स्फुट श्लोक - भागवत ३

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


नदीतिरें मनोहरें । जळें सुनीळ सुंदरें । डोहो कितेक मातले । अनंत जीव रातले ॥१॥
नदी खळाळिती बळें । जळे बहुत चंचळें । फुगे चळण वाकणें । निरें विराजती गुणें ॥२॥
धबाबिती धबाबिती । ध्वनी अनेक वाजती । बहुत रंग रंगसे । कितेक ते तरंगसे ॥३॥
अनेक भछ कछपे । कितेक सुंदरें रुपें । बहु जळीं चळाळिती । क्रिडाभरें उफाळिती ॥४॥
कदंब लंब लंबले । नदीतटाक बींबले । लता लता बहु लता । तरुसमोह पुरता ॥५॥
अनेक वृक्ष दाटले । निबीड दाट थाटले । बनें बनें बहु बनें । अचात दाटलीं घनें ॥६॥
फळें फुलें परोपरीं । कित्येक वोघ भीतरीं । विशाळ तें सरोवरें । विशेष तुंबलीं भरें ॥७॥
अनेक तुंब तुंबले । नदीतटाक बींबले । सुरंग रंग पद्मिनी । कितेक त्या कुमोदनी ॥८॥
बहुत बोलती खगें । चमक दाविती मृगें । कुसुमवाटिका भरें । विगुंतलीं मधुकरें ॥९॥
तुषारसा पळेंपळु । सुगंध वात सीतळु । कितेक वृक्ष डोलती । अनेक जीव बोलती ॥१०॥
कितेक शुक सारिका । मयोर बुल्बुलदिका । चकोर चक्रवाक तें । बदक थीर कीर ते ॥११॥
रसाळ उत्तमा किळा । ध्वनि कळोळ कोकिला । थिरावली मनोगती । मधुर उंच कुंजती ॥१२॥
ध्वनी बनीं विराजल्या । बहु प्रकार माजल्या । जनावरें मनोहरें । सुखें सुखावलीं भरें ॥१३॥
कपी कपी बहु कपी । उलाट धीत साक्षपी । लता अनेक औघडा । बळेंचि घालिती झडा ॥१४॥
कडाडिती खडाडिती । बहु तरु झडाडिती । कितेक झोंकती बळें । रसाळ भक्षिती फळें ॥१५॥
तयामधें श्रीरंग हा । त्रिभंगें ठाणसें पहा । अनेक रंग माजवी । सुरंगे वेणु वाजती ॥१६॥
ध्वनी विगुंतलीं मनें । बहु प्रकार गोधनें । श्रीकृष्णवेद लागला । मनें मनु सुखावला ॥१७॥
श्रीकृष्ण वेणु वाजवी । विधीभुगोळ गाजवी । नदीतटें  विराजवी । सुरेंद्र मान लाजवी ॥१८॥
विशेष गौळियां कुळीं । सुढाळ बाळ गोकुळीं । सुरंग रंग अंगना । विलासती व्रजांगना ॥१९॥
गुणें गुणीं गुणागळ्या । समर्थ योग्य मंडळ्या । वयें वयें परोपरीं । क्रिडाभरें  नदीतिरीं ॥२०॥
अनेक योषिता जनीं । रसाळ रम्य लोचनी । तयापरीस गोपिका । सुवर्णरंग तो फिका ॥२१॥
बहुत रंग रंगिणी । गुणाथिल्या कुरंगिणी । कळा प्रवीण नाटका । विशेष वेष नेटका ॥२२॥
उदार धीर गंभिरा। विळासिनी मनोहरा । अनर्घ्ये रत्नभूषणें । विराम कामदूषणें ॥२३॥
आळापिती परोपरीं । विणे मधुर किन्नरी । शरीर दिव्य दामिणी । संयोग धूर्त कामिणी ॥२४॥
आळाप होतसे मनें । वृजांगनांत गायनें । विणे बहुत वाजती । सुरंग रंग माजती ॥२५॥
रुपें रसाळ सुंदरी । विभूषणें परोपरीं । भरें तरुण बाळिका । सुढाळ रत्नमाळिका ॥२६॥
प्रवाळ नीळ माणिकें । बहु प्रकार आणिकें । सुवर्णरत्नभूषणें । सुरंग रंगली गुणें ॥२७॥
चिरें चिरें मनोहरें । बहु प्रकार सुंदरें । जडीत जाड भूषणें झणाणिती विभूषणें ॥२८॥
घवघवीतसी कळ । विशेष लंब कुंतळा । सुवास वास कस्तुरी । विळाससी कृशोदरी ॥२९॥
शरीरधात मातली । रतीपतीस रातली । तरुणता भरें भरु । श्रीरंग वेश नागरु ॥३०॥
कसी रसीकसी कळा । सडया सुबुक पातका । प्रसन्नमुख डोळसा । गुणें गुणी बहुवसा ॥३१॥
बहुत जाणती कळा । विशेष काम कुशळा । आवेश शुध वाणती । सुनैनबाण हाणती ॥३२॥
गुणे चतुर नेटक्या । तटतटीत कंचुक्या । सुढाळ कांति कोमळा । वधु चकीत वीकळा ॥३३॥
विलोकितां च निकटा । मृगेंद्र लाजवी कटा । गतीस हंस मंदले । मृगाक्षही विनोदले ॥३४॥
सुचीत्र चीत्र त्यापरी । कळा विचीत्र सुंदरी । चिरे आमोल्य त्या गुणें । उदास भास भूषणें ॥३५॥
विळासती उमा रमा । तया समान उत्तमा । पवीत्र शुध नीर्मळा । चटक दाविती कळा ॥३६॥
गुणी समस्त गायेका । चकीत आष्ट नायेका । सुरांसि सौख्यदायेका । मयंक तुळीतां फिका ॥३७॥
उलाळ ताळसी गती । कितेक त्या उफाळती । कल्लोळ लोळ घोळका । विळास रोळ गोळका ॥३८॥
विशेष गायनी कळा । रुपें रसाळ चंचळा । सुलक्षणा विलक्षणा । अतर्क तर्क तीक्षणा ॥३९॥
मधुर तंत वाजती । घनें घमंड गाजती । प्रबंद मंदले कवी । कल्लोळ ताल माजवी ॥४०॥
आनेक ताळ मृछना । कळेचिना गुणी जना । कळा विशेष दाविती । परस्परें चुकाविती ॥४१॥
थकीत होतसे मनु । चिरें लपेटिल्या तनु । गुणें शरीर दाटलें । विशेष बीक लोटकें ॥४२॥
सुरंग रंगलीं मनें । कुचंबताति सुमनें । सुवर्ण घातलें मुसे । बहुत स्वेद वीलसे ॥४३॥
आखंड रूप लोचनीं । चटक लागली मनीं । अनेक भाव भाविती । तमाळनीळ दाविती ॥४४॥
श्रीरंगरूप सांवळें । कटीं दुकूळ पींवळें । सुरंग रंगली तनु । विगुंतलें तनु मनु ॥४५॥
नटे नटांग नाटकु । ठकार ठाण तो ठकु । मनें मनास हालवी । सुरंग नेत्र पालवी ॥४६॥
मनेचि घेतसे चवी । विशाळ नेत्र पालवी । अनेक भाव दावितो । बळेंचि प्रीति लवितो ॥४७॥
विवंचितो मनें मनीं । विशेष लक्ष लोचनीं सवेव पाहातां रिझे । वधु खुणावितां खिजे ॥४८॥
वृजांगनामधें हरी । परोपरीं क्रीडा करी । मधुर वेणु वाजवी । तरंग रंग माजवी ॥४९॥
वसंतकाळ पातला । सुरंग रंग मातला । नुरेचि देहभावना । हिरोनि घेतलें मना ॥५०॥
बहुत विकळा वधु । हरी विशेष सावधु । क्रीडाकल्लोळ गाजला । सुरंग रंग माजला ॥५१॥
फुलें सुगंध साजिरीं । विशेष गुंफिली बरीं । परोपरीं मनोहरें । बहु सुगंध केशरें ॥५२॥
झबक झेल हाणती । मनें खुणेसि बाणती । तनें मनें धकाधके । वधु चकीत चामके ॥५३॥
सुगंध गंध लिंपिती । गुलाल लाल सिंपिती । हरुष मानिती मनें । बनें बनें चि चुंबन ॥५४॥
सुरंग लाल लाल रे । गुलाल मस्तहाल रे । फुलेले तेल घातलें । सुगंध गर्द मातलें ॥५५॥
गुणी समस्त सुंदरें । विळासती वधुवरें । अनन्य अन्यथा नसे । समस्त काम वीलसे ॥५६॥
बहुत प्रीतिच्या गुणा । आसेल काये तुळणा । जीवीच जीवीचें सये । कदापि सांगतां नये ॥५७॥
हरीचरीत्र साजिरें । सगुण रूप गोजिरें । सवेंचि वेष पालटे । आधीक कृष्ण हा नटे ॥५८॥
श्रीकृष्ण कृष्ण हें वदा । तुटोन जाती आपदा । नको कदा देहेमदा । तरीच पावसी पदा ॥५९॥
रसीक भाव भावना । महंत आणिती मना । अनंत गुण लाववी । रसाळ गातसे कवी ॥६०॥

N/A

References : N/A
Last Updated : April 02, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP