स्फुट अभंग - ज्ञानशतक

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


संतांचे संगतीं काय प्राप्त होतें । तें आम्हाम निरुतें सांगईन ॥१॥
सांगईन परी मानसीं धरावें । मग उद्धरावें या संसारीं ॥२॥
संसारीचें सार जया नाश नाहीं । तेंचि पडे ठाईं संतसंगें ॥३॥
संतसंगें चुके जननीजठर । दुस्तर संसार मायाजाळ ॥४॥
मायाजाळ तुटे तरी देव भेटे ।संतसंगें आटे भवसिंधू ॥५॥
भव भयानक बुडवी सकळां । त्याहूनि वेगळा साधुसंग ॥६॥
साधुसंग साधी असाध्य वस्तूसी । जेथें आहे त्यासी वाट नाहीं ॥७॥
वाट नाहीं जेथें जावया इतरा । अभाविक नरा पापबुद्धी ॥८॥
पापबुद्धि झडे संतांचे संगतीं । नाही अधोगाति गर्भवास ॥९॥
गर्भवास संतसंगें मुक्त होय । वेगीं धरी सोय आलीया रे ॥१०॥
आलीया संसारीं स्वहित विचारी । एके भावें धरीं संतसंग ॥११॥
संतसंग धरीं धन्य तो संसारीं । बोलिलें श्रीहरीं भागवतीं ॥१२॥
भागवत गीता सार निरूपण । त्याचें विवरण संतसंगें ॥१३॥
संतसंगें कळे सर्व शास्रभाग । आणि ज्ञानयोग अप्रयासें ॥१४॥
प्रयासें साधितां कधीं नये हाता । तें लाभे तत्त्वतां साधुसंगें ॥१५॥
साधूचेनी संगें अलभ्याचा लाभ । मुक्ति हे सुलभ होत आहे ॥१६॥
आहे एक देव परी तो वळेना । जयासी मिळेना संतसंग ॥१७॥
संतसंग नाहीं जयालागीं जनीं । जया कां जननी प्रसवली ॥१८॥
प्रसवली माता शीणचि उरला । पुत्र नाहीं झाला हरिभक्त ॥१९॥
हरिभक्त नर वंशाचें मंडण । दोषाचें खंडण करीतसे ॥२०॥
करीतसे भक्ति संताचेसंगतीं । सायुज्यतामुक्ति पावावया ॥२१॥
पावावया मुक्ति हरीचें भजन । श्रवन मनन सर्वकाळ ॥२२॥
सर्वकाळ होय सार्थक श्रवणें । ब्रह्मनिरूपणें संतसंगें ॥२३॥
संतसगें ब्रह्मपद ओळखावें । विवेकें पावावें निरंजन ॥२४॥
निरंजना आतां नाहीं जन वन । अंत्राळीं गमन एकाएकीं ॥२५॥
एकाएकी देव निर्भळ निश्चळ । आतुडे प्रांजळ दुजेवीण ॥२६॥
दुजेवीण देव एकला एकट । उभा घनदाट मागें पुढें ॥२७॥
मागें सर्व देवांचा नायक । सांपडे विवेक झालीयानें ॥२८॥
झालीयानें कृपा संतसज्जनांची । मग विवेकाची वाट फुटे ॥२९॥
वाट अवघड पाहातां दिसेना । जेथें नाहीम मना समागम ॥३०॥
समागमें जातां वाटचि फुटेना । संशय तुटेना बहुविध ॥३१॥
बहुविध पंथ कोणें तो धरावा । दुजेपणीं देवा पावीजेना ॥३२॥
पावीजेना देव संतसंगावीन । मार्ग हा कठीण विवेकचा ॥३३॥
विवेकाचा मार्ग विवेकें चालावा । मनाचा त्यागावा संग सर्व ॥३४॥
सर्व त्याग करी पावसी श्रीहरी । परी एक धरीं संतसंग ॥३५॥
संतसंगावीण त्याग हा घडेना । श्रीहरी पडेना कदा ठायीं ॥३६॥
ठाव सज्जनाचा सज्जन जाणती । तेथें नाहीं गति मीपणाची ॥३७॥
मीपणाची गति संगाचेम लक्षण । ठाउकी ही खूण सज्जनाची ॥३८॥
सज्जनाचें वर्म सज्जनाला तुटे । उतारा कुवाटे मायाजाळ ॥३९॥
मायाजाळ पाहों जातां आढळेना । सर्वथा कळेना न पाहतां ॥४०॥
पाहतां संसार माईक वेव्हार । परी निरंतर लागलासे ॥४१॥
लागला दिसेना परी निरसेना । माईक वासना सत्य झाली ॥४२॥
सत्य झाली असे विवेकें निरसे । निरसोनी वसे जवळींच ॥४३॥
जवळींच आहे अंतरीं चोरटा । आतां कोण्या वाटा धांवसील ॥४४॥
धांवसील परी वासना सरेना । सर्वथा मरेना साधुवीण ॥४५॥
साधुवीण प्राणी पडती आटणीं । तप तीर्थाटणीं नाना कर्मी ॥४६॥
नाना कर्मी देव चुकोनी राहिला । सज्जनीं पाहिला अनुभवें ॥४७॥
अनुभव सर्व देहीं वेगळाले । कोण झाले भले संतजन ॥४८॥
संतजन परी कोण ओळखावे । कैसे ते जाणावे साधूजन ॥४९॥
साधुची वोळखीं साधु वोळखीला । येर भांबावला माया धरी ॥५०॥
माया धरी प्राणी जवळी चूकलें । नाहीं वोळखीले साधुजन ॥५१॥
साधुजन कोण कसें वोळखण । तेंचि निरूपणा सांगितलें ॥५२॥
सांगितलें आहे मागे थोरथोरीं । तेंचि अवधारी आलीया रे ॥५३॥
आलीया रे साधू जाणावा कवणें । तयाचीं लक्षणें असंख्यात ॥५४॥
असंख्यात परी ओळखीकारणें । साधू पूर्णपणें सारिखाची ॥५५॥
सारिखाची दिसे जनाचीयापरी । परी तो अंतरीं वेगळाची ॥५६॥
वेगळाची ज्ञानें पूर्ण समाधानें । स्वस्वरूपीं मनें वस्ति केली ॥५७॥
वरित केली मनें निर्गुणीं सर्वदा । मीपणें आपदा तया नाहीं ॥५८॥
तया नाहीं काम तया नाहीं क्रोध । तया नाहीं खेद स्वार्थबुद्धि ॥५९॥
बुद्धी निश्चयाची स्वरूपीं तयाची । कल्पना ठाईंची निर्विकल्प ॥६०॥
निर्विकल्प मद मत्सर सारीला । आणि संहारीला लोभ दंभ ॥६१॥
दंभ हा लौकिक विवेकें सांडीला । दुरी वोसंडला अहंकार ॥६२॥
अहंकार नाहीं दुराशा अंतरीं । ममता ही दोरी मोकळली ॥६३॥
मोकळली भ्रांति शरीरसंपत्ति । वैभवसंगतीं लोलंगता ॥६४॥
लोलंगता नसे ज्ञानें धालेपणें । ऐसीं हीं लक्षणें सज्जनांचीं ॥६५॥
सज्जनलक्षणें सांगेन पुढतीं । आर्त चित्तवृत्ति लांचावली ॥६६॥
लांचावली वृत्ति सज्जन सांगतां । होय सार्थकता जयांचेनी ॥६७॥
जयांचेनी ज्ञानें तरती अज्ञान । साधुसंगतीनें समाधान ॥६८॥
समाधानें शांति क्षमा आणि दया । रंक आणि रम्या सारिखाची ॥६९॥
सारिखाची शोध तेथें नाहीं भेद । सर्वांसी अभेद सर्व काळ ॥७०॥
सर्व काळ गेला श्रवनें मननें । सक्तिया साधनें हरिभक्ति ॥७१॥
हरिभक्ति करी जन तारावया । स्वधर्मा विलया जाऊं नेदी ॥७२॥
जाऊं नेदी भक्ति जाऊं नेदी ज्ञान । अनुतापीं मन निरंतर ॥७३॥
निरंतर भाव सगुणीं भजन । येणें बहुजन उद्धरती ॥७४॥
उद्धरती जन करितां साधन । क्रियेचें बंधन आचरतां ॥७५॥
आचरतां साधुजना होय बोधू । लागतसे वेधू भक्तिभावें ॥६७॥
भक्तिभावें देवप्रतिष्ठा पूजन । कथा निरूपण महोत्सव ॥७७॥
महोत्सव साधुभक्तीचें लक्षण । करी तीर्थाटण आदरेंसी ॥७८॥
आदरेंसी विधी करणें उपाधी । लोकांतें सद्‍बुद्धि लागावया ॥७९॥
लागावया बुद्धि सत्क्रिया भजन । करितो सज्जन मुक्तिदाता ॥८०॥
मुक्तिदाता साधु तोचि तो जाणावा । जेणें संपादावा लोकाचार ॥८१॥
लोकाचार करी तो जना उद्धरी । ज्ञाता अनाचारी कामा नये ॥८२॥
नये नये निंदूं जनीं जनार्दन । म्हणोनि सज्जन क्रियावंत ॥८३॥
क्रियावंत साधु विरक्त विवेकी । तोचि तो लौकिकीं मान्य आहे ॥८४॥
मान्यता सक्तिया लौकिक सोडिला । तोचि उद्धरिला जनीं नाहीं ॥८५॥
जनीं नाहीं मान्य तो सर्व अमान्य । म्हणोनियां धन्य क्रियावंत ॥८६॥
क्तियावंत तेणें लौकिक सोडावें । आणि वसवावें ब्रह्मारण्य ॥८७॥
ब्रह्मारण्य सेवी साधु तो एकला । जना नाहीं आला उपेगासी ॥८८॥
उपेगासी येणें जना पूर्णपणें । तयाचीं लक्षणें निरूपीलीं ॥८९॥
निरूपीलीं येणें लक्षणें जाणावा । साधू वोळखावा मुमुक्षू नें ॥९०॥
मुमुक्षूनें गुरू क्तियाभ्रष्ट केला । तरी अंतरला दोहीं पक्षी ॥९१॥
दोहीं पक्षीं शुद्ध तया ज्ञानबोध ।  येर तें अबद्ध अनाचार ॥९२॥
अनाचार करिसा कोण आहे जनीं । परी निरूपणीं बोलिजेतें ॥९३॥
बोलीजे साचार सत्य निरूपणीं । घडे ते करणी सुखें करूं ॥९४॥
करूं नये कदा मिथ्या निरूपण । करितां दूषण लागों पाहे ॥९५॥
पाहें पाहें बापा साधी ते सोधुनी । ठाकेना म्हणोनी निंदूं नको ॥९६॥
निंदूं नको शस्र निंदूं नको वेद । तरीच स्वानंद पावसील ॥९७॥
पावसील राम जीवाचा विश्राम । अहंतेचा श्रम सांडितांचि ॥९८॥
सांडितां विवेक मिथ्या अभिमान । तरी समाधान पावसील ॥९९॥
पावसील गति शुद्ध निरूपणें । रामदास म्हणे क्षमा करी ॥१००॥

N/A

Last Updated : March 28, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP