त्यांनी वर्णिले आहेत, व त्यांच्या मेळास ‘ गणकूट ’ अशी संज्ञा आहे. वधूवरे एकाच गणाची असणे हे उत्तम; एकाचा देवगण व एकाचा मनुष्यगण असला तरी वाईट नाही; मनुष्यगण एकाचा व राक्षसगण दुसर्याचा असे झाले असता ज्याचा मनुष्यगण त्याचा नाश ठेविलेलाच म्हणून समजावा; देवगण व राक्षसगण यांमध्ये भांडणतंटे नेहमी चालूच राहावयाचे, अशा प्रकारची शास्त्रात सांगितली आहेत. अर्थात कन्या पाहताना तिचा गण पुरुषास बाधक न होईल अशी खबरदारी घेणे इष्ट होय.
( ऐ ) राशिकूटाचे तीन प्रकार ‘ खडाष्टक ’ इत्यादी : ज्योति:शास्त्रात ‘ राशिकूट ’ म्हणून आणखी एका प्रकारचे निराळे कूट पाहण्याविषयां सांगितले असून या कूटाचे प्रकार तीन आहेत. ( १ ) पहिला प्रकार म्हणजे ‘ षट्काष्टम ’, म्हणजे ज्यास लोकव्यवहारात ‘ खडाष्टक ’ म्हणतात तो, व त्यापासून स्त्रीपुरुषांस मृत्यू प्राप्त होतो. या खडाष्टकात स्त्री आणि पुरुष यांच्या जन्मराशी एकीमेकींपासून सहाव्या व आठव्या असतात. जसे मेषराशीपासून सहावी राशी कन्या व आठवी राशी वृश्चिक ही होय. या संयोगापासून मृत्यू प्राप्त होतो. यासाठी व्यवहारात असा संयोग प्राय: टाळण्यात येतो. ( २ ) दुसर्या प्रकारात ‘ नवात्मज ’ म्हणजे एकमेकांच्या राशीपासून नववी व पाचवी राशी समजावयाची असून अशा संयोगाचे फ़ळ संततीचा नाश हे असते. ( ३ ) तिसर्या प्रकारात दोनदा बारावी राशी येत असल्याने तिला ‘ द्विर्द्वादश ’ ही संज्ञा आहे, व त्याचे फ़ळ निर्धनत्व हे होय. शास्त्रकर्त्यांनी प्रत्येक राशीचा एकेक स्वामी सांगितला आहे, त्यात स्त्रीपुरुषांच्या राशींवरून दुष्ट कूट उत्पन्न होत असले, तरी दोन्ही राशींचा स्वामी एकच असेल, तर त्यापुढे खडाष्टकादिकांचे काही चालत नाही, व खुशाल वाटेल तर विवाह करावा असेही वर्णिले आहे.
( ओ ) एक, मध्य व अंत्य नाड्या : जन्मनक्षत्रे व त्यांचे विशिष्ट भाग यांवरून वाईट नाडी या नावाचा आणखी एक प्रकार पाहावयाची आवश्यकता ज्योति:शास्त्रकारांनी वर्णिली आहे. नाड्या ( १ ) एकनाडी, ( २ ) मध्यानडी व ( ३ ) अंत्यनाडी, अशा तीन प्रकारच्या असून तिन्हीही वर्ज्य कराव्या असे त्यांचे मत आहे. दाक्षिणात्य मंडळात प्राय: पहिली नाडी मात्र पाहण्यात येते, व ती ‘ एकनाड ’ या संज्ञेने व्यवहारात ओळखिली जाते.