अमृतानुभव - अज्ञानखंडन

अमृतानुभव हा ज्ञानेश्वरांना ज्ञानेश्वरी लिहून झाल्यावर आलेला अनुभव आहे.


एरवी अज्ञान जर नसते । तर ज्ञानाचे स्फुरण ते । कानाखालीच राहिले असते । दडोनिया ॥१॥

अंधाराचे आश्रयें । काजवा तेज मिरवे । अज्ञान तैसे मिथ्यात्वें । अनादि होय ॥२॥

स्वप्नींचि महिमा स्वप्नासी । अंधारींचि मान तमासी । तैसी थोरवी अज्ञानासी । अज्ञानींचि ॥३॥

मातीचे घोडे न येती- । पळविता रिंगणावरती । शृंगारा उपयोगी न होती । जादूची लेणी ॥४॥

अज्ञान आत्मज्ञानाचे घरात- । खोविता भिन्न न दिसत । काय उठती चांदण्यात- । मृगजळलहरी ? ॥५॥

आणि हे जे म्हणती ज्ञान । तेचि दुजे अज्ञान । काय एकासि झाकून । दुज्या न दाविती ? ॥६॥

असो आता ही प्रस्तावना । आधी धुंडाळू अज्ञाना । मग त्याचि न्यायें ज्ञाना । लटिके मानू ॥७॥

ज्ञानरूप आत्म्याठायी । अज्ञान अंगें नांदत राही । ऐसे जर असे काही । तर का न झाकी ज्ञाना ? ॥८॥

जेथ असे अज्ञान । तेथ सर्वचि अजाणपण । ऐसाचि स्वभावगुण । अज्ञानाचा ॥९॥

शास्त्रमत जर ऐसे की । आत्माचि अज्ञान हे ठाउकी । आणि तेचि तया झाकी । तयाचे आश्रयें; ॥१०॥

मग न जन्मता दुजेपणे । अज्ञानचि असे बीजरूपाने । तर तेचि असे हे समजणे । कोणा येथ ? ॥११॥

अज्ञान तर स्वतःसीचि । जडपणें न जाणे निश्चितचि । प्रमाणासी प्रमाणचि । सिद्ध न करी ॥१२॥

म्हणोनि अज्ञान स्वतःसि जाणून । करुनि घेईल आपुलेचि ज्ञान । हे म्हणता घ्यावे लागे मौन । विरोधाभासें ॥१३॥

आणि ज्या ज्ञानाचे आश्रयें । हे अज्ञान राहे । जर ते ज्ञानासि जाणवे । तर ते ठरे मूर्ख ॥१४॥

स्वभावें अज्ञान जाणा । झाकी आश्रयस्थाना ते आत्म्याठायी व्यक्त होत ना । तर अज्ञान कैसे म्हणावे ? ॥१५॥

भरले आभाळ सूर्यासि ग्रासे । तर आभाळा कोण प्रकाशे ? । सुषुप्तीतचि निद्रिस्त नाशे । तर निद्रेसि प्रकाशी कोण ? ॥१६॥

तैसे अज्ञान असे जेथे । तेचि जर अज्ञान होते । तर अज्ञान अज्ञानाते । न जाणता गेले ॥१७॥

नातरि अज्ञान एक असे । हे ज्या ज्ञानायोगे कळतसे । ते स्वये अज्ञान नसे । कोणेही काळी ॥१८॥

डोळ्यावरि सारा येई । आणि डोळा आंधळा नाही । हे म्हणणे ठायी ठायी । पोकळचि की ॥१९॥

इंधनीं प्रगटला अग्नी । आगीने खवळुनी । परि जाय लाकडा न जाळुनी । तर व्यर्थचि ती शक्ती ॥२०॥

अंधार कोंडूनि भरला घरी । परि तो काळोख न करी । तर अंधा-र या अक्षरीं । न म्हणावा की ॥२१॥

नाशू न देई जागणे । तिज निद्रा कोण म्हणे ? । दिवसासी न आणी उणे । ती रात्र कैसी ? ॥२२॥

तैसे आत्म्याठायी अज्ञान इतुके । तरि आपुल्या ज्ञाना न मुके । तर अज्ञान या शब्दा लटिके । म्हणावे लागेचि की ॥२३॥

एरवी तरि आत्म्याठायी । अज्ञान असावयाही । कारण आहे म्हणता काही । न्याय्य न होय ॥२४॥

अज्ञानतम दाटूनिही । आत्मा प्रकाशाची खाण ही । आता कैसे होई । दोहोंचे मीलन ॥२५॥

स्वप्न आणि जागर । आठव आणि विसर । ही युग्मे चालती जर । एके हारीने ॥२६॥

शीत ताप एकवट । वस्तीची धरिती वाट । तम बांधी मोट । सुर्यरश्मींची ॥२७॥

वा दिवस आणि रात्र । राहण्या येत एकत्र । तरचि अज्ञानाचे जिवावर । जगे आत्मा ॥२८॥

हे असो, जन्म आणि मरण । हे शोभे मेहुण । तरचि आत्म्याचे असतेपण । अज्ञानासह ॥२९॥

आत्मज्ञानें नष्ट होय । तेचि नांदे आत्म्यासह । ऐसे विरुद्ध कायकाय । बोलणे हे ॥३०॥

अहो, अंधःकार पैजेवर । त्यागूनिया अंधार । तेज झाला तर । तो सूर्यचि निःसंशय; ॥३१॥

लाकूडपण टाकिले । आणि अग्निरूप धरिले । तेव्हा तेचि इंधन झाले । आगीसी की; ॥३२॥

अथवा गंगेसि पावताक्षणीं । वेगळेपण सोडुनी । तेथ मिळे तेव्हा पाणी- । गंगाचि होय; ॥३३॥

तैसे हे नाही । तर सकळ आत्माचि होई । एरवी आत्मत्वीं । असेचि जडलेले ॥३४॥

अज्ञान विरुद्ध आत्म्याशी । म्हणोनि नुरेचि तयापाशी । आणि वेगळेही सिद्धीसी । जाईचिना ॥३५॥

लवणाची मासोळी । जिवंत जरि असली । तरि जळीं वा जळावेगळी । न जगे जैसी; ॥३६॥

अज्ञान येथ नोहे । परिपूर्ण आत्माचि आहे । म्हणोनि बोलणे नच ऐकावे । व्यर्थ ऐसे ॥३७॥

दोरामुळे सर्पाभास होई । तो सर्प त्या दोरे बांधिताहि येई-  । वा तया घालविणेही- । न होय ज्यापरी: ॥३८॥

अथवा अंधार पुनवेचे वेळे । दिनभयें रात्रीकडे वळे । तोंचि तया गिळे । चंद्र जैसा; ॥३९॥

तैसा उभयपरींनी पाहता । अज्ञान शब्द होय वृथा । केवळ तर्कावाचुनि हाता । उरे न स्वरूपें ॥४०॥

तर अज्ञानस्वरूप कैसे । कार्यीं अनुमान होतसे । की प्रत्यक्षचि दिसे । ते धुंडाळू आता ॥४१॥

अहो, प्रत्यक्षादि प्रमाणांवर । करावा जयाचा स्वीकार । ते अज्ञानाचे कार्य खरोखर । अज्ञान नव्हे ॥४२॥

जैसी अंकुरापासुनि सरळ । वेली दिसे वेल्हाळ । ती बीज नव्हे, केवळ- । बीजकार्य होय; ॥४३॥

वा शुभाशुभ स्वरुपांत । स्वप्न दृष्टीसी प्रकट होत । ती नीज नव्हे तेथ । पोरटे निद्रेचे की; ॥४४॥

अथवा चंद्र एक असे । तो व्योमीं दुणावला दिसे । ते दृष्टिदोषाचे कार्य जैसे, । दृष्टिदोष नव्हे; ॥४५॥

तैसे ज्ञाता ज्ञान ज्ञेय । हे जे असे त्रय । ते अज्ञानाचे कार्य, । अज्ञान नव्हे ॥४६॥

म्हणोनि प्रत्यक्षादिकही । अज्ञानकार्ये जी वेचक ही । करणे अज्ञानग्रहण त्यांकरवी । होणे नसे ॥४७॥

अज्ञानाच्या कार्यावरुनी । अज्ञानसिद्धि पहावी करोनि । तर ती गृहीतेही, करणी- । अज्ञानाचीच ॥४८॥

स्वप्नीं दिसे ते स्वप्न तर । पाहणारा काय होय इतर ? । कार्यचि अज्ञान जर । केवळ तैसे; ॥४९॥

तर चाखिला गूळ गुळें । माखिले काजळचि काजळें । वा सुळीं दिले सुळें । सुळालाचि; ॥५०॥

कारणाभिन्नपणें तैसे । कार्यहि अज्ञान होतसे । तर ते अज्ञानचि मग कैसे । कोणे ग्रहण करावे ? ॥५१॥

आता घेणारा, घ्यावयाचे ऐसे । विचार आणू नये मानसें । नातर साच भासतिल मासे । मृगजळींचेही ॥५२॥

तर प्रमाणाचिया मापातही । जे न सापडे बापासीही । तयात आणि आकाशुपुष्पातही । अंतर काय ? ॥५३॥

मग हे प्रमाणाचि नुरवी । तर आहे हे कोण प्रस्तावी ? । जाणावे बोलें याही । अज्ञानाचे लटिकेपण ॥५४॥

ऐसे प्रत्यक्ष अनुमान । या प्रमाना पात्र न ठरून । जाहले अप्रमाण । अज्ञानही ॥५५॥

स्वकार्या न प्रसवी । जे कारणही न होई । ‘मी अज्ञान’ म्हणण्या घाबरेही । ते साच कैसे ? ॥५६॥

आत्म्यासी अज्ञान ते । स्वप्न दावू न शकते । आणि तया जेथल्या तेथे । निजवूही न जाणे ॥५७॥

हे असो, आत्मा ज्यावेळी । आत्मपणेंचि असे सर्वकाळी । तेव्हाही त्या मेळीं । अज्ञान असे ॥५८॥

जैसे न करिताहि मंथन । काष्ठीं असे स्थान- । तमनाश- दहन-पचन- । सामर्थ्याचे ॥५९॥

तैसे आत्मा ऐसे नाव । न साहे आत्म्याचे स्वत्व । तर काय अज्ञानाची हाव । धरील  ते ? ॥६०॥

काय दीप न लाविता । काजळी ये झाडित ? । की वृक्ष न उगवत । छाया त्यागिता ये ? ॥६१॥

वा न जन्मल्या देहाही । काय उटणे लाविता येई ? । की आरसा न घडविताही । पुसता येई ? ॥६२॥

आणि कासेतील दुधावर । साय आधीचि असे जर । तर ती काढया बुद्धीने सत्वर । काय युक्ति योजावी ? ॥६३॥

आत्मा ज्ञानमात्र होय । विशेष जाणीवांसीहि जेथ न ठाव । तर अज्ञान काय । वसे तेथ ? ॥६४॥

म्हणोनि तेव्हाहि अज्ञान नव्हते । हे सहजी आकळलेचि पुरते । आता उगा काय ते । नाही म्हणावे ? ॥६५॥

ऐसा आत्मा अलिप्त जेव्हा । भाव-अभावांपासूनिया । अज्ञान असे तेव्गा । तर ते ऐसे ॥६६॥

घटाच्या नसलेपणाचेहि किती- । फुटोनि तुकडे होती । किंवा सर्वपरींनी अंतीं । मृत्यूसी मारावे जैसे; ॥६७॥

नीज आली निजेसी । मूर्च्छा आली मूर्च्छेसी । अंधार भेटला अंधारासी- । अंधार्‍या आडात; ॥६८॥

वा अभाव अवघडला । केळीचा गाभा मोडला । की आसूड कडकडला । आकाशाचा; ॥६९॥

निवर्तलेल्यासि घातले विष । मुक्याचे बांधले मुख । अथवा न लिहिता लेख- । पुसला जैसा; ॥७०॥

तैसे अज्ञान स्वयें अस्तित्व- । भोगी, हेचि मिथ्यात्व । आता तर सर्वथैव । ब्रह्मचि होऊनि असे ॥७१॥

वांझेची कैसी प्रसूती होय ? । भाजले बी अंकुरे काय ? । की पाहील कधी सूर्य । अंधाराते ? ॥७२॥

चोख चिन्मात्रीं ठायी ठायी । घेतला अज्ञानाचा झाडा कितिही । तरि शोधाबोधा काही । येईल का ? ॥७३॥

जर सायीचे वांछेने खरे । ढवळिले दुधाचे पात्र पुरे । तर ती दिसे की विघरे ? । तैसेचि हे होय ॥७४॥

नीज धरावया कोणी । उठे जागृत होउनि । तर ती लाभे, की झणी- । नाहीशी होय ? ॥७५॥

पाहावया अज्ञानाते । हे अंगीं पिसे कवणाते ? । न पाहता आपोआप ते । न पाहणेचि की ॥७६॥

ऐसे कोणत्याही प्रकारे । अज्ञानभावाचे किरण खरे । न शिरतीचि पुरे । नगरीत विचारांच्या ॥७७॥

अहे, कोणेही वेळे । आत्म्याठायी वा वेगळे । विचारांचे डोळे । देखतीचि की अज्ञाना ॥७८॥

विचार तोंड न लावी । न ऐके प्रमाण स्वप्नींही । आणि निश्चितचि ते नाही । आत्म्याहुनि वेगळे ॥७९॥

इतके असूनिहि सांग । कैसा कळावा अज्ञानाचा माग ? । कैसा लागावा थांग । अज्ञानाचा ? ॥८०॥

अवसेचे चंद्रबिंब । सजवी सभेचे खांब । तेथ उभारिले स्तंभ । सशाच्या शिंगांचे; ॥८१॥

आकाशपुष्पांच्या माळा । वांझेच्या पुत्राचिया गळा- । घालुनी तो सोहळा । साजरा केला; ॥८२॥

आणूनि कासवीचे तूप । भरू आकाशाचे माप । तरचि साच होती संकल्प । ऐसे ऐसे ॥८३॥

आम्ही पुन्हापुन्हा किति सांगावे ? । आणि अज्ञान सिद्ध करावे ? । ते नाही म्हणोनि वटवटावे । किती काळ ? ॥८४॥

म्हणोनि अ-ज्ञा-न ही मिथ्या अक्षरे । शिणावे न त्यांचे उच्चारें । परि अन्य एक स्फुरे । याविषयी ॥८५॥

आपणा वा आणिकाते । देखोनि व्हावे देखत । ऐसे नव्हेचि, स्वभावें ते । आत्मतत्त्व ॥८६॥

तरी ते आपल्यापुढे । जगत-दृष्य पसरे एवढे । आणि आपणचि केवढे । करी द्रष्टेपण ॥८७॥

जेथ आत्मभानाचे साकडे । तेथ उद्‌भवे हे एवढे । आणि उद्‌भवले ते रोकडे । देखतचि असे ॥८८॥

अज्ञान जरि न दिसेही । तरि आहे यात अन्य नाही । यास्तव दृश्याचे अनुमानही । प्रमाण झाले ॥८९॥

नातरि चंद्र एक असे । तो व्योमीं दुणावला दिसे । तर डोळ्यांचाचि दोष, ऐसे । मानिता ये की ॥९०॥

भूमीवाचुनि झाडे सारी । पाणी घेती कोणाकडुनि तरी ? । कोरडी दिसती बुडे, परी । झाडे साजिरी; ॥९१॥

परि भरवशाने मुळे । पाणी घेती, हे न ढळे । तैसे अज्ञान कळे । दृश्य जगतायोगें ॥९२॥

जागे होता नीज जाई । निद्रिता तर ठाउकी नाही । परि स्वप्नाचे अस्तित्वें म्हणता येई । आहे हेही ॥९३॥

चोख वस्तुमात्रीं म्हणून । दृश्य दिसे एवढे प्रकट होऊन । तर आत्मत्वीं गाढ अज्ञान । ऐसे सुखें म्हणू ॥९४॥

अहो, ऐशा ज्ञानाते । अज्ञान म्हणावे कैसे ते ? । काय दिवसनाथ करी तयाते- । अंधार म्हणावे ? ॥९५॥

चंद्राहूनि उजळ । वस्तू झाली धवल । तयाते काजळ । म्हणावे का ? ॥९६॥

अग्नीचे पाणी । पूर्णत्व जर आणी । तरचि विश्व अज्ञानातुनी । विस्तारले मानू ॥९७॥

षोडषकलापूर्ण चंद्रास । जर आणवूनि भेटवी अवस । तरचि ज्ञान, अज्ञान या नामास- । पात्र होईल ॥९८॥

अहो, वर्षोनि लोभें । विष का अमृत दुभे ? । वा दुभे, तरि जे लाभे- । तया विषचि की म्हणावे ॥९९॥

तैसा ज्ञानाचा व्यवहार । जेथ ओसंडे समोर । तेथ अज्ञानाचा पूर । आला कोठून ? ॥१००॥

तया अज्ञान हे नाव । तर ज्ञान म्हणावे ते काय ? । अथवा जे काही होय- । ते आत्माचि नव्हे का ? ॥१०१॥

काहीचि जया न होणे । आहे ते स्वतःसि न जाणे । शपथा घेती प्रमाणे । शून्याच्याचि ॥१०२॥

आहे म्हणावयाजोगे आहे । परि न आचरे अंगें काही हे । परि नाही हेही जोडावे । नच लागे ॥१०३॥

कोणाचेही असण्यावाचुनि असे । कोणी न देखताहि दिसे । सर्वत्र ज्ञानरूप आत्मवस्तु असे । मग कायसे हरपलेपण तिज ? ॥१०४॥

मिथ्यावादाचा आरोप येई । तोही निवांतचि साही । फिरविली विशेषभावांसीही । पाड जयाने ॥१०५॥

जो प्रलयनिद्रा देखे । तो सर्वज्ञ एवढा कैसे चुके ? । दृश्यस्थितीसी न ठाके । परी जो की ॥१०६॥

वेद काय काय बोलेही । परि आत्म्याचे नाव न घेई । सिद्ध केले न काही । जयाने ऐसे ॥१०७॥

कोणा न प्रकाशे सूर्य ? । परि तये आत्मा दाविला काय ? । ऐसी ही आत्मवस्तु होय । की गगनें व्यापिताहि उरे ॥१०८॥

देह हाडांची मोळी । मी म्हणोनि कवटाळी । तो अहंकार गाळी । ब्रह्मवस्तुसि या ॥१०९॥

बुद्धि जाणण्यात चतुर असे । परि ब्रह्मवस्तुसि चुकतसे । मन संकल्प देखतसे । यावाचुनि अनेक सर्व ॥११०॥

तोंडे घासती बरडमाळावरी । विषयांच्या जावोनि आहारी । घेऊ न शकती गोडी खरी । इंद्रिये याची ॥१११॥

परि नाहीपणासकट । खावोनि ज्याचे भरे पोट । ते ब्रह्म परमश्रेष्ठ । प्राप्त होय कोणा ? ॥११२॥

जो स्वतःसि विषय न होत । तया कोण देखत ? । जिव्हा चाखू न शकत । स्वतःसि जैसी ॥११३॥

अनेक नावे पुढे करित । ब्रह्मासमोरी ठाकत । परि तेथ येताचि भीअ । अविद्या ही ॥११४॥

म्हणोनि पाहण्यासी मुख । न उपजे भूक । मग काही आणिक । शिरेल कैसे ? ॥११५॥

जुगार्‍याचे वादीचे ते कोडे । घालिताचि काही बाहेरी पडे । तैसा निर्णय व्यर्थ घडे । केलेला येथ ॥११६॥

आपादमस्तक पडली । ओलांडू पाहे छाया आपुली । तयाची भरकटली । बुद्धि जैसी; ॥११७॥

तैसे सर्वथा ठणकावून । उपमांनी करी वर्णन । तया न होय आकलन । ब्रह्म जे ॥११८॥

आता आंगावे कैसे काही ? । शब्दव्यवहार जेथ नाही । तेथ दर्शना द्वैत पाही । काय बोध आणी ? ॥११९॥

आत्मतत्त्वाविषयी जे आंधळे । ते सच्चिदानंद आत्मस्वरुपामुळे । पाहू शकती तयांचे डोळे । आत्मस्वरूपासी ॥१२०॥

आपुलेचि द्रष्टेपण । उमजू न शकत आपण । द्र्ष्टेपन वाहुनिहि आण- । सोडिला असता ॥१२१॥

कोण कोण भेटे तेथे ? । दिठी कैसी उपजते ? । ऐक्यभावही जेथे । आटोनि गेला ॥१२२॥

एवढे हे साकडे । जयाने सारुनि एकीकडे । उघडली कवाडे । प्रकाशाची ॥१२३॥

दृश्यांचिया सृष्टी । आणि दुष्टीवरी दृष्टी । उपजताचि तळवटीं । चिन्मात्रचि ॥१२४॥

दर्शनसमृद्धी बहुत । निर्मिता चैतन्य रमत । न देखे शिळ्या आरशात । विषयरत्नाच्या ॥१२५॥

क्षणोक्षणी नित्य नवी । दृश्याची वस्त्रे बरवी । वेढवी दिठीकरवी । उदार जो ॥१२६॥

मागल्या क्षणीचि अंगे । पारोशी म्हणोनि वेगें । सोडूनि दृष्टि रिघे । नव्या रूपीं ॥१२७॥

तैशीच प्रतिक्षणीं । जाणिवेची लेणी । लेवोनिया आणी । जाणतेपणा ॥१२८॥

त्या परमपदींचे एकपण । न देई समाधान । आणि एक मी बहु होईन । ऐसा ध्यास घेई ॥१२९॥

सर्वज्ञतेची परी सगळी । विलसे चिन्मात्रमुखीं अगळी । परि ती अन्य स्थळीं । जाणवेना ॥१३०॥

जेथ ज्ञान-अज्ञान लय पावे । तो आत्मा दिठी फाकवे । दृश्यपणे भेटीसी ये । आपुलिया ॥३१३॥

ते दृश्य क्षणैक देखे । देखल्याने स्वयें तोषे । तोंचि ते दाटे सुखें । दिठीचे मुखीं ॥१३२॥

तेव्हा देणे घेणे घडले वाटे । परि ऐक्याचे सूत न तुटे । मुखासि मुख भेटे । जैसे की दर्पणें दाविले ॥१३३॥

उभ्याउभ्याचि निजणे । उभाचि जागेपणें । त्या अश्वाऐसी घेणे-देणे । चैतन्य न डहुळता ॥१३४॥

पाणी लहरींचे मिषें । स्वतःवरिचि आंदोळे जैसे । आत्मा आत्मा आत्मत्वासवे तैसे । खेळण्या ये सुखें ॥१३५॥

अग्नीने ज्वाळांची माळ ॥ लेइताहि काय अनक । भेदांचे खळगे सकळ । उडी घेण्या शोधी ? ॥१३६॥

रश्मींचे थोर परिवारें । सूर्यासि वेढिले पुरे । तर तयासि दुसरे । म्हणता ये काय ? ॥१३७॥

चांदणे बहुत पडे । चंद्रावरी पहुडे । तर काय एकत्वा नडे । बाध तया ? ॥१३८॥

पाकळ्या सहस्त्रवरी तेथ । आपुल्यापरीने उमलोत । परि भास नाही कमळात । अन्य कमळाचा ॥१३९॥

बाहुटे होते सहस्त्रवरी । अर्जुनरायाचे अंगावरी । मग तो काय तरी । एकसहस्त्र एकावा ? ॥१४०॥

ताण्याबाण्यावरी मागाचे । बहुत पुंज सुताचे । परि तंतूवाचुनि काय नाचे । तेथ दुजा भाव ? ॥१४१॥

मेळावा शब्दांचा जरी । जमला वाचेच्या घरी । वाचा एकचि परी । आहे तेथ ॥१४२॥

तैसी दृश्ये अगणित । दृष्टिचे उमाळे अनंत । परि द्रष्टेपण उपजत । परमात्म्यासीचि एका ॥१४३॥

फोडिता ढेपेतिल गूळ । खडे पडती पुष्कळ । परि तो सकळ । गूळचि की ॥१४४॥

तैसे हे दृष्य देखावे । की बहु होऊनि फाकावे । परि परमात्माचि तो, नव्हे- । भेद तेथ ॥१४५॥

त्या आत्म्याची भाषा । तेथ न पडेचि दुजी रेषा । जरि विश्व अशेष ऐशा । नामरूपें भरले ॥१४६॥

वस्त्रे गंगाजमनी दुरंगी । दिसती धवल, नानारंगी । तर तितुकी रंगीबेरंगी । काय सुते असती ? ॥१४७॥

पाणण्यांची मिठी । न उकलिता दिठी । अवघीचि सृष्टी । दिसेल जर; ॥१४८॥

अथवा न फुटता अंकुर । बीजातचि होय वटविस्तार । उपमा लाभेल तर खरोखर । या अद्वैतविस्तारा ॥१४९॥

मग मी न देखावे मजसी । उत्कट हाव उपजता ऐसी । आपुल्या अंगाचेचि शेजेसी । विसावणे जे ॥१५०॥

जैसी पापण्यांची मिठी । पडताचि दिठी । आपुल्याचि पोटीं । शिरोनि राही; ॥१५१॥

उदया न ये सुधाकर । तोवरी स्वतःठायीचि सागर । कासव ज्यापरी अवयवविस्तार । आवरी स्वतःतचि ॥१५२॥

अथवा अवसेचे दिवशी । सतराव्या कलेचे अंशीं । स्वतःतचि शशी । शिरे जैसा; ॥१५३॥

नामरूपात्मक दृश्या तैसे । आत्मा सामावुनि घेतसे । तयाचेचि नाव असे । स्वरूपस्थिती ॥१५४॥

स्वयेंचि आघवे आहे । तर कोण कोणा पाहे ? । ते देखणोचि आहे । सरूपनिद्रा ॥१५५॥

वा न पाहणेपणासि उबगत । म्हणे मीचि मज पाहत । आपोआप विषय होत । आपणचि आपणा ॥१५६॥

जे अनादीचि दृश्यपणे । अनादीचि देखणे । ते आता काय कोणे । रचू जावे ? ॥१५७॥

गगना आकाशासी । पवना स्पर्शासी । सूर्यनारायणा दीप्तीसी । काय जोडू जावे ? ॥१५८॥

विश्वपणें उजाडे । तरी विश्व देखे पुढे । तो नाही तरी तेवढे । अभावासहित पाहे ॥१५९॥

विश्व आहे-नाही । निमाल्या स्थिती दोन्हीही । तरी ब्रह्मचैतन्यस्थिती ही । देखतचि असे ॥१६०॥

कापुरीं धवलता आहे । परि तो चांदणेमाखिला नोहे । आपुल्याचि ठायी पाहे । ते तयाचे देखणे जैसे ॥१६१॥

किंबहुना कोणत्याहि अवस्थेत । विश्वाच्या भावअभावात । ब्रह्मवस्तु असे देखत । स्वतःसीचि ॥१६२॥

मनोरथांची देशांतरे । मनी प्रकाशूनि नरें । मग तेथ प्रेमभरें । हिंडावे जैसे; ॥१६३॥

पाहता डोळा दाबुनि, तार्‍याऐसे- । प्रकाशाचे चक्र दिसे । डोळ्यासीचि जणु डोळा देखतसे । यात विस्मय काय ? ॥१६४॥

तैसे एक चिद्रूप । आपणचि देखे आपुले रूप । द्रष्टा-दृश्य हा आरोप । काशासि मग ? ॥१६५॥

अहो, प्रभेचे पांघरूण । घाली रत्नासी कोण ? । सोने लेई कोठूनि सोनेपण । काय जोडजोडूनी ? ॥१६६॥

काय चंदन सौरभ वेढी ? । काय अमृत अमृता स्वतःसीचि वाढी ? । की गूळ चाखे स्वतःचीचि गोडी । ऐसे असे हे ? ॥१६७॥

की प्रभेचे उजाळें । कापुरा पूट दिधले । तावून ऊन केले । आगीसी काय ? ॥१६८॥

अथवा जणु लता । देहवेल गुंडाळिता । घर करीत करिता । ज्यापरी की; ॥१६९॥

की प्रभेने उभारिले । दीप प्रकाशें संचले । तैसे चैतन्यें व्यापिले । चिद्रूप स्फुरे ॥१७०॥

ऐसे आपुलेचि निरीक्षण । करावे आपण । या संकल्पाविण । करितचि असे ॥१७१॥

हे देखणे न देखने । हा अंधार, हे चांदणे । ऐसे चंद्रा अधिक-उणे । काही दिसे काय ? ॥१७२॥

म्हणोनि जगत्-विलासा आवरावे । ऐसे तयाने करू पहावे । तरि तैसाचि तो स्वभावें । स्वतःसिद्धचि असे ॥१७३॥

द्रष्ट-दृश्य ऐसे । दोनपणे दिसे अल्पसे । तेही परस्परप्रवेशें । काही न राहे ॥१७४॥

तेथ दृश्य द्रष्ट्‌यात भरे । द्रष्टेपण दृश्यीं सरे । मग दोन्ही न होऊनि उरे । दोहींचे साचपण ॥१७५॥

मग कोठेही केव्हाही साची । द्रष्ट-दृश्यातिल दर्शनाची । आटणी करिताक्षणींचि । भेटती दोन्ही ॥१७६॥

अग्नी कापुरीं प्रवेशे । वा कापूर अग्नीत जातसे । दोन्हीही नाशे । एकेचि काळी ॥१७७॥

एकतुनि एका काढिले । शून्यासि शून्यें पुसिले । द्रष्ट-दृश्य निमाले । हे तैसे होय ॥१७८॥

वा बिंबा-प्रतिबिंबाची गाठ पडत । प्रतिबिंब नाहीसे होत । बिंबत्वाचा आरोप ठारे व्यर्थ । त्यासरशीचि; ॥१७९॥

रुसता दृष्टी तैसी । द्रष्टा-दृश्य येती भेटीसी । तेथ मिठी पडे सहजशी । दोहींचीही ॥१८०॥

पूर्व-पश्चिम समुद्र- । न मिळती, तोंवरिचि म्हणावे सागर । मग एकवटचि नीर । जैसे होई ॥१८१॥

बहुविध या त्रिपुटी असती । तयांची राहटी सहजचि ती । प्रतिक्षणीं काय तो स्मृती । ठेवी तयांची ? ॥१८२॥

द्रष्टा-दृश्य विशेष गिळिणे । निर्विशेष भावांसि उजळने । उघडझाप एका डोळ्याने । ब्रह्मवस्तूची ही ॥१८३॥

पापणीसी पापणी मिळे । तोंचि दृश्यत्वें अवघे पघळे । ती उघडता मावळे । नवल हे ॥१८४॥

द्रष्टा-दृश्यांचा ग्रास होतसे । मध्ये जी स्थिति विकसे । ती योगभूमिका वसे । चैतन्याचे अंगीं ॥१८५॥

उठला तरंग बैसे सहजे । दुसरा न उपजे । ऐशा ठायी निश्चित समजे । पाणी असे ॥१८६॥

की नीज सरोनि गेली । जागृति नाही उपजली । तेव्हा होय आपुली । स्थिति जैसी; ॥१८७॥

एका ठावावरुनि उठली । अन्यत्र नाही बैसली । ऐसी दृष्टी लाभली । तरचि हे उमगे; ॥१८८॥

मावळुनी सरला दिनराव । रात्रीचा न करी प्रस्ताव । त्या गगनें परमात्मभाव । वर्णिला हा; ॥१८९॥

घेतला श्वास बुडाला । उच्छ्‌वास नाही उठला । दोन्हीसी न शिवला । प्रान जैसा; ॥१९०॥

की अवघ्याचि इंद्रियांनी । विषयांची घेणी । करीत असता एके क्षणीं । जे काही आहे; ॥१९१॥

तयासारिखा ठाव । हा निकराचा आत्मभाव । येथ का लाभण्या संभव । पाहणे न पाहणे ? ॥१९२॥

आपुल्याचि ठायी आपण । आरसा आपुले निर्मळपण । पाहू शके, न शके, हे कोठून । जाणता येई ? ॥१९३॥

समोर की पाठमोरे । मुखा होता ये आरशासामोरे । परि मुख मुखासामोरे । आरशावाचुनि कैसे ? ॥१९४॥

सर्वांगें देखताहि सूर्य । कधी ऐसे घडे काय- । की स्वतःचेचि अस्त-उदय । स्वयें पाही ? ॥१९५॥

रस स्वतःसि पिउनि घेई । की तोंड लपवुनि राही ? । ऐसा रसाचा व्यवहार काही । तयाचे स्वरूपीं आहे ? ॥१९६॥

तैसे पाहणोहि न होय पाहणे । पाहणेपणेचि न जाणणे । आणि दोन्ही हे स्वयेंचि असणे । परमात्म्याने ॥१९७॥

तो ज्ञानरूप आहे । म्हणोनि स्वतःकडे न पाहे । आणि न पाहणेहि हे । स्वयेचि तो ॥१९८॥

आणि न पाहणे मग कैसे हे । नामरूपात्मक आपणासचि पाहे । तरि पाहणे हे आहे । आपणासचि पुन्हा ॥१९९॥

पाहणे न पाहणे हे दोन्ही । नांदती एके स्थानी । परस्परां बांधोनी । नाहीसे करिती ॥२००॥

म्हणोनि पाहणे न पाहणेही । दोन्ही ब्रह्मवस्तुपाशी नाही । तेणे ज्ञानमात्र वस्तूठायी । हे दोन्ही धर्म नसती ॥२०१॥

ऐसे पाहणे न पाहणे । यावाचूनि तयाचे असणे । अथवा पाहे, तर कोणे- । काय पाहिले ? ॥२०२॥

द्रष्टयाने दृश्य देखावे । तर देखिले ऐसे म्हणावे । परि आत्मा दृश्यायोगे द्रष्टा नव्हे । तो स्वयंप्रकाश असे ॥२०३॥

अनेकरूपात्मक दृश्य दिसे । तरि ते साचचि चैतन्यद्रष्टा असे । आता जे नाही ते कैसे । देखिले होय ? ॥२०४॥

मुख दिसे जरि दर्पणात । तरि असेचि ते मुखपणात । मग झाली ती व्यर्थ- । प्रतीती की ॥२०५॥

निद्रावशें जागृत स्वप्न पाही । प्रपंचरूपें स्वतःसीचि पाहत राही । तैसी ब्रह्मवस्तु दृश्यजगत्, द्रष्टा होई । स्वतःसीचि देखे ॥२०६॥

निद्रिस्त सुखासनीं । वाहिला जाय पालखीतुनी । तो काय साचपणी । तैसी सवस्था पावे ? ॥२०७॥

शिराविण कोणी एक ।  स्वप्नीं राज्य करी रंक । तैसे ते खरोखरीचे सुख । असे काय ? ॥२०८॥

निद्रा जेव्हा नसे । तेव्हा तो जैसा ज्या ठायी असे । परि स्वप्नीं काही तैसे । अनूभवा न ये ॥२०९॥

मृगजळ न भेटे जेव्हा । शीणचि केवळ तृषार्ता तेव्हा । मग ते भेटलेचि अथवा, । तर कोणा काय भेटले ? ॥२१०॥

वा सावलीचे रूपाने । मिळविली संगत जयाने । होय तयाचे करणे । वांझ जैसे; ॥२११॥

तैसे दृश्य करूनिया । दृश्याने द्रष्टयासि त्या । दावूनि धाडिले वाया । दाविलेपणही ॥२१२॥

जे दृश्य द्रष्टाचि आहे । मग दाविणे का साहे ? । दाविले तर तो नव्हे । द्रष्टा काय ? ॥२१३॥

आरशात न पाहे । तर मुख का वाया जाये ? । आणि आरशाविण आहे । तेही मुखचि की ॥२१४॥

तेवी आत्मा ऐसे आत्म्या । न दावीचि जर माया । तर आत्मा व्यर्थ, की वाया- । ती मायाचि ना ? ॥२१५॥

म्हणोनि न करवी स्वतःसि द्रष्टा । तो स्वयंसिद्ध त्या मूळपीठा । आता काय या जगत्‌दृश्यें द्रष्टा । सिद्ध करावा ? ॥२१६॥

दृश्याने पुन्हा दाविले । तर पुनरुक्त तेचि जाहले । आणि याही बोलें गेले । दाविणे वृथा ॥२१७॥

दोरीवरच्या सर्पाभासा । साच दोरचि की जैसा । द्रष्टा-दृश्यामाजी तैसा । द्रष्टाचि साच ॥२१८॥

कोणी दर्पणीं देखे । तर मुख दिसणे न चुके । परि मुखींचि मुख ठाके । दर्पणीं नव्हे; ॥२१९॥

तैसे द्रष्टा दृश्य या दोहोतही । आधार द्रष्टाचि होई । म्हणोनि दृश्य ते व्यर्थ जाई । देखिले जरी ॥२२०॥

मिथ्या जरि जाय म्हटले । तरि दिसतही आहे सगळे । होय या बोलें । आहे तैसेचि ॥२२१॥

जर कोणाते पुरे- । देखोनि होय देखणारे । तर मानिता ये खरे । देखिले ऐसे ॥२२२॥

देखोनि वा न देखोनी । एक वा ना होउनी । परि हा याचेवाचुनी । काय देखे ? ॥२२३॥

आरशाने जरि दाविले । तरि मुखचि मुखें देखिले । तो न दावी तरि संचले । मुखचि मुखीं; ॥२२४॥

तैसे दाविले नाही । तरि हाचि याचे ठायी । न दावी तरीही । हावि यास ॥२२५॥

जागृतीत देहस्मृती असावी । की निद्रेत नाहीशी व्हावी । कोणी एक आपुल्या ठायी । असेचि असे ॥२२६॥

रायासी तू राया- । ऐशा आणिले जरि प्रत्यया । तरि आपुल्या ठाया । तो राजाचि असे ॥२२७॥

राजेपण राजाचिया । जरि न आले प्रत्यया । तरि त्यामाजी काय तया । उणेपण असे ? ॥२२८॥

तैसे दाविता न दाविता । हा या दोहोंपरता । वाढेना, घटेना, आयता- । असतचि असे ॥२२९॥

तर दृश्यमिषें का हे पिसे ? । की हा स्वतःसी दावू बैसे । देखणारेचि नाही तर आरसे- । देखावे कोणी ? ॥२३०॥

दीप लावण्यार्‍यासी घडवी, । की तोचि दीपसिद्धी करवी ? । तैसी दृश्याची सिद्धि होई । आत्मसत्तेनेचि ॥२३१॥

वन्हीसी वन्हिशिखा । प्रकाशित करी देखा । परि वन्हीहुनि भिन्न का- । लेखता येई ? ॥२३२॥

दृश्य निमित्त जे म्हणावे । ते ह्यानेचि दिसोनि दावावे । देखिले तरि स्वभावें । दृश्यही हाचि ॥२३३॥

म्हणोनि स्वयंप्रकाशा ह्या । स्वतःसी देखावया । निमित्त स्वतःवाचोनिया । नाहीचि मग ॥२३४॥

कोणत्याही रीतीने जे दिसे । ते ह्याचेचियोगे होतसे । ह्याचेवाचूनि नसे । येथ काही ॥२३५॥

लेणे आणि सोने यात खरे । सोनेचि एक स्फुरे । तेथ काही दुसरे । नाहीचि म्हणोनि ॥२३६॥

जळ आणि तरंग दोहोतही । जळावाचुनि काहीचि नाही । म्हणोनि अन्य काही । नाही न होय ॥२३७॥

घ्राणाने अनुमान होवो । की हाती घेता येवो । अथवा दिठी पांहो । कैसेही असो; ॥२३८॥

परि कापुराचे ठायी खरे । कापुरावाचुनि काही न ठरे । तैसे कोण्याही प्रकारें । हाचि ह्यास ॥२३९॥

दृश्यपणे दिसो आता । की होऊनि असो द्रष्टा पुरता । परि ह्याचेवाचुनि अन्यथा । काही नसे येथ ॥२४०॥

गंगा गंगापणे वाहो । की सिंधू होऊनि राहो । परि पाणीपण जाता पाहो । न दिसेचि वेगळे; ॥२४१॥

थिजावे की वितळावे । हे अप्रयोजक आघवे । तूपपण नव्हे । वेगळे तेथ; ॥२४२॥

ज्वाळा आणि वन्ही । वेगळे न लेखती दोन्ही । वन्हिमात्रचि म्हणोनी । अन्य नव्हेचि ॥२४३॥

दृश्य की द्रष्टा ऐसा विचार करिता । या दोन्ही वांझ अवस्था । ऐसे पराकाष्ठेने पाहता । स्फूर्तिमात्र तो आत्माचि ॥२४४॥

या स्फूर्तिरूप आत्मदृष्टिने पहावे । तर स्फूर्तिमात्रावाचुनि काहीचि नोहे । मग आत्म्याने दृश्य जगता पाहिले म्हणावे । तर कोणी कोणा पाहिले ? ॥२४५॥

पुढे दृश्य फडकेना । मागे द्रष्टा डोकावेना । ह्यानेचि ह्यास पाहताना । स्फुरद्रपचि तो; ॥२४६॥

तरंग जळी बुडले । सोन्याने सोने पांघरिले । दिठीचे पाय गुंतले । दिठीतचि; ॥२४७॥

श्रुतीसी मेळविली श्रुती । द्युतीसी मेळविली द्युती । की तृप्तीसी तृप्ती । वाढिली असे; ॥२४८॥

गूळ गुळाने माखिला । मेरू सुवनें मढविला । की ज्वाळांनी गुंडाळिला । अग्नि जैसा; ॥२४९॥

आता बहु काय नोलावे ? । नभें जर नभाचेचि शय्ये निजावे । तर मग कोणी जागावे ? । हे बोलणेचि व्यर्थ ॥२५०॥

दृश्यमिषें स्वतःसी पाहणे हे । जैसे न पाहणेचि आहे । आणी हा न पाहताहि जे पाहे । ते पाहणेचि होय ॥२५१॥

येथ बोलणे न साहे । जाणणे न समाये । अनुभव न लाहे । अंगीं मिरवू; ॥२५२॥

म्हणोनि ह्यासीचि ह्याने । यापरीचे पाहने । पाहता काही कोणे । पाहिले नाही ॥२५३॥

किंबहुना ऐसे । आत्म्यानेचि आत्मा प्रकाशे । न जागविताचि जागवू बैसे । स्वतःसी तो ॥२५४॥

स्वदर्शनाची स्फुरे आस । अवघ्यांचेचि ये लाभास । निजआत्मभावास । न मोडताही ॥२५५॥

आरसे न पाहता पहावे । तर तेचि पाहणे व्हावे । आणि पाहिले तरि जे पाहे । ते न पाहणेचि ॥२५६॥

कितिही विकसे जरी । एकपणासी न मुके परी । अथवा संकोचे पावे तरी । हाचि पूर्ण ॥२५७॥

सूर्याचिया हाता । अंधार न ये सर्वथा । मग प्रकाशाची कथा । तो ऐके काय ? ॥२५८॥

अंधार असो की उजेड । हा एकला एकवटे अजोड । जैसा की मार्तंड । कोठेही असो ॥२५९॥

आत्मा हा व्यक्त वा अव्यक्तही । भूमिकेवरि असे लीलयाही । तरि तो मुकत नाही । स्वस्वरूपासी ॥२६०॥

सिंधूची शीव न मोडे । पाणीपण रूप न सोडे । जरि लाटांचे वाडे गाडे । होती जाती ॥२६१॥

किरण सूर्याचे अगणित । परि बिंबाबाहेरी जात । म्हणोनि उपमेयोग्य नसत । बोधसंपत्तीसी ॥२६२॥

आणी कपाशीचे बोंड जर । न उकले तर । जग कापडा खरोखर । मुकलेचि असते ॥२६३॥

अहो लगड सुवर्णाची । ठेविली जर लगडपणींचि । तर न होती लेणी साची । अवयवां अवघ्या ॥२६४॥

कोणी एक घरातचि राही । तर या दिशेचा त्या दिशेस कैसा जाई ? । मग ही उपमा कैसी देता येई- । विलासा या ? ॥२६५॥

म्हणोनि याचिया लीलेयोग्य । तराजू काटा न अन्य । याचिया तुळेस्तव । हाचि ह्यास ॥२६६॥

स्वप्रकाशाचे ग्रासें । जेविता बहु वेगें ऐसे । अन्न संपेना, खपाटीसी कैसे- । पोट न जाय ? ॥२६७॥

कैसी ही निरुपम परी ? । आपुल्या विलासावरी । आत्मा राज्य करी । आपुल्या ठायी ॥२६८॥

तया म्हणावे अज्ञान । तर न्याय जाय रानोरान । आता म्हणे तयाचे वचन । साहावे हो आम्ही ॥२६९॥

जगा प्रकाशी जे ज्ञान । तया जर कोणी म्हणे अज्ञान । तर पायाळूच्या डोळ्यात अंजन । घालावे निधानास्तव जैसे ॥२७०॥

सुवर्णगौर अंबिका । तिज न म्हणती काय काळिका ? । तैसा आत्मप्रकाशका । अज्ञान हा शब्द ॥२७१॥

एरवी शिवापासूनि पृथ्वीपावत । तत्त्वाचे अनेक प्रकार दिसत । जयाच्या रश्मीकरांत । उजळुनि येती; ॥२७२॥

जेणे ज्ञान सज्ञान होई । दृष्टिमात्र दृष्टीते प्रसवी । प्रकाशाचा दिवस पाही । प्रकाशासी; ॥२७३॥

दाविले कोण्या दुर्बुद्धाने । अज्ञान ऐसे बोटाने । तर मोटेत तमाने । सूर्यासि बांधिले जैसे ॥२७४॥

‘अ’ अक्षर ज्ञानापूर्वी । वसता अज्ञानाची थोरवी । हा शब्दार्थाचा उजेडही । अपूर्व नव्हे का ? ॥२७५॥

लाखेच्या पेटीत कोणी । काय साठविती अग्नी ? । तो सरिसेचि टाकी करुनी । आतबाहेरी ॥२७६॥

म्हणोनि जग ज्ञानें स्फुरले । आता अज्ञानवादात बोले । तयाची वाचा बरले । निःसंशय ॥२७७॥

गोवध शब्द उच्चारणेही पापचि । असत्य बोलण्याने पाप अधिकचि । मग का अज्ञान शब्दालापचि । योजावा ज्ञानीं ? ॥२७८॥

अज्ञानाचा प्रत्ययही । ज्या ज्ञानार्थाने येई । तो अर्थ ज्ञान हेही । कोणीही समजेना ॥२७९॥

असो हे आत्मराजे । आपण आपणा ज्या तेजें । अनेक दृश्यरूपांनी जे । पाहतात ॥२८०॥

ज्या अज्ञानाचे विचारें । निर्णय करण्या जावे पुरे । तर ते लटिके ठरे । मग दृष्टीसि कसे भासावे ? ॥२८१॥

ऐसे जगज्ञान जे ठायी ठायी । ते अज्ञान म्हणे मी प्रसवी । या अनुमानें होई । आहे ऐसेचि ॥२८२॥

अज्ञान त्रिवार नाही । ज्ञानचि भरले जगाठायी । तर अज्ञानाचा धर्मही । ज्ञान असे काय ? ॥२८३॥

काय काजळ मोती प्रसवी ? । राखेने दीप प्रज्वलित होई ? । तरचि ज्ञान धर्म होई ॥ अज्ञानाचा ॥२८४॥

जर चंद्रापासुनि ज्वाळा निघतील । आकाशातुनि शिळा उपजतील । तरचि अज्ञान उत्पन्न करील । निर्मळ ज्ञाना ॥२८५॥

क्षीरब्धीतुनि निघावे काळकूट । हे एकेपरीने बिकट । परि काळकूटीं विचित्र गोष्ट । हे अमृत कैसे ? ॥२८६॥

ज्ञानीं अज्ञान जाहले । ज्ञानासमोरी येताचि ते गेले । पुढती ज्ञानचि एकले । मग अज्ञान कोठले ? ॥२८७॥

म्हणोनि सूर्य सूर्याचिऐसा । चंद्र चंद्राचिसरिसा । दीपाचे योग्यतेजैसा । दीपचि की; ॥२८८॥

प्रकाश तो प्रकाशचि एक । यात न काही चूक । म्हणोनि जग सकळिक । वस्तुप्रभाचि ॥२८९॥

जयाचे प्रकाशाने । हे सर्व प्रकाशणे । कायसे हे वेदांचे बोलणे- । बोलुनि व्यर्थनि ढेकर देती ? ॥२९०॥

यालागी ही वस्तुप्रभा । वस्तुचीच असे शोभा । आणि जाय लाभा । वस्तूच्याचि ॥२९१॥

म्हणोनि वस्तूसि या । स्वयें प्रकाशावया । अज्ञान हेतू हे वाया- । अवघेचि बोलणे ॥२९२॥

म्हणोनि अज्ञानाचे अस्तित्व । कोण्याहि प्रकारें सिद्ध न होय । अज्ञान निश्चितचि व्यर्थ जाय । पाहो जाता ॥२९३॥

रात्रीचे की घर । गाठिताहि दिनकर । तयापुढे अंधार । नच येई ॥२९४॥

नीज खोळीत भरू जाता । जागणेही न ये हाता । मग टळटळित जागा पुरता । ठाके एकटा जैसा; ॥२९५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP