मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|गोपाळ गोडसे|
त्या डब्यांत मृत्यूची होत...

जय मृत्युंजय - त्या डब्यांत मृत्यूची होत...

गोपाळ गोडसे कवींनी मोठ्या बेहोष जिव्हाळ्याने आणि उन्मादक रसिकतेने `जय मृत्युंजय’ या कवितासंग्रहात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे वर्णन केले आहे.


त्या डब्यांत मृत्यूची होती छाया उसाळली ।
मानगुटीला धरुनि धांवते वाघिण पिसाळली ॥धृ०॥
गावांमागुनि गांवें ।
टाकुनि मागे धावे ।
कुठुनी मज ना ठावे ।
वने उपवने, पर्वत, ओढे लंघून चालली ।
मानगुटीला धरुनि धावते वाघिण पिसाळली ॥१॥
पाश मागचे तोडी ।
क्षणाक्षणाला ओढी ।
श्वास भयानक सोडी ।
धाप लागतां अधुनी मधुनी गुरगुरत थांबलीं ।
मानगुटीला धरुनि धावते वाघिण पिसाळली ॥२॥
मजसम भारतवासी ।
करण्याला वनवासी ।
आंग्लभूमिची दासी ।
टपुनी होती, सावज मिळतां धरण्या उफाळली ।
मानगुटीला धरुनि धावते वाघिण पिसाळली ॥३॥
घाली मजवरि घाला ।
वेग वायुचा आला ।
विपिनी सोडायाला ।
आणिल का ही परत मला, की रक्ता चटावली ? ।
मानगुटीला धरुनि धावते वाघिण पिसाळली ॥४॥
कशास आशा वेडी ।
अंगावरची बेडी ।
मसणवटीची गाडी ।
हाय मातृभू ! करित कदाचित होइन हिचा बळी ।
मानगुटीला धरुनि धावते वाघिण पिसाळली ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : February 12, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP