पंढरीमाहात्म्य - अभंग २ ते ५
संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.
२.
पितयाची भक्ति पुंडलीकें केली । मात हे ऐकिली देव-रायें ॥१॥
नवलक्ष गोधनें पांचसें सवंगडे । रामकृष्ण पुढें चालताती ॥२॥
उठा चला जावों पुंडलीक पाहों । देव ह्मणे भावो पाहों त्याचा ॥३॥
गोकुळींहूनि देव पंढरपुरा पातला । त्वरित पावला वेणुनादीं ॥४॥
तेथूनि परतला बाळुवंटीं आला । तंव देव देखिला पुंडलीकें ॥५॥
देव उभा आहे पुंडलीक पाहे । चतुर्भूज स्वयें देखियेला ॥६॥
देखियेले हरि शंख चक करीं । आयुधें तीं चारी झळकती ॥७॥
चतुर्भूज मूर्ति देखियेली दृष्टी । पुंढलिकें ईट टाकियेली ॥८॥
इटेवरी उभा राहिला विठ्ठल । ठसा मिरवला त्रिभुवनीं ॥९॥
पुंडलिक भाव पाहूं आला देव । प्रसन्न झाले सर्व पुंडलीका ॥१०॥
वैकुंठ कैलास आणिल हा येथें । नामा म्हणे हित झालें आह्मां ॥११॥
३.
पंढरी हें क्षेत्र पावन पवित्र । महिमा विचित्र त्रिभुवनीं ॥१॥
पाहिलिया क्षणीं नासती पातकें । ऐसियासी तुके दुजें कोण ॥२॥
तृण पक्षि सर्व झाले ऋषि देव । पहाती वैभव पंढरीचें ॥३॥
भूमि ते राहिली विष्णु चक्रावरी । वैकुंठिंची परी सर्व येथें ॥४॥
टाळ नृत्य घोष पताकांचे भार । गर्जे भीमातीर सर्वकाळ ॥५॥
पुंडलिकासाठीं ठाके केशिराज । भेटीनें सायुज्य त्यास देती ॥६॥
स्रानें उद्धरती दर्शनें प्रशस्तीं । वाचे नाम कीर्ति विठोबाचा ॥७॥
नामा ह्मणे लाभ थोर हा जोडतो । पंढरिसी येतो प्राणी त्यासी ॥८॥
४.
पंढरीचें सुख आनंदें गर्जती । ध्यातसे पार्वती अखंडित ॥१॥
भीमातीरीं उभा सखा । पांडुरंग । देई अंगसंग अखंडित ॥२॥
उशीर झाला काय कामकाजा । यावें अधोक्षजा अनिरुद्धा ॥३॥
नामा ह्मणे पाहा पंढरी माझारी । केशीराज तारी एकसरा ॥४॥
५.
निंबलोण करूं पंढरीच्या सुखा । आणिक पुंडलीका मायबापा ॥१॥
पाहतां भूमंडळीं नाहीं आणिक रे । पांडुरंग क्षेत्रा वांचूनियां ॥२॥
अणिमादी सिद्धि भक्तांचिये द्वारीं । होऊनिं कामारि वोळंगती ॥३॥
परलोकीं येती परतोनी मागुसे । सर्व सुख तेथें भोगावया ॥४॥
मुक्तिपद कोणी नघे फुकासाठीं । हिंडे वाळवंटीं दीनरूप ॥५॥
भक्तांचिया पायां पडतो पुढतां पुढती । मज करा सांगती मोक्ष म्हणे ॥६॥
सत्य लोकीं जया सुखाची शिराणी । तें आम्हां अनुदिनीं प्रत्यक्ष दिसे ॥७॥
बंदी जन नामा उभा महा-द्वारीं । कीर्ति चराचरीं वर्णितसे ॥८॥
५.
पंढरीचें सुख जिहीं अनुभविलें । भावें अनुसरले विठठल- पायीं ॥१॥
काया वाचा मन रंगलें चरणीं । धरियेला मनीं पांडुरंग ॥२॥
नामाचेनि बळें उडविलीं साधनें । तोडीलीं बंधनें संसाराचीं ॥३॥
मुक्तिपद कोणी नेघे फुकासाठीं । हिंडे वाळवंटीं दीनरूप ॥४॥
योगियांचें घर रिघे काकुलती । आव्हेरीलें संतीं ह्मणोनियां ॥५॥
दोन्ही कर जोडूनि मोक्ष पाहे वास । ह्मणे होईन दास हरिदासाचा ॥६॥
तंव तुच्छ करोनि न पाहती दृष्टी । आपंगिलें शेवटीं ब्रह्मज्ञानें ॥७॥
अष्ट महा-सिद्धि ह्मणती कवण गति । यावें काकूलती कवणा आह्मी ॥८॥
मोक्ष मुक्ति जिहीं हाणितल्या पायीं । आमची ते सोयी काय धरिती ॥९॥
ऐसे भक्तराज देवां वंद्य झाले । ते एक राज्य केलें पुंडलीकें ॥१०॥
हर्षें निर्भर नामा नाचे महाद्वारीं । कीर्ति चराचरीं वर्णीतसे ॥११॥
N/A
References : N/A
Last Updated : April 23, 2014
TOP