फ़लादेशासंबंधाने मतभेद
प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.
या कोष्टकात निरनिराळ्या शरीरावयवांची शुभाशुभ फ़ळे सांगितली आहेत, त्यांचा अनुभव स्त्रियांच्या आयुष्याच्या निरनिराळ्या भागाम्त येतो असे वराहमिहिराने या अध्यायाच्या शेवटी लिहिले आहे. फ़ळाची खरी प्रतीती पाहिजे असल्यास हरएक प्रसंगी सूक्ष्म दृष्टीनेच अवलोकन केले पाहिजे. हे अवलोकन वाजवी रीतीने पुरे ठरण्यास त्या त्या स्त्री - व्यक्तीच्या आयुर्मर्यादेचे भाग पाडिता आले पाहिजेत. सामान्य व्यवहारात तरी हे भाग पाडिता येणे अशक्य असते, व यामुळे प्रसंगी लिहिलेया फ़लदेशाप्रमाणे फ़ळाचा अनुभव न आला, तरी तेवढ्यावरून मूळ सामुद्रिक शास्त्रास दोष न देता कोणत्या तरी इतर सबबी पुढे आणून मनुष्य आपल्या मनाचे समाधान करून घेतो, असाच प्राय: सर्व प्रकार आहे.
कोष्टकात लिहिलेले शुभाशुभ फ़लादेश वराहमिहिराने लिहिले, ते त्याने स्वत: घेतलेल्या अगर त्याच्या वेळी सामान्यत: लोकश्रद्धेस पात्र झालेल्या अनुभवांवरोन लिहिले हे स्पष्टच आहे. या अनुभवांहून ज्यास निराळे अनुभव आले असतील त्यांच्या मते फ़लादेशात अंतर पडू शकेल, अगर वराहमिहिराने लिहिलेल्या शरीर चिन्हांहून आणखी निराळ्या चिन्हांहून फ़लादेश फ़िरविणेही कोणास अवश्य वाटेल हेही उघडच आहे.
याचे उदाहरण संस्कृत भाषेतील प्रसिद्ध कादंबरीकार दंडी कवी याच्या ‘ दशकुमारचरित ’ नावाच्या ग्रंथावरून स्पष्ट दिसून येण्याजोगे आहे. या ग्रंथाच्या ६ व्या उल्लासात एका शक्तिकुमार नावाच्या श्रीमंत सावकाराची कथा वर्णिली आहे; तीत प्रसंगाने सामुद्रिकशास्त्रानुसार स्त्रियांची लक्षणे वर्णिली आहेत. या लक्षणवर्णनात नाभिमंडलास म्हणजे बेंबीच्या प्रदेशास ‘ तनुतरमीषन्निम्नं गंभारं ’ म्हणजे फ़ार लहान, पोटाच्या काहीशा खालच्या भागाकडे असणारा व खोल ही विशेषणे दिली आहेत. वराहमिहिराच्या ग्रंथावरून स्त्रियांची बेंबी अंमळ खालच्या अंगास असावी असा बोध होत नाही; तसेच त्याच्या लेखावरून बेंबी मोठी असावी असे असता, दंडीच्या लिहिण्यात ती फ़ार लहान असावी, अशा प्रकारचे क्वचित् मतविरोधही दृष्टीस पडतात. अशा मतभेदांच्या फ़लादेशावर फ़ारशी भिस्त अगर श्रद्धा ठेवावयाचई नसली तरीदेखील हे मतभेद कळणे जरुरीचे वाटते, व यासाठी सामुद्रिकवर्ननापुरता दंडिकवीच्या लेखातील भाग भाषान्तरसुद्धा परिशिष्ट ( ब ) येथे उतरून घेतला आहे.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP