स्फुट श्लोक - श्लोक ५८

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


( प्रमाणिका वृत्त )
तनु वितंड चंडसी । प्रचंड शुंड दंडसी । सुरंग रंग रेखिला । घवघवीत देखिला ॥१॥
नमु गणेश तो गुणी । विराजतो विभूषनीं । जनासि सौख्यकारकु । विशाळ विघ्रहारकु ॥२॥
जनांत सुमती मती । नमुन ते सरस्वती । महंत संत श्रोतयां । वंदोनिया गुणाळया ॥३॥
समस्त ही मनीं धरा । कथा करीनसें करा । लाहानसा कवी नवा । रघोत्तमासि वनिवा ॥४॥
श्रीराम राम राम हा । समर्थ पूर्णकाम हा । प्रतापकीर्ण फांकलें । प्रचंड तेज झांकलें ॥५॥
प्रिती करूनि आदरें । भजोनियां दसासीरें । पुजून देव शंकरु । उदंड साधिला वरु ॥६॥
तया वरेंचि मातला । अधर्म कर्म रातला । मुमंडळीं नव्हे भला । बहुत लोक पीडिला ॥७॥
स्वधर्म सांडिला सळें । अधर्म माडिला बळें । पिडावलीं रुसीकुळें । कितेक शोधिलीं मुळें ॥८॥
समस्त देव ते भले । परंतु बंद पावले । बहु प्रहांसि निग्रहो । ग्रहासि भेटला ग्रहो ॥९॥
उदासली वसुंधरा । बहु भिती निशाचरा । अनीत्य फारसी वसे । कदापि न्याय तो नसे ॥१०॥
नरेंद्र हो फणेंद्र हो । विधी सुरेंद्र चंद्र हो । वरुण वात्त पावकु । कुबेर येम धार्मिकु ॥११॥
प्रचेंड दंड दंडिका । सटी गणेश चंडिका । समस्त ही विरोघली । बहु बळें निरोधली ॥१२॥
समीर लेटितो खडे । वरुण घालितो सडे । मयंक साउली धरी । मळीण पावकु हरी ॥१३॥
विधी विधीस धाकतो । सुरेद्र बाग राखतो । करावयास निग्रहो । भुभंदळासि निग्रहो ॥१४॥
अखंड चाकरी करी । सदा वरुची भादरी । सटी आरंधळी दळी । गणेश गाढवें वळी ॥१५॥
परोपरीं विटंबणा । वदेल कोण रावणा । उदंड देव पीडिले । मदें पदासि खंडिले ॥१६॥
बहु कठीण काळ हो । समस्त पावले मोहो । हिणादिनाचियापरी । सदा गळीत अंतरीं ॥१७॥
समस्त केंश लांबले । कितेक वेस्त लोंबले । नखेंचि योग साधले । समस्त देव गादले ॥१८॥
निशाचरें बहु वसे । कठीण वर्तमानसें । म्हणोनि राम पावला । बहु बळें उठावला ॥१९॥
निमीत्य मात्र ते सिता । विबुधपक्ष पुरता । समर्थ तो भला भला । कुढावयासि पावला ॥२०॥
अचाट तीं कपीदळें । असंख्य चालिलीं बळें । करूनि सख्य पाहिलें । परंतु सर्व राहिलें ॥२१॥
इरूनियां कुळांगना । बहुत गर्व रावणा । विचार नाइके भला । प्रचंड राम कोपला ॥२२॥
प्रभु म्हणे हरेश्वरा । त्रिकुट पालथा करा । उठावलीं कपीदळें । पुरीस वेढिलें बळें ॥२३॥
कपी विशाळ ते गिरी । गिरीच घेतले करीं । उठावले भुजाबळें । बळें बळेचि तुंबळें ॥२४॥
बहुत दाटले हुडे । हुडा चि मेहुडे । तया परीच ते कपी । वितंद चंड साक्षपी ॥२५॥
निशाचरांसि घातलें । बळेंचि दुर्ग घेतलें । असंख्य जुत्पती किती । हुडां हुडांचि गर्जती ॥२६॥
बळें कपी बळावले । उदंड दैत्य पावले । विरा विरांसि तांतडी । बळावळी धडाधडी ॥२७॥
कपी कितेक कोपले । रवी मयंक लोपके । तडकसें तडाडिलें । नभीं गिरी घडाडिले ॥२८॥
त्रिकुट तो तडांडिला । तडक वाजला भला । कडाडिलें खडाडिलें । बहु हुडे घडाडिले ॥२९॥
त्रिकुट घेतला बळें । अचाट चालिलीं दळें । असंख्य वीर जातसे । धुळार गर्द होतसे ॥३०॥
थटाट मारिती शिरें । कितेक हाणती करें । नि:कट हो धबाधबी । रुधिरसें थबाथबी ॥३१॥
करें करासि देहुडया । पदो पदीं आढया तिढया । मुखें मुखासि तोडिती । धरूनि केंश वोढिती ॥३२॥
बहु उकावले बळा । गळयासि लविती कळा । धडें धडासि ठेलिती । विरासि वीर रेलिती ॥३३॥
पडोनियां उफाळती । बळें बळी धुमाळिती । बुकालिताति नीकुरें । मुहुप लात कोंपरें ॥३४॥
बसोनियां उरावती । नखे शिखा परोपरीं । कितेक वीर झोंबती । किती अडोन लोपती ॥३५॥
बहुत धीट ते हटी । कित्तेक ते लटापटी । परस्परें चि नीकुरें । धरूनि मोडिती शिरें ॥३६॥
कितेक वीर पाडिले । कित्तेक ते पछ्याडिले । बळेंचि पोट फाडिती । निशाचरा विभांडिती ॥३७॥
कित्तेक दैत्य झोडिले । कित्तेक हस्त मोडिले । पदीं धरूनि वोढिती । बळें भुमीस पाडिती ॥३८॥
कपी चपेट सूटले । कित्तेक दैत्य आटले । झपेटिती लपेटिती । पिटून कूटकूटिती ॥३९॥
पुरीमधें कल्लकळी । तडक हाक वाजली । आचात धुंद माजली । विशेष बोंब गाजली ॥४०॥
त्रिकूटिचे भले भले । वितंड वीर क्षोभले । प्रचंड चालिलीं दळें । दळें दळेंचि तुंबळेम ॥४१॥
बळागले भले भले । तुरंगभार चालिले । मना कळेचिना गती । तुफानसे उफाळती ॥४२॥
सुरंग रंग साजिरे । तुरंग रंगले बरे । समस्त हस्त तोलती । आढाल डाल डोलती ॥४३॥
कितेक हस्त मस्तसे । बहुत खस्त वेस्तसे । प्रंचड दंत हाणती । महीतळास खाणती ॥४४॥
पथीं पथींच ते रथी । रथींच रथींच सारथी । तुरंग ते तडाडिले । रंणागणीं घडाडिले ॥४५॥
तुरें तुरें बहुवसें । विशेष घोष कर्कशें । अचाट भाट चालती । ब्रिदें पवाड बोलती ॥४६॥
उन्मत्त मत्त ठांइचें । रथी तुरंग पांइचे । समस्त ही उठावले । रणांगणासि पावले ॥४७॥
कडक चालिलीं सळें । थडक जाहाली वळें । विरांसि वीर हाणती । परस्परें खणाणिती ॥४८॥
गदा पटीस तोमरें । दुधार मारिती भरें । बहु खणाण सुटले । अनेक घोंष उठीले ॥४९॥
असंख्य हस्त मातले । बळेंच रान घेंतलें । चपेटिती लपेटिती । कपीकुळां झपेटिती ॥५०॥
रथारुढीं निशाचरीं । कपीसि त्रासिलें शरीं । विशेष राउतीं बळें । विदारिलीं कपीकुळें ॥५१॥
समस्त हस्त सुटले । अभंग भार फुटले । बळें करूनि चीरडा । रणांगणीं पखारडा ॥५२॥
कितेक भार चिंबती । कितेक वीर हुंबती । अचाट दाटलीं रणेम । दिसेतिनात कीरणें ॥५३॥
अनेक भार वावरे । समोर मार नावरे । कितेक वीर भेदिती । परस्परें चि छेदिती ॥५४॥
मध्यें चि येक खंडिले । कितेक तें उलंडिले । परोपरीं कळीवरें । तुटोनि भेदिलीं भरें ॥५५॥
कठीण मार नावरे । वीरांत वीर वावरे । वीरश्रिया भरीं भरे । देहासि लागले झरे ॥५६॥
घसास तोडिती बळें । भसास टोंचिती शुळें । थडाड थाड तोडिते । वीरांसि वीर पाडिती ॥५७॥
कितेक वीर नीखुरें । भडाड मारिती भरें । तडाड तूटती शिरें । उलंडलीं कळीवरें ॥५८॥
कत्तार मार होतसे । रुधिरपूर जातसे । नभीं उफाळति शिरें । रीसें गळीत वानरें ॥५९॥
रणांगणीं मदोन्मतीं । रथीं विशेष राउतीं । मनीं धरूनि आक्रमु । बळें चि भंगिली चेमु ॥६०॥
कडक निकटें कटें । तुरंग हस्त श:कटें । कत्तार मार मारिले । रिपू समस्त हारिले ॥६१॥
भुजाबळें चि राउतीं । कपीदळें चि तीं रितीं । करूनि खस्त पाडिलीं । किती रिसें विदारिलीं ॥६२॥
बहुत आट वानरां । जयो दिसे निशाचरां । प्रचंड वीर कोपले । कितेक ते उठावले ॥६३॥
कपीकळोळ चालिला । विधीभुगोळ हालिला । चपेट मारिती बळें । लपेटिताति लांगुळें ॥६४॥
कितेक टाकिती शिळा । कितेक झोंकिती शुळा । गदा तडक फुटले । फणाण बाण सुटले ॥६५॥
किराण ठाण नेटकें । धरूनि खर्व खेटकें । फडाड हाणती बळें । बळें चि मोडिती दळें ॥६६॥
कडक वाजती भरें । परस्परें चि नीकुरें । भले भले उठावले । वीरांसि वीर पावले ॥६७॥
पुढील भार भंगती । कितेक वीर लंघती । सवेंचि उठती बळी । बळें चि फोडिनी फळी ॥६८॥
बळें चि भार लटिले । कितेक दैत्य आटले । विरश्रिया भले भले । भले भले चि तुंबले ॥६९॥
शिळा बहुत सीखरें । कितेक तें तरुवरें । बळें उठावले कपी । अचाट धीट साक्षपी ॥७०॥
हये हयास ताडिती । गजें गजा पछयाडिती । रथें रथासि मोएइती । निशाचरासि झोडिती ॥७१॥
बहुत वेळ भांडले । रिपु कितेक खंडले । सुरांसि त्रासिती बळी । जलंडले भुमंडळीं ॥७२॥
वितंड मेघवर्ण तो । बलाढय कुंभकर्ण तो । दळेंचि गीळितो सळें । परंतु मारिला बळें ॥७३॥
प्रधान ही भले भले । रणीं बहुत भांडले । परंतु येश नाडळे । देह्याभिमान तो गळे ॥७४॥
सुरेंद्र जिंकिला रणीं । प्रसीध राम रावणी । बहुत वेळ भांडळे । पुढें रणीं उलंडले ॥७५॥
अनुजसुत आक्रमी । प्रधानही पराक्रमी । सखे समस्त मारिले । रणांगणीं विदारिले ॥७६॥
सुरां कळेचिना गती । भुमंडळासि भंगिती । बहुत सुर विक्रमी । उलंडले पराक्रमी ॥७७॥
बहु बळाढय दैत्य हो । परंतु पावले मोहो । कपी तुफान सुटले । असंख्य सैन्य आटलें ॥७८॥
अभंग भार भंगले । कितेक वीर रंगले । शरीर खस्त खंगलें । विरंगलें विरंगलें ॥७९॥
अखंड वानरा जयो । निशाचरां घडे क्षयो । मनीं धरूनि साक्षपु । अचाट कोपला रिपु ॥८०॥
उदंड देखिलें उणें । मनीं धरूनि रावणें । बहु बळें उठावला । रणांगणासि पावला ॥८२॥
रथारुढें निशाचरें । बहुत नीकुरें भरें । असंख्य बाण सोडिले । रिपु कितेक मोडिले ॥८३॥
कितेक वीर बापुडे । पळोनि राघवाकडे । विशेष मंदली गती । रघोत्तमासि बोलती ॥८४॥
प्रसंग हा नव्हे भला । कृतांत काळ कोपला । बहुत त्रासलों जिवीं । प्रभु दिनासि वांचवी ॥८५॥
उणीव देखत क्षणीं । उठावला ततक्षणीं । विरश्रिया भुजाबळें । असंख्य भंगिलीं दळें ॥८६॥
रणांगणीं निशाचरें । करूनि खस्त गज्जरें । कितेक तें भयातुरें । विलेकिलीं दशाशिरें ॥८७॥
अधीक कोपला हटी । पुढें रथास नेहटी । उदंड सोडिली सिमा । धिकारिलें रघोत्तमा ॥८८॥
समस्त मानिलें उणें । गिळीन काळसें म्हणे । खिळीन हे वसुमती । मनुष्य राम तें किती ॥८९॥
मनीं धरूनियां पणु । समोर राम रावणु । हटें हटावली हटी । किलाल चोसटी सटी ॥९०॥
अनेक वाजती तुरें । कितेक होत आतुरें । कठोर मांडलें पुरे । नभासि दाटलें धुरें ॥९१॥
सणाण विंधिती शरें । परस्परें चि नीखुरें । घुमघुमी घुमारलें । नमीं धुरें धुमारलें ॥९२॥
नभासि दाटली रजें । चणाणिताति नारजें । अचाट युध्य माजलें । कठोर थोर गाजलें ॥९३॥
अमेद मौष पुरतें । रणांत नाचती भुतें । सिरें धरूनियां पदें । गिदे कितेक स्वापदें ॥९४॥
वितंड कोपला ईशु । अचाट घोंष कर्कशु । धनुष्य वाइलें गुणा । गमे वधील रावणा ॥९५॥
तडक वाजला बळें । दंणाणिलीं भुमंडळें । कडक उठीला रणीं । भयें थरारिला फणी ॥९६॥
करकरीत कर्करी । गरगरीत गर्गरी । थरथरीत थर्थरी । भरभरीत भर्भरी ॥९७॥
कडक कडाडिलें । खडखड खडाडिलें । गडगड गडाडिलें । धडधड धडाडिलें ॥९८॥
तडतड तडाडिलें । थडथड थडाडिलें । दडदड दडाडिलें । धडधड धडाडिलें ॥९९॥
कडाडिलें खडाडिलें । गडाडिलें पडाडिलें । तडाडिलें थडाडिलें । द्डाडिलें धडाडिलें ॥१००॥
विशेष आट वानरां । जयो दिसे निशाचरां । अचाट दाटलीं दळें । नीशंख तोडिती बळें ॥१॥
कृतांत काळ कोपला । भुजाबळें उठावला । उदंड भार भेदिले । रिपु समस्त छेदिले ॥२॥
पुन्हा सवें चि नीखुरें । समस्त छेदिलीं शरें । बळें भेदिली कुपी । अचाट गर्जले कपी ॥३॥
रणीं वधूनि रावणा । विभीछेता रणांगणा । बळें धडाडिला नभीं । विशाळ देवदुंदुभी ॥४॥
निरोध बंद सुटले । समस्त देव भेटले । मृदोत्तरेंचि उत्तरें । बहुस्तुती परस्परें ॥५॥
समस्त देव हरुषले । कुशमभार वरुषले । जयो जयो सितापती । सुखें बहुत गर्जती ॥६॥
महेश कीर्ति बोळती । प्रताप जीव तो किती । चुकोनी नेणता कवी । रघोत्तमासि वीनवी ॥७॥
बळें कृतांत काळ तुं । प्रभु दिना दयाळ तुं । मनीं धरूनियां मोहो । तुझाचि साभिमान हो ॥८॥
बिभीषणास त्रीकुटीं । बळेंचि स्थापिला पटीं । सुखावला बिभीषणु । अखंड रामचींतनु ॥९॥
विराजमान जानकी । धगधगीत पावकीं । रघोत्तमासि भेटली । वियोग वेळ तुटली ॥१०॥
कितेक स्वर्गगायेका । मिळोन आष्ट नायेका । विणे धरूनि तुंबरें । आळाप होतसे भरें ॥११॥
अनेक वाद्यकुसरी । बहुकळा परोपरीं । गुणी उदंड गातसे । घनें घमंड होतसे ॥१२॥
कितेक भांट दाटले । अचाट दाट थाटले । जिवीं सुखावले सुखें । कडक बोलिती मुखें ॥१३॥
अनेक बंद तोडिले । समस्त देव सोडिलें । प्रचीतिनें पाहा पाहा । प्रभु समर्थ राम हा ॥१४॥
निरोप दीधला सुरां । समागमेंचि वानरां । रिसांसहित घेतलें । सपुष्पकांत घातलें ॥१५॥
बहुत आर्त हो तया । विशेष भेटि भ्रातया । समस्त लोक भेटले । माहांसुखें सुखावले ॥१६॥
अनेक वीरकट्ट तो । प्रभुसी राजपट्ट तो । अचाट गर्द माजला । विधीभुगोळ गाजला ॥१७॥
अनेक मंत्रघोंष तो । अनेक वाद्यघोंष तो । अनेक नामघोंष तो । अनेक सर्व घोंष तो ॥१८॥
गणील कोण वैभवा । उल्हास वाटतो जिवा । पहा जयाचिया मनें । समर्थ इंद्रभुवनें ॥१९॥
सुखें उभारिली गुढी । बहु जनासि आवडी । अखंड राज्य हा करु । कवी जनासि वीवरु ॥२०॥
बहुत भव्य भोजनें । अनेक वस्रभूषणें । कपीरिसासि गौरवी । श्रीरामदास तो कवी ॥२१॥
समर्थ हे उपासना । जनांत आणिती मना । रघोत्तमा उपासिती । सखेचि तेचि वाटती ॥२२॥
शरीर वीकिलें गुणीं । अनन्य भाव निर्गुनीं । जना उपासने गुणें । कळोनि मोक्ष पावणें ॥२३॥
घवघवीतसे कवी । कवी कवीच लाघवी । परोपरीं भले भले । प्रबंद बंद साधले ॥२४॥
विरक्त भक्त जाणते । अगम्य खूण बाणते । शरीर त्या घरीं पडो । मनांत राम सांपडो ॥२५॥

N/A

References : N/A
Last Updated : April 02, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP