अमृतानुभव - शब्दखंडन
अमृतानुभव हा ज्ञानेश्वरांना ज्ञानेश्वरी लिहून झाल्यावर आलेला अनुभव आहे.
अतीव उपयुक्त वस्तू शब्द । स्मरणदानीं प्रसिद्ध । अमूर्ता करण्या विशद । आरसा नव्हे का ? ॥१॥
पाहणारा आरसा पाही । यात काहीचि नवल नाही । परि या दर्पणें होई- । न पाहणारा पाहता ॥२॥
थोर अव्यक्ताचिया वंशा । उजळविता सूर्य जैसा । या एके गुणें आकाशा । अंबरत्व ॥३॥
आपण तर आकाशपुष्प । परि फळ देई जगद्रूप । शब्द मापी तेव्हा अमाप । काय आहे ? ॥४॥
विधि-निषेधांच्या पथा । हाचि मशालजी पथ दाविता । बंध-मोक्षाचा कलह घडता । निर्णयकर्ता हाचि ॥५॥
हाचि अविद्येचा पक्ष घेई । तेव्हा रूढे मिथ्याही । परि किंमत ना तीन कवडयाही । ब्रह्मवस्तूपाशी यास ॥६॥
शुद्ध शिवाच्या शरीरीं । शब्द हा जीव भरी । अक्षता फेकुनि पंचाक्षरी । पिशाच्चा बोलवी जैसा ॥७॥
जीव देहें बांधिला । तो शब्दें एके सुटला । आत्मा शब्दें भेटला । आपणासचि ॥८॥
उगवू जाय दिवसासी । तर नाशी रात्रीसी । म्हणोनि उपमा नव्हेचि शब्दासी- । सूर्याची कदापि ॥९॥
प्रवृत्ती आणि निवृत्ती । विरुद्ध वाटा हात धरिती । मग त्या प्रकाशती । शब्देंचि या ॥१०॥
आत्मज्ञानाचे प्राप्त व्हावया सुख । शब्द त्यांसी साहाय्यक । गोमटे काय एकेक । शब्दाचे या वानू ? ॥११॥
किंबहुना शब्द । स्मरणदानीं प्रसिद्ध । परि याचाही संबंध । नाही येथ ॥१२॥
शब्दाचे आत्म्यासाठायी । काहीचि प्रयोजन नाही । त्रिकालज्ञानरूप तया कोणाच्याही- । उपकाराचे ओझे कैसे ? ॥१३॥
आठवे की विसरे । की विषय होउनि अवतरे । तरि आत्मवस्तूसि वस्तुपण दुसरे । नसेचि काही ॥१४॥
आपणासी आपण । आठवे विसरे कोण ? । काय जिभेसीचि जीभ चुकून । चाखे काय ? ॥१५॥
जागृतासी नीज नसे । मग जागे होणे घडे कैसे ? । स्मरण-विस्मरण दोन्हीही तैसे । आत्मस्वरूपीं ॥१६॥
रात्र न जाणे सूर्य-। तर दिन जाणे कैसा काय ? । तैसे स्मरण-विस्मरण न होय । आत्मवस्तूमाजी ॥१७॥
स्मरण-विस्मरण न होय । मग स्मारकाचे काम काय ? । म्हणोनि या ठायी न जाय । न शिरे शब्द ॥१८॥
आणिक एक, शब्द । कार्य करी भले सिद्ध । येथ देण्या परि साद । विचारा न धैर्य ॥१९॥
शब्दाने अविद्येचा नाश होई । मग आत्मा आत्मस्वरूप अनुभवी । ऐसे म्हणताक्षणीं पदरी येई । वेडेपण ॥२०॥
सूर्य़ रात्रीसी मारील । मग आपला उदय करील । हे खुळचट सरती बोल । सत्याचे गावीं ॥२१॥
निद्रित निजेवरी जरि रुसला । तरि कैसा राहू शके तिजहुनि वेगळा ? । की जागृतीने जागा जाहला । तया पुन्हा काय जागे होणे ? ॥२२॥
ब्रह्मीं नाशापुरतीही अविद्या नाही । आत्मा आत्मस्वरूपींचि राही । तया स्थापिणे न आवश्यक काही । तो त्रिकाळ आत्मस्थितीतचि ॥२३॥
अविद्या स्वरूपें तर । वांझेचेचि पोर । मग तर्काचे खुरपे खरोखर । खांडील कोणा ? ॥२४॥
इंद्रधनुष्यासी दोरी । कोण न चढवी धनुर्धारी । ते दिसे तैसे खरोखरी । असते जर ? ॥२५॥
अगस्तीच्या प्राशना जर । पुरेल मृगजळाचा पूर । तरचि तर्क देईल मार । अविद्येसी ॥२६॥
शब्दांची चढाई साहील । ऐसी अविद्या जर असेल । तर का न जळोनि जातील । मेघांची गंधर्वनगरे ? ॥२७॥
दीप जेथ जाई । तेथ अंधार न राही । तेथ नाहीसे व्हावया काही । आहे काय ? ॥२८॥
नातरी पाहावया दिवस । ज्योतीचा करावा सोस । तर तेवढाही प्रयास । व्यर्थ होय ॥२९॥
साउली पडेना जेथ । तेथ साउली हा न काही पदार्थ । तितुक्याचि मानें, पडे तेथ । तो भासचि की ॥३०॥
स्वप्न लटिकेचि ठायी ठायी । हे जागेपणी ठाऊक होई । तेवी अविद्याकाळीं देखावी । तैसी अविद्या नसे ॥३१॥
जादूचे अलंकार । पसरले घरभर । वा नागवे नागविले तर लाभ काय ? ॥३२॥
मनातले मांडे भले । लाखवेळा जरि सेविले । तरी उपवासावेगळे । अन्य काय होय ? ॥३३॥
मृगजळ न दिसे । तेथ कोरडेचि असे । मग असे तेथ दिसे- । ओलावा काय ? ॥३४॥
अविद्या दिसे तैशी असे । तर चित्रींचे पाऊसें । भिजतील की माणसे, । आगरे, तळी ॥३५॥
कालवुनी अंधार । लिहिता येई अक्षर । तर शिणण्या शाईचे अवडंबर । का करावे वृथा ? ॥३६॥
काय आकाश निळे । न देखती हे डोळे ? । तैसे अविद्या मिथ्याचि हे सगळे । जाणोनि घ्यावे ॥३७॥
अविद्या या नावें । मी विद्यमान नव्हे । हे अविद्याचि स्वभावें । सांगतसे ॥३८॥
आणि हिचे अनिर्वचनीयपण । तेही दुसरे शपथप्रमाण । आपुलाचि स्वभाव आपण । सिद्ध करी ॥३९॥
अविद्या जर असे काही । तर विचार का न साही ? । काय घटाचे अभावींही । भुई आच्छादिली दिसे ? ॥४०॥
अविद्या नाशी आत्म्यासी । निश्चित नव्हे ऐसी । सूर्याअंगीं न वसत जैसी । तम आदी ॥४१॥
अविद्या तर मायावी । परि मायावीपण लपवी । ही अस्तित्वाअभावी । खरेपणासी आली ॥४२॥
ऐसे बहुत परींनी देखता । अविद्या नाहीचि तत्त्वता । शब्द हात चालविल आता । कोणावरी ? ॥४३॥
चालविता सावलीवरी । तलवार आदळे भुईवरी । मारिता अंतराळावरी- । हिसडे हात ॥४४॥
किंबहुना मृगजळपानीं । की गगनाच्या आलिंगनीं । वा सरसावता चुंबनीं- । प्रतिबिंबाच्या; ॥४५॥
आवेश ढिलावत । तो सर्व जाय व्यर्थ । तैसा तर्क विनाशा प्रवृत्त । तर व्यर्थ होय ॥४६॥
ऐसी अविद्या नाशावी । हे वाहेल जो जीवीं । त्याने साल काढावी । आकाशाची; ॥४७॥
त्याने गलस्तनी शेळी दोहावी । गुडघ्याच्या डोळ्यांनी वाट पहावी । वाळवूनि काचरी करावी । सांजवेळेची; ॥४८॥
जांभई वाटूनि रस- । काढावा, करुनि सायास । कालवूनि आळस । धडासि पाजावा; ॥४९॥
तो पाटाचे पाणी वळवो मगुते । सावलीसी करो उलथे । वार्याचे वळो दोर ते । सुखेनैव; ॥५०॥
तो बागुलबुवासी मारो । प्रतिबिंबें खोळ भरो । तळहातींचे विंचरो- । केस सुखें; ॥५१॥
घटाचे नसलेपण फोडो । गगनाची फुले तोडो । सशाचे मोडो- । शिंग सुखे ॥५२॥
तो कापुराची शाई करो । रत्नदीपीं काजळ धरो । वांझेच्या लेकीशी करो । लग्न सुखे; ॥५३॥
तो सुधाकराकरता अवसेचे । पोसो चकोर पाताळींचे । जळचर मृगजळींचे । धरो सुखें; ॥५४॥
अहो, हे किती बोलावे ? । अविद्या रचिली अभावें । आता काय नाशावे । शब्दें या ? ॥५५॥
नाही तयाचे नाशीं । शब्द न ये प्रमाणदशेसी । जैसे अंधारीं अंधारासी । नसे रूप ॥५६॥
अविद्या नसेचि ती । तेथ नाही म्हणण्या युक्ती । जैसी भरदुपारी लावावी पणती । अंगणात ॥५७॥
न पेरिताचि शेती । जे पीक काढण्या जाती । तयां काय प्राप्ती । लज्जेवाचुनी ? ॥५८॥
आकाशाच्या पोकळीवरी । जो म्हणे स्वारी करी । तो काही न करिताचि घरी । उगा असे साच ॥५९॥
पाण्यावरी पाऊस । पडता काय विशेष ? । अविद्यानाशीं शब्दोन्मेष । व्यर्थ तैसा ॥६०॥
माप मापपण मिरवी । तोंवरि नभ मापण्या न जाई । तम पाहता व्यर्थ होई । दीपाचा जन्म ॥६१॥
गगनाची रुची । जर जीभ चाखण्या जायचि । तर रसना हे व्यर्थचि । नाव होय ॥६२॥
नसेचि त्या वल्लभें । अहेवपण का शोभे ? । केळीचे पोकळ गाभे । न खाताचि संपले ॥६३॥
स्थूल-सूक्ष्म कोणताहि होय- । पदार्थ न प्रकाशी काय सूर्य ? । परि रात्रीविषयी निरुपाय । जाहलाचि तया ॥६४॥
दिठीसी काय न दिसावे ? । परि नीज न देखता ये । जागेपणी न संभवे- । म्हणोनिया ॥६५॥
चकोराचिया उद्यमा । व्यर्थतेची होय परिसीमा । जर दिवसाचि तो चंद्रमा । शोधू लागे ॥६६॥
कागद पाहता कोरा । मुका होय वाचणारा । अंतराळीं चालणारा । पांगळाचि म्हणावा ॥६७॥
तैसी अभावेंचि जी सिद्ध । त्या अविद्येसि करण्या विद्ध । उठताचि शब्द- । निरर्थक होती ॥६८॥
अवसेसी जरि ये सुधाकर । नच करी अंधार दूर । अविद्यानाशीं विचार । तैसा असे ॥६९॥
अथवा न रांधिता अन्न । लंघन तेचि जेवण । निवर्तल्याचे नयन । पाहण्या जैसे अंध; ॥७०॥
अविद्याचि जी न मुळात । तिचा लाणिण्या अर्थ । शब्दही निरर्थक होत- । नाश पावती ॥७१॥
आता अविद्याचि नसे । हे किती म्हणावे कैसे ? । परि नाशता शब्दाचे ऐसे । काहीचि नुरे ॥७२॥
अविद्येची करण्या अखेर । मोहरा वळवी विचार । तेव्हा स्वयेंचि संहार । स्वतःचा करी ॥७३॥
म्हणोनि अविद्येचे मरणे । प्रमाण होईल बोलणे । हे अविद्याचि अभावरूपाने । घडू न देई ॥७४॥
आणि ज्ञानरूप आत्म्या । आत्मानुभव देऊनिया । शब्द थोरपणासी यावा । हेही होणे विसंगतचि ॥७५॥
आपुलेचि आपुल्याशी । लग्न लागले कोणे दिवशी ? । की सूर्य आपुलेचि अंग ग्रासी । ऐसे ग्रहण आहे ? ॥७६॥
गगन कधी । स्वतःकडे निघे ? । समुद्र आपणातचि रिघे ? । तळहात काय झेप घे- । आपणाचिवरी ? ॥७७॥
सूर्यचि सूर्यासी तेजाळे ? । फळ काय स्वयें फळे ? । की हुंगावे परिमळें । परिमळासीचि ? ॥७८॥
चराचरासी पाणीपाजणी । करिता येईल एकेक्षणी । परि पाण्यासी पाणी । पाजिता येई का ? ॥७९॥
तीनशेसाठ दिवसात काय । ऐसा एक तरि दिन होय- । की जो सूर्यासि सूर्य । डोळ्यां दावी ? ॥८०॥
कृतांत जर कोपेल । तर त्रैलोक्य हे जाळील । परि आग आगीसी लावील- । आग काय ? ॥८१॥
आपण आपणासि स्वयें । सामोरे देखावे । तरि दर्पणावाचुनि काय आहे । साधन ब्रह्मदेवाही ? ॥८२॥
दिठी दिठीत शिरू पाहे । रुचि रुचीस चाखू जाये । जागृता जागे करिता ये- । हे नच होय जैसे ॥८३॥
चंदन स्वयेंचि चंदन चर्ची । रंग रंगवी स्वतःसीचि । मोती मोत्यांसि लेववी मोतीचि । हे कैसे व्हावे ? ॥८४॥
सोनेचि कस लावी सोन्यासी । दीपचि प्रकाशी दीपासी । रसचि बुडी दे रसीं । हे कैसे घडावे ? ॥८५॥
शंकरें आपुल्या मुकुटावर । बैसविला शीतल चंद्र । परि चंद्रचि चंद्रा माथ्यावर । वाहू शके काय ? ॥८६॥
तैसा आत्मराज होय । केवल ज्ञानमात्रचि भरीव । आता ज्ञानासी कैसा वाव । उराउरी भेटण्या ज्ञाना ? ॥८७॥
आत्मा ज्ञानरूप असल्याने । स्वतःसीचि न जाणे । डोळ्यांनी स्वतःसीचि पाहणे । दुर्घट जैसे ॥८८॥
आपणातचि आपणा । पाहू शकेल आयना । तरचि आपुल्या ज्ञाना । आत्मा जाणू शके ॥८९॥
दिगंतापार झेपावे तरी । तेथ रुरेचि सुरी । परि काय चिरी । अंग स्वतःचे ? ॥९०॥
विविध रसांचे ज्ञानें । जिव्हाग्र होय शहाणे । परि काय करावे, न जाणे- । आपणासचि चाखू; ॥९१॥
तरि जिभेने आपुले । चाखणे काय टाकिले ? । तैसे नव्हे, संचले- । तेचि तेथ की ॥९२॥
तैसा आत्मा सच्चिदानंद । आपला आपण सिद्ध । आता काय देई शब्द । तयाचेचि तया ? ॥९३॥
कोण्याही प्रमाणाचे साहाय्य । ब्रह्म घे ना न घे आपणास्तव । जे स्वयेंचि स्वयंसिद्ध होय । तेथ घेणे न घेणे निरर्थचि ॥९४॥
ऐसा आत्म्यासि आत्मलाभ देउनिया । शब्द शोभे नांदवुनी तया । ऐसा कोणा न लाभावा । बोध येथ ॥९५॥
माध्यान्हीची दिवली । ना तम नाशी, ना प्रकाश उजळी । तैसी दशा शब्दा आली । दोही प्रकारे ॥९६॥
आता अविद्या जर नसे । तर तिज नाशणे ते कैसे ? । आत्मा तर स्वयंसिद्धचि असे । मग कोणे सिद्ध करावा वृथा ? ॥९७॥
ऐसा उभयपक्षी । आधारा न लाभुनी नखी । शब्द हरपला, प्रळ्योदकीं । ओघ जैसा ॥९८॥
आता शब्दा स्थान काही । असणे आत्म्याचे ठायी- । हे कोण्याही अर्थे नाही । निश्चितचि ॥९९॥
बागुलबुवा आला म्हणणे । हे व्यर्थ जैसे बोलणे । अथवा तळहातीं आकाश लोंबणे । हेही तैसेचि ॥१००॥
तैसे शब्द डामडौलासहित । निरर्थक होऊनि शोभत । जसे रंगलेप चढत । रंगावरी ॥१०१॥
शब्दचि ज्यांची जीवने । ती बापुडी ज्ञाने-अज्ञाने । साच होती, वने- । चित्रींची जैसी ॥१०२॥
हा शब्द निमाला । महाप्रलय हो सरला । अभ्रासवे गेला । दुर्दिन जैसा ॥१०३॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP