जय मृत्युंजय - जन्मजात जागृत अपुल्या अधि...

गोपाळ गोडसे कवींनी मोठ्या बेहोष जिव्हाळ्याने आणि उन्मादक रसिकतेने `जय मृत्युंजय’ या कवितासंग्रहात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे वर्णन केले आहे.


गुरुदेव टिळक त्या शिष्य विनायक
जन्मजात जागृत अपुल्या अधिकाराला ।
गुरुदेव टिळक, त्या शिष्य विनायक झाला ॥धृ०॥
उलगडे भूमिवरि काल नव्या शतकाला ।
अंगणी विनायक माजघरातुनि आला ।
गोदातट सोडी शिक्षण वाढविण्याला ।
गुंफाया किंवा क्रांतिदेविला माला ।
लोकमान्य होती स्फूर्ती विकल देशाला ।
गुरुदेव टिळक, त्या शिष्य विनायक झाला ॥१॥
केसरी परिसरी एकत्रावे छावे ।
विस्मृत शौर्याचे जिथुनि शिक्षण घ्यावे ।
उन्मत्त शक्तिला परकी आव्हानावे ।
दंष्ट्रा-नखरी गज-गंडस्थळ फोडावे ।
उघडता अशी तै क्रांतिची महाशाला ।
गुरुदेव टिळक, त्या शिष्य विनायक झाला ॥२॥
कार्यासि मिळावे अधिष्ठान देवाचे ।
पाठीसि असावे दैवत सामर्थ्याचे ।
गणराय,शिवाजी म्हणुनी पूजायाचे ।
इह-अध्यात्माचे सूत्र लोकमान्यांचे ।
आंदोलन-मंदिर विशाल उभवायाला ।
गुरुदेव टिळक, त्या शिष्य विनायक झाला ॥३॥
आर्यांच्या देशी म्लेच्छांचा ये घाला ।
सावध शिवराया ! पुनरपि घे जन्माला ।
दास्याने केले दीन हीन आम्हांला ।
तू शक्त ! ये प्रभो दु:ख निवारायाला ।
काव्यात विनायक विनवी शिवरायाला ।
गुरुदेव टिळक, त्या शिष्य विनायक झाला ॥४॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2013-02-12T21:01:39.0130000