स्फुट अभंग - ३३

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


३३
नमस्कार आतां देवा गणनाथा । चरणकमळीं माथा ठेउनीयां ॥१॥
शारदा सुंदरी ते ब्रह्मकुमरी । राजहंसावरी शोभतसे ॥२॥
उभ्या महेश्वर शंभूचें शिखर । येती निरंतर विश्वजन ॥३॥
विश्वासी आधार सुर्यनारायण । तया पंचप्राण ओवाळीन ॥४॥
स्तंभ फोडुनीयां आला गडगडीत । भक्तांसी रक्षीत नरहरी ॥५॥
नाना पूजा नाना नैवेद्य विळास । नांदे त्रिमलेश वेंकटेश ॥६॥
कटावरी कर उभा निरंतर । भक्तांसी आधार पांडुरंग ॥७॥
तुळजापुरीं माझें कुळीचें दैवत । तुळजा विख्यात भूमंडळीं ॥८॥
काशीपुरीमध्यें विश्वनाथ राजा । अंतकाळीं वोजा रक्षितसे ॥९॥
न करी अव्हेरू कृपेचा सागरू । जानकीचा वरू रामराजा ॥१०॥
द्वारकेचा कृष्ण पांडवांचा सखा । बंधु पाठीराखा द्रौपदीचा ॥११॥
उधळलें भंडार पाली पेंबरीस । नित्य मल्हारीस । हळदी लागे ॥१२॥
साटी पत्रशाखा होय शाखांबरी । ते बनशंकरी भक्तमाता ॥१३॥
आउदीये माई मातापुरी गेली । चंडिका देखिली सप्तशृंगीं ॥१४॥
रासीनीरासाई आंबा जोगेश्वरी । नांदे कोल्हापुरीं महालक्ष्मी ॥१५॥
स्वामीयाचे यात्रे विश्वजन जाती । सप्त जन्म होती भाग्यवंत ॥१६॥
पंचवटीकेसी रामसीतापती । देव हा मारूती जेथें तेथें ॥१७॥
कावेरीचें तीरीं नांदे रंगनाथ । वोड्य़ा जगन्नाथ पूर्वभागीं ॥१८॥
उडुपेचा कृष्ण बद्रीनारायण । भगवंत आपण बारसीचा ॥१९॥
वैकुंठीचा विष्णू कैलासी शंकर । मुख्य निराकार परब्रह्म ॥२०॥

N/A

References : N/A
Last Updated : November 05, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP