श्रीपूर्णानंद चरित्र - अध्याय सतरावा

आनंद संप्रदाय हा सर्व भक्तिमार्गी संप्रदायाचा मूळ स्रोत आहे .


श्रीगुरुदेव दिगंबरायनमः ।

जयजय पूर्णानंद स्वप्रकाशा । स्वयंज्योती विश्वाधीशा । सच्चिदानंदा चिद्विलासा । चिन्मयरुपा चिन्मूर्ती ॥१॥

तू तो केवळ दयाळु । तू तो केवळ कृपाळु । तू तो पूर्णानंद कल्लोळु । पूर्णब्रह्म परेशा ॥२॥

तू तो केवळ निरामय निर्गुण । निज पुत्राचा धावा ऐकून । सगुण जालास क्रपाघन सुहास्य वदन । किरीट कुंडले मंडित ॥३॥

शंख चक्र गदा कमळ । चौभुजी मूर्ती स्वानंद कल्लोळ । सरळ नासिका पितांबर सोज्वळ । ह्रदयी शोभे वत्सलांछन ॥४॥

तुझ्या समपदाची शोभा मोठी । त्यापुढे शशी आदित्याचे तेज आटी । भक्तवत्सला तू जगजेठी । जगदोध्दारा जगत्पते ॥५॥

ज्याचे पदरी सुकृत फार । सदभक्त स्मरणी निरंतर । तयासीच लाभे तूझे चरण दुर्मीळ उदार । अपूर्व दर्शन त्रिभुवना ठायी ॥६॥

तुझे स्थान सदैव नित्य कल्याणा । कल्याण शब्द ऐकता जन्म साफल्यपूर्ण । कल्याणकारक तुझे ध्यान । पूर्णानंदा परेशा ॥७॥

कल्याणी असे सदानंद । कल्याणी वसे सहजानंद । कल्याण म्हणता स्वानंद । पदोपदी त्या देशी ॥८॥

तुच नित्य कृपा करुन । तव चरित्र पुढे करविशी कथन । कल्याणकारक करुणाघन । सहजानंदा श्रीदिगंबरा ॥९॥

षोडषोध्यायी कथा पूर्ण । पूर्णानंदांचे गुरु सांप्रदाय स्मरण । पूर्णानंदे करविले गुरुआज्ञे कारण । अगम्य कथा ऐकिली स्वानंदे ॥१०॥

पुढे त्याची लीला चरित्र । जे स्वसुखाचे सुखसूत्र । पावन करील श्रवण सत्र । भाविक सज्जन लोकासी ॥११॥

पूर्णानंद शिवराम । ऐसे नाम घेता सप्रेम । पुरविशि त्याचे सकळ काम । मनोरथ पूर्ण करिशी दयाघना ॥१२॥

धन्य तो पूर्णानंद पूर्णकाम । धन्य ते महाराज शिवराम । जे भक्तकाम कल्पद्रुम । भक्तास्तव अवतरले भूतळी ॥१३॥

पूर्णानंद आणि शिवराम । निजकल्याणी राहती भक्तधाम । ते अवतारी परम । त्यांची महिमा कोण वाखाणी ॥१४॥

त्या महाराजांचे चरित्र अलौकिक । वर्णन न घडे कदापि देख । ते केवळ कल्याणकारक । कल्याण करीती भक्तां जनाचे ॥१५॥

अशा प्रभूची स्थिती काय असे । उठता बैसता कवित्व चालतसे । अच्युत अनंत लेखिति प्रेमरसे । शिवराम प्रभूचे निजशिष्य ते ॥१६॥

प्रभू जिकडे जाती तिकडे जाय । ते दोघे जवळी असती सदैव निश्चय । जे जे मुखे उच्चार निघत जाय । ते लिहिती तत्क्षणी ॥१७॥

प्रभूचे आयुष्य तो अतिस्वल्प । ग्रंथ जालेसे अमुप । तरी ते अवतारीच चिद्रुप । अगम्य काय त्यालागी ॥१८॥

जेवी आकाशातूनी सुटे मेघधारा । तेवी कवित्व चालती सदैव गंगाधारा । जे प्रत्यक्षचि अवतरले उमावर । लोकोध्दारास्तव भूतळी ॥१९॥

प्रभू मुख समुद्रातुन कवित्व रत्न । निघताच लेखिती दोघेजण । ग्रंथाची तत्काळी समुध्दरण । भरुनी ठेविती सप्रेमे ॥२०॥

या रत्नाचे जोहरी परीक्षक । इतर साधुसंताशी ओळख । किंवा सप्रेम मोल देऊनी भाविक । रत्न घेती नित्य अक्षर ॥२१॥

शांकरकृत ग्रंथासी । टिका करोनि निश्चयेसी । यास्तव अवतार प्रभूसी । घेणे असे सत्यवी ॥२२॥

आचार्यकृत ग्रंथ संपूर्ण । शिवराम प्रभू टीका करुन । आणखी कित्येक वेदांत ग्रंथ जाण । लोकोध्दारास्तव लेखिले प्रभूवर्ये ॥२३॥

त्यांनी जी केली ग्रंथरचना । त्याचे अवलोकनही न घडे सामान्यजना । ते पतीत पावन पतीतोध्दारणा । स्वानुभवबोध साधना प्रबोधिले ॥२४॥

प्रभूचे आयुष्यमुळी आहे षोडष । ही मात पुर्णानन्दा होते ठाऊक संलेष्य । आपुलेही पुढील आयुष्य शोडष । तेही शिवराम आयुष्या जोडणे असे ॥२५॥

तेव्हा पूर्णानंद पूर्णज्ञानघन । प्रभूस जवळ बोलाऊन । बोलती काय अमृतवचन । निजपुत्रासी त्याकाळी ॥२६॥

अरे शिवरामा ज्ञानसिंधु । तू तो केवळ स्वानंदकंदु । तुज पाहता होतसे ब्रह्मानंदु । ब्रह्मानंद न सामाये त्रिभुवनी शिवरामा ॥२७॥

धन्य माझे ब्रह्मानंद सदगुरु । प्रत्यक्ष पूर्ण अवतारी शंकरु । जे जे वचन बोलिले निजवक्त्रु । ते सर्व सत्यचि करुन पै दावियली ॥२८॥

जेंव्हा त्यांनी कृपा करुनी । मज पाठविले कल्याण स्थानी । तेव्हा माझ्या विनंती वरुनी । आज्ञा केली की भविष्यार्थी ॥२९॥

तरी ते भविष्य वचन । आता प्रत्ययासी येतसे पूर्ण । यास्तव माझे षोडष आयुष्य जाण । तुजला असो सर्वस्वी ॥३०॥

आता तू नीज मुखासी उघडी । आयुष्याची मी घालीन पुडी । हे वचन ऐकता सदगुरुची प्रौढी । प्रभू उघडीती मुखकमळ ॥३१॥

प्रभू उघडीता मुखकमळ । पूर्णानंद घाली चरणामृत जळ । ते जळ काय अमृत केवळ । पाजुनी अमरत्वी जागविले ॥३२॥

अगाध तो पूर्णानंद पिता । अगाध ती लक्ष्मीमाता । अगाध तो पुत्र तत्वता । जो शिवराम स्वामी अवतरीले ॥३३॥

ही मानवी दिसती साचार । ते मानवी नव्हे प्रत्यक्ष सर्वेश्वर । त्याची महिमा अगम्य अगोचर । ब्रह्मादिकासी न कळे ॥३४॥

पूर्णानंद तो श्रीनारायण । लक्ष्मी ती महालक्ष्मी पूर्ण । शिवराम तो सांब जाण । अवतार पुरुष भूतळी ॥३५॥

असो पूर्णानंदराये । पुत्रास देऊनी आयुष्य निश्चये । लक्ष्मीप्रती बोले काय । ते ऐकावे श्रोतेहो ॥३६॥

श्रीपूर्णानंद पुढील कार्य । सारोनि शिवरामा आयुष्य दिधले लक्षणीये । श्रीलक्ष्मीस कल्पना दिली सौकार्ये । अवतार विधानी कर्तव्यांशी ॥३७॥

ऐश्या विधी विधान काळी । भक्तेशिवरामा महोत्सवार्थ नेले स्वाग्रामस्थळी । त्यानिमित्ये शिवरामे आज्ञा मागीतली । महोत्सवार्थ पंचविंशती दिनांशी ॥३८॥

एतत्काळ पर्यंत कल्याणाहून भक्तस्थळी । ओझर प्रांती ग्रामाधिपाच्या उत्सवांर्थत्या वेळी । योजिली अच्युत अनंतासह शिबिके आगळी । निघण्यार्थी आज्ञा वाहताती ॥३९॥

नित्यापरी पूर्णानंदा पूजियले । विधिवत पूजूनि तीर्थ वाहीले । नित्य मानसपूजे दर्शन साक्षात प्रार्थिले । होकारार्थी वचनी आज्ञा संवाहिली ॥४०॥

पूर्णानंद अनुमती दीधले । नित्य दर्शन होईल साक्षात स्थळे । तेणे शिवरामी वृतक्रमा वाहिले । गुरुसेवा विधानांशी ॥४१॥

ओझर ग्रामी भक्तमेळणी । चैत्रवैद्य पंचमी पासोनि । वैशाख शु . षष्टी कालमानी । सदानंद पंचमी महोत्सवी ॥४२॥

नित्य पूजापाठ भजन प्रवचन । सर्वासीही दोन्हीवेळ अन्नसंतर्पण । सहस्त्रावधी जन रंजन । उपासनी गजबजलेसे ॥४३॥

बहुपरि उपदेश क्रति नियमनी । सर्वहिजन भाग घेती सक्रीयपणी । श्रवण उपासनी मार्ग भक्तांशी दावोनि । पसायदाने संतोषविले ॥४४॥

शिवराम स्वामीच्या सान्निध्ये । आनंदाम्नाय प्रसिध्दे । भक्तजनोध्दारिणी गावोगावी योजिलि निबध्दे । सामान्यजनाव बोधनी यथावत ॥४५॥

इकडे पूर्णानन्द आपुल्या नियोजनी । श्रीलक्ष्मीसी कल्पना देतसे विधानी । आयुर्मान अपेक्षणी । काल नियोजनी प्रत्यर्थिले ॥४६॥

ऐक देवी लक्ष्मी गुणवंती । आता या शरीराची समाप्ती । स्वस्वरुपी घेणे असे विश्रांती । हा माझा निश्चिय तू जाणणे ॥४७॥

यापरी बोलती पूर्णानंदघन । ते ऐकोनी लक्ष्मी लक्षणसंपन्न । म्हणती काय प्रतिवचन । पतीलागी त्याकाळी ॥४८॥

लक्ष्मी तरी केवळ ज्ञाननिधी । जिची वृत्ती रंगली पूर्णानंदी । जीची कधी न उतरे समाधी । निजस्वरुपी निमग्न ॥४९॥

ऐकता प्राणनाथाची मात । कांहीच खेद मनी न आणित । विनवितसे कार्यांशी पतीस । अवधी किती असे प्राणनाथा ॥५०॥

पूर्णानंद बोले आठ दिवसाची । अवधी असे जाण साची । परी ही सूचना जाणुनी तैसेचि । राहती जाहली त्याकाळी ॥५१॥

आठवे दिवशी प्रातःकाळी । लक्ष्मी पतीच्या चरणकमळी । पुसती पूर्वस्मृती वचनी स्वानंद पुतळी । आवधी सांगा किती स्वामिया ॥५२॥

लक्ष्मीचे पाहुनी अतिशय प्रेम । विकसित असे पूर्णानंदांचे ह्रत्पद्म । बोलिले काय सुवेळी उत्तम । एक प्रहर पूर्ण काल पै असे ॥५३॥

तेव्हा लक्ष्मी करुनी मंगलस्नान । तुळसीपूजा सहस्त्र प्रदक्षिणा करुन । सुवासिनी लागी वायन । देती जाहली स्वानंदे ॥५४॥

तेव्हा प्रभू औदार्याचा सागर । गोदुबाई इतर आप्तादी सहोदर । मिळाले स्थानी समग्र । कार्य संभावनी गहनांशे ॥५५॥

लक्ष्मी पूर्णानंदास पुजून । सप्रेम सहस्त्र प्रदक्षिणा करुन । आपाद मौळी पर्यंत अवलोकून । पायी मस्तक वाहिले ॥५६॥

मस्तक ठेविता पूर्णानंद चरणकमळी । पूर्णानंदही आंतस्थह्रदी ब्रह्मनंद गुरुचरणा ध्याईलि । पूर्णध्यानि साक्षातपणि स्मरतसे दिव्यलीळी । ब्रम्हानंद स्वरुपी सदानंदा अर्पियले ॥५७॥

धन्य धन्य ती लक्ष्मीमाई । जीची वृत्ती रंगली पूर्णानंद पायि । अंतर्बाह्य पूर्णानंद स्वरुपाठायी । मूर्तिंमंत मूळपाया साक्षात ॥५८॥

स्थूलदेहा सहित तत्क्षणी । पूर्ण विराली पूर्णानंद स्वरुपदेही निमग्नपणी । मूळ याचा तत्वार्थ वाहोनि । पूर्णानंदेही गुरुतत्वी विरमले ॥५९॥

पूर्णानन्द संकल्प लक्षणी । श्रीसदानन्द ब्रम्हानन्दार्पणी । तत्काळ पूर्णानन्देही तत्क्षणी । स्थूल देहासहीत विराले ॥६०॥

अन्नमयकोश स्थूलदेहा सहित । पूर्णानंद गुरुस्वरुपी विराले अदभुत । एक वृदांवन आकारले तुळशीसहित । तीन श्रीफळेपीठी आकारली ॥६१॥

त्यातील एक सदानंद मठी वाहिले । दूजे शिवरामार्थ वृंदावनी निमाले । तिजी तिम्मण दीक्षिते त्रिस्थळी उत्तरकार्यार्थ नेले । तीर्थावळीत कर्मविधानी ॥६२॥

इकडे श्रीशिवराम स्वामी । सदानंद पंचमीचा महोत्सव सारोनि । वैशाख शुध्द सप्तमीस कल्याणी । प्राप्त झाले यथावत ॥६३॥

शालीवाहन शक पंधराशे ब्याण्णवी । साधारण सरंत्सर आघवी । वैशाख शुध्द त्रितीया अभिनवी । पूर्णानंदे समाधिस्त ॥६४॥

शिवराम स्वामी यथाक्रमपणी । सदानंद दर्शनमठी वाहोनि । पूर्णानंद स्थानीय मठी आले माध्यान्ही । सर्वत्र शांतता अचंबित ॥६५॥

गोदाम्माशी शिवराम । विचारती पितृचरण क्षेम । कोठे आहेती पुसती यथाक्रम । घटित घटना वर्णियली ॥६६॥

दूजे दिनी प्रातःकाळी । स्नान करोनि मानसपूजा केली । नित्यापरि साक्षात दर्शन नाही घडली ते काळी । तेणे शिवरामे निर्वाण संकल्पिले ॥६७॥

जेंव्हा गुरुस्वरुपी पूर्णानंद समरसले । तेंव्हा शंखनाद भरले दशदिशी आगळे । टाळमृदंग घंटाध्वनि कल्लोळे । भूवैकुंठ नादब्रह्मे ओथंबिली ॥६८॥

धन्य धन्य तो पुर्णानंद नारायण । धन्य ती लक्ष्मी चित्काळ पूर्ण । धन्य ती उभयता शुध्द जीवन । अवतारिक या भूतळी ॥६९॥

ज्यास मूळीच नसे येणे जाणे । मग त्यास कैंची जन्म मरणे । श्रीसच्चिदानंद पूर्णब्रम्हानंदघने । सद्यःकाळ पावेतो पै तिष्ठली ॥७०॥

निजकल्याणी स्वानंद सिहांसनी । लक्ष्मीसह विराजीले पूर्णानंदमुनी । निजकल्याण द्यावया लागुणी । सदानंदी समरसले ॥७१॥

पूर्णानंद स्वरुपी लीन होऊन । याकाळ पावतो केवी राहिले विराजमान । तरी याचे दिव्यदर्शन शिवरामी निगमन । ते ऐकावे भाविकहो ॥७२॥

शिवराम स्वामीचा असे नित्यनेम । पूर्णानंदाचे पादपद्म । षोडषोपचारे सप्रेम । पूजा करावी अत्यादरे ॥७३॥

सहस्त्र नामावली सहस्त्रपुष्प । नित्य वाहतसे ते चिद्रुप । यापरीच नैवेद्य धूपदीप । नित्योपासनी क्रमवाहे ॥७४॥

पूर्णानंदाची नित्यपूजोत्सवा । आदिनारायण दिव्य अभिनवा । विश्वंभर स्वरुपी कल्याण ठेवा । भक्तीभावे भूतळी अवतरले ॥७५॥

पूजोत्तरीय नित्यध्यान । विश्वंभरीय पूर्णसाक्षी चैतन्यघन । पूज्य पूजक पूजाविधान । पूर्णब्रम्हानंद स्वायंभवी ॥७६॥

अंतःसाक्षी बहिःपूर्ण । अणुरेणु विश्वंभर गहन । पूज्य पूजकत्विभिन्न । नांही नांही त्रिकाळिक ॥७७॥

ही दिव्य अर्चना नित्याचरण । दिव्य गुरुत्वी ऐक्य ब्रम्ह स्वानंद निधान । नित्यस्वरुपि दिव्यदर्शन । नाव्दैतंगुरु संन्निधौ संकल्पांशी ॥७८॥

नित्यवृत येणेविधी ती शिवराम वाहात । यावद ब्रम्हस्तंबी दर्शन घेत । तेणे वृतांगत्वी अपूर्णत्व । अन्नोदका परित्यागीले ॥७९॥

शिवराम साक्षात शूलपाणि । नित्य साधनी गुरुसेवा वाहोनि । क्रम वाहती आजीवनी । आनन्दाम्नाय अनुक्रमी स्थितीत ॥८०॥

प्रभूमनीचा हा भाव । माझा पूर्णानंद साक्षात्पूर्ण ठेव । मज बाळकासी गुरुतत्वी वैभव । अव्यवधानीयपणी पुरविल ॥८१॥

याकारणी दिव्यसाहस्त्र स्वरुपी । प्रगटतील नित्यलीले भक्तसंकल्पी । आंतर जाणोनि भक्तसंकल्प राहाटि । सत्यवृत्ती सत्यसंघीय ॥८२॥

अरे शिवरामा ज्ञानसिंधु । तू तो केवळ स्वानंदकंदु । तुझ्या कटाक्षमात्रे भवबंधु । हरेल सर्व लोकांचे ॥८३॥

तुवा मज नित्य संकल्पन । कासया मांडिले निर्वाण । सबाह्य स्वरुप वाहोन । एकदेशी अपेक्षिसी ॥८४॥

तू तो सदैव स्वरुपाकार । तुझ्या तत्वी नसे एकदेशी मूळस्तर । तरी अपेक्षिसी दर्शन साकार । याला काय म्हणावे ॥८५॥

सुवर्णी काय अलंकरण । अस्तित्व नसते रे भिन्नपण । मग परत आंतरी संकल्पन । कासयार्थी वागविशी ॥८६॥

उत्पत्यादि व्यवहारु । स्त्रजन मायेचा हा बडिवारु । माया नियंता तू सर्वेश्वरु । तुजपरता कोणी नसेची ॥८७॥

तुज नसेचि आदिमध्यांत । तू स्वप्रकाश सदोदीत । सच्चिदानंदघन पुनीत । स्वानंदसिंधु ज्ञानमूर्ती ॥८८॥

तू नव्हेसी काईक कर्मकर्ता । भोगातीत स्वानंद निरता । सकळ प्रकाशक सकळातीता । चिदानंदा चिन्मयात्वी ॥८९॥

तुज नसे ज्ञानाज्ञान । ज्ञानाश्रय आधार केवळ चिदघन । तू सच्चिदानंद परिपूर्ण । पूर्णब्रह्म सनातनांशी ॥९०॥

यापरी असता एकले एकपणे । तुज हे काय साजे रे आचरणे । प्रत्यक्ष पूजा केल्याविणे । अन्न कदापि न घेसी ॥९१॥

मी काय असा एकदेशी । मुळ स्वरुपी सकळ प्रकाशी । हे काय तू नेणसी । स्वानंदकंदा शिवरामा ॥९२॥

तुज मज सांग कैसा भेद । मी असता की रे तुझ्या ह्रदयारविंद । तरी हट्टे घेतोसी ऐसा छंद । हे योग्य काय रे तान्हया ॥९३॥

यापरी प्रत्यक्ष होऊनी पूर्णानंदु । प्रभूसी बोलिले स्वानंदु । तेव्हा बोले काय शिवराम अद्वयानंदु । निज गुरुलागी त्याकाळी ॥९४॥

जय जय पूर्णानंदा पूर्ण कामा । अद्वयानंदा कैवल्यधामा । तू सर्वसाक्षी सर्वांतरात्मा । ही प्रचिती असणे तवकृपा ॥९५॥

परी ह्रदयी जडली मूर्ती सदगुरुत्वी अनुदिनी । अभयहस्त सुहास्य वदनी । कुंडलमंडित श्रवण आकर्णायनी । वामांगी विराजे लक्ष्मी अभंगा ॥९६॥

तरी ही मूर्ती भरली असे अंतरंग । कदापि न साहे त्याचा वियोग । तू सकळसाक्षी पूर्णतरंग । त्याच रुपी प्रकट होई ॥९७॥

त्याच मूर्तीची करीन पूजा । हीच लाड चालवी सदगुरुराजा । याविण नसे मागणे दूजा । पूर्णानंदा अंतारात्मा ॥९८॥

प्रल्हादाचे हाकेसाठी । प्रकटलासी तू स्तंभापोटी । द्रौपदीस वस्त्र कोट्यान कोटी । देऊन लज्जा रक्षिलेशी ॥९९॥

परिक्षितास रक्षसी मातृपोटी । क्षीरसिंधु लाविसी उपमन्यूच्या होटी । ध्रुवास अढळपद देसी जगजेठी । तू भक्तकाम कल्पद्रुमा ॥१००॥

असे कित्येक भक्तकार्यासी । नमनी सेविजे स्वअंगे प्रार्थनांशी । तरी माझे मनोरथ पुरवावयासी । अगाध काय तुजलागी ॥१०१॥

पूर्णानंद तो आदिनारायण । शिवराम प्रभू तो गौरीरमण । ते अवतारी दोघेजण । विंदाणे दाविती लीलांशी ॥१०२॥

असो निज पुत्राचे ऐकूनि विनंती । पूर्णानंद काय बोले प्रभूप्रती । ते ऐकावे स्वानंदचित्ती । अभिनव कथा अलौकिक ॥१०३॥

अरे तान्हया शिवरामा । अगाध की रे तुझा भाव सर्वोत्तमा । तुझ्या भावास्तव अवतार आंम्हा । घेणे सहज प्राप्त असे ॥१०४॥

तरी तू ऐक वचन साचार । कलबुर्गे प्रांती असे हिरापूर । तेथे असे तिम्मणा नावे साहुकार । तो निजभक्त माझा प्रेमळु ॥१०५॥

त्याचे परसात असे विहीर । तेथे मी घेईन अवतार । तू तेथ जाऊन निर्धार । मजला घेऊन पै येई ॥१०६॥

तुझे नाम तो शिवराम । विकसित पाहून तुझे ह्रत्पद्म । त्यामाजी मी असतो सप्रेम । हे तो सत्य पै असे ॥१०७॥

तथापी तू घेतोस बाळछंद । त्या विहीरीत मी पूर्णानंद । प्रकटेन तू आणि स्वानंद । इच्छा संकल्पांशी परिवाही ॥१०८॥

ऐसे वचन पडता कानी । प्रभूचा हर्ष न समाये गगनी । दशदिशी पूर्णानंद भरुनी । उरला असे सत्यत्वी ॥१०९॥

प्रभू जेव्हा नेत्र उघडुनी पाहे । पूर्णानंदचि जगी भरला आहे । पूर्णानंदविन्हा रिता न ठाये । आपूर्णीही पूर्णानंदचि देखिले ॥११०॥

यापरी होता सहजानंद । तेव्हा काय बोले शिवराम सच्चिदानंद । धन्य माझा पूर्णानंद म्हणून । उठतसे त्याकाळी ॥१११॥

प्रभूचे नित्यनेम असे यापरी । उठून माघील चारी घटिका असता रात्री । मलविसर्जन करुन वेशी बाहेरी । मुख प्रक्षाळणास जावे मठासी ॥११२॥

तेथ सदानंदाचे घेऊनी दर्शन । परतुनी यावे निज घरासी जाण । यापरी नित्यक्रम पूर्ण । करीत होते श्रीचरणी ॥११३॥

जे दिवशी दृष्टांत । प्रभूस जाला निश्चित । माघले प्रहर रात्री असता उर्वरीत । निघते जाले त्याकाळी ॥११४॥

प्रभू निघाले म्हणून । अच्युत अनंतही उठती गडबडून । प्रभू कांहीच न बोलता जाण । निघाले बाहेर वेशीच्या ॥११५॥

मठाचा मार्ग सोडून । पुढे करिती प्रयाण । ते दोघासी नसे त्राण । प्रभुलागी पुसावया ॥११६॥

धन्य ते शिष्य शिरोमणी । ज्याची वृत्ती रंगली गुरुचरणी । जेवी लुब्धाचे मनगुंते निजधनी । तेवी न सोडी पाय प्रभूचे ॥११७॥

जेथे जेथे प्रभू जाय । तेथे तेथे उभयता ठाकिती प्रत्यय । काय आज्ञा करतील गुरुराय । यापरी इच्छा धरुनी ॥११८॥

प्रभू चालती अतिवेग । पूर्णानंद होऊनी सर्वांग । हे दोघेही धावती मागेमागे । प्रभूसी लक्षूनी त्याकाळी ॥११९॥

प्रभू ठेविता पुढे पाऊले । पाऊला पाऊली पूर्णानंदचि दाटले । जिकडे तिकडे पूर्णानंदचि निष्कले । पूर्णानंदचि दिसे वामसव्य ॥१२०॥

आंतरी पूर्ण बाहेर पूर्ण । मागील पुढील मार्गही पूर्ण । गुरुभक्ति विश्वंभरि पूर्ण । पूर्ण गुरुत्वी परिपूर्णिले ॥१२१॥

पूर्णानंद करुनी चित्तवृत्ती । पूर्णानंदार्थ जाती पुढत पुढत । पूर्णानंद क्रमिती मार्ग निश्चिती । हिरापूरासी पै आले ॥१२२॥

तो हिरापूर नव्हे केवळ वैरागर । का तिथेच निघे पूर्णानंद हिरा निर्धार । पूर्णानंद जो उपनिषद पुरुष साचार । संपूर्ण रुप त्याठायी ॥१२३॥

ज्या समयी प्रभूसी झाला दृष्टांत । त्याचवेळी नायकाच्या स्वप्नात । प्रगटुनि पूर्णानंद नश्चित । बोले काय त्यालागी ॥१२४॥

माझा तान्हया शिवराम । उदयिक येईल तुझे धाम । तो केवळ योगी जनमन विश्राम । त्याचे बोलण्यानुसार तू करी ॥१२५॥

त्या दिवशी असे सोमवार । जे उपासिती नित्य श्रीशंकर । स्वयंपाक करऊनी निर्धार । वाट पहात बसलेति व्दाखंडी ॥१२६॥

तीन घटित रात्र झाली असे । प्रभू का नये मनी म्हणतसे । स्वामीची गोष्ट ते असत्य दिसे । यास्तव प्रभू नयेची ॥१२७॥

यापरी मनी चिंतिती । वैश्वदेव करुनी बली हरणार्थी । बाहेर आला पाहती । प्रभूही जाती त्याचवेळी ॥१२८॥

त्या नायकाचे नाम प्रकारी । दोन चार असती हिरापुरी । प्रभू हुडकती ज्याचे परिसात असे विहीरी । तेथे निर्धारी जाणे असे जिवलगा ॥१२९॥

कल्याणाहून कलबुर्गेस । खचित असे वीस कोस । तेच दिवशी निश्चयेस । प्रभू पातले त्या ग्रामी ॥१३०॥

प्रभू येताच नायकाचे घरी । तो मस्तक ठेऊनी पायावरी । नमस्कार करुनी निर्धारी । बोले काय प्रभूसी ॥१३१॥

मी बसलो वाट पहात । धन्य म्हणावे आजिचा दिवस आपूर्त । नेत्री पाहिला दीनानाथ । दीनबंधु दयाळु ॥१३२॥

आता करावी जी त्वरा । स्वयंपाक सिध्द असे दातारा । भोजन होताच निर्धारा । बोलणे सहज होईल ॥१३३॥

प्रभू म्हणे मज करणे नसे भोजन । जाले असे मज पंधरा उपोषण । तुझे विहीरीत असता वस्तू पूर्ण । मजला पै प्राप्त करणे असे ॥१३४॥

तू म्हणसी वस्तूचे काय लक्षण । तरी ऐक सांगतो स्वानंदे मन । जे उपनिषदी मांडिलेसे दिव्यरत्न । ती वस्तू माझे म्हणावी ॥१३५॥

त्यास वर्णिता भागले चारी वेद । शेषादिक जाहले मतीमंद । तो स्वामी माझा पूर्णानंद । अंतरात्मा श्रीगुरु येथे असे ॥१३६॥

ती वस्तू दाखविता नये डोळा । तो डोळियाचा असे निजडोळा । ऐसा माझा पूर्णानंद पुतळा । ती वस्तू माझी पूर्ण असे ॥१३७॥

तू पाहिजे तरी करी भोजन । मज नसे कांही अन्नसेवन । ती वस्तू पाहिल्यावीण । मजला चैन न पडेचि ॥१३८॥

प्रभूचे ऐकता उत्तर । त्यानी बोलतसे प्रत्युत्तर । आपणास सोडून निर्धार । आमुचे भोजन नव्हेची ॥१३९॥

ज्याची मी करितो आराधना । तोचि साक्षात प्रगटला क्षणा । आपणास टाकून सहसा जाणा । भोजन कदापि न करी मी ॥१४०॥

मी तो केवळ पामर । आपण प्रत्यक्ष श्रीशंकर । जी आज्ञा कराल निर्धार । तदनुसार करीन मी ॥१४१॥

प्रभू म्हणे न करी रे उशीर । मशाल आणवी रे सत्वर । प्रभूचे नेत्र स्फुरलेसे साचार । केव्हा पाहीन गुरुचरणे ॥१४२॥

तेव्हा मशाल लाविती दोन तीन । प्रभू आपण काष्टासी घालून । विहीरीत देता बुडी पूर्ण । पूर्णानंदाचि येतसे त्या हाती ॥१४३॥

वरती असता अच्युत अनंत । ती मूर्ती देतसे त्यांचे हातात । काय वर्णावे तेथील आनंदा उतस्फूर्त । ब्रह्मांडगर्भी न समाये ॥१४४॥

चतुर्भुज सुहास्य वदन । सरळ नासिका आकर्ण नयन । किरीट कुंडले मंडित पूर्ण । वक्षस्थळी शोभे लक्ष्मी ॥१४५॥

शंखचक्र वराभय उत्तम । चौबाहु वाहती सदव्योम । यापरी पाहता सगुण ब्रह्म । पूर्णानंद भरते आले असे ॥१४६॥

पूर्णानंदी रंगली चित्तवृत्ती । पूर्णानंदमय जग दिसती । प्रभूस न राहे देहभ्रांती । पूर्णानंदी भरली दिगंतिही ॥१४७॥

नेत्री चालिल्यासे प्रेमांबुधारा । अष्टभाव दाटले शरीरा । त्या आनंदे बोलती श्रीलक्ष्मीवरा । स्वानंदे प्रगटले मजकरिता ॥१४८॥

धन्य धन्य माझा सदगुरु । जो पूर्णब्रह्म पूर्णावतारु । पूर्णानंद श्रीलक्ष्मीवरु । माझे लाड चालविले ॥१४९॥

अरे भक्तांनो अच्युता अनंता । माझे उपास्य पाहा रे दिव्यत्वीय ऋता । काय ओवाळावे यावरता । निगमांश केतन श्रीचरणे ही ॥१५०॥

यावरी ओवळावे जिवाचे लिंबलोण । तरी जीवन हरपलासे या आधीच मुळीपूर्ण । जीव शिवातीत बह्यत्व संपूर्ण । करुनि ठेविले नारायणे ॥१५१॥

आता या उपकारापासून । केवी मी होईन उत्तीर्ण । जो निर्गुण निराकार निरंजन । तो साकार मज करिता जाला कीं ॥१५२॥

पाहता ही मूर्ती सावळी । काय सच्चिदानंद ओतीव घडली । चरणी चित्तवृत्ती मुराली । ही सावळी मूर्ती पाहता ॥१५३॥

यापरी शिष्यासी संवादून । नायकाप्रती बोलती काय वचन । धन्यधन्य या परते भाग्य आणखिन । पूर्णानंद तवघरी प्रगटले ॥१५४॥

नेणो तू जन्म जन्मांतरी । काय आराधिलासी की श्रीहरी । तरीच पूर्णानंद तुझे विहीरी । सगुणरुपे प्रगटले ॥१५५॥

असो यापरी त्यास बोलून । मूर्तीस करिती नमस्कार पूर्ण । त्या पूर्णानंदाने पुरुषसूक्ती स्तऊन । मंगलस्नाने आभिषिंचिती ॥१५६॥

मंगलपद ती श्रीमूर्ति । मंगलमय दर्शन सर्वाप्रती । मंगलमय ज्याची किर्ती । यास्तव महापुजना करीताती ॥१५७॥

स्नान करुनी शिवरामेश्वर । नेसविले पितांबर मनोहर । भाळी लाऊनी गंध केशर । पूजा आरंभिली प्रभूराये ॥१५८॥

मांडोनी स्वानंद सिंहासन । त्यावरी बैसवी मूर्ती सगुण । जे पूर्णानंद चैतन्यघन । निज पुत्रास्तव अवतरले ॥१५९॥

ज्या मूर्तीचे करावे ध्यान । तेच असे सन्मुख पूर्ण । पूर्णानंदमूर्ती विलोकून । पूजा करी षोडषोपचारे ॥१६०॥

सप्रेम जीवनी स्नान । अष्टभावाचे अष्टगंध जाण । निजरंगाची अक्षता लाऊन । निजगुरुशी पै पूजीती ॥१६१॥

सुमनी वैजयंती माळा । रज तमासी करुनी वेगळा । शुध्द सत्वाची उधळण परिमळा । अमळ चिन्मय मूर्तीवरी ॥१६२॥

कर्माकर्माचा धूप जाळिती । देहत्रयाची करुनी वाती । अव्यक्त स्नेही भिजऊनी निगुती । अपरोक्ष ज्योती ही उजळी ॥१६३॥

सदभक्तिच्या ताटी मांडून । चौ पुरुषार्थाचे चतुर्विध अन्न । अद्वयानंद मुख झाकोन । नैवेद्य अर्पिती स्वानंदे ॥१६४॥

निष्काम पूगीफल । बावन्न मात्रका तांबूल । अमन ती दक्षिणा निर्मळ । अर्पिते जाले गुरुलागी ॥१६५॥

पंचप्राणाची आरती । सदगुरुस ओवाळिती । स्वानुभव पुष्पांजळी वाहाती । प्रार्थुनी करिती नमस्कार ॥१६६॥

करुनी द्वादश नमस्कार । प्रदक्षिणाही तदनुसार । संपुटिका जोडूनी दोन्ही कर । ध्यान करिती सप्रेमे ॥१६७॥

सप्रेम करिता ध्यान । ध्यानी लक्ष्मीस न देखता जाण । प्रभू अंतःकरणी गडबडला पूर्ण । पूर्णानंदा संप्रार्थिती ॥१६८॥

अरे माझे वक्षस्थळी पाहे । लक्ष्मीतरी स्वतः सिध्द आहे । लक्ष्मीसहित मी आहे । प्रकटलो असे तुज करिता ॥१६९॥

ऐसे वचन पडता कानी । प्रभो आनंदोनी निज अंतःकरणी । मस्तक ठेवूनी पूर्णानंद चरणी । नमन करितसे वारंवार ॥१७०॥

यापरी पूर्णानंद पूजा । करति ग्रासुनी भाव दुजा । पूज्य पुजक विराले सहजा । सहजानंदी हरपले ॥१७१॥

सहजानंदी हरता चित्तवृत्ती । तारक स्थिती प्राप्त होती । करुनी पूर्णानंद स्तवन स्तुती । सहज विराले त्याकाळी ॥१७२॥

यापरी प्रभूस भेटले पूर्णानंद । ते वेळी नायक मस्तक ठेवूनी चरणारविंद । नमस्कार करुनी बोले स्वनंदे । प्रभूलागी काय तेधवा ॥१७३॥

जय जयाजी शिवरामराया । सच्चिदानंद स्वानंद निलया । ब्रह्मादिकासी न कळे तव माया । माया परता परेशा ॥१७४॥

आपुली जी अवतार स्थिती । आपुली ही अगाध कीर्ती । अनन्यपणी चित्त विरती । ती प्रत्यया आली सर्वस्वे ॥१७५॥

येथे येता आपुले पाय । हा सगुण ब्रह्म पाहिला निश्चय । प्रारब्ध माझे उदय । मज कळीकाळाचे भय नाही ॥१७६॥

आता जाली रात्र फार । भोजनास उठावे सत्वर । आपुले उच्चिष्ठ निधार । प्राप्त होता तरेन मी ॥१७७॥

त्याचे विनंतीवरुन । दोघा शिष्यासह वर्तमान । प्रभू करीती भोजन । स्वानंद विडा पै घेती ॥१७८॥

अगाध त्याची गुरुभक्ति । अगाध त्याची निश्चळ वृत्ती । तरीच पूर्णानंद मूर्ती । सगुणरुपे अवतरली ॥१७९॥

पूर्णानंदांची जी आकृती । तैसीच अवयवयुक्त ही मूर्ती । ती मूर्ती पाहता निश्चिती । पूर्णानंदी दर्शन गमे ॥१८०॥

पूर्णानंद तो निर्गुण निराकार । निज पुत्रास्तव झाले साकार । प्रगटले असती भूवर । सगुण ब्रह्म स्वयंमेव ॥१८१॥

ही वार्ता पसरली देशोदेशी । लोक धावती दर्शनी विशेषी । मूर्तिपुढे धनराशी । आणून ठेविती सवेस्वे ॥१८२॥

सुरपुरीचा राजा आपण । पाठविता जाला अपार धन । सुखासनादि करुन । प्रभूलागी त्याकाळी ॥१८३॥

कल्याणी ही वार्ता ऐकून । पालखी पाठविले पूर्ण । यापरी पूर्णानंद महोत्सव करुन । पंचरात्र राहिले ॥१८४॥

देशो देशीचे जे लोक । दर्शनास येती भाविक । त्यांचे भोजनादिक सम्यक । प्रभू परामर्श पै करिती ॥१८५॥

ज्या विहीरीत पूर्णानंद प्रगटले । त्या आडाचे नाव लक्ष्मीतीर्थ ठेविले । अद्यापी पाहती लोक सगळे । स्वानंदयुक्त ते तीर्था सेविती ॥१८६॥

असो पुढील प्रसंगी निरुपण । पूर्णानंद मूर्ती घेऊन । प्रभू करतील प्रयाण । कल्याणासी स्वानंदे ॥१८७॥

ही कथा सुरस फार । ऐकावी अत्यादर । मस्तकी तुमचे अभयकर । असता चालेल ग्रंथ पुढे ॥१८८॥

आता पुढील अध्यायी जाण । या ग्रंथाचे शिरोभाग पूर्ण । पूर्णानंद स्वसत्तेने पूर्ण । करवितील हे जाणावे ॥१८९॥

हे चरित्र पूर्ण वैरागर । यात पूर्णानंद हिरा निरंतर । ते भाविक जन हरिसी भजती जीवनभर । साक्षात प्राप्त असे सर्वदा ॥१९०॥

हे तो हिरा अविनाश । श्रवणमात्र येईल हातास । हातास आलिया निश्चयेस । मग येणे जाणे त्या कैचे ॥१९१॥

येथे येणे जाणेच नाही । त्यास सहजानंद पद प्राप्तठायी । यास्तव हनुमदात्मज तुमचे पायी । वंदन करीतसे सप्रेमे ॥१९२॥

इति श्रीपूर्णानंद चरित्र । पूर्णानंद घडे श्रवणमात्र । जे स्वसुखाचे सुखसूत्र । सप्तदशोध्याय गोड हा ॥१९३॥

श्रीसदगुरु पूर्णानंद शिवरामार्पणमस्तु । कृष्णार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : September 27, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP