अमृतानुभव - ज्ञानखंडन

अमृतानुभव हा ज्ञानेश्वरांना ज्ञानेश्वरी लिहून झाल्यावर आलेला अनुभव आहे.


तैसे आमुचे नावें । अज्ञानाचे ज्ञानही नव्हे । आम्हासाठी गुरुदेवें । आम्हाचि केले ॥१॥

परि आम्हासाठी आम्हीचि ऐसे । हे पाहू जावे कैसे ? । काय करावे, पाहणेहि जैसे- । लाजे येथ ॥२॥

गुरुरायें हे येथपावत । नांदविले आनंदात । की आम्ही न समावत । आम्हामाजी ॥३॥

आत्मपणें न मर्यादित व्हावे । देहज्ञाना न स्पर्शावे । दुजेपणें अंगीं न राहावे । कैवल्यही ॥४॥

आमुच्या करू शके गोष्टी । ऐसी झालीचि नाही वाक्‌सृष्टी । आम्हा देखू शकेल दृष्टी । ऐसी दृष्टीचि नाही ॥५॥

आम्हा विषय करून । वेगळे भोगू शके कोण ? । जर आमुचे आम्हीपण । आम्हीही न देखावे ? ॥६॥

प्रकटणे लपणे न होई । हे नवल नसे येथ काही । परि असणे कैसे तेही । कळे क्वचितचि ॥७॥

किंबहुना श्रीनिवृत्तिनाथ । ठेविती आम्हा ज्या अवस्थेत । ती काय देऊ करात । वाचेचिया ? ॥८॥

तेथ सामोरे व्हावया ऐसे । अज्ञानाचा काय पाड असे ? । मरता माया काय दिसे । पुन्हा जन्मून ? ॥९॥

अज्ञानचि न शिरत । कदापि ज्या गावात । ज्ञानाची गोष्ट तेथ । कोण जाणे ? ॥१०॥

रात्र होता दिवे- । लागतीचि की लावावे । परि लाविले सूर्यासवे । तर शिणणेचि होय ॥११॥

म्हणोनि अज्ञान नाही । त्यासवेचि गेले ज्ञानही । आता उघडझाप दोन्हीही । तयांची सरली ॥१२॥

एरवी तरि ज्ञान-अज्ञाने । दोहींची अभिधाने । अर्थाचे वेगळेपणें । विस्तारिली ॥१३॥

जैसी दांपत्यांनी परस्परांची । तोडूनि पालटावी शिरेचि । तर पालट ना, परि दोहींची । सरती आयुष्ये ॥१४॥

पाठी जो लावावा । तो दीपचि वाया जावा । दिठीने अंधार पाहावा । तर तीचि वृथा ॥१५॥

आता जे न जाणणे । ते अज्ञान शब्दें बोलणे । आता सर्वही समजे जेणे । ते अज्ञान कैसे ? ॥१६॥

ऐसे ज्ञाना अज्ञाना झाले । अज्ञान ज्ञानें गेले । दोन्ही एकमेकांमुळे । वांझ झाली ॥१७॥

आणि जाणे तोचि न जाणे । न जाणे तोचि जाणे । आता कोठे असे जिणे । ज्ञाना अज्ञाना ? ॥१८॥

ऐसे ज्ञान-अज्ञान दोन्ही । दिवस-रात्र पोटीं घालुनी । उदयला गगनीं । चित्सूर्य हा ॥१९॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP