स्फुट श्लोक - श्लोक ४१ ते ४३

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


४१
हळु हळुच बोलणें । हळु हळुच चालणें । विचारणें अबोलणें । अबोलणेचि बोलणें ॥१॥
उदास बोलणें करी । मनास दास वीवरी । जनास हें बळें कळे । जरी मनांत नीवळे ॥२॥
४२
जिवामधील जाणती । कळाचि ते सरस्वती । मनांतरीं वसे सदा । प्रसन्न रूप शारदा ॥१॥
कळा कळा चि वीकळा । समर्थ जाणती कळा । अचंचळा चि चंचळा । निचंचळा दुचंचळा ॥२॥
अनेक सौख्यदायेका । अनेक लोकनायेका । अनेक धारणा धरी । अनेक चाळणा करी ॥३॥
अनेक पंथ चालवी । अनेक मत्त हालवी । निशब्द खूण पालवी । मनें मनास मालवी ॥४॥
उरेचिना सरेचिना । पुरेचिना धरेचिना । असेचिना नसेचिना । वसेचिना दिसेचिना ॥५॥
अगम्य गम्य गम्य रे । प्रणम्य नम्य नम्य रे । असो जसी तसी असो । मदांतरींच वीलसो ॥६॥
चतुर जाणते जनीं । करा विचारणा मनीं । सरस्वतीस वोळखा । उगे भरीं भरों नका ॥७॥
कसी कसी कितेकसी । पाहाचनास कोणती । आहाच पाहातां नये । विचारितां प्रचीत ये ॥८॥
प्रचीति ये तिची तिला । उगाचि काये गल्बला । दुभाग भासतो पाहा । समस्त व्यापिनी माहां ॥९॥
असेल तें सुखें असो । नसेल तें सुखें नसो । कळेल त्या सुखें कळो । वकेल त्या सुखें वळो ॥१०॥
उदास दास बोलणें । उदास दास चालणें । उदास याचिकारणे । नव्हे मनासि पारणें ॥११॥
गणेश वेश पूजिती । गणांतरी सरस्वती । जना उफारटें दिसे । परंतु सत्य हें असे ॥१२॥
उफारटें सुफारटें । नटे विचार नीवटे । नसोन शारदा वदा । उगेचि सीणता सदा ॥१३॥
आहो जना म्हणे कवि । तुम्हांस कोण सीकवी । बहुत गुंतले दिसा । करा विचार नीरसा ॥१४॥
तुम्हास कोण बोलवी । तुम्हास कोण चालवी । तुम्हास कोण हालवी । समस्त ही लव्हालवी ॥१५॥
जनामधें प्रभंजनु । प्रभंजनामधें मनु । मनांतरींच शारदा । समस्त जाणते सदा ॥१६॥
खडेच सार भूतळीं । पियूषसार ते जळीं । रवीच सार पावकीं । जनास हा उपाव कीं ॥१७॥
प्रभंजनांत जाणती । कळाचि ते सरस्वती । नभांत ब्रह्म सार हो । करा बरा विचार हो ॥१८॥
तनूंत मानवी तनु । तयांत सार आननु । सिरांत सार लोचनु । सुलोचनीं प्रभंजनु ॥१९॥
प्रभंजनांत वासना । विचार येऊं द्या मना । समस्त जाणती कळा । बरे चतुर नीवळा ॥२०॥
किती करूं विवंचना । हरीजनासि सूचना ॥ समीर सर्व सार हो । तयांत ही विचार हो ॥२१॥
विचाररूप जाणणें । खुणेसि खुण बाणणें । स्वभाव चालिला बळें । वदोन काये पाबळें ॥२२॥
मनास मानला जये । जनास कां कळो नये । वडील कोण माईका । कदापिही वदो नका ॥२३॥
समस्त स्वप्र वोसरे । तरीच जागतें खरें । कळावयास बोलणें । विशेष तें अबोलणें ॥२४॥
सगुण भक्ति वाळली । उपासना कलोळली । शरीर भावना भरे । जना समस्त हे खरें ॥२५॥
४३
धिरे धिरे म्हणे कवी । विशेष जन्म मानवी । तयांतही बहु तनु । विचारणा तनुमनु ॥१॥
बहु मिळोनि भांडता । उगेचि वेर्थ तंडता । तनुगुणे चि वोळखा । उगे भरीं भरों नका ॥२॥
बरा करा शमु दमु । गुणें समस्त कर्दमु । भरा भरा भरीं भरा । भरोनि सर्व वीवरा ॥३॥
भुतीं भुतें विळासती । गुणी गुणांत भासती । तयापरीच तीसरें । प्रचीतिनें खरें खरें ॥४॥
अगाध हा रघोत्तमु । न बोलवे पराक्रमु । कठीण काळ वीशमु । भ्रमुचि पाववी भ्रमु ॥५॥
प्रताप या रघोत्तमा । करील कोण रे सिमा । हिणे विळास पावती । सुखें सुखें बळावती ॥६॥
उदंड देव ही पाहा । समर्थ येक राम हा । बसमस्त देव तीं भुतें । सदा रघोत्तमीं रतें ॥७॥
विशेष आंगिची कळा । कदा कळेचिना लिळा । अनाम्य नाम्यधारकां । अनंत सुखकारकां ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : April 02, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP