जय मृत्युंजय - अष्टभुजा देवीची मूर्ती सु...

गोपाळ गोडसे कवींनी मोठ्या बेहोष जिव्हाळ्याने आणि उन्मादक रसिकतेने `जय मृत्युंजय’ या कवितासंग्रहात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे वर्णन केले आहे.


मूर्ति दुजी ती
अष्टभुजा देवीची मूर्ती सुंदरा,
मातामह तातांचे आणिती घरा ।
शौर्याचा तो प्रसाद, ती महाकृती,
कुलदैवत गेहाचे म्हणुनि वंदिती ।
भक्तांना प्रेम जिचे नेत्र दाविती,
दंडण्यासि दुष्टजना क्रुद्व हो अती ।
जी रुधिरप्रिय होती, जीस मत्त अरि भीति,
संचरे विनायकांत मूर्ति दुजी ती ॥१॥
ज्येष्ठ बंधु बाबा हो या विनायका,
भगिनी माई कनिष्ठ काव्यनायका ।
नारायण बंधू असे पाठचा तिला,
शोभविती भावंडे आपल्या कुला ।
जनक आणि जननीची वाटिका फुले,
प्रेमाच्या कौमुदीत वाढती मुले ।
माधुरी विनायकासि भक्तिची असे-
देवीच्या, तो निवांत मंदिरी बसे ।
तेजाने लखलखती,
शस्त्रांची करि पाती,
संचरे विनायकांत मूर्ति दुजी ती ॥२॥
अभ्यासा बाल विनू लागला जसा,
जागली प्रवेगाने ज्ञानलालसा ।
वाची तो वृत्तपत्र, आपली स्थिती
पाही त्या दर्पणात आणि भोवती ।
चिंती आपुल्या मनात, भूप भारता-
इंग्रज का, आपली कुठे स्वतंत्रता ।
अष्टभुजेपुढति करी ध्यानधारना,
आळवी, मला देवी शक्ति दे रुणा ।
भक्तांना दे स्फूर्ती, व्हावया कराल कृती,
संचरे विनायकात मूर्ति दुजी ती ॥३॥
वय वाढे कार्यांचा व्याप वाढला
मित्रांचा नासिकला संघ काढला ।
मोंगल सत्ता महान राहिली जरी
शिवबाने निर्मिले स्वराज्यही तरी ।
व्हावा समहेतू मजला अशक्य का
भक्तीची सुप्तता पुसे विनायका ।
जी त्याते प्रिय होती,
रणचंडी उग्रमती,
संचरे विनायकात मूर्ति दुजी ती ॥४॥
चाफेकर बंधूंचे दिव्य ऐकले,
आणि तये नासिकचे मित्र पेटले ।
पोवाडे करित आणि गात संगती,
काव्यातुनि, कंठातुनि आग ओकती ।
बाजी प्रभु गात कुणी, कुणि तानाजी,
स्वातंत्रप्रेम कुणी, कोणि शिवाजी ।
असिधारेसम पड्‍क्ती, जीपासुनि कवि घेती,
संचरे विनायकात मूर्ति दुजी ती ॥५॥
वाटले विनायकासि, का न मी स्वता-
क्रांतिने करावयासि मुक्त भारता ।
व्हावे कटिबद्व या क्षणासि, अन्यथा-
राहिल चिरदास्याची भारता व्यथा ।
देवीते बोले, हे प्राण जोवरी,
शत्रूला मारित झुंजेन तोवरी ।
खड्गहस्त शिवमूर्ती, केतूचीं करि पूर्ती,
संचरे विनायकात मुर्ति दुजी ती ॥६॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2013-02-12T21:01:36.2630000