संत एकनाथ रचित - श्रीगणाधिपतयें नम: । श्री...

पूजा करण्याआधी मन प्रसन्न करण्यासाठी त्या त्या देवीदेवताचे स्तवन करावे.


श्रीगणाधिपतयें नम: । श्रीसरस्वत्यै नम: ।
ॐ नमो श्रीजनार्दना । नाहीं भवअवभावना ।
नदेखोनि मीतृंपणा । नमन श्रीचरणा सद्‌गुरुराया ॥१॥
नमन श्रीएकदंता । एकपणें तूंचि आतां ।
एकीं दाविसी अनेकता । परी एकात्मता न मोडे ॥२॥
तुजमाजी वासु चराचरा । म्हणोनि बोलिजे लंबोदरा ।
यालागीं सकळांचा सोयरा । साचोकारा तूं होसी ॥३॥
तुज देखे जो नरु । त्यासी सुखाचा होय संसारु ।
यालागीं विघ्नहरू । नामादरू तुज साजे ॥४॥
हरूष तें वदन गणराजा । चार्‍ही पुरुषार्थ त्याचि चार्‍ही भुजा ।
प्रकाशिया प्रकाशी वोजा । तो झळकत तुझा निजदंतु ॥५॥
पूर्वउत्तरमीमांसा दोनी । लागलिया श्रवणस्थानीं ।
नि:शब्दादि वाचा वदनीं । कर जोडूनि अभिया ॥६॥
एकेचि काळीं सकळ सृष्टी । आपुलेपणें देखत उठी ।
तेचि तुझी देखणी द्दष्टी । सुखसंतुष्टी विनायका ॥७॥
सुखाचें पेललें दोद । नाभीं आवर्तला आनंद ।
बोधाचा मिरवे नागबंध । दिसे सन्नद्ध साजिरा ॥८॥
शुद्धसत्वाचा शुक्लांबर । कासे कसिला मनोहर ।
सुवर्णवर्ण अलंकार । तुझेनि साचार शोभति ॥९॥
प्रकृतिपुरुष चरण दोनी । तळीं घालिशी बोजावुनी ।
तयांवरी सहजासनीं । पूर्णपणीं मिरवसी ॥१०॥
तुझी अणुमात्र झालिया भेटी । शोधिता विघ्न न पडे द्दष्टी ।
तोडिसी संसारफांसोटी । तोचि तुझे मुष्टी निजपरशु ॥११॥
भावें भक्त जो आवडे । त्याचें उगविसी भवसांकडें ।
वोढुनि काढिसी आपणाकडे । निजनिवाडें अंकुशें ॥१२॥
साच निरपेक्ष जो नि:शेख । त्याचें तूंचि वाढविसी सुख ।
देऊनि हरिखाचे मोदक । निवविसी देख निजहस्तें ॥१३॥
सूक्ष्माहूनि सूक्ष्म सान । त्यामाजी तुझें अधिष्ठान ।
यालागीं मूषकवाहन । नामाभिधान तुज साजे ॥१४॥
पाहतां नरू ना कुंजरू । व्यक्ताव्यक्तासी परू ।
ऐसा जाणोनि निविकारू । नमनादारू ग्रंथार्थीं ॥१५॥
ऐशिया जी गणनाथा । मीपणें कैंचा नमिता ।
अकर्ताचि जाहला कर्ता । ग्रंथकथाविस्तारा ॥१६॥

N/A

References : N/A
Last Updated : July 22, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP