होरा अथवा फ़लज्योति:शास्त्र
प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.
होरा-ज्योतिषावरील ग्रंथात अगर त्यांवरील टीकांत कन्येची सर्वमान्य लक्षणे लिहिली आहेत, ती मागे कलम ११ येथे लिहिलेल्या मन्वादी वचनांस अनुसरून असल्यामुळे त्यांची पुनरुक्ती करण्याचे कारण नाही. कलम १७ येथे आश्वलायनाच्या मते मृत्पिंडावरून कन्येच्या परीक्षेची फ़ले सांगितली आहेत; त्यांत कन्या विवाहोत्तर कोणत्या गुणांची निघेल, तिजपासून संतती आणि संपत्ती प्राप्त होईल की नाही, व ती पतिघ्नी म्हणजे पतीचा घात करणारी अर्थात विधवा होणार आहे किंवा कसे, एवढ्याच गोष्टी जाणावयाच्या असल्याचे उघड दिसते. परंतु ज्योति:शास्त्राचा बोजा मिरविणार्या जोशी मंडळाच्या सांगण्याकडे लक्ष दिले असता, त्यांनी ज्या पावलेल्या कन्येच्या जन्मकाळावरून पत्रिका करावयाच्या, त्या पत्रिकांत निरनिराळे ग्रह, राशी इत्यादिकांची निरनिराळ्या प्रकारची परस्पर सापेक्ष स्थाने दर्शवावयाची; कन्या विशिष्ट प्रकारच्या जातींच्या मातापितरांपासून जन्मली असली तरी तिचा जन्मत: वर्ण कोणता मानावयाचा; ती झाल्यापासून ती आपल्या मातापितरांच्या अगर इतर बंधुवर्गांच्या नाशास कारणीभूत होणार आहे किंवा कसे; पतीच्या घरी गेल्यावर तिच्यापासून सासरा, सासू, दीर व पती यांच्या जिवास अपाय होणार आहे की काय; तिच्या पोटी राहिलेला गर्भ जिवंत बाहेर पडेल अगर मेलेला बाहेर पडेल; ती प्रसूत झाल्यास तिला स्त्री अगर पुरुष यांपैकी कोणत्या जागीचे अपत्य होईल, अगर तिच्या कपाळ अपत्ययोग मुळीच नाही; इत्यादी अनेक गोष्टींचे ज्ञान पत्रिकांवरून जोशीबोवांस आगाऊ समजते, इत्यादी प्रकारचा आव या ग्रंथांत पदोपदी दाखविला असल्याचेच दिसून येते. यावरून सूत्रकाळी ज्योति:शास्त्राचे जे काही महत्त्व मानण्यात येत असेल, त्यापेक्षा ते पुढे किती तरी पटींनी वाढून त्याच्या पूर्वस्वरूपात व हेतूंतही जमीन अस्मानाचे अंतर पडले असले पाहिजे असे दिसून आल्यावाचून राहणार नाही.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP