अमृतानुभव - ग्रंथपरिहास

अमृतानुभव हा ज्ञानेश्वरांना ज्ञानेश्वरी लिहून झाल्यावर आलेला अनुभव आहे.


परि गा तुवा निवृत्तिराया । सुखविले शिरीं कर ठेवुनिया । तर निवांतचि म्यां सुखा तया । भोगावे की ॥१॥

परि सूर्याहाती महेशें । दिधले तेजाचे सूत्र ऐसे । की जगचि त्या प्रकाशें । सामावुनि घेतले ॥२॥

चंद्रीं अमृत घातले । ते काय तयाचिलागी झाले ? । की सिंधूने मेघा दिधले । मेघाचिसाठी ? ॥३॥

दिवसा जो प्रकाश असे । तो केवळ घराचे सुखास्तव नसे । गगनीं जो अवकाश वसे । तोही जगास्तवचि की ॥४॥

सागर हे उचंबळती । ती चंद्राचीच ना शक्ती ? । वसंत फुलवी तेव्हा होती । झाडे दानीं समर्थ ॥५॥

म्हणोनि हे असीमपण । निवृत्तिरायांचेचि उदारपण । त्यावाचुनि स्वतंत्रपण । माझे नाही ॥६॥

आणि हा एवढा ऐसा । परिहार देऊ कायसा- । प्रभुप्रभाव पैस ऐसा- । तयाआड ठाकुनी ? ॥७॥

आम्ही बोलिलो जे काही । ते प्रगटचि असे ठायीं । शब्दांनी काय स्वयंप्रकाशाही । प्रकाशावे लागे ? ॥८॥

अतवा कदाचित आम्ही वर्णन- । न करिता धरिले असते मौन । तर जनांसी काय जन । दिसले नसते ? ॥९॥

जनांसि जन देखत । ते दोन्ही द्रष्टेचि होत । दृश्य कोणी न तेथ । सिद्धांतचि हा ॥१०॥

यावाचुनि काही । ज्ञानाचे रहस्य नाही । आणि हे जगाआधीही । असतचि असे ॥११॥

म्हणोनि ग्रंथप्रस्ताव व्यर्थ गमेल । कासया घडावा, कोणी म्हणेल । तरि प्रेमभरें करु गेलो सकळ । सिद्धानुवाद येथ ॥१२॥

आवडीचे सदा तेचि । परि भोगीं नवी नवी रुचि । म्हणोनि हा उचितचि । अनुवाद सिद्ध ॥१३॥

याकारणे मियां । गौप्य दाविले बोलोनिया- । ऐसे नव्हे, सहजतया । प्रकाशचि की हा ॥१४॥

पूर्णब्रह्मअहंतेने वेढिलो । सर्वत्र आम्हीचि दाटलो । मग लोपलो ना प्रकटलो । कोणी होउनी ॥१५॥

आपणचि आपणाते । काय व्हावे निरूपिते ? । की उगे बैसले तर हरपते- । ऐसे आहे ? ॥१६॥

म्हणोनि माझी वैखरी । मौनाचेही मौन करी । हे मगर पाण्यावरी । रेखावी जैसे ॥१७॥

ऐसी दशोपनिषदे । पुढे न टाकिती पदे । देखोनि बुडी बोधें । येथेचि दिधली ॥१८॥

ज्ञानदेव म्हणे श्रीमंत- । हे अनुभवामृत । सेवूनि जीवन्मुक्त । हेचि होवोत ॥१९॥

मुक्ति खरेचि वेल्हाळ । अनुभवामृत निखिळ । परि अमृताही सुटे लाळ । अमृतें येणें ॥२०॥

नित्य चांद ठाके । परि पुनवेसी संपूर्ण देखे । हे का मी म्हणू शके- । सूर्याचे दृष्टीने ? ॥२१॥

प्रियाने जेव्हा वेढिले । अंगींचे अंगीं न समावले । एरवी तेथेचि लपले । तारुण्य की ॥२२॥

वसंत येता आपुल्या- । फळीं फुलीं बहरल्या । गगनचुंबी डहाळ्या । पेलती झाडे ॥२३॥

यासाठी हे बोलणे । अनुभवामृतपणें । स्वानुभूतिपक्वान्ने । वाढियेली ॥२४॥

आणि मुक्त मुमुक्षु बद्ध । हे तोवरीचि योग्यताभेद । जोंवरि अनुभवामृतस्वाद । लाभेचिना ॥२५॥

गंगेसि मिळण्या आले । ओघ समुद्रचि झाले । की तिमिर भेटले । सूर्या जैसे ॥२६॥

कसोटी न लागे आटोकाट । तोंवरिचि कसाची गोष्ट । मग परिसाची होता भेट । चोख सोनेचि होय ॥२७॥

तैसे जे कोणी येथ । अक्षरांच्या भेटती गाभार्‍यात । ते ओघ जैसे सागरात- । मिळण्या आले ॥२८॥

जैशी अकारादि स्वरांसंगत । पन्नास वर्णांची सिद्धी होत । तैसे आत्म्यावाचुनि या चराचरात । अन्य न काही ॥२९॥

तैसे दाविता काही ईश्वरावाचुनी । अंगुली उठू न शके कवणी । किंबहुना सर्वपरींनी । श्रीशिवचि तो ॥३०॥

म्हणोनि ज्ञानदेव म्हणे । अनुभवामृतें येणें । सण भोगावा सणें । विश्वाचेचि ॥३१॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP