पूर्वमेघ - श्लोक १०६ ते ११०
महाकवी कालिदास यांच्या मेघदूत काव्याचे मराठी समवृत्त व समश्लोकी भाषांतर.
(१०६) वेळू जातां भरुनि पवनें वाजतो गोड पांवा ।
तैसा तेथें त्रिपुरजय कीं, किन्नरीं आळवावा ॥
तूझा चंडध्वनि गिरिदरीं ढोलसा जों घुमेल ।
संगीताचा मदनरिपुच्या संच तेथें जमेल ॥
(१०७) तीं तीं स्थानें बघुनि, तटिं तो आक्रमोनी नगेन्द्र ।
गांठावें त्वां भृगुप्तियशश्चिन्ह जें क्रौंचरन्ध्र ॥
तेणें जाया त्वरित, कलता डौल घे उत्तरेतें ।
श्रीविष्णूचा पदचि, बलिच्या सिद्ध कीं संयमातें ।
(१०८) सांधे ज्याचे निजभुजबळें रावणें सैल केले ।
जेणें कार्य त्रिदशवनितादर्पणाचें जहालें ॥
ज्याचीं शृंगें सुधवल, जणों हास्य कीं त्र्यंबकाचें ।
गोळा झालें प्रतिदिनिं; तया शैलिं तूं जावयाचें ॥
(१०९) अद्री तो कीं नवकरिरदच्छेदसा गौरवर्ण ।
मूर्ती त्याच्या तटिं तव दिसे कज्जलाच्या समान ॥
शोभा, डोळे भरुनि बघण्या योग्य, तेव्हां दिसेल ।
वाटे कीं हा हलधर उभा लेवुनी कृष्णचेल ॥
(११०) तत्र व्यक्तं द्दषदि चरणन्यासमर्धेन्दुमौले:
शश्वत्सिद्धैरुपचितबलिं भक्तिनम्र: परीया: ।
यस्मिन्द्दष्टे करणविगमादूर्ध्वमुद्धूतपापा:
संकल्पन्ते स्थिरगणपदप्राप्तये श्रद्दधाना: ॥
Last Updated : November 11, 2016
TOP