प्रल्हाद चरित्र - भाग १
संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.
दैत्य राजा थोर महा बळिवंत । जगीं तो विख्यात हिरण्यकश्यप ॥१॥
करुनियां तप तोषवी ब्रम्हाया । मागे वर तया दैत्यराव ॥२॥
वरदान मागे नसावा तो मृत्यु । कवणाचे हातु देव सुरां ॥३॥
गंधर्व मानव सकळांचें भय । नसावें तिळप्राय कवणेकाळीं ॥४॥
दिवसां ना रात्रीं तिथीं हो नक्षत्रीं । अंतरिक्ष क्षितीं मरण नसो ॥५॥
घरीं राजधानीं चोहटा मंदिरीं । कवणे ते स्थळीं मृत्यू नसो ॥६॥
ऐसा वर मागे दिला ब्रम्हा देवें । तपाचे स्वभावें तयेकाळीं ॥७॥
वर मागूनियां हरियलें पद । देवांसहित इंद्र स्थान भ्रष्ट ॥८॥
तयेकाळीं देव लपोनियां हरी । स्तविती अंतरीं पाहीं पाहीं ॥९॥
देवराया आली कृपा ते समयीं । म्हणे सर्व होई काळयोगें ॥१०॥
तयाचे उदरीं भक्तराजराणा । प्रल्हाद सुजाणा होईल तो ॥११॥
तयासी छळितां पावेल शासन । हाचि भरवसेन नेम आहे ॥१२॥
नामा म्हणे देवें केलें समाधान । आनंदें निमग्न आले स्थाना ॥१३॥
N/A
References : N/A
Last Updated : January 12, 2015
TOP